You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बालदिन विशेष : शिक्षणासाठी बंड पुकारत सुनीताने रोखला स्वत:चा बालविवाह
- Author, श्रीकांत बंगाळे आणि अमेय पाठक
- Role, बीबीसी मराठी
सुनीता देविदास उबाळे ही जालना जिल्ह्यातल्या नंदापूर इथं राहते. सातवीत असतानाच सुनीताच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं. लग्न ठरवताना ना तिला त्याची कल्पना देण्यात आली, ना तिची मर्जी विचारात घेण्यात आली.
त्यामुळे मुलगा कोण आहे, कसा आहे, काय करतो, याबद्दल तिला काहीही माहीत नव्हतं. काही दिवसातच नातेवाईकांच्या दबावाखाली सुनिताच्या आई-वडिलांनी तिचा साखरपुडाही उरकला.
जेमतेम 12-13व्या वर्षी सुनिताला लग्न करायचं नव्हतं. तिला शिकायचं होतं. सरकारी अधिकारी व्हायचं होतं.
सुनीताने सर्वप्रथम घरच्यांना आणि नातेवाईंकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यश मिळत नाही हे लक्षात आल्यावर ती शाळेतल्या तिच्या शिक्षकाकडे गेली आणि त्यांना लग्नाबद्दल सांगितलं.
त्या वेळी काही दिवसांपूर्वीच जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुनीताच्या शाळेत जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचं आयोजन केलं होतं. स्पर्धेनंतर शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शाळेतल्या शिक्षकांना त्यांचा मोबाईल क्रमांक दिला होता.
मग सुनीताने शाळेतल्या शिक्षकाकडून जालन्याचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राधाकृष्णन यांना फोन लावला. "इच्छा नसतानाही माझं लहान वयात लग्न करून दिलं जात आहे," असं तिनं फोनवरून त्यांना कळवलं.
त्यांनीही वेळ न घालवता 'सर्व शिक्षा अभियाना'साठी काम करत असलेल्या टीमला सुनीताच्या गावी पाठवलं. अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचं लग्न करणं कायद्यानं कसं अयोग्य आहे, त्याचे काय परिणाम होतात, हे या टीमनं सुनीताच्या पालकांना समजावून सांगितलं.
मग सुनीताच्या पालकांनीही आपला निर्णय मागे घेतला. आणि सुनिताला पुढे शिकायची संधी मिळाली.
पण लग्न का करणार होते?
सुनीताचे वडील देविदास उबाळे यांना पाच अपत्य आहेत - तीन मुली आणि दोन मुलं. घरी फक्त दीड एकर शेती. तीही कोरडवाहू.
पहिल्या दोन मुलींची लग्न करताना त्यांचं कबरडं मोडलं होतं.
त्यांनी सांगितलं, "पोरीला शिकवायला मही 10 रुपयाची ऐपत नव्हती. शेतात काही माल होत नाही. मग काय करणार होतो तिला घरी ठेवून?"
अठरा वर्षांखालील मुलीचं आणि 21 वर्षांखालील मुलाचं लग्न कायद्याने करणं गुन्हा आहे, हे समजल्यावर आपण चुकत आहोत, याची जाणीव त्यांना झाली.
"आता पोरगी स्वत:हून शिकत आहे. जोवर तिला शिकायचं आहे, तोवर ती शिकेल. जोवर तिची शिकायची इच्छा संपत नाही, तोवर तिच्या लग्नाचा विषय काढणार नाही," असं त्यांनी पुढे सांगितलं.
बालविवाह थांबवण्याचा इम्पॅक्ट
बालविवाह थांबल्यानंतर सुनीता सर्व शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांसोबत गावोगावी जाऊन बालविवाहाबद्दल जनजागृती करू लागली.
"माझ्या आई-वडिलांनी माझं लग्न लहान वयात ठरवलं होतं. पण तुम्ही तसं करू नका. जसं माझ्यासोबत झालं, तसं तुमच्या मुलींसोबत करू नका," असं ती गावोगावच्या महिलांना सांगून त्यांच्या मुलींचा बालविवाह न करण्यासाठी प्रवृत्त करू लागली.
महिलाही तिची कहाणी ऐकून प्रेरित होतात.
"आम्ही आमच्या मुलीचं लवकर लग्न करणार नाही. कारण तुझं ऐकल्यापासून आम्हाला समजलं की, मुलगी पण अधिकारी बनू शकते. मुलगी पण कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही," असं त्या महिला सुनीताला सांगतात.
मुख्य कार्यकारी अधिकारी व्हायचं स्वप्न
सुनीता सातवीपर्यंत गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकली. आठवीत तिला केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत बदनापूरच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात प्रवेश मिळाला.
दहावीपर्यंतचं शिक्षण तिनं तिथंच पूर्ण केलं. नंतर मात्र कॉलेजच्या शिक्षणाचा खर्च परवडत नसल्यानं तिला पुन्हा गावाकडं परतावं लागलं.
आज ती गावातल्या शाळेत बारावीत शिकत आहे. इतकी सगळी उठाठेव झाली पण तिचं ध्येय कायम आहे.
"मी लहानपणी लग्न केलं नाही, कारण मला शिकायचं होतं. कितीही अडचणी आल्या तरी मी शिक्षण सोडणार नाही. कारण मला मुख्य कार्यकारी अधिकारी व्हायचं आहे."
जबरदस्तीविरोधात आवाज उठवा!
आपल्यावर घडलेल्या प्रसंगातून सुनीता ना केवळ स्वत: सावध आहे, ती समाजात एक सावधतेचा संदेश पसरवत आहे.
"मुलींनो, तुमच्या स्वत:मध्ये हिंमत असायला पाहिजे. घरच्यांनी लग्नासाठी जास्त जबरदस्ती केली, तर त्या विरुद्ध बोलायची तुमच्यामध्ये हिंमत असायला पाहिजे."
कारण मुलीने जर ठामपणे नकार दिला, तर आई-वडीलच काय, कोणीच काही करू शकत नाही."
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)