विमान 16 हजार फुटांवर असताना अचानक खिडकी तुटली, कंपनीनं मान्य केली चूक

विमान

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, आकाशात विमानाची खिडकी तुटली तेव्हा सुदैवाने त्या जवळच्या सीटवर कुणी बसलेलं नव्हतं.

अमेरिकेत एक विमान 16 हजार फूट उंच असताना त्याची खिडकी तुटल्याने इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं होतं.

विमान 5 जानेवारी 2024 रोजी अमेरिकेतल्या पोर्टलँडमधून कॅलिफोर्नियाला जात असताना हा अपघात घडला.

हवेच्या दाबामुळे विमानाचा एक भाग तुटल्याचं सांगितलं जात आहे.

विमानाने उड्डाण करून केवळ 6 मिनिटे झाली होती. तेव्हाच ही घटना घडली. त्यानंतर विमानाचं लँडिंग करण्यासाठी एकूण 20 मिनिटे लागली.

या घटनेनंतर अलास्का एअरलाइन्सने त्यांच्या सर्व 65 बोईंग विमानांची उड्डाणे थांबवली आहेत.

आता या सर्व विमानांची नीट तपासणी केल्यानंतरचं त्यांच्या उड्डाणांना परवानगी देण्यात येणार आहे.

सुदैवानं सर्व 177 प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप बचावले. विमानातली कंप्रेस्ड हवा बाहेर गेल्यानं ऑक्सिजन मास्क खाली आले.

त्यांच्या सहाय्यानं प्रवासी श्वास घेताना दिसले. विमानानं त्यानंतर पोर्टलँडमध्ये इमर्जन्सी लँडिंग केलं.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हे विमान बोईंग कंपनीनं तयार केलेलं 737 मॅक्स 9 प्रकारचं होतं. या अपघातानंतर अमेरिकेतली हवाई वाहतूक प्रशासन संस्था FAA नं बोईंग कंपनीची सर्व 737 मॅक्स नाईन विमान ग्राऊंड केली आहेत, म्हणजे या विमानांना अमेरिकन हवाई हद्दीत उड्डाण करता येणार नाही.

भारतात कुठलीही एयरलाईन्स सध्या बोईंग 737 मॅक्स 9 प्रकारची विमानं वापरत नाहीये. पण DGCA या भारतातील हवाई वाहतूक नियंत्रण संस्थेनं एयर इंडिया एक्सप्रेस, अकासा एयर आणि स्पाईसजेटला त्यांच्या ताफ्यातील बोईंग 737 मॅक्स विमानांची पाहणी करण्यास सांगितलं आहे.

या प्रकारच्या विमानांमध्ये केबिनच्या मधल्या भागात एरवी अतिरिक्त आपात्कालीन दरवाजा बसवण्याची सोय असते.

पण अलास्का एयरलाईन्समध्ये असा दरवाजा वापरला जात नसल्यानं ती जागा बंद करण्यात आली होती. अपघातात तोच भाग निखळून खाली पडला.

आता या घटनेमध्ये बोईंग कंपनीच्या प्रमुखांनी हा दोष कंपनीचा असल्याचे मान्य केले आहे. मंगळवार 9 जानेवारी रोजी बोईंगचे प्रमुख आणि मुख्य कार्यकारी डेव्ह कल्हौन यांनी ही कबुली दिली. ते म्हणाले, "आम्ही आमची चूक मान्य करतो. ती दुरुस्त करण्याचे 100 टक्के प्रयत्न केले जातील तसेच त्यातल्या प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता पाळली जाईल. "

"या अपघाताच्या कारणाचा तपास करण्यासाठी एनटीएसबीबरोबर आपण काम करू असेही त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले. "

विमान

फोटो स्रोत, Reuters

अलास्का एअरलाईन्सच्या मते, ही एक अत्यंत दुर्मीळ घटना आहे. विमानातील पायलट आणि कर्मचार्‍यांना अशा प्रकारची परिस्थिती हातळण्यासाठी ट्रेनिंग देण्यात आले होते. त्यांनी ती परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली असं एअरलाईन कंपनीने सांगितलं.

फ्लाइट ट्रॅकिंग डेटानुसार, विमान 16,000 फूट (4,876 मीटर) पेक्षा जास्त उंचीवर उड्डाण करत होते. तेव्हाच अचानक विमानाचा दरवाजा निखळून पडला.

‘विमानाची खिडकी तुटलीय, आम्हाला इमरजन्सी लँडिंग करायचं’

या विमान दुर्घटनेचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये तुटलेल्या खिडकीतून आकाश दिसतं.

इतर फोटोंमध्ये तुटलेल्या खिडकीजवळचा भाग दिसत आहे. ही घटना घडली तेव्हा तिथे कुणी बसलेलं नव्हतं.

या खिडकीचा भाग किंवा फ्यूजलेज विमानाच्या मागील भागात म्हणजे पंख आणि इंजिनच्या मागे होता.

अमेरिकेचे नॅशनल ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्ड आता या घटनेचा कसून तपास करणार आहे.

दरम्यान, अलास्का विमानातील पायलट हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) कक्षाशी बोलतानाचा ऑडिओ मेसेज प्रसिद्ध करण्यात आला आहे.

त्यामध्ये पायलट इमरजन्सी असल्याने विमानाचे तात्काळ लँडिंग करावे लागेल, असं सांगत आहे.

विमान

फोटो स्रोत, Reuters

या अपघातानंतर बोईंग 737 मॅक्स विमानं पुन्हा चर्चेत आली आहेत.

2018-19 साली या विमानांना वेगवेगळे अपघात झाले होते.

इंडोनेशियातली लायन एयर आणि इथियोपियन एयरलाईन्सला झालेल्या अपघातात 330 हून अधिक जण मारले गेले.

विमानांतल्या सॉफ्टवेअरमधील दोषामुळे हे अपघात झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर बोईंग कंपनीनं आवश्यक ते बदल करून ही विमानं पुन्हा बाजारात आणली होती. त्यानंतर या विमानांना कुठला मोठा अपघात झालेला नाही.

पण या इतिहासामुळे 737 मॅक्स प्रकारातल्या विमानांची नेहमी बारकाईनं तपासणी आणि चर्चा होताना दिसते. तरीही अलास्का एयरलाईन्समध्ये विमानाचा काही भाग निखळण्याचा प्रकार घडला आहे. त्यामागचं कारण स्पष्ट होईपर्यंत अमेरिकेत आता या विमानांना बंदी आहे.

पण विमान वाहतूक तज्ञ जॉन स्ट्रिकलंड यांच्या मते, अलास्का विमानाचा आताचा अपघात हा आधीच्या घटनांपेक्षा फार वेगळा आहे आणि या विमानाची सुरक्षा मानके फार चांगली आहेत.

पण आकाशात विमानाची खिडकी कशी तुटली याची कारणं शोधावी लागतील, असंही जॉन यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)