You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्लाझ्मा थेरपी: कोरोना व्हायरसवर हा उपचार घातक ठरू शकतो का?
- Author, गुरुप्रीत सैनी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कुठलीही लस किंवा औषध नसल्याने प्लाझ्मा थेरपी कोव्हिड-19 आजारावर उपचाराच्या दिशेने एक आशेचा किरण मानली गेली. मात्र, काही दिवसांपूर्वीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या उपचाराबाबतही सावधगिरीचा इशारा दिला.
प्लाझ्मा थेरपी कोव्हिड-19 च्या उपचारात यशस्वी ठरल्याचे पुरावे नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटलं होतं. ही उपचार पद्धती अप्रव्ह्ड म्हणजेच स्वीकृत नाही आणि त्या सर्व उपचारांमधली एक आहे ज्याच्या परिणामांवर सध्या संशोधन सुरू आहे.
प्लाझ्मा थेरपी योग्य पद्धतीने आणि मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करून करण्यात आली नाही तर रुग्णाचे प्राणही जाऊ शकतात, असा इशाराही अग्रवाल यांनी दिला होता.
भारतात दिल्लीत एका 49 वर्षांच्या कोरोनाग्रस्त रुग्णावर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यात आले आणि त्यात यश आल्याचं सांगण्यात आलं होतं.
सकारात्मक परिणामांविषयी ऐकल्यानंतर देशातल्या इतर भागातही प्लाझ्मा थेरपीच्या ट्रायल सुरू झाल्या आहेत. अनेक प्लाझ्मा डोनरही पुढे आले.
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील म्हटलं होतं की, कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचे चांगले परिणाम आढळून येत आहेत आणि दिल्लीतल्या एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये एका गंभीर रुग्णाची परिस्थिती या थेरपीनंतर बरीच सुधारली आहे.
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राज्यात प्लाझ्मा थेरपीसाठी प्रोत्साहन देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या होत्या.
मात्र एकाएकी प्लाझ्मा थेरपीच्या चर्चेला लगाम लागला आहे. इतकंच नाही तर प्लाझ्मा थेरपी घातक असल्याचंही काही संशोधकांनी म्हटलं आहे.
प्लाझ्मा घातक असू शकतो का?
प्लाझ्मा डोनरच्या रक्तातून वेगळा केला जातो. या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात. या अँटीबॉडीज शरीरातले विषाणू नष्ट करतात किंवा त्यांची वाढ रोखतात.
जयपूरमधल्या सवाई मानसिंह हॉस्पिटलमधल्या मेडिसीन विभागातले एक डॉक्टर सांगतात, "रक्त आणि रक्ताचे कम्पोनंट चढवताना रिअॅक्शन होण्याची शक्यता असते. रक्त चढवल्याने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं तुम्ही ऐकलं असेलच."
ते पुढे सांगतात, "कोरोना रुग्णांना याचा किती फायदा होईल, हे आम्हाला माहिती नाही. मात्र, यामुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यांची आम्हाला कल्पना आहे."
काही कोरोना रुग्ण प्लाझ्मा थेरपीने बरे झाले आहेत. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, अनेक रुग्ण तर कुठल्याही उपचाराविना स्वतःच बरे झालेत. त्यामुळे हे रुग्ण प्लाझ्मा थेरपीने बरे झाले की स्वतःच्या रोगप्रतिकारकशक्तीने, हे आपण सांगू शकत नाही.
मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते कोरोनाचे गंभीर रुग्ण ज्यांच्याकडे इतर कुठलाही पर्याय शिल्लक नाही, अशांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करून बघता येईल.
दिल्लीतल्या एका खाजगी हॉस्पिटलमध्येही हेच करण्यात आलं होतं. त्यांना ICMR ने प्लाझ्मा थेरपीसाठी मंजुरी दिली नव्हती. मात्र, रुग्णाच्या कुटुंबीयांनी संमती दाखवल्यानंतर रुग्णावर उपचार झाले आणि रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
'रुग्णाची निवड महत्त्वाची'
दिल्लीतल्या सर गंगाराम हॉस्पिटलमधल्या मेडिसीन विभागाचे व्हाईस चेअरमन डॉ. अतुल कक्कड सांगतात की, कुणाचाही प्लाझ्मा घेताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
कोव्हिड-19 आजारातून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णाच्या शरीरातूनच प्लाझ्मा घेतला जाऊ शकतो. या थेरपीसाठी सांगण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, "एखाद्या रुग्णाच्या शरीरातून अँटीबॉडीज तो पूर्णपणे बरा झाल्याच्या दोन आठवड्यानंतरच काढता येतात. इतकंच नाही तर त्या कोव्हिड-19 च्या रुग्णाची एकदा नव्हे तर दोनदा कोव्हिड चाचणी झालेली असावी."
आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णाची एलिजा (इन्जाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट) चाचणी करतात. या चाचणीतून त्या व्यक्तीच्या शरीरात किती अँटीबॉडीज आहेत, हे कळतं.
इतकंच नाही तर बरे झालेल्या रुग्णाच्या शरीरातून रक्त घेण्याआधी राष्ट्रीय निकषांनुसार त्या रक्ताच्या शुद्धतेची तपासणीही केली जाते.
प्लाझ्मा थेरपीच्या ट्रायलविषयी
कोव्हिड-19 च्या रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करायची असेल तर ICMR आणि ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया या दोघांचीही परवानगी घ्यावी लागते.
या दोघांनीही काही दिवसांपूर्वी दिल्ली, महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांना प्लाझ्मा थेरपीसाठीची परवानगी दिली होती.
केवळ भारतातच नाही तर ब्रिटन आणि अमेरिकेसह जगभरातल्या अनेक देशांमध्ये प्लाझ्मा थेरपीच्या ट्रायल्स सुरू आहेत.
चीनमध्ये झालेल्या ट्रायलचे निष्कर्ष
काही दिवसांपूर्वी जामा या मेडिकल जर्नमध्ये एक संशोधन प्रसिद्ध झालं होतं. यात कोव्हिड-19 आजार असलेल्या आणि कॉनवेल्सेंट प्लाझ्माद्वारे उपचार करण्यात आलेल्या पाच गंभीर रुग्णांची माहिती होती.
अशा प्रकारच्या एक्सपेरिमेंटल थेरपीद्वारे उपचार केल्यानंतर क्लिनिकल फिचरमध्ये किती सुधारणा झाली, याची तपासणी होते. उदाहरणार्थ- ताप किंवा श्वास घेताना होणारा त्रास किती कमी झाला.
अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णांना प्लाझ्मा थेरपी देतात. त्यांच्या महत्त्वाच्या अवयवांवर लक्ष ठेवलं जातं. याला सोफा (sequential organ failure assesment) स्कोअर म्हणतात.
तसंच रुग्णाचा व्हायरल लोड म्हणजेच त्याच्या शरीरातल्या विषाणुवर थेरपीनंतर किती फरक पडला आणि थेरपीनंतर व्हेंटिलेटरची सेटिंग बदलली की नाही, हे सगळं बघितलं जातं.
चीनमध्ये झालेल्या ट्रायलमध्ये पाचही रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यांच्यात क्लिनिकल इम्प्रुव्हमेंट झाली. सोफा स्कोरमध्ये सुधारणा झाली आणि व्हायरल लोड कमी झाला. दोन आठवड्यांनंतर तीन रुग्णांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आलं. या तिघांनाही डिस्चार्ज मिळाला.
मात्र, या संशोधनाचा सॅम्पल साईज खूप छोटा होता. तसंच आणखी क्लिनिकल ट्रायल करायची गरज आहे.
सवाई मानसिंह हॉस्पिटलच्या मेडिसीन विभागाच्या डॉक्टरांच्या मते काही रुग्ण बरे झाले म्हणून प्लाझ्मा थेरपी यशस्वी उपचार पद्धती आहे, असं मानलं जाऊ शकत नाही. आजचा काळ हा एव्हिडन्स बेस्ड औषधांचा आहे. त्यामुळे 100 रुग्णांवर या पद्धतीने उपचार करण्यात आले आणि त्यातल्या इतक्यांना त्याचा फायदा झाला, तर तो एव्हिडन्स म्हणजेच पुरावा मानला जातो. डॉक्टर म्हणतात, "यासाठी अनेक पातळ्यांवर आधी ट्रायल्स कराव्या लागतील."
यापूर्वीही अनेक आजारांमध्ये प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला आहे.
2014 साली आलेल्या इबोला विषाणुच्या साथीच्या वेळीसुद्धा प्लाझ्मा थेरपीचा वापर झाला आहे. त्यापूर्वी 2009 साली H1N1 विषाणू आणि 2003 सालच्या सार्सच्या साथीच्या वेळीसुद्धा प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला आहे.
मात्र, कोव्हिड-19 च्या उपचारात प्लाझ्मा थेरपी किती लाभदायी आहे, यावर अजून पुरेसं संशोधन झालेलं नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)