You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उत्तर कोरिया : अमेरिकेबरोबर वाद नेमका काय?
"ज्या गोष्टीत जिंवतपणा वाटत होता त्या प्रत्येक गोष्टींवर आम्ही बाँबहल्ला केला होता." हे वाक्य आहे अमेरिकाचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री डेयान रस्क यांचं.
ते कोरियन युद्धादरम्यान (1950-1953) उत्तर कोरियावर अमेरिकानं केलेल्या बाँबच्या वर्षावाबाबत सांगत होते.
अमेरिकी संरक्षण खात्याचं मुख्यालय असलेल्या पेंटागॉनच्या तज्ज्ञांनी या मोहीमेचं नाव `ऑपरेशन स्ट्रँगल` असं ठेवलं होतं.
अनेक इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार तीन वर्ष सतत उत्तर कोरियावर हवाई हल्ले केले जात होते.
डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या या देशातली कित्येक गावं आणि शहरं उध्वस्त झाली. लाखोंच्या संख्येनं सामान्य नागरिक मारले गेले.
कोरियन राजकारण
"अमेरिकेच्या इतिहासातील ही अशी पानं आहेत, ज्याविषयी अमेरिकन नागरिकांना फारशी माहिती दिली गेलीच नाही." असं जेम्स पर्सन सांगतात.
जेम्स पर्सन हे कोरियन राजकारण आणि इतिहासाचे जाणकार आहेत. सध्या ते वॉशिंगटनच्या विल्सन सेंटरमध्ये कार्यरत आहेत.
दुसऱ्या महायुद्धानंतर आणि व्हिएतनाम युद्धाआधी कोरियन युद्ध झालं होतं. उत्तर कोरियावर या युद्धाचे मोठे घाव आहेत. ते अजूनही या युद्धाच्या आठवणी विसरलेले नाहीत.
अमेरिका आणि इतर भांडवलशाही देशांबरोबर उत्तर कोरियाचे संबंध कटू आहेत. त्यात युद्धाचा मोठा वाटा आहे.
दक्षिण कोरियाशी वैर
या युद्धानंतरच उत्तर कोरियासाठी अमेरिका शत्रू ठरली आणि दोन्ही कोरिया एकमेकांसमोर उभे ठाकले गेले. या कोरियन युध्दाची कारणं आणि भिजत घोंगड आजही कायम आहे.
ही 1950 मधील घटना आहे. मित्रराष्ट्रांच्या मदतीनं अमेरिकन सैन्य दक्षिण कोरियात नॉर्दर्न आर्मीच्या घुसखोरीविरोधात लढत होती.
सेऊलमध्ये कम्युनिस्ट समर्थकांच्या दडपशाहीनंतर उत्तर कोरियाचे तत्कालीन नेते किम उल सुंग यांनी दक्षिण कोरियाविरोधात लष्करी कारवाई सुरू केली.
किम उल सुंग हे उत्तर कोरियाचे विद्यमान शासक किम जोंग उन यांचे याचे आजोबा आहेत.
... आणि युध्दाचं चित्रपालटलं
या युद्धात किम उल सुंग यांना स्टॅलीनचं समर्थन मिळालं होतं. कोरिया युद्ध हे शीतयुद्धाचा पहिला आणि सर्वात मोठा संघर्ष होता.
या युद्धात पहिल्या टप्प्यात अमेरिकेचे हवाई हल्ले दक्षिण कोरियातील लष्करी ठाणी आणि औद्योगिक केंद्रांपुरते मर्यादीत होते.
पण, त्याचवेळी असं काही वातावरण निर्माण झालं की या युध्दाचं संपूर्ण चित्रच बदलून गेलं.
युद्ध सुरू होताच काही महिन्यात आता अमेरिकन सैन्य कदाचीत आपल्या सीमांपर्यंत धडकेल ही भीती चीनला सतावू लागली.
सोवियत संघ
याच कारणास्तव चीननं उत्तर कोरियाला मदत करण्याचा निर्णय घेतला.
चीनीनं युद्धात उडी घेताच अमेरिकी सैन्याला मोठं आव्हान मिळालं. त्यांच्या जखमी सैनिकांची संख्य़ा वाढू लागली.
चीनी लष्कराकडे अत्याधुनिक शस्त्रं नव्हती. पण, सैन्यबळ भरपूर होतं.
प्राध्यापक जेम्स पर्सन सांगतात, "त्यावेळी उत्तर कोरियाला चीन आणि सोवियत संघाकडून मिळणाऱ्या मदतीला वेळीच अटकाव करणं गरजेचं झालं होतं."
यानंतर जनरल डग्लस मॅकअर्थर यांनी जगाला हादरवून टाकणाऱ्या युद्धनितीची अमंलबजावणी करण्याचा निर्णय घेतला.
जीवघेणे हल्ले
मॅकअर्थर हे दुसऱ्या महायुद्धादरम्यान प्रशांत महासागर क्षेत्रातील हिरो म्हणून ओळखले जायचे. त्यांनी उत्तर कोरियावर नियोजीत हवाई हल्ले करायला सुरूवात केली.
याच काळात उत्तर कोरियातील प्रत्येक शहर आणि गावावरून दररोज बी-29 आणि बी-52 ही अमेरिकन बाँब हल्ले करणारी विमानं घिरट्या घालू लागली.
ही युद्ध विमानं नेफाम शस्त्रांनी सज्ज होती. नेफाम हा एकप्रकारचा ज्वलनशील पदार्थ आहे. ज्याचा उपयोग युद्धादरम्यान जाळपोळीसाठी केला जातो.
यामुळे जनरल डग्लस मॅकअर्थर यांची वेगवेगळ्या स्तरावर निंदा करण्यात आली. पण, हल्ले काही थांबले नाहीत.
सेऊल नॅशनल यूनिव्हर्सिटीचे प्राध्यापक ताइवू किम सांगतात "अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर उत्तर कोरियातील अनेक शहरं आणि गावांच ढिगाऱ्यात रुपांतर झालं."
तीन वर्षे चाललं युद्ध
या संघर्षादरम्यान अमेरिकेनं 20 टक्के कोरीयन जनतेला नष्ट केल्याचं स्ट्रॅटजिक एअर कमांडर प्रमुख म्हणून काम पाहिलेल्या जनरल कर्टिस लीमे यांनी कबूल केलं आहे.
उत्तर कोरियावर अनेक पुस्तकं लिहणारे पत्रकार ब्लेन हार्डेन यांनी अमेरिकी लष्कराच्या या कारवाईला सर्वात मोठा गुन्हा म्हणून संबोधलं आहे.
असं असलं तरी ब्लेन हार्डेन यांच्या युक्तीवादाशी जेम्स पर्सन सहमत नाहीत. "हे एक युद्ध होतं. ज्यात दोन्ही पक्षांनी सर्व सीमा ओलांडल्या" असं ते म्हणतात
ताइवू किम यांच्यासारखे संशोधक सांगतात की, "या तीन वर्षांमध्ये उत्तर कोरियावर 6 लाख 35 हजार टन बाँबचा वर्षाव करण्यात आला होता."
उत्तर कोरियाच्या सरकारी आकड्यानुसार या युद्धात 5000 शाळा, 1000 रुग्णालयं आणि सहा लाख घरं बेचिराख झाली होती.
नुकसानीचं प्रमाण
युद्धानंतर प्रसिध्द करण्यात आलेल्या सोवियत कागदपत्रांनुसार बाँब हल्यामुळे तब्बल 2,82,000 लोकं मारली गेली.
युद्धात झालेल्या या नुकसानीच्या आकड्यांची सत्यता पडताळून पाहणं अशक्य आहे. पण, झालेलं मोठं नुकसान अजिबात नाकारता येऊ शकत नाही.
या युद्धानंतर एका आंतरराष्ट्रीय आयोगानंही उत्तर कोरियाच्या राजधानीचा दौरा केला होता. या बाँब वर्षावात कदाचीत एखाददुसरीच इमारत वाचली असेल. असं आयोगानं त्यांच्या अहवालात म्हटलं आहे.
दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या ड्रेसडेन शहरांनी जे अनुभवलं तेच उत्तर कोरियात झालं. नागरीकांनी रस्त्यांवर धुराचे असंख्य लोट अनुभवले.
आण्विक युद्ध
जीव वाचण्यासाठी लोकांनी भूमिगत ठिकाणी आश्रय घेतला होता.
कोरियन द्विपकल्पात अमेरिका आणि सोव्हियत युनियनमध्ये आण्विक युद्धा होण्याची भीती जगाला त्यावेळी सतावत होती.
साम्राज्यवाद्यांनी शांतताप्रिय नागरिकांवर केलेला हा क्रूर हल्ला असल्याचं म्हणत, उत्तर कोरियाचे तत्कालिन परराष्ट्रमंत्री पाक हेन यांनी संयुक्त राष्ट्रात अमेरिकेवर जोरदार हल्ला चढवला होता.
"प्याँगयांगला चारी दिशानी आग लावण्यात आली होती. त्यातच क्रुरपणे बाँबवर्षाव सुरू होता. लोकं आपल्या घरा बाहेर पडूच शकत नव्हती." असं पाक हेन यांनी सांगितलं.
धरणं, वीज प्रकल्प आणि रेल्वेसारख्या पायाभूत सुविधांवर नियोजीतपध्दतीनं हल्ले केले गेले.
सामंजस्य करारावर स्वाक्षरी
"त्यावेळी उत्तर कोरियात सामान्य जीवन जगणं जवळपास अशक्य झालं होतं" ताइवू किम सांगतात.
यासाठी मग उत्तर कोरीया सरकारनं भूमिगतपध्दतीनं बाजारपेठा आणि लष्करी हलचाली सुरू केल्या.
युद्धा दरम्यान उत्तर कोरियाचं रुपांतर एका भूमिगत देशात झालं होतं. हवाई हल्ल्याच्या धोक्याचा इशारा कायमस्वरुपी लागू करण्यात आला होता.
शेवटी 1953 मध्ये दिर्घकाळ चाललेल्या चर्चेनंतर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
तत्कालिन अमेरिकी राष्ट्रपती ट्रुमॅन यांची सोवियत संघासोबत थेट संघर्ष टाळण्याची भूमिका होती.
युद्ध आणि आकाशातून होणाऱ्या हल्ल्यांनी उत्तर कोरियाला एका बंकरमध्ये लपलेला देश करून टाकलं होतं. आज पंचाहत्तर वर्षानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)