स्पाईसजेटच्या विमानात एक प्रवासी फ्लाईट लँड होईपर्यंत टॉयलेटमध्येच अडकून पडला

स्पाईसजेट विमान

फोटो स्रोत, Reuters

    • Author, इम्रान कुरेशी
    • Role, बीबीसीसाठी

विमानातून प्रवास करताना टॉयलेटचं दार बिघडल्यामुळे एका प्रवाशाला एक तासाहून अधिक काळ टॉयलेटमध्येच अडकून राहावं लागलं. मुंबईहून बेंगळुरूला जाणाऱ्या स्पाईसजेट कंपनीच्या विमानात हा धक्कादायक प्रकार घडला.

स्पाईसजेटने या प्रवाशाची माफी मागितली असली तरी सध्या विमान प्रवास करणाऱ्यांच्या गैरसोयींबाबत वेगवेगळ्या बातम्या येत असताना आता हा टॉयलेटमध्येच अडकण्याचा प्रकार घडला आहे.

संबंधित व्यक्ती मुंबईहून बेंगळुरूला जाणाऱ्या एका विमानात बसला, प्रवासादरम्यान तो शौचालयाचा वापर करण्यासाठी गेला आणि टॉयलेटचा दरवाजा खराब झाल्यामुळे त्याला त्या छोट्याशा टॉयलेटमध्ये सुमारे तासभर अडकून राहावं लागलं.

आदर्श परिस्थितीत मुंबई ते बंगळुरू हा प्रवास करायला सुमारे 1 तास 45 मिनिटं लागतात. शेवटी संपूर्ण प्रवासात टॉयलेटचा दरवाजा काही ठीक झाला नाही आणि बंगळुरूच्या विमानतळावर हे विमान उतरल्यानंतरच या प्रवाशाची सुटका करण्यात आली. 16 जानेवारीला ही घटना घडल्याची माहिती आहे.

स्पाईसजेटीच्या प्रवक्त्यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, "या संपूर्ण प्रवासात, स्पाईसजेटच्या कर्मचाऱ्यांनी या प्रवाशाला सहकार्य आणि मार्गदर्शन केलं.

बेंगळुरूच्या विमानतळावर हे विमान उतरलं आणि एका इंजिनियरने या टॉयलेटचा दरवाजा उघडला. त्यानंतर लगेचच संबंधित प्रवाशाला वैद्यकीय मदत करण्यात आली."

त्याच्या प्रवासाचा संपूर्ण खर्च त्याला परत दिला जाईल, अशी माहितीही स्पाईसजेटने दिली आहे.

स्पाईसजेटने या प्रवाशाचे अधिक तपशील देण्यास नकार दिला असून एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार तो माणूस 'प्रचंड तणावात' होता.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बंगळुरू विमानतळावरील एका अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, "हा बिचारा माणूस मुंबई ते बंगळुरूच्या प्रवासात विमानातलं टॉयलेट वापरायला गेला आणि ते विमान जमिनीवर उतरेपर्यंत तो त्याच टॉयलेटमध्ये अडकून पडला."

या अधिकाऱ्याने अशीही माहिती दिली की शौचालयात अडकल्यानंतर विमानाच्या कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा ते दार उघडण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर एका महिला कर्मचाऱ्याने टॉयलेटच्या दाराखालून एक चिठ्ठी संबंधित प्रवाशाला दिली ज्यात त्याला घाबरू नका असं सांगण्यात आलं होतं.

"सर, आम्ही दार उघडण्याचा खूप प्रयत्न केला. घाबरू नका. आपण काही मिनिटांत उतरणार आहोत, त्यामुळे कृपया कमोडचं झाकण बंद करा आणि त्यावर बसा आणि स्वतःला सुरक्षित करा. मुख्य दरवाजा उघडताच, इंजिनियर येईल," अशी माहिती या चिठ्ठीत देण्यात आली होती.

भारताच्या विमान वाहतूक मंत्र्यांनी एकीकडे सांगितलं की ते प्रवाशांच्या गैरसोयीच्या समस्या सोडवण्यासाठी देशातील सहा प्रमुख विमानतळांवर 'वॉर रूम' स्थापन करणार आहेत आणि त्याच काळात ही घटना घडली आहे.

भारतातील सर्वांत व्यग्र विमानतळांपैकी एक असलेल्या दिल्लीत दाट धुक्यामुळे रविवारपासून शेकडो देशांतर्गत उड्डाणांना उशीर झाला आहे.

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)