You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उत्तर कोरियानं सोडलेलं मिसाईल 'जागतिक संकट': अमेरिका
उत्तर कोरियानं बुधवारी सकाळी आजवरचं सर्वाधिक शक्तिशाली बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं डागलं आहे. आता थेट वॉशिंगटन त्यांत्या माराच्या टप्प्यात आल्यानं अमेरिकेनं या मिसाईल चाचणीला जागतिक संकट म्हटलं आहे.
पेंटागॉननं दिलेल्या माहितीनुसार, हे क्षेपणास्त्र 1,000 किमींपर्यंत जाऊन जपानच्या समुद्रात पडलं. हे आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असल्याचा प्राथमिक अंदाज अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयानं व्यक्त केला होता.
उत्तर कोरियानं यापूर्वी सप्टेंबरमध्ये बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागलं होतं. त्या घटनेच्या काही दिवसांपुर्वीच त्यांनी सहावी अणूचाचणी केली होती.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेचे सुरक्षा सचिव जेम्स मॅटिस यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना माहिती दिली.
"आजवरच्या सर्व क्षेपणास्त्रांपेक्षा हे सर्वांत उंचावर गेलं होतं. उत्तर कोरियाच्या या चाचण्या म्हणजे जागतिक संकंट आहे," असं मॅटिस म्हणाले.
उत्तर कोरियानं प्योंगयांग येथून हे क्षेपणास्त्र डागल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या योंहॅप या वृत्तसंस्थेनं दिली आहे.
हे क्षेपणास्त्र 50 मिनिटं हवेत होतं, पण जपानवरून गेलं नाही, असं जपान सरकारच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
'अमेरिका माऱ्याच्या टप्प्यात'
गेल्या अनेक महिन्यांपासून उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप सध्या एकमेकांविरोधात युद्धखोरीची भाषा करताना दिसत आहेत.
त्याचं मुख्य कारण म्हणजे उत्तर कोरियानं आपल्या शस्त्रागारातील अनेक शस्त्रांच्या चाचण्या घेण्यास सुरुवात केली आहे.
उत्तर कोरियानं जुलै 2017च्या पहिल्या आठवड्यात व्हॉसाँग-१४ या सर्वाधिक मारक क्षमता असलेल्या आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाईलची (ICBM) यशस्वी चाचणी केल्याचा दावा केला होता.
त्यानंतर लगेचच अमेरिकेची सगळी राज्य त्यांच्या माऱ्याच्या टप्प्यात आल्याचा दावा प्योंगयांगमधल्या अधिकृत सूत्रानीं केला होता. अमेरिकी लष्करी सूत्रांनी मात्र या वृत्ताचं खंडन केलं आहे.
तरी उत्तर कोरियानं डागलेली क्षेपणास्त्र अमेरिका आणि अलास्कापर्यंत पोहोचू शकतील, अशी भीती काही अमेरिकेच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
उत्तर कोरियाचा क्षेपणास्त्र कार्यक्रम
दुसऱ्या महायुद्धानंतर उत्तर कोरियाच्या शस्त्रागारात नव-नव्या शस्त्रांची भर पडली आहे. सध्या अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्तर कोरियानं क्षेपणास्त्रांची निर्मिती केली आहे. यात प्रामुख्यानं लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.
इजिप्तमधून 1976च्या सुमारास उत्तर कोरियाला क्षेपणास्त्र निर्मितीसाठी मदत मिळाली. व्हॉसाँग हा क्षेपणास्त्रांचा प्रमुख कार्यक्रम 1984 साली उत्तर कोरियानं सुरू केला.
या व्हॉसाँग क्षेपणास्त्रांचा पल्ला 1,000 किमीपर्यंत आहे. तसंच ते रासायनिक आणि जैविक हल्लेही करू शकतात.
26 जुलै 2017 ला उत्तर कोरियानं जपान नजीकच्या सागरी क्षेत्रात 3,000 किमी मारक क्षमतेच्या एका आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
यानंतर उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाबद्दल जगभरात उलटसुलट चर्चा सुरू झाली. काही आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मते तर उत्तर कोरियाचा हा कार्यक्रम त्यांची अमेरिकेवर हल्ला करण्याची पूर्वतयारी आहे.
आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे
संपूर्ण जगात आपल्या अस्तित्वाची झलक दाखवण्यासाठी तसंच अमेरिकेवर दबाव ठेवण्यासाठी उत्तर कोरियानं पहिल्यापासूनच आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या निर्मितीवर भर ठेवला.
2012 मध्ये उत्तर कोरियात झालेल्या लष्करी संचलनात वेगवान माऱ्याची क्षमता असलेल्या आधुनिक KN-08 आणि KN-14 ही आंतरखंडीय क्षेपणास्त्रं प्रदर्शित केली होती.
तीन टप्प्यात विभागलेलं KN-08 क्षेपणास्त्र विशिष्ट ट्रकवर तैनात केलेलं असतं. त्याची मारक क्षमता ही तब्बल 11,500 किमी आहे.
KN-14 क्षेपणास्त्र हे दोन टप्प्यात विभागलेलं असून त्याची मारक क्षमता ही 10,000 किमी आहे. या क्षेपणास्त्राची अद्याप चाचणी झालेली नसली तरी सध्याचे प्रमुख अस्त्र व्हॉसाँग-14 आणि त्यामधील फरक स्पष्ट झालेला नाही.
अणवस्त्रांचीही निर्मिती?
अमेरिकेतील माध्यमांच्या वृत्तानुसार, उत्तर कोरियानं लहान अणवस्त्रांची निर्मिती केली आहे. पण त्याला अधिकृत सूत्रांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.
तर काही तज्ज्ञांच्या मते उत्तर कोरियाला अणवस्त्रांची निर्मिती अजून शक्य झालेली नाही.
उत्तर कोरियाच्या अणवस्त्र कार्यक्रमाबाबत वॉश्गिंटन पोस्टनं अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्यानं एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
या वृत्तानुसार उत्तर कोरियानं अमेरिकेवर मारा करू शकणारी वेगवान अणवस्त्रं तयार केली आहेत. तसंच त्यांचा ते वापर करण्याची शक्यता आहे.
जपान सरकारच्या सूत्रांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. उत्तर कोरियाचा क्षेपणास्त्र कार्यक्रम लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रां पुरताच मर्यादित राहिलेला नाही. त्यांनी अणवस्त्रांचीही निर्मिती केल्याची शक्यता या सूत्रांनी व्यक्त केली आहे.
आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची आवश्यकता
जगाला आपल्या सामरिक ताकदीची चुणूक दाखवण्यासाठी आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात जगातील प्रमुख देश गुंग आहेत.
तसंच जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील विरोधी देशाला धाकात ठेवण्यासाठीही यांचा वापर केला जातो.
त्याचबरोबर अणवस्त्रं वाहून नेण्याची क्षमता आंतरखंडीय क्षेपणास्त्रांमध्ये असल्यानं त्यांच्या निर्मितीवर वेळ आणि पैसा खर्च केला जातो.
कोणत्या राष्ट्राकडे किती आतंरखंडीय क्षेपणास्त्रे
- अमेरिका - ४५० (सिलो सिस्टमवर तैनात)
- रशिया - ३६९ (सिलो सिस्टम आणि मोबाईल लाँचर्सवर तैनात)
- चीन - ५५-६५ (विशेष टनेल नेटवर्कमध्ये तैनात)
रशिया आणि अमेरिकेनं शीतयुद्धाच्या कालखंडात एकमेकांवर दबाव ठेवण्यासाठी ही क्षेपणास्त्र एकमेकांविरोधात आपापल्या देशात तैनात केली होती.
आंतरखंडीय क्षेपणास्त्र ही एकाच पद्धतीनं निर्माण करण्यात येतात. हे क्षेपणास्त्र अनेक टप्प्यात विभागलेलं रॉकेट असतं. त्यात घन आणि द्रवरूपातील इंधनाचा वापर केलेला असतो.
हे रॉकेट वातावरणाबाहेर अवकाशात झेपावताना त्याच्यासोबत जोडलेलं अस्त्रही पेलोडच्या स्वरूपात वर जातं. रॉकेट या पेलोडसह अवकाशात जाऊन संबंधित देश अथवा आपल्या निर्धारीत लक्ष्याच्या वर येतं आणि पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात येऊन थेट आपल्या लक्ष्यावर आदळतं.
काही अत्याधुनिक आंतरखंडीय क्षेपणास्त्रांतल्या रॉकेटमध्ये अनेक स्फोटकं असू शकतात.
तसंच सोडल्यानंतर लक्ष्य बदलण्याची क्षमताही त्यात असते. मुख्य म्हणजे शत्रूच्या 'मिसाईल डिफेन्स सिस्टम'ला गुंगारा देण्यातही ही क्षेपणास्त्रं यशस्वी होतात.
हेही वाचा-
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)