इटलीमधल्या या महिलेनं स्वत:शीच लग्न केलं

एका इटालियन महिलेनं पांढरा ड्रेस, तीन-थरांचा वेडिंग केक, ब्राईड्समेड आणि 70 पाहुण्यांसह एकदम थाटामाटत स्वत:शीच विवाह केला.

"आपण सगळ्यांनी सर्वांत पहिलं स्वत:वर प्रेम करायला हवं, असं मला वाटतं", असं 40 वर्षांची ही फिटनेट ट्रेनर लॉरा मेसी ठामपणे सांगते. "राजकुमारशिवायही तुमची परीकथा होऊ शकते", असंही ती सांगते.

ही आहे या लॉरा मेसीच्या लग्नाची गोष्ट.

लॉराच्या या लग्नाला कायदेशीररित्या महत्त्व नाही. पण मेसी आता जगभरात सुरू झालेल्या असलेल्या 'सोलोगमी लीग'मध्ये सामील झाली आहे.

जगभरात स्वत:शीच लग्न करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. याला 'सोलोगमी' असंही म्हणतात.

स्वतःवर प्रेम करणं आणि एकट्यानं जगणाऱ्यांना समाजानं स्वीकारावं यासाठी असे समारंभ केले जातात, असं या ट्रेंडमध्ये सामील असणाऱ्या समर्थकांचं म्हणणं आहे. विवाहित जोडप्यांना मिळणारी समाजमान्यता एकट्यानं राहणाऱ्यांनाही मिळावी, असंही त्यांचं म्हणणं आहे.

"दोन वर्षांपूर्वी मला सोलो वेडिंगबद्दल समजलं. 12 वर्षांचं माझं रिलेशनशिप संपलं होतं", असं लॉरा सांगते.

ला रिपब्लिका वृत्तपत्राशी बोलताना तिनं सांगितलं, "मला माझ्या वयाच्या चाळिशीपर्यंत योग्य जोडीदार मिळाला नाही तर मी स्वतःशीच लग्न करणार असल्याचं मी घरच्यांना आणि मित्रांना सांगून ठेवलं होतं".

"जर पुढे कधी माझ्या अयुष्यात असा कोणी मुलगा आलाच ज्याच्यासोबत मी भविष्याचा विचार करू शकेन, तर त्याचा मला आनंदच आहे, पण मी आनंदी राहण्यासाठी त्याच्याशी होणाऱ्या लग्नावर अवलंबून राहणार नाही."

सोलो वेडिंगचा ट्रेंड

स्वत:शीच लग्न करणारी मी पहिलीच इटालियन स्त्री आहे, असं मेसी सांगते. यापूर्वी नेपल्समध्ये नेल्लो रुजिएरो नावाच्या व्यक्तीने मे महिन्यात स्वत:शीच लग्न केलं होतं.

जपानमध्ये, एका ट्रॅव्हल एजन्सीने 2014ला एकट्या महिलांचे विवाह सोहळे आयोजित करायला सुरुवात केली.

स्वतःशीच लग्न करणाऱ्यांच्या नोंदी 1993 पासून सापडतात. अनेक पुस्तकांमध्येही याचा उल्लेख आहे.

सेक्स अँड द सिटी आणि ग्ली या प्रसिद्ध टीव्ही शोमध्येही या सोलो वेडिंग संकल्पनेवर आधारित काही भाग रचलेले होते.

अमेरिकेत, 'आय मॅरीड टू मी' नावाची वेबसाईट स्वत:शीच विवाह करण्यांना लग्नासंदर्भातल्या सगळ्या सेवा पुरवते.

कॅनडामध्ये 'मॅरी युव्हरसेफ व्हँकुव्हर' नावाची एजन्सी गेल्या वर्षापासून सोलो वेडिंग वाढल्याचं नमूद करते. याचं कारण एकट्या राहणाऱ्या तरुणांची संख्या वाढते आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.

"Single is new normal. आपलं सोलो स्टेटस साजरं करा", असं या एजन्सी ब्रीदवाक्य आहे.

आत्मपूजनाचा प्रकार?

पण सगळ्यांनीच या ट्रेंडचं स्वागत केलं आहे, असं नाही. काही जणं याला आत्मपूजन करण्याचा प्रकार म्हणतात आणि काही जण पुरुषप्रधान संस्कृतीच्या विरोधाचा हा निरर्थक मुद्दा असल्याचं सांगतात.

मेसीच्या लग्नाच्या फोटोखालच्या अभिनंदनाच्या प्रतिक्रियांमध्ये, "वाईट गोष्ट आहे", "तुला वेड लागलं आहे का?", "तुझं डोकं ठिकाणावर आहे ना?" अशा प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

गेल्या महिन्यात स्वत:शीच लग्न केलेल्या सोफी टॅनरने 'बीबीसी थ्री'ला सांगितलं की, काही लोक तिला "सॅड फेमिनिस्ट" असं म्हणतात.

मेसीने अशा खोचक प्रतिक्रियांवर, 'माझ्या चेहऱ्यावरचा आनंद कुणीही आणि कशानंही हिरावू शकणार नाही', असं म्हटलं आहे.

मीडियाला दिलेल्या मुलाखतीत मेसी म्हणते, "सोलो वेडिंग हा प्रकार सगळ्यांना परवडणारा नाही. स्वत:शी विवाह करण्यासाठी, तुमच्याकडे पैसे हवेतच. शिवाय, तुम्हाला यासाठी पाठिंबा देणारी माणसंही आवश्यक आहेत."

थोडा वेडेपणा करण्याची तयारी असणं गरजेचं आहे, असंही ती सांगते.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)