You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : व्हेंटिलेटर्स म्हणजे काय? ते इतके महत्त्वाचे का आहेत?
कोरोना व्हायरसची बाधा झालेले बहुतांश जण अंगदुखी, सर्दी -तापातून आराम आणि तापाची गोळी घेऊन बरे झालेले आहेत. पण, जेव्हा श्वास घ्यायला त्रास झाला, शरीरातली ऑक्सिजनची पातळी कमी झाली, तर मात्र तात्काळ हॉस्पिटलमध्ये जायला हवं.
डॉक्टर अशावेळी रुग्णाच्या छातीचा एक्स-रे काढून छातीत किती कफ साठला आहे ते पाहतात. त्यानुसार रुग्णाला ऑक्सिजनचा पुरवठा द्यायचा की थेट व्हेंटीलेटरवर ठेवायचं याचा निर्णय घेतला जातो.
तर व्हेंटिलेटर्स म्हणजे काय आणि हे कसं काम करतं ते आपण पाहू.
व्हेंटिलेटर्स म्हणजे काय?
व्हेंटिलेटरचा अर्थ आहे एखाद्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर श्वास घेण्यासाठी मदत करणारं उपकरण.
जेव्हा फुफ्फुसांना काही संसर्ग होतो त्यामुळे पेशंटला श्वास घेता येत नाही, तेव्हा त्या व्यक्तीला व्हेंटिलेटर लावलं जातं. म्हणजेच त्या व्यक्तीचं श्वास घेण्याचं काम व्हेंटिलेटर सोपं करतं, अशी माहिती बीबीसी न्यूजने दिली आहे.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) सांगते की कोरोना व्हायरसची लागण झाल्यावर 80 टक्के पेशंट हॉस्पिटल ट्रीटमेंटशिवाय बरे होतात.
पण सहा जणांमधून एका पेशंटला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
व्हेंटिलेटर्सचं काम कसं होतं?
पेशंटची तब्येत जर आणखी सीरिअस झाली तर व्हायरसचा फुफ्फुसांचं नुकसान करू शकतात. जेव्हा व्हायरस शरीरात घुसतो तेव्हा शरीरातली रोगप्रतिकारक यंत्रणा त्या व्हायरसला ओळखते. रक्तवाहिन्यांचं प्रसरण होतं आणि जास्त प्रमाणात इम्युन सेल्स रीलिज होतात.
त्यामुळे फुफ्फुसांमध्ये पाणी तयार होतं. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि शरीरातला ऑक्सिजनचा लेव्हल कमी होते.
व्हेंटिलेटरमधून फुफ्फुसांमध्ये हवा भरली जाते आणि ऑक्सिजनची लेव्हल वाढायला लागते.
या काळात पेशंटला अशी औषधं दिली जातात ज्यामुळे शरीरातल्या रेस्पिरेटरी मसल्स शिथील केल्या जातात. म्हणजेच पेशंटचं श्वास घ्यायचं काम ते व्हेंटिलेटर करतं.
भारतात किती व्हेंटिलेटर्स आहेत?
बीबीसी न्यूजने केलेल्या बातमीनुसार भारतात 48,000 व्हेंटिलेटर्स आहेत. WHO ने सांगितल्यानुसार 80 टक्के रुग्णांना हॉस्पिटलच्या उपचारांची गरज पडत नाही पण उरलेल्या 20 टक्के लोकांना ही गरज भासू शकते. म्हणून ज्या गतीने सध्या कोरोनाचा फैलाव होतोय त्यानुसार 48,000 हा आकडा अगदीच कमी आहे.
शासकीय आकडेवारी असं सांगते की महाराष्ट्रात 3,363 व्हेंटिलेटर्स आहेत. त्यापैकी शासकीय रुग्णालयात 1143, 18 मेडिकल कॉलेजमध्ये 220 आणि महात्मा फुले योजनेअंतर्गत 1000 रुग्णालयांमध्ये एकूण 2000 व्हेंटिलेटर्सची व्यवस्था सरकारने केली आहे.
हे व्हेंटिलेटर्स पुरेसे आहेत का?
बीबीसीने सेंटर फॉर डिसीज डायनामिक्सचे प्रमुख डॉ. रामनन लक्ष्मीनारायण यांचा इंटरव्यू घेतला होता. त्यात त्यांनी सांगितलं "की मे आणि जून महिन्यात भारतात कोरोना व्हायरससारखी त्सुनामीची लाट येऊ शकते. त्यांचा असा अंदाज आहे की भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 30 कोटी पर्यंत जाऊ शकते. त्यापैकी 40 ते 50 लाख लोकांची स्थिती गंभीर होऊ शकते."
याचाच अर्थ असा आहे की या लोकांना मेडिकल अटेंशन म्हणजेच इंटेसिव्ह केअर आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता लागू शकते.
जर समजा अशी परिस्थिती उद्भवलीच तर भारताची तयारी कुठवर आलीये हे आपण पाहूच पण त्या आधी आपण हे बघूत की आरोग्य सुविधांचा तुटवडा असेल तर परिस्थिती कशी येऊ शकते.
'इटलीत कोण जगणार कोण मरणार याचा घ्यावा लागतोय निर्णय'
इटलीमध्ये 10,000हून अधिक लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. इटलीत सध्या कोरोना झालेल्या पेशंटची संख्या 1 लाखांहून अधिक आहे. इटलीच्या आरोग्य यंत्रणेवर भार पडत असल्यामुळे कोणत्या रुग्णावर आधी उपचार करावेत हा निर्णय घ्यावा लागत आहे. सर्वांनाच त्या ठिकाणी उपचार देणे शक्य नसल्यामुळे वयोवृद्धांना उपचार देण्याऐवजी मॉर्फिनचा डोस दिला जात आहे ज्यामुळे झोपेत त्यांचा शांतपणे मृत्यू होईल.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनी केलेल्या बातमीनुसार तेथील डॉक्टर आणि पेशंटच्या नातेवाईकांना हा निर्णय घ्यावा लागत आहे. जर एखादा खूप वय असलेला पेशंट आला आणि त्याच्या जगण्याची काही आशाच नसेल तर त्याच्या ऐवजी दुसऱ्या कुणावर उपचार केले जातात. यावेळी त्या पेशंटवर किती जण अवलंबून आहेत, उपचारानंतर घरी गेल्यावर त्या व्यक्तीची काळजी घेण्यासाठी कुणी आहे की नाही या गोष्टींचाही विचार केला जातो, असं रॉयटर्सने स्थानिक डॉक्टरांच्या हवाल्याने म्हटलं आहे.
लोंबार्डी या ठिकाणी 17 मार्चपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1,135 इतकी होती. पण भागातील इंटेसिव्ह केअर बेडची संख्या 800 आहे. तेव्हा हा निर्णय घ्यावा लागत आहे की कुणावर उपचार केले जाणार आणि कुणावर नाही. याबाबत एक घटना या बातमी सांगितली आहे. लोंबार्डीतील क्रेमोना हॉस्पिटलमध्ये 83 वर्षांच्या आजोबांना भरती करण्यात आलं.
सुरुवातीला त्यांना फक्त ताप होता दोन आठवड्यानंतर त्यांना कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे, असं निदान झालं. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला होता. डॉक्टरसमोर हा पेच होता की त्यांना व्हेंटिलेटर लावायचा की नाही. त्यांना त्यांच्या नातीने भरती केलं होतं. त्या सांगतात की त्यांच्यावर उपचार करण्यात अर्थच नव्हता. त्या ऐवजी त्यांनी त्यांच्या आजोबांचा हात हातात घेतला. त्यांना मॉर्फिनचा डोस देण्यात आला आणि आजोबांनी जगाचा निरोप घेतला.
'भारतात मृत्यूचं प्रमाण कमी'
इटलीच्या तुलनेत भारताचा फॅटालिटी रेट म्हणजेच बाधा झाल्यावर मृत्यू होण्याचं प्रमाण कमी आहे. व्हॉक्सने सांगितल्यानुसार इटलीचा फॅटालिटी रेट 11.75 टक्के आहे. इटलीत वृद्धांची संख्या अधिक असल्यामुळे तिथे मृत्यूचं प्रमाण अधिक आहे.
वर्ल्ड बॅंकेनी दिलेल्या डेटानुसार इटलीच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात 25 टक्के लोक 65 किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत.
म्हणजेच जितकं वय जास्त तितकं श्वसनविकाराचा धोका अधिक आणि व्हेंटिलेटरसारख्या आरोग्य सुविधांची आवश्यकता अधिक.
भारतात व्हेंटिलेटर्सच्या निर्मितीचं काम कसं सुरू आहे?
भारतात अंदाजे 40 ते 50 लाख लोकांना विशेष वैद्यकीय देखरेखीची गरज पडणार आहे. व्हेंटिलेटर्सची निर्मिती हा त्याचाच एक भाग आहे.
भारतात हे काम विविध स्तरावर सुरू आहे. सरकारी संस्था, औद्योगिक कंपन्या आणि स्टार्टअप्स अशा विविध स्तरावर हे काम सुरू आहे.
पुण्यातही तयार होणार स्वस्तातले व्हेंटिलेटर
एका व्हेंटिलेटरची किंमत अंदाजे 1,50,00 रुपये असते. पण पुण्यातील नोक्का रोबोटिक्सने बनवलेला व्हेंटिलेटर 50,000 रुपयांमध्ये मिळणार आहे.
सध्या यावर काम सुरू आहे. आधी 10-15 व्हेंटिलेटर्स बनवून ते हॉस्पिटलला दिले जातील आणि त्यांच्याकडून फीडबॅक आल्यानंतर उत्पादनाचं काम सुरू होईल, असं नोक्का रोबोटिक्सचे सह-संस्थापक निखिल कुरेले सांगतात.
या व्हेंटिलेटर्समध्ये इतर व्हेंटिलेटर सारखी फीचर्स नसतील पण कोरोनाच्या पेशंटवर उपचार होतील इतकी काळजी यात घेण्यात आल्याचं कुरेले सांगतात. ट्रायल्स झाल्यावर उत्पादनाला सुरुवात होईल असं त्यांनी सांगितलं.
भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) ने सध्या रॉकेट निर्मितीचं काम बाजूला ठेवलं आहे.
तिरुअनंतपूरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक एस. सोमनाथ यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं की ISRO सध्या व्हेंटिलेटर आणि सॅनिटायजर्स बनवून वितरीत करत आहे.
मारुती-सुझुकी कंपनीने भारतात AgVa हेल्थकेअर सोबत करार केला आहे. त्यानुसार दर महिन्याला किमान 10,000 व्हेंटिलेटर्स तयार होऊ शकतात.
AgVa हेल्थ केअर कंपनी व्हेंटिलेटर्स बनवते पण त्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याचा अनुभव नाही. मारुती-सुझुकी कंपनीला कार बनवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. दोन्ही कंपन्यांनी एकत्र मिळून काम केल्यास महिन्याला 10,000 व्हेंटिलेटर्सचं उत्पादन होऊ शकतं, असा विश्वास मारुतीचे चेअरमन आर. सी. भार्गव यांनी व्यक्त केला आहे.
भारताचे आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी माहिती दिली आहे की BHEL आणि संरक्षण मंत्रालयाकडून जून महिना संपेपर्यंत 40,000 व्हेंटिलेटर्स बनवले जाणार आहेत.
जगभरात तेजीत सुरू आहेत व्हेंटिलेटर्सचं उत्पादन
फक्त भारतातच नाही तर जगभरात अनेक मोठ्या कंपन्या सध्या व्हेंटिलेटर्स बनवण्याच्या कामात गुंतल्या आहेत.
ब्रिटन सरकारने देशातील इंजिनिअरिंग फर्म्सला आवाहन केलं आहे की तुमचं काम तात्पुरतं बाजूला ठेऊन व्हेंटिलेटर्सच्या निर्मितीमध्ये सरकारला मदत करावी.
जर्मनीमध्ये फियाट, मर्सडीज, निसान, जनरल मोटार्स या कंपन्यांनी मेडिकल इक्विपमेंट बनवण्याच्या कामात शक्य तितकी मदत करू, असं म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)