मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर : मतदान आणि निकाल कधी? जाणून घ्या सर्वकाही

महाराष्ट्रातील रखडलेल्या महानगरपालिकांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली.

राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदार होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी निकाल जाहीर केले जाणार आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी एकसदस्यीय प्रभाग असून, इतर 28 ठिकाणी बहुसदस्यीय प्रभागरचना आहे. त्यामुळं अशा ठिकाणी मतदारांना काही ठिकाणी तीन, चार, पाच मते द्यावी लागणार.

निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केलेल्या महानगरपालिकांपैकी 27 महानगरपालिकांची मुदत संपली आहे.

तर जालना आणि इचलकरंजी या दोन महानगरपालिका नवनिर्मित आहेत, अशी माहितीही दिनेश वाघमारे यांनी दिली.

या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ऑफलाईनच घेणार असल्याचं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं. राजकीय पक्षांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.

जातवैधता पडताळणीसाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा इतर पुरावाही स्वीकारणार असल्याचं सांगण्यात आलं. पण 6 महिन्यांत जातवैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत घ्यायच्या आहेत.

महापालिका निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम असा असेल

  • उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात - 23 डिसेंबर 2025
  • अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत - 30 डिसेंबर 2025
  • अर्जांची छाननी - 31 डिसेंबर 2025
  • अर्ज मागे घेण्याची मुदत - 2 जानेवारी 2026
  • निवडणूक चिन्हं आणि अंतिम उमेदवार यादी - 3 जानेवारी 2026
  • मतदान - 15 जानेवारी 2026
  • मतमोजणी अर्थात निकाल - 16 जानेवारी 2026

मतदार व मतदान केंद्र

  • पुरुष मतदार- 1,81,93,666
  • महिला मतदार - 1,66,79,755
  • इतर मतदार- 4,596
  • एकूण मतदार- 3,48,78,017
  • एकूण मतदान केंद्र- 39,147

जागा व आरक्षित जागा

  • महानगरपालिकांची संख्या - 29
  • एकूण प्रभाग-893
  • एकूण जागा- 2869
  • महिलांसाठी जागा- 1442
  • अनुसूचित जातींसाठी जागा- 341
  • अनुसूचित जमातींसाठी जागा- 77
  • नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- 759

उमेदवारांसाठी खर्च मर्यादा

  • बृहन्मुंबई आणि 'अ' वर्ग महानगरपालिका (पुणे व नागपूर)- रु. 15 लाख
  • 'ब' वर्ग महानगरपालिका (पिंपरी-चिंचवड, नाशिक व ठाणे) रु. 13 लाख
  • 'क' वर्ग महानगरपालिका (कल्याण-डोंबिवली, नवी मुबई, छ. संभाजीनगर व वसई-विरार)- रु. 11 लाख
  • 'ड' वर्ग महानगरपालिका (उर्वरित सर्व १९)- रु. 09 लाख

'मतदार याद्यांमध्ये घोळ नाही'

पत्रकार परिषदेत मतदार याद्यांच्या घोळाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले.

"मतदार याद्यांमध्ये काहीही घोळ नाही. फक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेत काही तांत्रिक अडचण होती ती सोडवली आहे," असं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.

तसंच सगळ्या राजकीय पक्षांना आजच मतदार याद्यांच्या प्रिंटआऊट देणार असल्याचंही निवडणूक आयुक्तांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

मतदार याद्यांच्या घोळांबाबत राजकीय पक्षांची बैठक घेतली असून त्यांना सर्व माहिती देऊन शंकांचं निरसन केलं असल्याचंही निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.

नागपूर आणि चंद्रपूरमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असलं तरी तिथं निवडणुका तत्काळ घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळं तिथं निवडणुका घेत असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं.

कोणत्या निवडणुका प्रलंबित?

राज्यातील निवडणूक होऊ घातलेल्या 29 महानगरपालिकांपैकी जालना आणि इचलकरंजी या नवनिर्मित महानगरपालिका आहेत.

5 महानगरपालिकांची मुदत 2020 मध्ये संपली आहे. सर्वाधिक 18 महानगरपालिकांची मुदत 2022 मध्ये संपली होती, तर 4 महानगरपालिकांची मुदत 2023 मध्ये संपली आहे.

राज्यातील एकूण 29 महापालिकांच्या निवडणुका दोन ते चार वर्षांपासून रखडलेल्या आहेत. यामध्ये नवनिर्मित जालना व इचलकरंजी महापालिकेची अद्याप पहिली निवडणूकही झालेली नाही.

या महानगरपालिका निवडणुका प्रलंबित

  • बृहन्मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे, भिवंडी निजामपूर,पनवेल, मीरा- भाईंदर
  • छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, जालना,मनांदेड वाघाळा
  • पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली- मीरज कुपवाड, अहिल्यानगर, सोलापूर
  • नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे,
  • नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर

या जिल्हा परिषद निवडणुका प्रलंबित

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, धाराशिव, लातूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा

31 जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश

सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळं सर्व महानगर पालिका आणि सर्वांचे लक्ष असते अशा मुंबई महापालिकेची निवडणूकही जाहीर करण्यात आली आहे.

यापूर्वी 2 डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान झालं. मात्र अद्याप निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. तर काही ठिकाणच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या असून त्यासाठी नवीन कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते चार वर्षांपासून प्रशासकांच्या हाती आहेत. 29 महागनरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदांचा गाडा अजूनही प्रशासक हाकत आहेत.

सुरुवातीला कोरोना, प्रभाग रचना आणि नंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुका लांबलेल्या होत्या.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.