You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाहा व्हीडिओ : अस्खलित हिंदी बोलणारे दुबईचे हे अरब शेख आहेत बॉलिवूडचे फॅन
- Author, जुबैर अहमद
- Role, बीबीसी प्रतिनिधी
पांढऱ्या रंगाचा पायघोळ झगा, छान कोरलेली दाढी आणि डोक्यावर चौकड्यांचा रुमाल, अशा वेषातले अरब शेख आपल्या अगदी परिचयाचे आहेत. पण या वेषातला एखादा शेख अचानक अस्खलित हिंदीत बोलायला लागला, तर आश्चर्य वाटेल ना?
असाच आश्चर्याचा धक्का मला नुकताच दुबईत बसला. तिथले स्थानिक व्यापारी सुहैल मुहम्मद अल-जरूनी हे फक्त हिंदी बोलत नव्हते, तर त्यांच्या विचारांमधूनही भारताबद्दलचं प्रेम दिसून येत होतं. आणि बॉलिवडूबद्दल तर त्यांना विशेष प्रेम होतं.
त्यांचे आवडते कलाकार होते राज कपूर आणि दिलीप कुमार! "कपूर खानदान म्हणजे बॉलिवूडचं राजघराणं आहे," ते सांगतात.
दुबईच्या एका उच्चभ्रू भागातल्या त्यांच्या घरी जाण्याचं मला भाग्य लाभलं. घर कसलं, मोठी आलिशान हवेलीच होती ती!
एका विस्तीर्ण भूभागावर पसरलेल्या त्या हवेलीचा दिवाणखाना एवढा मोठा होता की, दिल्ली किंवा मुंबईत तेवढ्या जमिनीवर एक इमारत उभी राहिली असती.
दिवाणखान्यात एकदम सोनंच वाटावं अशा पिवळ्या रंगाची उधळण होती. त्यामुळे तिथली प्रत्येक वस्तू सोन्याची वाटत होतं.
आणि तेवढ्यात, हे अरब शेखही पिवळा पायघोळ झगा आणि त्याच रंगाचा नक्षीदार रूमाल डोक्यावर, अशा पेहेरावात समोर आले आणि स्वागताचे अगदी शुद्ध हिंदीत शब्द उच्चारले!
त्यांच्या तोंडून हिंदी ऐकून मी चकित झालो, आणि त्यांना या शुद्ध हिंदीमागचं गुपित विचारलं.
"माझे अनेक मित्र भारतीय किंवा पाकिस्तानी आहेत. माझ्याकडचे अनेक नोकर भारतीय किंवा पाकिस्तानी आहेत. त्याशिवाय बॉलिवूड आहेच. मी रोज हिंदी सिनेमा बघतो. त्यामुळे हिंदी समजू लागली."
सुहैल मुहम्मद अल-जरूनी हे दुबईतल्या सुप्रसिद्ध अल-जरूनी या व्यावसायिक कुटुंबाशी निगडीत आहेत. दुबईच्या राजघराण्याशीही त्यांचे संबंध आहेत.
दुबईत हिंदीला पर्याय नाही!
दुबईत आधीपासूनच वेगवेगळ्या भाषांची खिचडी राहिली आहे. इथल्या लोकसंख्येत स्थानिक अरबांचं प्रमाण जेमतेम 20-25 टक्के आहे. बाकी सगळे परदेशातून आले आहेत.
त्यातही भारतीयांचं प्रमाण लक्षणीय आहे. एकट्या दुबईतच 28 लाख भारतीय राहतात. म्हणून हिंदी प्रचलित आहेच.
पण यात आपली भाषा हरवून जाईल, अशी भीती अल-जरूनी यांना आहे का?
"मुळीच नाही. अरबी भाषा सगळीकडे आहे. तिला प्राधान्य दिलं जातं. तुम्ही शाळेत जा, कॉलेजमध्ये जा किंवा सरकारी कार्यालयांमध्ये जा. इंग्रजी कितीही बोलली जाऊ दे, अरबी भाषेला पर्याय नाही," अल-जरूनी सांगतात.
"आम्ही अरबी लोक कुठेही गेलो तरी आमच्या संस्कृतीला, भाषेला आणि पोशाखाला घट्टं धरून असतो."
दुबईत हिंदी आणि उर्दू भाषेला चालना देणारे भारतीय वंशाचे पुश्किन आगा सांगतात की या देशात हिंदीला पर्याय नाही.
त्यांच्या मते, "हिंदी आणि उर्दू या दोन्ही भाषा दुबईत खूप आधीपासून बोलल्या जात आहेत. अनेक अरब या दोन्ही भाषा बोलतात. अल-जरूनींसारखे अरब तर काव्यसंमेलनांमध्ये किंवा मुशायऱ्यांमध्येही सहभाग घेतात."
दुबईतही चालायचा भारतीय रुपया!
दुबई आणि हिंदी हे नातं खूप जुनं आहे. अल-जरूनी सांगतात, "युनायटेड अरब अमिरात 1971मध्ये तयार झाला. त्याआधीपासून दुबई आणि भारताचे संबंध घनिष्ट होते. इथे भारतीय चलन म्हणजे रुपया वापरला जायचा. भारतातले टपाल स्टँप चालायचे. तसंच समुद्रामार्गे दोन्ही देशांमध्ये व्यापार चालायचा."
याच प्रभावामुळे अल-जरूनी यांचे वडील, आजोबा यांच्या पिढीतले अनेक जण हिंदी बोलत होते.
अल-जरूनी यांची दुबईत स्वत:च्या मालकीची 250 घरं आहेत. त्याशिवाय त्यांच्या गाड्यांच्या 7000 मिनिएचर्स मॉडेल्सच्या संग्रहाची नोंदही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.
त्यांना भारताबद्दल विशेष आस्था आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीबद्दल त्यांना आदर वाटतो. तसाच आदर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलही वाटतो.
तब्बल 30-35 वर्षांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानांनी 2015 मध्ये युनायटेड अरब अमिरातीचा दौरा केला होता. अल-जरूनी यांच्यामते अरब जगतासाठी ही खूप मोठी गोष्ट होती.
"भारताच्या पंतप्रधानांनी आमच्या देशात दौरा करावा, ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. आम्हीही त्यांची खूप चांगली सरबराई केली," असं ते सांगतात.
'दुबईतही दिवाळी होते'
भारतातल्या 'विविधतेत एकते'चं अल-जरूनी यांना कौतुक आहे. पण त्याचबरोबर गेल्या काही वर्षांमध्ये घडणाऱ्या घटनांमुळे ते चिंतेत आहेत.
ते सल्ला देतात, "भारतीयांनी आपल्या डोक्यात एक गोष्ट स्पष्ट ठेवायला हवी. त्यांनी सर्वांत आधी त्यांच्या देशाचा विचार करायला हवा आणि नंतर धर्म वगैरेंचा."
ते सांगतात की, दुबईत सगळ्या धर्मांना समान आदर दिला जातो.
त्यांच्यामते अरब विश्वाविषयी जगभरात काही गैरसमज आहेत. ते सांगतात, "अनेक लोकांचं म्हणणं असतं की अरब भारतीयांशी, हिंदूंशी किंवा इतर कोणत्याही परदेशी नागरिकांशी बोलत नाहीत. पण हे चूक आहे. आम्ही इथं होळी खेळतो, दिवाळी आणि दांडिया साजरे करतो. भारतानंतर कदाचित दुबईतच दिवाळी एवढ्या जल्लोषात साजरी होत असेल."
इंग्रजीबरोबरच हिंदीही महत्त्वाची
भारतीय लोक हिंदीऐवजी इंग्रजी भाषेला प्राधान्य देतात, हे बघून अल-जरूनी यांना वाईट वाटतं.
"मी एक अरब असूनही अस्खलित हिंदी आणि उर्दू बोलतो. तुम्हीही तुमच्या मुलांना या भाषा शिकवल्याच पाहिजेत," असं आवाहनही अल-जरूनी करतात.
अरबांच्या पुढल्या पिढ्यांनीही हिंदी शिकायला हवं, अशी त्यांची इच्छा आहे.
"या नव्या पिढ्यांना हिंदी समजतं, पण ते बोलत नाहीत. आता हिंदी चित्रपट अरबी भाषेत डब केले जातात, त्यामुळे मग हिंदी ऐकण्याचा संबंधच येत नाही," ते सांगतात.
"तसंच या नव्या पिढीतली मुलं पाश्चात्य देशांमध्ये शिकायला जातात आणि तिथून इंग्रजी शिकून येतात," असं अल-जरूनी सांगतात.
मग ते आपल्या मुलांनाही हिंदी शिकवतात का?
अल-जरूनी सांगतात की त्यांना त्यांच्या मुलांवर हिंदी शिकण्याची सक्ती करायची नाही. पण तरीही मुलांनी हिंदी शिकायला हवी, असं त्यांना मनापासून वाटतं.
तुम्ही हे वाचलं आहे का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)