You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उत्तर कोरिया, मिसाईल आणि फुटबॉल : 'बेंगळुरू एफसी'चा अनुभव
- Author, मॅट डेव्हिस
- Role, बीबीसी स्पोर्ट
फुटबॉलच्या निमित्ताने बंगळुरू एफसी फुटबॉल क्लबच्या खेळाडूंना हुकूमशहा किम जोंग उन यांच्या उत्तर कोरियात खेळण्याची संधी मिळाली.
उत्तर कोरिया म्हटल्यावर हुकूमशहा किम जोन उन, क्षेपणास्त्र चाचण्या असं चित्र डोळ्यासमोर तरळतं. जगापासून तुटक, अलिप्त अशा उत्तर कोरियाने अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेला आव्हान दिलं आहे.
मर्यादित इंटरनेट सेवा असणाऱ्या उत्तर कोरियात जाणंही दुर्मीळ. मात्र आशियाई फुटबॉल कन्फेडरेशन स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय क्लब बेंगळुरू एफसी संघाच्या खेळाडूंना उत्तर कोरियात जाण्याची आणि पर्यायाने खेळण्याची संधी मिळाली.
गेल्या आठवड्यात बेंगळुरू एफसी आणि 4.25 एससी यांच्यातील सामना प्योनग्यांग येथे खेळला गेला.
सामन्याच्या निकालापेक्षा उत्तर कोरियात आलेले अनोखे अनुभव त्यांच्यासाठी संस्मरणीय ठरले. बीबीसी स्पोर्ट्सने बेंगळुरू एफसीचा एरिक पार्तालूशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियाचा नागरिक असलेला एरिक पार्तालू बेंगळुरू एफसीचा मिडफिल्डर आहे.
सध्याच्या परिस्थितीत उत्तर कोरियाला जाणं सुरक्षित आहे का, असा प्रश्न एरिकला पडला होता. मात्र आशियाई फुटबॉल महासंघानं स्पर्धेआधी उत्तर कोरियात शिष्टमंडळ पाठवलं.
तिथे खेळणं सुरक्षित आहे, असा निवाडा शिष्टमंडळाने दिला. त्यामुळे बंगळुरू एफसीने उत्तर कोरियात खेळण्याचा निर्णय घेतला.
"असा देश की जिथं युद्ध सुरू असू शकतं किंवा अशांतता असू शकते, मात्र उत्तर कोरिया अगदीच वेगळ्या स्वरुपाचा देश आहे," असं एरिकने स्पष्ट केलं. उत्तर कोरियाला रवाना होण्यापूर्वी एरिकने ट्विटरवर विचार मांडले. एएफसी स्पर्धेच्या लढतीसाठी उत्तर कोरियाला जातो आहे. किम यांना भेटून त्यांचं आदरातिथ्य अनुभवण्याची संधी आहे.
बंगळुरू-मुंबई-बीजिंग ते प्योनग्यांग
"उत्तर कोरियात जाऊ नये असा सल्ला ऑस्ट्रेलियाच्या सरकारने दिला आहे. उत्तर कोरियात ऑस्ट्रेलियाचा दूतावास नाही तसंच राजदूतही नाही. तिथे अणुयुद्ध भडकण्याचीही शक्यता आहे. मात्र बंगळुरू एफसीचा खेळाडू या नात्याने मी उत्तर कोरियाला जाण्याचा निर्णय घेतला," असं एरिक लिहितो.
उत्तर कोरियात जाण्यापूर्वी आमच्या सगळ्यांच्या मनात कुतूहल होतं, असंख्य प्रश्न होते. अज्ञात प्रदेशात जात आहोत अशी भावना होती. मात्र तिथे गेल्यावर वातावरण आपल्यासारखंच असल्याचं जाणवल्याचं तो म्हणतो.
"आम्ही बंगळुरूहून मुंबईला आलो. मुंबई-प्योनग्यांग (बीजिंगमार्गे) असा 48 तासांचा प्रवास करून आम्ही उत्तर कोरियात पोहचलो," असं एरिक पार्तालूनं सांगितलं.
सामान हरवतं तेव्हा...
एरिक याआधी चीन, कतार, दक्षिण कोरियातील तसंच मायदेशातील क्लबसाठी खेळला आहे. मात्र उत्तर कोरियातील विमानतळावर उतरणाक्षणीच एरिकला गोष्टी वेगळ्या असल्याचं जाणवलं.
"आम्हाला प्रत्येकाला मोबाइल, टॅब विमानतळावरील कर्मचाऱ्यांना चेकिंगसाठी द्यावे लागले. गॅझेट्समध्ये काहीही आक्षेपार्ह नाही याची चाचपणी करण्यात आली. सामानाचाही कसून तपासणी झाली. उत्तर कोरियात फोटो घेताना काळजी घ्या अशी सूचना आम्हाला देण्यात आली."
किमचे मिम्स मोबाईलमधून डिलिट
"आमच्या बहुतेकांच्या स्मार्टफोनमध्ये उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांचे मिम्स अर्थात विडंबनात्मक व्हिडिओ होते. हे सगळं डिलिट करा, असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. बहुतेकांनी तसं केलंही होतं. मात्र चुकून कोणाच्या गॅझेटमध्ये तसलं काही सापडलं तर काय, असं काहीबाही डोक्यात येत होतं. सुदैवानं तसं काही घडलं नाही," एरिक पार्तालू अनुभव सांगतो.
आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकच विमान
आंतरराष्ट्रीय विमानतळ असूनही केवळ एकच विमान होतं. आमच्या बॅगांबाबत गोंधळ झाला होता. विमानतळावर दोन तास थांबल्यावरही आम्हाला सगळ्या बॅगा मिळू शकल्या नाहीत. बॅगांसाठी प्रतीक्षा करत असतानाच विमानतळावरची दुकानं बंद झाली. इमिग्रेशनचे कर्मचारीही घरी गेले. विमानतळावरचे दिवेही मालवू लागले. अख्ख्या विमानतळावर फक्त आम्हीच उरले होतो, असाही अनुभव एरिक पार्तालू सांगतो.
किट अर्थात खेळायचा पोशाख, बूट आणि फुटबॉल हे सगळं असलेल्या बॅगा प्योनग्याँग विमानतळावर आल्याच नाहीत. त्या प्रवासात गहाळ झाल्याचं सांगण्यात आलं. स्थानिक दुकानातून विकत घेण्यावाचून पर्याय नव्हता. मात्र एखाद्या साहित्यासाठी 150 ते 200 डॉलर्स एवढी रक्कम त्यांना सांगण्यात आली.
"मग आम्ही 4.25 एससी संघाच्या खेळाडूंकडे विचारणा केली. त्यांनी आम्हाला सर्वतोपरी सहाय्य केलं. पहिल्या सराव सत्रावेळी आमच्याकडे काहीच नव्हतं. पण हळूहळू साहित्याची जुळवाजुळव केली," या आठवणी एरिकने जागवल्या.
फोन नाही, इंटरनेट नाही, लोकांशी बोलणं नाही
"पाच दिवसाच्या दौऱ्यादरम्यान आम्हाला मोबाइल फोन वापरता आले नाहीत. इंटरनेट सेवाही नसल्याने प्रचंड अडचण झाली," असं एरिक पार्तालू म्हणाला.
उत्तर कोरियात इंट्रानेट आहे. ज्यावर सरकारचं नियंत्रण आहे. हॉटेलच्या खोलीत टीव्ही होता. त्यावर पाच चॅनेल दिसत होती. मात्र प्रत्येकावर किम जोंग उन यांच्याविषयीच बातम्या किंवा कार्यक्रम सुरू असत.
जागोजागी किम उन आणि परिवार
हॉटेलबाहेर पडल्यावर समोर ठिकठिकाणी किम, त्यांचे वडील आणि आजोबांचे पोस्टर लावलेलं होतं. बॉडीगार्डशिवाय हॉटेल सोडायला परवानगी नव्हती. किम यांच्या घराण्यातील व्यक्ती किंवा देशाचा राष्ट्रध्वज असलेला बॅज परिधान करणं नागरिकांसाठी अनिवार्य आहे.
"रस्त्यावर लहान मुलं भेटली आणि त्यांना अभिवादन केलं तर तेही हॅलो म्हणत. पण पुढे काहीच बोलणं होऊ शकलं नाही. बाकी माणसांशी बोललं तर स्मितहास्त करून ते निघून जात," असं एरिक पार्तालूनं सांगितलं.
सामन्याचा थरार
प्रत्यक्ष सामन्याचं वर्णन करताना एरिक म्हणाला, "अखेर सामन्याचा दिवस उजाडला. मे डे या प्रसिद्ध स्टेडियममध्ये सामना होता. दीड लाखाची क्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये जेमतेम दहा हजार प्रेक्षक होते. पण त्यांना फुटबॉलची आवड असल्याचं जाणवत होतं."
"4.25 संघाने आक्रमणावर भर दिला आणि बचाव करण्यापलीकडे आमच्या हातात काहीच नव्हतं. सामना 0-0 संपला. 4.25 क्लब उत्तर कोरियाच्या लष्कराचा संघ आहे. त्यांना मिळणाऱ्या सुविधा आम्ही पाहिल्या. ते जागतिक दर्जाच्या आहेत. ते रोबोसारखा सराव करतात. समजा आम्ही जिंकलो असतो तर विजय साजरा करता आला असता का असा प्रश्न पडला," असंही एरिक पार्तालू म्हणतो.
काही किलोमीटर मिसाईल टेस्ट
सामना झाल्यानंतर दोन दिवस बंगळुरू एफसीच्या खेळाडूंना सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. अशाच एका दिवशी सकाळी जाग आल्यावर अवघ्या काही किलोमीटरवर चक्क मिसाइल टेस्ट झाल्याचं त्यांना समजलं.
सकाळी 6 वाजता हॉटेलच्या बाहेर आला असता तर मिसाईल याचि देही याचि डोळा पाहता आलं असतं, असं हॉटेल स्टाफने त्यांना सांगितलं. एअरपोर्टवरून मिसाईल डागण्यात आलं होतं. हॉटेलच्या बाहेरून अगदी स्पष्टपणे मिसाईल दिसलं असतं असं स्टाफने सांगितलं. आपण जगातल्या भयंकर ठिकाणी आलो आहे याची जाणीव संघातल्या अनेकांना झाली.
आपण लवकरात लवकर इथून निघावं. आपल्याला देश सोडण्याचा आदेश येण्यापूर्वी आपण परतलेलं बरं, असा चर्चेचा नूर होता. या मिसाईलविषयी त्यांनी गाइडना विचारलं. पण प्रत्येकानं मिसाईल चाचण्यांचं समर्थन केलं.
अमेरिकेला टक्कर देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत असा त्यांचा दावा होता. असा विचार करण्याचं आणि बोलण्याचं त्यांना ट्रेनिंग दिलेलं असावं असं त्यांना वाटलं. त्यांचे विचार त्यांना विचित्र वाटले.
असेन मी... नसेन मी
दौऱ्याच्या अनुभवाविषयी एरिक म्हणतो, 'निरभ्र आकाश, सुंदर फुलं, अनोखा निसर्ग असं सगळं उत्तर कोरियात आहे. मी केवळ फुटबॉल खेळतो म्हणून मला इथे येण्याची संधी मिळाली आहे. परत आल्यावर आणि अनेक वर्षांनंतरही लोक मला या अनुभवाबद्दल विचारतील.
उत्तर कोरियात येण्याची संधी मिळालेल्या मोजक्या लोकांमध्ये माझा समावेश झाला आहे. मी हा दौरा कधीच विसरणार नाही. इथे आल्यावर मी एक गोष्ट शिकलो. छापून येणारे शब्द आणि टीव्हीवर दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात, असंही एरिक पार्तालू सांगतो.
"प्रत्यक्षात इथलं जग किती वेगळं आहे. अनेक लहान मुलं हसऱ्या चेहऱ्याने कसून सराव करत होती. त्यांच्याविषयी मला खूप वाईट वाटलं. कारण देशांदरम्यानच्या यादवीत हे सुरेख चित्र नष्ट होऊ शकतं."
"या भागावर कोणाचं राज्य असेल काहीच सांगता येणार नाही. या मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू कायम रहावं अशी इच्छा आहे. सामना संपल्यावर उत्तर कोरियाच्या खेळाडूंनी आम्हाला आलिंगन दिलं. खेळ माणसांना एकत्र आणतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. फुटबॉल हा खरंच सुंदर खेळ आहे."
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)