You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कुठे होतात उत्तर कोरियाच्या छुप्या अणुचाचण्या?
उत्तर कोरियाच्या वारंवारच्या अणुचाचण्यांमुळे संपूर्ण जगालाच हादरा बसतो आहे. २००६ सालापासून उत्तर कोरियानं पुंगे-री येथील डोंगराळ प्रदेशातून सहा मोठ्या अणुचाचण्या केल्या आहेत.
उत्तर कोरियाच्या उत्तर-पूर्व प्रदेशातील या डोंगराळ भागातील ही जागा देशातील सर्वात मोठी अणु चाचणीचे ठिकाण आहे. तसेच अशा चाचण्यांसाठी हे जगातील सर्वाधिक व्यस्त ठिकाण राहिलं आहे.
काय या जागेचंवैशिष्ठ्य?
या जागेची माहिती केवळ उपग्रहांकडूनच प्राप्त आहे. उपग्रहाद्वारे मिळालेल्या छायाचित्रांवरून त्या जागेवर आण्विक चाचणीसाठी लागणाऱ्या उपकरणांची ने-आण करण्याच्या हालचाली स्पष्ट दिसून येतात. पुंगे-रीच्या माऊंट मनटाप या डोंगराखालील खाणवजा भुयारात मुख्यत्वे अणुचाचण्या घेतल्या जातात.
उत्तर कोरियाच्या अणुकार्यक्रमावर लक्ष ठेऊन असणारे देश या भुयारातील खोदकामावर विशेष लक्ष ठेवतात. उपग्रहामार्फत मिळालेल्या छायाचित्रांनुसार ३ सप्टेंबरला झालेल्या मोठ्या अणु चाचणीपूर्वीच, म्हणजेच ऑगस्ट मध्येच इथे चाचणीच्या तयारीला सुरूवात झाली होती.
उपकरणांवरून मिळाला इशारा
उत्तर कोरियाच्या अणुकार्यक्रमाच्या जाणकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या सुरुवीतीला या डोंगराळ भागात खोदकाम सुरू झाले होते. या खाणीच्या प्रवेशद्वारावर काही मोठी उपकरणे आणण्यात आली होती.
या खाणीच्या आत अर्ध-वर्तुळाकार रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याच्या शेवटी चाचणीसाठी आणण्यात आलेली उपकरणे ठेवली गेली. स्फोटापूर्वी ही खाण पूर्णतः भरून बंद केली गेली. स्फोटानंतर किरणोत्सर्गाचा धोका कमी जाणवेल हा त्यामागचा हेतू होता, असं जाणकार सांगतात.
चीनलगतच्या उत्तर कोरियामधल्या गावांबाबत आम्हांला बरीच माहिती आहे, पण या डोंगराळ भागाबाबत आम्हांला कल्पना नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
अनेक शहरांमध्ये जाणवले धक्के
चाचणीनंतर सीमेलगतच्या अनेक शहरांमध्ये जमिनीत हादरे जाणवले. ग्लोबल टाइम्समधील वृत्तानुसार, चीननजीकच्या सीमेपासून १० किलोमीटर अंतरावर जमीनीत निर्माण झालेल्या कंपनांमुळे शाळेतील मुले घाबरून रस्त्यावर आली होती.
चाचणीनंतर केलेल्या परिक्षणानंतर कोणताही किरणोत्सर्ग झालेला नाही, असं उत्तर कोरियानं जाहीर केलं आहे. पण या चाचणीनंतर चीनच्या न्युक्लिअर सेफ्टी एडमिनिस्ट्रेशन आणि दक्षिण कोरियाच्या न्यूक्लिअर सेफ्टी अँड सिक्युरिटी कमिशनने किरणोत्सर्ग कितपत झाला याच्या चाचण्या करण्यास सुरूवात केली आहे.
अणू चाचणीनंतर भुकंपाचे धक्के?
उत्तर कोरियाच्या आण्विक कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी '३८ नॉर्थ' हा अनेक देशांचा समूह कार्यरत आहे. या समूहातील काही तज्ज्ञांच्या माहितीनुसार फेब्रुवारी २०१३ मध्ये उत्तर कोरियानं केलेल्या चाचणीनंतर वातावरणात किरणोत्सर्गाचे अस्तित्व जाणवू लागले आहे. तसेच नुकत्याच केलेल्या चाचणीनंतर रिश्टर स्केलवर ६.३ तीव्रतेचा भूकंपही जाणवला होता.
मात्र, या धक्क्यानंतर काही क्षणातच ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा धक्का जाणवला. तसेच शक्तिशाली स्फोटानंतर पुंगे-री डोंगराळ भागातील खाण कोसळली आहे. ज्यामुळे किरणोत्सर्गाचा धोका अधिक वाढला आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)