'कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पीएम केअर हा वेगळा फंड कशाला?'

    • Author, फैसल मोहम्मद अली
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी पीएम-केअर्स फंडाची (PM Cares Fund) घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली. या फंडासंदर्भात काही प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.

कोरोना व्हायरसच्या रुग्णांकरता मदतनिधी म्हणून या फंडाची रचना करण्यात आली आहे.

अनेक वर्षांपासून सरकारी पीएम रिलीफ फंड तसंच प्रंतप्रधान आर्थिक सहाय्यता निधी कोश असताना नव्या फंडाची आवश्यकता का? असा प्रश्न विचारला जातो आहे.

काही लोकांनी पीएम केअर फंडाला घोटाळा असल्याचं म्हटलं आहे. महालेखापरीक्षकांच्या किंवा कॅगच्या अखत्यारीत येऊ नये याकरता पीएम केअर फंडाची स्थापना केल्याचं काहींचं म्हणणं आहे.

आर्थिक निगराणी ठेवणाऱ्या यंत्रणांच्या परिघात येत नसल्याने या फंडात जमा झालेला पैसा आणि त्याचा विनियोग याविषयी विचारणा केली जाणार नाही, असं काहींचं म्हणणं आहे.

पंतप्रधान कार्यालय तसंच सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यासंदर्भात कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.

कोरोनाबद्दल अधिक माहिती-

भाजप नेते नलिन कोहली यांनी बीबीसी प्रतिनिधी दिव्या आर्य यांच्याशी बोलताना सांगितलं की, "या मुद्यावरून राजकारण करण्याची आवश्यकता नाही. सरकार वेगवेगळ्या उद्दिष्टांनिशी फंडाची स्थापना करतं. यासंदर्भात अहवाल कॅगला दिला जातो. सगळं काही नियमांच्या अखत्यारीत राहून केलं जात आहे."

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पीएम केअर फंडावर टीका केली आहे. पंतप्रधानांना कॅची नावं आवडतात. प्रधानमंत्री राष्ट्रीय राहत कोष किंवा PMNRF चं नाव बदलून पीएम केअर करता आलं असतं असं थरूर यांनी म्हटलं आहे. मात्र एक नवीन फंड तयार करण्यात आला, ज्याच्या विनियोगाबद्दल कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

राष्ट्रीय संकटावेळीही व्यक्तीकेंद्रित लाट आणण्याचे हे प्रयत्न असल्याची टीका इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केली आहे. या फंडासंदर्भात तुम्ही जनतेला स्पष्टीकरण द्यायला हवं असंही त्यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मदतनिधी कोषात 3800 कोटी रुपये असल्याचा दावा साकेत गोखले यांनी केला आहे. माहिती अधिकाराअंतर्गत त्यांनी पीएम केअरसंदर्भात माहिती मागवली आहे.

नव्या अकाऊंटमध्ये पैसे जमा करण्यापूर्वी, या आधीच्या खात्यातील शिल्लक रकमेचा विनियोग करा असं लाडक्या नेत्याला सांगायला हवं असं त्यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधानांचं ट्वीट

शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटच्या माध्यमातूवन कोरोनाग्रस्तांकरता मदत म्हणून पंतप्रधान नागरिक सहाय्यता आणि आपात्कालीन फंड अर्थात पीएम-केअर्स फंडाची घोषणा केली. लोकांनी देशवासीयांसाठी पैसे दान करावेत असं आवाहन त्यांनी केलं.

भविष्यात असं संकट ओढवलं तर त्यावेळी या फंडातील रकमेचा उपयोग होईल असंही त्यांनी सांगितलं. ट्वीमध्ये फंडाशी निगडीत माहितीची लिंक देण्यात आली होती.

www.pmindia.gov.in या पंतप्रधान कार्यालयाशी संलग्न वेबसाईटवर फंडासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. पीएम केअर ट्रस्टचे अध्यक्ष पंतप्रधान असतील, सदस्यांमध्ये गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री, अर्थमंत्री यांचा समावेश आहे.

एकीकडे फंडासंदर्भात प्रश्न विचारले जात असताना, कॉर्पोरेट उद्योग विश्व तसंच बॉलीवूड तारेतारका यांच्यासह सामान्य माणसं फंडासाठी भरभरून योगदान देत आहेत.

अभिनेता अक्षय कुमारने या फंडासाठी 25 कोटी रुपये देण्याची घोषणा केली. उद्योगपती गौतम अदानी यांनी या फंडाकरता 100 कोटी रुपये दिले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)