You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचा शुभविवाह मे महिन्यात
- Author, मिशेल हुसैन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचा विवाह विंडसर कॅसलमधल्या सेंट जॉर्ज चॅपेलमध्ये येत्या मे महिन्यात पार पडणार असल्याचं केंजिंग्टन पॅलेसमधल्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.
शाही विवाह सोहळा, संगीताचा विशेष कार्यक्रम आणि रिसेप्शन हे सोहळे ब्रिटीश राजघराण्याच्या वतीनं साजरे केले जाणार आहेत. या विवाहाची तारीख काही दिवसांनी जाहीर केली जाणार आहे.
नागरिकांनी शाही विवाह सोहळ्यातील प्रत्येक प्रसंग अनुभवावा अशी इच्छा प्रिन्स हॅरी यांनी व्यक्त केल्याची माहिती पॅलेसमधल्या जेसन नॉफ यांनी दिली आहे.
विंडसर पॅलेस या जोडप्याची आवडती जागा असून जुलै 2016 पासून हे जोडपं विंडसर पॅलेसमध्ये भेटत असल्याचंही नॉफ म्हणाले.
पाहता क्षणी प्रेमात पडलो
"मेगनला पाहता क्षणीच मी तिच्या प्रेमात पडलो, हाच पुरावा आहे योग जुळून आल्याचा." प्रिन्स हॅरी मेगनबाबत सांगतात.
बीबीसीच्या मिशेल हुसैन यांच्याशी बोलताना या जोडप्यानं सांगितलं की, ते एका ब्लाइंड डेटवर भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. त्याआधी एकमेकांविषयी त्यांना फारशी माहिती नव्हती.
प्रिन्स हॅरी सांगतात, 'सुंदर' मिस मार्कल माझ्या आयुष्यात अचानक आली आणि माझीच झाली.
आई दिवंगत प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना असत्या तर मेगन आणि त्या चांगल्या मैत्रीणी होऊ शकल्या असत्या. अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
प्रपोजचं गुपित केलं उघड
या महिन्याच्या सुरवातीला केंजिंग्टन पॅलेसमध्ये एका रात्री रोस्ट चिकन बनवत असताना प्रिन्स हॅरी यांनी मेगनला प्रपोज केलं होतं. बीबीसीच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी हे गुपित उघड केलं.
"माझ्यासाठी ते एक अद्भूत आश्चर्यासारखंच होतं. तो गुडघ्यावर बसला. अगदी गोड. साधेपणानं. व्हेरी रोमँटीक." मेगन सांगते.
यावेळीच वेळी प्रिन्स हॅरी सांगतात, माझी वाक्य संपायच्या आधीच ती म्हणाली, 'मी हो म्हणू का?'
"मग आम्ही एकदुसऱ्याला मिठी मारली आणि माझ्या हातात एक अंगठी होती."
"मी विचारलं, 'मी तुझ्या बोटात अंगठी घालू शकतो का?' ती म्हणाली : 'ओह येस द रिंग' खरंच तो सुखद क्षण होता."
मेगनकडे वळून हॅरी म्हणतात, "आणि मी तुला सरप्राइज देण्यात यशस्वी झालो."
कॉमन मैत्रिण ठरली दुवा
अमेरिकतील सुटस् नावाच्या प्रसिद्ध मालिकेत काम करणाऱ्या 36 वर्षीय अभिनेत्रीनं अभिनयाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या नव्या भूमिकेवर अधिक लक्ष देण्याचं आता तिनं ठरवलं आहे.
मेगन आधीपासूनच मानवतावादी चळवळींत काम करत आहे. संयुक्त राष्ट्राची महिला सल्लागार म्हणूनही ती कार्यरत आहे.
मेगन म्हणते, "मी याकडे काहीतरी सोडून दिल म्हणून बघत नाही. तर मी याकडे बदल म्हणून बघते. नवीन अध्याय सुरू होत आहे."
प्रिन्स हॅरीकडे वळून ती म्हणते, "आता तुझ्यासोबत एक टीम म्हणून काम करायचं आहे."
त्यावर प्रिन्स हॅरी दुजोरा देतात,"मला माहित आहे, ती नवी भूमिका ती उत्तमपणे निभावेल."
एका कॉमन मित्राच्या मदतीनं दोघं ब्लाइंड डेटवर भेटले होते. बोत्सवानाला सुट्टीवर जाण्याआधी पुन्हा एकदा भेटल्याच दोघं सांगतात.
"मला वाटतं तीन ते चार आठवड्यांनंतर ती माझ्या बरोबर यायला तयार झाली." हॅरी सांगतात.
"ती माझ्यासोबत पाच दिवस होती. अगदी विलक्षण होतं ते सारं. चांगल्या बदलासाठी आम्ही दोघंही उत्कट होतो."
मेगन म्हणाली, "आम्ही भेटल्यावर कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या गोष्टी आम्ही करू शकतो आणि जगात बदलासाठी आम्ही कितपत पॅशनेट आहोत यावर चर्चा केली."
वडील गौरवर्णीय आणि आई आफ्रिकन-अमेरिकन असल्याबद्दल होणाऱ्या चर्चेमुळे आपण नाराज झाल्याचं मेगन सांगते.
"मला अभिमान वाटतो की मी कोण आहे आणि कुठून आले आहे... मी फक्त आमच्या दोघांच्या आयुष्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे."
जुलै 2016 मध्ये दोघांची भेट घडवून आणणाऱ्या कॉमन मैत्रीणीचं नाव मात्र जाहीर करण्यास दोघांनी नकार दिला.
" मात्र जेव्हा आम्ही दोघं एकत्र राहण्याचा निर्णय घेण्यापर्यंत आलो तेव्हा मात्र मी त्या कॉमन मैत्रिणीला विचारलं,'तो खरंच चांगला आहे का?' तो जर चांगला नसेल तर हे करण्यात काहीच अर्थ नसेल." मेगन सांगत होती.
लंडनमध्ये पहिल्यांदा मेगनला भेटण्यापूर्वी ती काय करते प्रिन्स हॅरींना माहिती नव्हतं. तिचा टीव्ही शो सुद्धा त्यांनी पाहिला नव्हता.
लंडनमधल्या केंजिंग्टन पॅलेसबाहेर या जोडप्यानं फोटोसाठी पोज दिल्या. याच ठिकाणी हे नवं जोडपं राहणार आहे.
प्रिन्स हॅरी सांगतात, मला हे रोमांचकारी वाटतयं. तर मेगन खूपच आनंदी आहे.
सफेद रंगांचा बेल्ट लावलेला कोट घालून मेगन प्रिन्स हॅरी सोबत फोटोग्राफीसाठी बाहेर आली होती. केंजिंग्टन पॅलेसच्या संकेन गार्डनमध्ये मीडियाच्या गराड्यात येताच प्रिन्स हॅरी यांचा हात तिनं हातात घेतला. यावेळी डायमंडची एंगेजमेंट रिंगही तिनं सर्वांना दाखवली.
तुम्हाला असं कधी वाटलं की मेगन "ही तीच आहे" असं पत्रकारानं विचारल्यावर प्रिन्स हॅरी लगेचच उत्तरले "अगदी पहिल्या भेटीतच."
लेडी डायनाची आठवण
मेगनच्या एंगेजमेंट रिंगचं डिझाईन प्रिन्स हॅरी यांनी केलं आहे. त्यात त्याच्या आईची आठवण असलेले दोन हिरे लावण्यात आले आहेत.
तर मध्यभागी मढवलेला हिरा खास बोत्सवानाहून मागवण्यात आला आहे.
हे हॅरीच्या विचारशीलपणाचं लक्षण असल्याचं मेगन म्हणाली.
ती कधीच त्यांच्या आईला भेटू शकली नसली तरी ती म्हणाली, "याद्वारे ती आमचाच एक भाग असल्याचं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे."
तर महाराणींना आपण दोनहा भेटल्याचं मेगन सांगते. त्या अतुलनीय महिला असल्याचं ती म्हणा.
मुलांबाबत प्रश्न विचारल्यावर "एकावेळी एकच. पण, नजीकच्या भविष्यात आम्ही कुटुंबाचा नक्कीच विचार करू." असं उत्तर हॅरी यांनी दिलं.
मेगन लॉस एंजेलिसमधल्या मध्यमवर्गीय वातावरणात लहानाची मोठी झाली आहे. खाजगी कॅथलिक शाळेत तिचं शिक्षण झालं आहे.
अभिनयात करिअर करताना तिनं नॉर्थवेस्टर्न युनिर्व्हसिटी स्कूल ऑफ कम्युनिकेशनमधून पदवीपर्यंतची शिक्षणही पूर्ण केलं आहे. मेगनला राजघराण्याची कोणतीही पार्श्वभूमी नाही.
या एंगेजमेंटच्या घोषणानं आपल्या फारच आनंद झाल्याचं सांगत या जोडप्याचं लग्न कँटरबरी चर्चमध्ये होण्याचे संकेत तिथल्या आर्चबिशपनं दिले आहेत.
मेगन घटस्फोटीत आहे. पण, चर्च ऑफ इंग्लडनं 2002 मध्येच घटस्फोटीत लोकांना पुन्हा चर्चमध्ये लग्न लावण्याची परवानगी दिली आहे.
तुम्ही हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)