You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेइर बोल्सोनारो यांना कोरोनाची लागण
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेइर बोल्सोनारो यांनी कायमच कोरोना व्हायरसला गांभीर्यानं घ्यायचं टाळलं आहे. त्याचा फटका त्यांना बसला आहे. बोल्सोनारो यांची कोव्हिड-19ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
कोरोना व्हायरस हा साध्या फ्लूसारखा आहे असं ते म्हणत. तसेच त्यांनी राज्यांच्या गव्हर्नरला लॉकडाउन शिथील करण्याचे आदेश दिले होते.
ते नेहमीच सोशल डिस्टन्सिंगकडे नकारात्मकतेनं पाहत आले आहेत. त्यांनी याआधी एक वक्तव्य केलं होतं त्यामुळे अनेकांना धक्काच बसला होता.
ब्राझीलमध्ये दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत्यूंची संख्या वाढत असताना राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनी परिस्थितीचं वर्णन मग काय झालं, अशा शब्दांत केलं होतं.
ब्रासिलियामध्ये रविवारी (3 मे) झालेल्या रॅलीत राष्ट्राध्यक्षांनी ब्राझीलच्या जनतेला कामावर परत जाण्याचा, हँडशेक करण्याचा सल्ला दिला. तसंच अनुयायांना सेल्फी काढण्याची परवानगीही दिली.
जेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं होतं तेव्हा ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 1 लाखांहून अधिक होती, तर कोरोनामुळे तोपर्यंत 7 हजारांहून अधिक जणांचा जीव गेला होता. आता ब्राझिलमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या 16 लाखांहून अधिक आहे तर आतापर्यंत ब्राझिलमध्ये कोरोनाने 65 हजाराहून अधिक जणांचा बळी घेतला आहे.
याविषयी एका पत्रकारानं विचारल्यानंतर बोल्सोनारो यांनी म्हटलं, "मग काय झालं? इतके लोक मेले तर मी काय करणार आहे? मी काही चमत्कार नाही करू शकत."
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
'थोडी सर्दी झाल्यासारखं वाटेल'
बोल्सोनारो यांनी यापूर्वी कोरोनाचा उल्लेख "a bit of a cold" असा केला होता आणि माध्यमं याविषयी फेक न्यूज पसरवत असल्याचा आरोप केला होता.
हे सुरू असतानाच बोल्सोनारो यांच्या अनुयायांनी सोशल मीडियावर शवपेटीचे खोटे फोटो टाकायला सुरुवात केली. देशातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा फुगवून सांगण्यासाठी रिकाम्या शवपेट्या दफन करण्यात येत आहेत, असं त्यांचं म्हणणं होतं.
बोल्सोनारो यांच्या रविवारच्या रॅलीत तीन पत्रकारांवर हल्ले झाले आणि सर्वोच्च न्यायालय बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली.
O Estado de S. Paulo या वर्तमानपत्राच्या एका पत्रकाराला शिडीवरून खाली ढकलण्यात आलं आणि त्याला लाथा घालण्यात आल्या, असं रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
"माझ्यासारख्या स्पोर्ट्सची पाश्वर्भूमी असणाऱ्या माणसाला कोरोना झालं तरी काही वाटणार नाही. फक्त थोडी सर्दी झाली, असं वाटेल," असं मागे बोल्सोनारो यांनी म्हटलं होतं.
पण मार्चमध्ये अमेरिकेच्या अधिकृत दौर्यावर आलेल्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांमधील 20हून अधिक सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर स्वत:ला कोरोना झाला की नाही, हे सांगण्यासाठी बोल्सोनारो यांच्यावरील दबाव वाढला.
कारण, ब्रासिलिया येथील लष्कराच्या मुख्यालयाबाहेरील लॉकडाऊन संपुष्टात आणावं, अशी मागणी बोल्सोनारो यांनी 19 एप्रिलला केली. भाषण देताना त्यांना खोकला आला होता.
'बेजबाबदारपणा'
गुलहेर्म रोलीम हे 36 वर्षांचे दंतचिकित्सक आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, त्यांनी 2018च्या निवडणुकीत बोल्सोनारो यांना मतदान केलं कारण त्यांना 'बदल' हवा होता.
पण, आता कोरोनामुळे रोलीम यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे आणि सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलं, असं त्यांना वाटतं.
"बोल्सोनारो हा एक बेजबाबदार माणूस आहे. त्यांनी केलेली टिप्पणी बेजबाबदारपणाचं लक्षण आहे. ते अतिशय गंभीर प्रश्न हलक्यानं घेत आहेत, " रोलीम म्हणाले.
"कोरोनामुळे वडिलांना गमावलेला एक मुलगा म्हणून मला राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्याबद्दल भीती वाटते. कदाचित जवळचं कुणी गमावलं नसल्यामुळे ते असं म्हणत असावेत. त्यामुळे त्यांना कोरोनाचा त्रास जाणवत नसेल," रोलीम पुढे सांगतात.
'ब्राझील थांबू शकत नाही'
या महिन्याच्या सुरुवातीला 60 टक्के लोकांना घरात थांबावं वाटत होतं, ते प्रमाण आता 52 टक्के इतकं झालं आहे. Datafolhaनं घेतलेल्या ओपिनियन पोलनुसार ही आकडेवारी समोर आली आहे.
"आता कोरोनामुळे 5 हजार जण मरतील आणि आपण ते टाळू शकणार नाही. आपण सगळंच बंद करू शकत नाही. आपण शत्रूपासून लपू शकतो, कामापासून नाही," असं Madero या रेस्टॉरंट चैनचे मालक ज्युनियर डुर्सकी सांगतात.
ब्राझीलच्या इतर उद्योजकांनीही अशीच भावना बोलून दाखवली आहे. 'ब्राझील थांबू शकत नाही,' असं त्यांचं म्हणणं आहे.
बोल्सोनारो यांच्या वक्तव्यानंतर प्रतिक्रिया
बोल्सोनारो यांच्या या वक्तव्यानंतर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी 28 एप्रिलला म्हटलं, "ब्राझीलमध्ये कोरोनाचे खूप जास्त रुग्ण आहेत. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष माझे खूप चांगले मित्र आहेत, पण सध्या ते अतिशय बिकट परिस्थितीत आहेत."
फ्लोरिडाचे राज्यपाल रॉन डे सँटिस यांनी म्हटलंय, "ब्राझीलमधल्या परिस्थितीवर आम्ही बारकाईनं लक्ष ठेवून आहोत."
तर काही तज्ज्ञांच्या मते, ब्राझीलमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी दाखवली जात आहे.
ब्राझीलमध्ये कोरोनाच्या संसर्गाचा दर 2.8 टक्के इतका आहे आणि हा इतर 48 देशांपेक्षा अधिक आहे, असं इंपेरिअल कॉलेज लंडनचं म्हणणं आहे.
राजकीय अडचणी
ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांसमोरील राजकीय अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.
त्यांनी फेडरल पोलिसांच्या देखरेखीसाठी अलेक्झांड्रे रामागेम यांची नेमणूक केली होती. ती सुप्रीम कोर्टानं रोखली आहे. रामागेम हे बोल्सोनारो यांचे मित्र आहेत. पण, सध्या रामागेम हे बनावट बातम्या पसरवण्याच्या एका योजनेच्या आरोपाअंतर्गत त्यांचा मुलगा कार्लोस याची चौकशी करत आहेत.
"तर काय झालं? असं बोल्सोनारो यांनी याविषयी फेसबुक पोस्टवर लिहिलं.
"माझ्या मुलांना भेटण्यापूर्वी मी रामागेमला भेटलो होतो. त्यांची नियुक्ती या कारणामुळे रोखली जावी?" असंही त्यांनी पुढे म्हटलं.
याच वादामुळे न्यायमूर्ती सर्जिओ मोरो यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो कामात राजकीय हस्तक्षेप करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)