You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लग्नानंतर व्यक्तिमत्वात खरंच बदल होतो का?
- Author, ख्रिस्चन जॅरेट
- Role, बीबीसी फ्युचर
आजकाल कुठेही पार्टीला गेलं, मग ती ऑफीसची पार्टी असो किंवा एखाद्या लग्नाचं रिसेप्शन, एक प्रश्न नेमका पडतो - "हल्ली अनेक महिला तिशीतही अविवाहित का असतात?" आजूबाजूला एक नजर टाकली की लक्षात येतं की ही "सिंगलम सदासुखी" असं मानणारी बरीच महिलामंडळी आहे. आणि ही संख्या वाढत आहेच.
लग्न झाल्यावर खरंच आत्मिक समाधान मिळतं का, हे जरी मानसशास्त्रज्ञांसाठी आजही कोड असेल, तरीही संशोधनाअंती असं लक्षात आलं आहे की, आयुष्याचा जोडीदार मिळाल्यावर आपल्या व्यक्तिमत्त्वात काही न काही चांगला-वाईट बदल होतोच, आणि तो राहतो, अगदी मरेपर्यंत.
यात तथ्य आहे. कारण देवा-ब्राह्मणाच्या साक्षीनं लग्न केल्यानंतर एक प्रकारची निष्ठा असावी लागते. अनेकांना हा बदल जाचक वाटू शकतो, कारण एखाद्या व्यक्तीबरोबर अख्ख आयुष्य दिवसरात्र सोबत राहण्यासाठी संयम आणि मुत्तसद्दीपणा लागतो.
व्यक्तीमत्त्वात काहीही बदल झाले तरी हा विषय अतिशय गहन आहे, म्हणून या विषयावर जगभर संशोधन सुरू आहे.
पण जगभरात दरवर्षी इतके लग्न होत असले तरी आश्चर्याची बाब म्हणजे या विषयावर फारसं संशोधन उपलब्ध नाही.
जर्मनीत गेल्या चार वर्षांत 15,000 व्यक्तींना घेऊन हे संशोधन करण्यात आलं आहे. त्यापैकी 664 व्यक्तींचं लग्न तर हा अभ्यास सुरू असतानाच झालं.
त्यानं एक बरं झालं, संशोधन करणाऱ्या ज्युल स्पेक्ट यांना असे लोकही मिळाले, ज्यांचं लग्न झालं आहे, जे अविवाहित आहेत आणि जे संशोधनादरम्यान लग्नाच्या बेडीत अडकले.
संशोधकांना असं लक्षात आलं की लग्नानंतर या लोकांच्या व्यक्तिमत्त्वात तो आधीसारखा खुलेपणा राहिला नाही.
हा फरक खरंतर काही नवीन नाही. पण आमचे मित्र लग्नांतर बदलतात, या अविवाहित मित्रांच्या दाव्याला बळकटी मिळाली.
स्त्रियांच्या बाबतीत हा बदल प्रकर्षाने जाणवला होता. 2000 साली अमेरिकेत अशाच एका अभ्यासातून हा निष्कर्श काढण्यात आला होता खरा, पण त्या सर्वेक्षणात फक्त 2000 व्यक्तीच सहभागी झाले होते. त्या वेळी 2000 पैकी 20 स्त्रिया विवाहित होत्या आणि 29 स्त्रियांचा घटस्फोट झाला होता.
ज्यांचा घटस्फोट झाला होता त्या जास्त खुलेपणाने वागत होत्या कारण त्या लग्नाच्या बंधनातून मुक्त झाल्या होत्या. मात्र नवीन लग्न झालेले पुरुष जास्त काळजी घेणारे पण कमी चिंता करणारे झाले होते.
लग्नानंतर जास्त काळजी घेणं खरंतर स्वाभाविक आहे. ज्यांचं लग्न झालं आहे किंवा जे बराच काळ प्रेमसंबंधात आहेत, त्यांना कल्पना असेलच की लग्न नावाची ही बोट वल्हवणं सोपं नाही. शांत समुद्रातून ही बोट नेताना अधूनमधून मोठ्या आणि कधी वादळी लाटांचा सामना करावा लागतो.
लग्न झाल्यावर हे गुण तसे येतातच, असं नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधातून समोर येतं.
टिलबर्ग विद्यापीठातल्या डच वैज्ञानिक टिला प्राँक यांच्या चमूने या विषयावर अभ्यास केला आहे. त्यानुसार एक लग्नसंबंध टिकवून ठेवण्यासाठी दोन गुणांची नितांत आवश्यकता असते - स्वनियंत्रण (भांडण्यात कुठं शब्द गिळायचा, हे कळणं) आणि क्षमाशीलता (जेणेकरून आपल्या जोडीदाराकडून झालेल्या सगळ्या चुका पोटात घालू शकतो).
संशोधकांनी 199 नवविवाहित जोडप्यांचा अभ्यास केला की लग्नानंतरच्या पहिल्या तीन महिन्यात कोण किती क्षमाशील होतं. हे मूल्यांकन करताना 'जेव्हा जेव्हा जोडीदार चुकला तेव्हा त्याला क्षमा करून विसरणं, आणि अनेक इच्छा नियंत्रित कऱणं' या दोन गोष्टींवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं.
हा अभ्यास त्यांनी पुढची अनेक वर्षं सुरू ठेवला.
निकालांमध्ये असे लक्षात आलं की, जसा अभ्यास पुढे गेला तशी या लोकांवरची क्षमाशीलता आणि स्वनियंत्रण वाढलं. क्षमाशीलता जरी एका मर्यादेपर्यंत होती तरी स्वत:वरचं नियंत्रण मात्र प्रचंड प्रमाणात वाढलं.
पण लग्नानंतर काळांतरानं विरळ होणाऱ्या समाधानाचं काय?
लग्नानंतर समाधान कमी होतं का, यासंदर्भात एक अभ्यास करण्यात आला. आणि त्याचे निष्कर्ष होकारार्थी उत्तरातून निघाले.
लग्नानंतर समाधानाची पातळी वाढते खरी, पण एका वर्षात ती पुर्वपदावर येते. त्यामुळे जे लोक तिशीतसुद्धा अविवाहित आहेत, त्यांच्यासाठी हा निष्कर्ष आनंदाची बातमी देणारा आहे.
मात्र मनासारखा जोडीदार मिळाल्यानं काहींचं हे समाधान आयुष्यभर टिकलं.
आणि सर्वांत महत्त्वाचा मुद्दा - लग्नानंतर काळांतरानं जोडीदार एकमेकांसारखे होतात, या समजाबद्दल संशोधन काय म्हणतं?
हे स्पष्ट करणारं एक सोपं उदाहरण म्हणजे पार्कात एकसारखे कपडे घालून फिरणारे आजी-आजोबा.
पण खरंतर हा गोड गैरसमज आहे. कारण ज्या दाम्पत्यांचं लग्न दीर्घकाळ टिकलं आहे, ते मग एकमेकांसारखेच राहिले-वागले असते.
आणि तसंही या पाठिंबा देणारं कोणतंच तथ्य समोर आलं नाही. मिशिगन विद्यापीठाने 1,200 दाम्पत्यांवर या दृष्टिकोनातून अभ्यास केला होता.
कारण सोपं आहे - जे दोन व्यक्ती एकसारखे असतात त्यांचंच लग्न होतं.
तर संशोधनाअंती असं लक्षात आलं आहे, की लग्नानंतर व्यक्तिमत्त्वात थोडेफार बदल होतात. पण एकदा का मुलं झाली की या सगळ्या गोष्टींचा विचार करायला वेळही नसतो.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)