You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आरोग्य : सकाळचा नाश्ता टाळावा की रात्रीचं जेवण?
- Author, जेसिका ब्राऊन
- Role, बीबीसी फ्युचर
जुनी म्हण आहे - न्याहरी राजासारखी, दुपारचं जेवण राजासारखं आणि रात्रीचं जेवण फकीरासारखं असावं. म्हणजे सकाळी भरपूर नाश्ता केला पाहिजे. त्यामुळे दिवसभर मानसिक आणि शारीरिक मेहनतीसाठी ऊर्जा मिळते.
आशिया असो वा अमेरिका, न्याहरी न करणं बऱ्याच देशांमध्ये चुकीचं मानलं जातं. खरंतर जगभरात सकाळचा नाश्ता न करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अमेरिकेत तीन चतुर्थांश लोकच नियमित नाश्ता करतात तर केवळ दोन तृतियांश ब्रिटिश नागरिक नियमित न्याहरी घेतात.
ब्रेकफास्ट म्हणजेच रात्रभर उपाशी असण्याचं चक्र ब्रेक करणं. शरीर रात्री अंगात असलेल्या ऊर्जेचा वापर शरीराची वाढ आणि पुनर्निमाणासाठी करतं.
ब्रिटिश आहारतज्ज्ञ सारा एल्डर सांगतात, "संतुलित नाश्ता केल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. यातून शरीराच्या विकासासाठी गरजेचं प्रथिनं आणि कॅल्शिअम मिळतं."
न्याहारी खरंच महत्त्वाची आहे का?
मात्र सकाळच्या नाश्त्याला इतकं महत्त्व दिलं जावं की नको, यावर आता तज्ज्ञांमध्ये मतभेद दिसू लागले आहेत.
हल्ली उपाशी राहण्याची क्रेझ आली आहे. शिवाय सकाळच्या नाश्त्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या डबाबंद कडधान्यात अतिप्रमाणात साखर असणंही आरोग्यासाठी चांगलं नाही, असं काही जण मानतात.
एका संशोधनाने तर सकाळचा नाश्ता घातक असल्याचं म्हटलं आहे.
मग अखेर सत्य काय आहे? दिवसाची सुरुवात करण्यासाठी नाश्ता आवश्यक आहे? की मग सकाळच्या नाश्त्यासाठी कडधान्य विकणाऱ्या कंपन्यांचं हे कारस्थान आहे?
ब्रेकफास्टबद्दल सर्वाधिक संशोधन होतं ते म्हणजे त्याच्या लठ्ठपणाशी असलेल्या संबंधावर. शास्त्रज्ञ याबाबत वेगवेगळी मतं मांडतात.
अमेरिकेमध्ये 50 हजारांहून जास्त जणांवर एक संशोधन करण्यात आलं. त्यात जे लोक सकाळचा नाश्ता करतात, त्यांचा BMI म्हणजेच बॉडी मास इंडेक्स संतुलित असल्याचं आढळलं. या तुलनेत रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांचा BMI जास्त आढळला.
संशोधकांच्या मते नाश्ता केल्याने तुम्हाला समाधान मिळतं. तुमची रोज कमी कॅलरी खर्च होते.
ब्रेकफास्टमुळे खाण्या-पिण्यावरही नियंत्रण येतं. सकाळच्या नाश्त्यामध्ये घेतले जाणारे पदार्थ हे तंतुमय आणि पौष्टिक असतात. यामुळे नंतर घेण्यात येणाऱ्या जेवणाप्रती इन्सुलिनची संवेदनशीलताही वाढते. हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी जोखमीचं ठरू शकतं.
ब्रेकफास्ट आणि लठ्ठपणाचा संबंध
मात्र सकाळी नाश्ता न केल्यामुळे लठ्ठपणा वाढतो की न्याहारी न करण्याची सवय आणि लठ्ठपणा एकाचवेळी असणं केवळ योगायोग आहे, हे मात्र या संशोधनातून स्पष्ट झालं नाही.
52 लठ्ठ महिलांवर याविषयी स्वतंत्र संशोधन करण्यात आलं. या स्त्रिया दिवसभरात सारख्या कॅलरीचे पदार्थ घ्यायच्या. मात्र नाश्त्यामध्ये त्यातल्या निम्म्या कॅलरीजच घ्यायच्या.
या संशोधनाचा निष्कर्ष असा निघाला की सकाळी नाश्ता केल्यामुळे नव्हे तर रोजच्या सवयी बदलल्यामुळे वजन कमी झालं. काही स्त्रियांनी नाश्ता कमी केला. मात्र त्यामुळे त्यांचं वजन कमी झालं नाही.
आता जर वजन कमी करण्यासाठी न्याहारी वगळून भागणार नसेल तर लठ्ठपणा आणि न्याहारी न घेणं या दोघांमध्ये काय संबंध आहे?
नाश्ता न करणाऱ्यांना बरेचदा या जेवणाचं महत्त्व माहीत नसतं, असं ब्रिटेनच्या अॅबरडीन विद्यापीठातील अॅलेक्झॅन्ड्रा जॉन्स्टन म्हणतात.
अॅलेक्झॅन्ड्रा म्हणतात, "न्याहारी करणाऱ्यांना आरोग्यदायी पदार्थ खाण्याची सवय असते. यामुळे त्यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. उदारहणार्थ, सकाळी नियमितपणे नाश्ता करणारे धूम्रपान करत नाहीत."
2016साली न्याहारी आणि वजन कमी करण्याची मोहीम यांच्यातला संबंध समजवून सांगण्यासाठी 10 अनुभवांची सरासरी काढून एका निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र नियमित नाश्ता केल्याने वजन कमी होतं, याचे कुठलेच पुरावे सापडले नाही.
खावं की उपवास करावा?
रात्रभर उपाशी राहून सकाळी खाण्याकडे कल वाढताना दिसतोय. विशेषतः वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांमध्ये.
2018साली करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार कधी-कधी उपवास केल्याने रक्तातील शर्करेचं प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. इन्सुलिनप्रति संवेदनशीलता वाढते. यामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो.
आता नाश्ता न करणं फायदेशीर असेल तर नाश्ता केल्याने नुकसान होतं का? काही संशोधक हाच दावा करतात आणि सकाळचा नाश्ता घातक असल्याचं सांगतात.
मात्र सकाळचा नाश्ता मुळीच चुकवायला नको, असं ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे आहारतज्ज्ञ फ्रेडरिक कार्पे म्हणतात.
न्याहारी सकाळी आपल्या शरीराचं मीटर सुरू करण्यासाठी खूप महत्त्वाची असते. फ्रेडरिक सांगतात, "आपल्या शरीरातल्या पेशी आहाराला चांगला प्रतिसाद देतात. त्यासाठी तुम्ही कर्बोदकयुक्त पदार्थांपासून सुरुवात केली पाहिजे. इन्सुलिन गेल्यावर शरीर प्रतिक्रिया देतं, यासाठी न्याहारी गरजेची आहे."
नाश्ता न केल्याने आपल्या शरीराचं घड्याळ म्हणजेच सर्केडियन क्लॉकसुद्धा बिघडतं. रात्री उशिरा जेवल्याने शरीरात कॉर्टिसॉल वाढतं.
जे सकाळी नाश्ता करत नाहीत ते रात्री चांगलं जेवतात. तर काही असेही असतात जे रात्री उशिरा जेवतात. जे रात्री उशिरा जेवतात त्यांच्यात लठ्ठपणा वाढण्याची शक्यता वाढते. त्यांना हृदयरोग आणि मधुमेह होण्याची शक्यताही असते.
एकूणच या जाणकारांच्या मते सकाळच्या नाश्त्यापेक्षा महत्त्वाचं असतं रात्रीचं जेवण. अॅलेक्झॅन्ड्रा म्हणतात, "आपल्या रक्तात शर्करेचं प्रमाण सकाळी सर्वाधिक संतुलित असतं. रात्री उशिरा जेवल्यास त्यावेळी शरीरात साखरेचं प्रमाण वाढतं."
मात्र न्याहरी सोडून रात्रीच्या जेवणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक संशोधनाची गरज असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
अॅलेक्झॅन्ड्रा सांगतात आपल्या शरीराचं घड्याळ एखाद्या ऑर्केस्ट्रॉसारखं असतं. एक मास्टर घडी मेंदूत असते. मग इतर घड्याळं शरीरातल्या सर्व अवयवांमध्ये असतात. यांच्यावर प्रकाशासारख्या इतर बाबींचा परिणाम होत असतो.
जेवताना तुम्हाला योग्य प्रकाश मिळत नसेल तर शरीराच्या घड्याळीचं संतुलन बिघडतं. त्यावेळी शरीरातील दोन ऑर्केस्ट्रा सूरात सूर मिसळू शकत नाही. तर प्रत्येक जण आपापलं तुणतुणं वाजवतो.
कुठल्या वेळी खाण्याचे काय फायदे-तोटे होतात, यावर ब्रिटनमधल्या सरे आणि अॅबरडीन विद्यापीठांमध्ये सध्या संशोधन सुरू आहे. यानंतर त्याचा लठ्ठपणा आणि लठ्ठपणा नियंत्रणात ठेवण्याशी संबंध तपासला जाईल.
न्याहारी आरोग्याची गुरूकिल्ली
सकाळच्या नाश्त्याचा संबंध केवळ शरीराच्या वजनाशी नाही. नाश्ता चुकवल्याने हृदयरोग होण्याची शक्यता 27 टक्क्यांनी वाढते, मधुमेहाची शक्यता 21 टक्क्यांनी वाढते तर इतर आजार होण्याची शक्यता 20 टक्क्यांनी वाढते.
यामागे कदाचित न्याहारीत दडलेली आरोग्याची गुरुकिल्ली असावी. जे नाश्त्यामध्ये कडधान्य किंवा ओट्स इत्यादी खातात त्यांना यातून विटामिन्स, आयर्न आणि कॅल्शिअम मिळतात. हे आरोग्यासाठी लाभदायी असतात.
असं संशोधन ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत झालेलं आहे.
सकाळी नाश्ता केल्याने मेंदू उत्तमरीत्या काम करतो, असंही म्हटलं जातं. यामुळे मन एकाग्र करणं आणि भाषेचं ज्ञान मिळवण्यातही मदत होते. यामुळे स्मृती उत्तम राहत असल्याचंही एका संशोधनात आढळलं आहे.
मात्र त्यासाठी आपण न्याहरीत काय खाते, हे महत्त्वाचं आहे. जे अधिक प्रोटीन आणि कॅल्शिअमयुक्त नाश्ता करतात, त्यांना जास्त फायदा होतो. शिरा-पुरी खाऊन तसं पोषण मिळणार नाही.
सकाळच्या नाश्त्यामध्ये डबाबंद पदार्थ टाळलेलेच बरे, कारण त्यात वरून साखर मिसळलेली असते.
सकाळच्या भुकेवर ताबा मिळवणं सोपं असल्याचं इस्रायलच्या तेल अविव विद्यापीठातल्या संशोधनात समोर आलं आहे.
कुठल्या प्रकारचा नाश्ता आरोग्यासाठी सर्वोत्तम असतो, हे 54 संशोधनाचा अभ्यास करूनही तज्ज्ञांना अजून सांगता आलेलं नाही.
तर मग न्याहरीचं करावं तरी काय?
जाणकार सांगतात न्याहरीत काय खावं, हे माहिती नसलं तरी हे तर नक्कीच माहिती आहे की तेव्हाच खावं जेव्हा भूक लागली असेल. ज्यांना सकाळी भूक लागते त्यांनी न्याहरी जरूर करावी. ज्यांना रात्री भूकेची जाणीव होते त्यांनी रात्रीचं जेवण उत्तम करावं.
प्रत्येक शरीराचं स्वतःच वैशिष्ट्य असतं. त्यानुसारच निर्णय घेणं योग्य असतं. कुठल्याही एका जेवणावर विसंबून राहणं योग्य नाही, मग ते डिनर असो की ब्रेकफास्ट.
संतुलित ब्रेकफास्ट आणि संतुलित डिनरचा सल्ला तर सर्वच जाणकार देतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)