कोरोना व्हायरस: भारतात पुरेश्या चाचण्या केल्या जात आहेत का?

    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

WHOचे प्रमुख ट्रेड्रोस अॅडानाम ग्रेब्रायेसूस आवाहन करताहेत की चाचणी करा, चाचणी करा आणि चाचणी करा. प्रत्येक संशयिताची चाचणी करा. कारण जोवर कोरोनाची लागण झालेल्या सगळ्या लोकांची चाचणी होत नाही, तोवर त्यांना वेगळं काढून क्वारंटाईनमध्ये ठेवता येणार नाही. आणि तसं केलं नाही तर ते इतर लोकांमध्ये राहून कोरोना पसरवत राहतील.

मग प्रश्न येतो की भारत सरकार या गोष्टीचं पालन खरंच करतंय का? भारतात कोरोना चाचण्यांचं प्रमाण एवढं कमी का आहे? अनेक तज्ज्ञ सांगतात की भारतातला खरा कोरोना रुग्णांचा आकडा बराच मोठा असू शकतो. हे खरंय का? पाहूया सोपी गोष्ट कोरोनाच्या झालेल्या आणि न झालेल्या चाचण्यांची.

भारतात कोरोनाच्या पुरेशा चाचण्या होतायत?

भारतात आतापर्यंत फक्त १५,००० लोकांची कोरोना संसर्गासाठी चाचणी घेण्यात आली आहे. १३० कोटींची लोकसंख्या असलेल्या भारतात गुरुवारपर्यंत ७२ चाचणी केंद्र होती.

सुरुवातीला फक्त त्याच लोकांची चाचणी होत होती जे परदेशातून आल्यानंतर आजारी पडले होते किंवा अशा लोकांच्या संपर्कात आले होते.

पण पेशंट्सची संख्या जशी वाढू लागली, तसे कुणाची चाचणी घ्यायची याबाबतचे निकष सरकारने बदलले.

ज्या व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होत आहे, श्वासांची गती खालावली आहे, ताप आणि सर्दी आहे. त्या व्यक्तीची चाचणी घेण्यात यावी असं ICMR ने सांगितलं आहे.

ICMR म्हणजे Indian Council of Medical Research हे तुम्हाला आठवत असेल. कोरोनाच्या चाचणीसाठी ही सरकार संस्था सर्व निर्णय घेत आहे.

पण अजूनही भारत पुरेशा चाचण्या करत नाहीये, असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे भारतातले खरे आकडे जगासमोर येत नाहीयेत, असंही त्यांचं म्हणणं आहे.

अमेरिकेतल्या सेंटर फॉर एपिडेमिक डिसीजचे संचालक रामनन लक्ष्मीनारायण यांना बीबीसीशी बोलताना म्हटलंय की भारतात चाचण्या कमी होत आहेत. भारतात कोरोनाच्या रुग्णांची सुनामी सारखी लाट येऊ शकते, असा धोक्याचा इशारा लक्ष्मीनारायण यांनी दिला आहे.

"जर आपण जास्त लोकांच्या चाचण्या केल्या तर कदाचित आपल्याला जास्त रुग्ण आढळतील. पण खरं तर ही समस्या संपूर्ण जगभरात आहे. पुढच्या काही दिवसांत जेव्हा जास्त चाचण्या केल्या जातील तेव्हा भारतातील रुग्णांचा आकडा हजारांमध्ये जाईल आणि मला वाटतं आपण त्याची तयारी करायला हवी. आपल्याला हे समजायला हवं की भारतात रोगाचा संसर्ग होण्याचं प्रमाण खूप आहे कारण भारताची लोकसंख्या चीनप्रमाणेच जास्त आहे. आपली युरोपसारखी परिस्थिती नाही. त्यामुळे समाजातून हा रोग पसरण्याची भीतीही त्याचप्रमाणात वाढते," असं लक्ष्मीनारायण सांगतात.

ICMRचे प्रमुख डॉ. भार्गव यांनी सांगितलं की भारतात पुरेशा चाचण्या होत आहेत.

"अनेकांनी म्हटलं आहे की भारत कमी चाचण्या घेत आहे. आपल्याकडे पुरेशी क्षमता नाही असं देखील काही जण म्हणाले. पण लक्षात घ्या भारताकडे जास्त चाचणी घेण्याची क्षमता आहे. आपल्याला गरज पडल्यास दिवसाला १०,००० टेस्ट म्हणजेच आठवड्याला ५०-६० हजार टेस्ट घेता येऊ शकतील."

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले होते की कुणाची चाचणी घ्यायची आणि कुणाची नाही, याचा प्रोटोकॉल आहे म्हणून सर्वांची चाचणी होत नाहीये. त्यासाठी पैसेही लागतात, असं ते गेल्या आठवड्यात म्हणाले होते.

भारत इतर देशांच्या तुलनेत मागे का?

भारताची लोकसंख्या आहे १३० कोटी आणि आतापर्यंत १५,००० जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

याचाच अर्थ १० लाख लोकांपैकी सुमारे 10 लोकांची चाचणी होत आहे. हेच प्रमाण इटलीसाठी २,७४० इतकं आहे.

दक्षिण कोरियात 10 लाख लोकांमागे ५,७२९ लोकांची चाचणी होतेय. हा जगासमोर आदर्श आहे, असंही काही तज्ज्ञांनी म्हटलंय. कारण कोरोनाची बाधा झालेले सगळे रुग्ण शोधले तर त्यांना बाजूला काढून प्रसार थांबवता येतो.

युरोपातले देश सोडा, थायलंड आणि व्हिएतनाममध्येही भारतापेक्षा जास्त प्रमाणात चाचण्या होत आहेत.

चाचण्या कमी करण्याचं कारण काय?

मुळात पाहूया की ही चाचणी होते कशी. तर संशयित रुग्णाच्या घशातून किंवा नाकातून स्वॅब म्हणजे सॅंपल काढलं जातं आणि ते चाचणीसाठी पाठवलं जातं.

कोविड -१९ हा RNA व्हायरस आहे. रायबोन्यूक्लिक अॅसिड ही त्याची मूळ रचना आहे. रुग्णाच्या सँपलमध्ये या RNAचं प्रमाण अतिशय कमी असतं. प्रयोग सिद्ध करण्यासाठी या RNAचं प्रमाण वाढू द्यावं लागतं. ही प्रक्रिया खरं तर आणखी लांबलचक आहे. थोडक्यात, ही प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक असते.

यासाठी लागणाऱ्या टेस्ट किट्सचा पुरेसा पुरवठा अनेक देशांकडे नाहीये. म्हणूनही सगळ्यांची टेस्ट घेण्याचं ते टाळत आहेत. पण चाचण्यांचं प्रमाण लवकर वाढवणं त्या सर्व देशांसाठी आवश्यक आहे. कारण तसं केलं नाही तर रोग आणखी पसरत राहील.

म्हणूनच आता प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्येही कोरोनाचे किट्स देण्यात येणार आहेत, असं ICMRच्या डॉ. भार्गव यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रातही लवकरच आणखी 8 सरकारी हॉस्पिटल्समध्ये चाचण्या सुरू होताहेत. हे प्रमाण आणखी वाढणार असल्याचं सरकारने सांगितलंय.

त्यामुळे तुम्हालाही जर ताप, कोरडा खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर तुमच्या डॉक्टरशी नक्की संपर्क साधा आणि तपासून घ्या. तपासणी न केल्यामुळे तुम्ही स्वतःचा आणि तुमच्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात टाकत आहात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)