International Dog Day : ती इतकी रडली की चोरांनी परत केलं कुत्र्याचं पिलू!

चोरीमध्ये घरातल्या वस्तूंसोबत चोरून नेलेलं कुत्र्याचं पिल्लू चोरांनी परत केल्यामुळं चार वर्षांच्या मुलीच्या आनंदाला पारावार उरला नाही.

मेलबर्नमध्ये एका घरी चोरी झाली. चोरट्यांनी बाकी ऐवजाबरोबर दीड-दोन महिन्यांचं साशा नावाचं लॅब्रेडॉर जातीचं कुत्र्याचं पिल्लूसुद्धा चोरलं होतं. या चोरीनंतर घरातील चार वर्षांची मुलगी माइया ही खूप नाराज झाली होती.

"माइयाचा बेस्ट फ्रेंड चोरीला गेल्यामुळं आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत," असं माइयाच्या पालकांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितलं. चोरी झाल्याच्या दोन दिवसानंतर घराच्या गार्डनमध्ये साशा परतली.

"चोरांचं मन बदललं असावं म्हणून त्यांनी हे कुत्र्याचं पिल्लू परत केलं," असं व्हिक्टोरिया पोलिसांनी सांगितलं.

कुत्र्याचं पिल्लू घेऊन एक आठवडा झाल्यानंतर ही चोरी झाली. घरातील काही वस्तूंसोबत हे पिल्लू देखील चोरांनी नेलं होतं.

"ते पिल्लू परत करा. माझी मुलगी रडायची थांबत नाही," असं आवाहन श्वानमालक रायन हूड यांनी स्थानिक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चोरांना केलं होतं.

"हे कुत्रं परत येईल अशी आम्हाला फार आशा नव्हती, पण गुरुवारी सकाळी माझी पत्नी नेहमीप्रमाणं उठली. तिनं कॉफी बनवली. तिची नजर बगीचाकडं गेली. तिथं काहीतरी हलत आहे असं दिसलं."

"जवळ जाऊन पाहिलं तर साशा असल्याचं लक्षात आलं. ज्यानं हे कुत्र्याचं पिल्लू नेलं असेल, एकतर त्यांची सदसद्विवेकबुद्धी जागृत झाली असावी किंवा ते साशाला घाबरले तरी असावेत," असं हूड म्हणाले.

"पण या कुत्र्याच्या घरी परतण्यामुळं आम्हाला खूप आनंद झाला आहे," असं ते पुढं म्हणाले.

या कुत्र्याच्या घरी येण्यामुळं कुटुंबीयांना आनंद झाला असला तरी आम्ही चोरीचा तपास सुरू ठेवणार असल्याचे व्हिक्टोरिया पोलिसांनी म्हटलं.

"या चोरीमध्ये एक लॅपटॉप आणि आयपॅड चोरीला गेला होता. या वस्तू अजून मिळाल्या नाहीत," असं सिनियर कॉन्स्टेबल अॅडम लेगो यांनी सांगितलं.

"कुत्र्याच्या पिल्लाची चोरी का करण्यात आली होती आणि त्यांनी ते परत का केलं हे सर्व समजण्यापलीकडचं आहे," असं ते म्हणाले.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)