You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महात्मा गांधी : अण्वस्त्रसज्ज उत्तर कोरियावर कधीकाळी होता गांधीवादाचा प्रभाव
अण्विक अस्त्रांसारखा विनाशकारी हिंसक पर्याय आजमवणारा देश ही उत्तर कोरियाची ओळख आहे. पण, एकेकाळी गांधीजींच्या अहिंसा विचारांनी कोरिया प्रभावित होता.
क्षेपणास्त्र चाचण्यांवरून उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातले संबंध ताणले गेले आहेत. अण्विक अस्त्रं बाळगणारा आणि हुकूमशाही सरकार असणारा देश अशी उत्तर कोरियाची ओळख आहे.
पण, कोरियाच्या स्थापनेचे जनक किम अल सुंग यांनी कोरियाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी गांधीजींच्या अहिंसा या तत्त्वाची प्रेरणा महत्त्वाची होती असं लिहिलं आहे.
'विथ द सेंचुरी' या आपल्या पुस्तकात किम सुंग लिहितात, "कोरियातल्या एका छोट्याशा गावात गांधीजींना मानणारे असंख्य ज्येष्ठ नागरिक आहेत. कोरियन भाषेतील वर्तमानपत्रात गांधीजींचं एक पत्र प्रसिद्ध झालं होतं."
"हे पत्र या वृ्द्ध गृहस्थाला कोणीतरी वाचून दाखवलं. त्यातून प्रेरणा घेत हा माणूस अहिंसक मार्गानं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अहिंसेचा मार्गच कसा योग्य आहे हा विचार तो समाजात रुजवत आहे."
याच पुस्तकात किम सुंग यांनी एक अनुभवसुद्धा सांगितला आहे. ते लिहितात, "जिलीनमध्ये असताना गांधीजींचं पत्र वाचलं. त्यावेळी पार्क सो सिम यांच्याशी बोलताना अहिंसावादी विचारसरणीवर मी टीका केली होती. जिलिनमध्ये राहणाऱ्या युवा वर्गाला गांधीजींचा मार्ग पटला नाही."
ते पुढे लिहितात "जपानच्या अहिंसेशी साधर्म्य असणाऱ्या या विचारसरणीनं आपल्याला स्वातंत्र्य मिळेल यावर कोणाचाच विश्वास नव्हता. मात्र गांधीजींच्या विचारांमुळे हिंसक आंदोलनं आणि स्वातंत्र्य चळवळीचा मार्ग सोडलेल्या राष्ट्रवादी विचारसरणीच्या नेत्यांचं आम्हाला समर्थन मिळालं."
कोरियाचे गांधी
नालंदा विद्यापीठाचे प्राध्यापक पंकज मोहन यांनी याविषयी बोलताना सांगितलं, "कोरियाचा स्वातंत्र्यलढा गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होता. गांधीजींनी असहकार आणि स्वदेशी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला."
"याच धर्तीवर कोरियाच्या स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांनी मार्ग अनुसरला. या आंदोलनाचे प्रवर्तक चो मन सिक यांना कोरियाचे गांधी म्हटलं जातं. सिक यांच्यावर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव होता."
कोरियाच्या विभाजनानंतर...
कोरियातील एका वर्तमानपत्राचे संपादक किम संग सू यांनी गांधीजींना एक पत्र लिहिलं. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी व्यक्तींसाठी संदेश देण्याचं आवाहन संग यांनी गांधीजींना केलं होत.
यावर गांधीजींनी आपला प्रतिसाद कळवला. 'कोरिया अहिंसेच्या मार्गानं स्वातंत्र्य मिळवेल अशी मला आशा आहे', असा संदेश गांधीजींनी पाठवला.
हा संदेश कोरियातल्या डोंगा इल्बो वर्तमानपत्रात छापून आला होता. पंकज मोहन यांनी हा किस्सा सांगितला आहे.
कोरियाचे गांधी अशी बिरुदावली पटकावलेल्या मन सिक यांचा जन्म प्योंगयोंगमध्ये झाला. हे शहर आता उत्तर कोरियाची राजधानी आहे.
दुसऱ्या महायुद्धात जपानच्या पराभवानंतर कोरियाच्या विभाजनाची प्रक्रिया सुरू झाली. दक्षिण भागात अमेरिकेचं प्रशासन असेल तर उत्तर कोरियावर रशियाचे नियंत्रण असेल असं ठरलं.
अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धाच्या बदलत्या समीकरणा दरम्यान 1947 मध्ये अमेरिकेनं कोरियावरील नियंत्रणाचा मुद्दा संयुक्त राष्ट्र परिषदेसमोर मांडला.
कोरियाचं युद्ध
वर्षभरानंतर संयुक्त राष्ट्र परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कोरियाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली. त्यानंतर 1950 मध्ये सुरू झालेलं संहारक युद्ध कोरियाच्या विभाजनानंतरच थांबलं.
विभाजनानंतरही दक्षिण कोरियातलं गांधींचं महत्त्व कमी झालं नाही. मात्र उत्तर कोरियातून गांधीजींचे विचार हळूहळू नाहीसे झाले.
प्राध्यापक पंकज मोहन यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली. विभाजनानंतर उत्तर कोरियात डाव्या चळवळीनं जोम धरला तर दक्षिण कोरियात लोकशाही विचार रुजला.
साहजिकच उत्तर कोरिया आणि गांधी यांची विचारप्रक्रिया विरोधाभासी झाली.
कोरियात रुजलेला गांधींचा विचार
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कोरिया भाषा विभागातील प्राध्यापक वैजयंती राघवन यांनी सांगितलं, "1926च्या आसपास किम अल संग गांधीजींच्या विचारांशी सहमत होऊ शकले नाही हे पटणारे आहे."
"कारण त्यावेळी ते रशियाकडून चालवण्यात येणाऱ्या गनिमी कावा युद्धनीतीचं प्रशिक्षण घेत होते."
"मात्र कोरियातल्या सगळ्यांचे विचार अल संग यांच्याशी जुळणारे नव्हते. त्याचवेळी जगभरात गांधीजींच्या विचारांचा सन्मान होत होता. अनेक देशांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अहिंसावादी मार्ग स्वीकारला होता."
"त्यामुळे कोरिया उपमहाद्वीपातही गांधीजींच्या विचारांचा पगडा होता. प्योंगयोंगचे गांधीवादी नेते मन सिक यांनी अहिंसावादी पद्धतीनच जपानविरुद्धच आंदोलन चालवलं. मात्र आता दुर्दैवाने हेच शहर जगातल्या हुकूमशाही वृत्तीचं प्रतीक आहे", असंही प्रा. राघवन म्हणतात.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)