जेव्हा एक भारतीय लढाऊ विमान पाकिस्तानात कोसळलं आणि पायलट चालत भारतात आला

फोटो स्रोत, DARA PHIROZE CHINOY
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
6 सप्टेंबर 1965. त्या रात्री पाकिस्तानी वायुदलाच्या C-130 हरक्युलस नामक लढाऊ विमानांनी भारताच्या पठाणकोट, हलवाडा आणि आदमपूरच्या हवाई दलाच्या अड्ड्यावर हल्ला चढवला होता.
यादरम्यान, पाकिस्तानी लढाऊ विमानांमधून तब्बल 180 पॅराट्रूपर वरील ठिकाणांवर उतरत होते. पण त्यापैकी बहुतांश पॅराट्रूपरना भारतील सैनिकांनी पकडलं.
या चकमकीत पाकिस्तानचे 22 पॅराट्रूपर मारले गेले, तर उर्वरित त्यांच्या देशात जाण्यास यशस्वी ठरले. त्यादरम्यान, पाकिस्तानच्या दोन कॅनबेरा विमानांनी भारताच्या आदमपूर एअरबेसवर हल्ला चढवला होता. तिथे तैनात असलेल्या विमानभेदी तोफांनी एका विमानाला लक्ष्य बनवलं. त्यानंतर हे विमान एअरबेसच्या बाहेरच्या बाजूला कोसळलं.
त्या लढाऊ विमानाचे पायलट आणि नेव्हिगेटर यांना पकडून आदमपूरच्या ऑफिसर्स मेसमध्ये आणण्यात आलं. जिनेव्हा कराराचं पालन करताना त्यांना चांगली वर्तणूक देण्यात आली.
इतकंच नव्हे, तर त्यांच्या इच्छेनुसार त्यांना जेवणात एका पंजाबी ढाब्यातून तंदुरी चिकन आणि बटर नानसुद्धा देण्यात आलं.
पुढच्या दिवशी या युद्धकैद्यांना लष्कराच्या ताब्यात देण्यात आलं. यानंतर भारतीय सैन्यदलाचं लक्ष्य पाकिस्तानवर हल्ला चढवून लाहोर शहर ताब्यात घेण्याचं होतं. पण 1950 च्या दशकात बांधण्यात आलेला इच्छोगिल कालवा यामध्ये अडसर ठरत होता.
या कालव्याच्या मागील बाजूने भारतीय सैनिकांवर 1.55 एमएमच्या हॉवित्झर तोफांनी हल्ला करण्यात येत होता. अखेरीस, भारतीय सैनिकांना या तोफांचा बिमोड करण्यासाठी भारतीय वायुदलाची मदत घ्यावी लागली.
भारतीय सैनिकांचा गैरसमज
पाकिस्तानच्या तोफांचा बंदोबस्त करण्यासाठी भारतीय वायु दलाच्या विमानांनी झेप घेतली.
पण, पाकिस्तानच्या विमानभेदी तोफा, मशीन गनने चालवलेल्या गोळ्या यांनी या विमानांना हानी होऊ लागली.
हल्ला करून परत येईपर्यंत त्यांचे इंजिन निकामी झालं होतं. त्यानंतर भारतीय सैनिकांना पॅराशूटच्या मदतीने खाली उतरावं लागत होतं.

फोटो स्रोत, BHARATRAKSHAK.COM
भारतीय वायुदलातील एक सुप्रसिद्ध पायलट राहिलेले ग्रुप कॅप्टन दारा फिरोज चिनॉय यांनी आपल्या 'एस्केप फ्रॉम पाकिस्तान : अ वॉर हिरोज क्रोनिकल' या पुस्तकात या प्रसंगाविषयी लिहिलं आहे.
ते लिहितात, "अनेक वेळा भारतीय पायलट्सना आपल्याच सैनिकांकडून हल्ल्याला सामोरं जावं लागलं होतं. एका भारतीय पायलटच्या पोटात भारतीय सैनिकानेच संगिनीचा चाकू खुपसला होता. तर एकाने भारतीय पायलटवर गोळी झाडली होती. असं होण्यामागचं कारण म्हणजे, भारतीय सैनिकांना हेच पाकिस्तानचे पॅराट्रूपर आहेत, असा गैरसमज झाला होता."
फ्लाईट लेफ्टनंटला भारतीय गावकऱ्यांकडून मारहाण
अशाच एका घटनेत भारतीय पायलट फ्लाईट लेफ्टनंट इक्बाल हुसेन यांच्या विमानाची इंधन टाकी पाकिस्तानच्या तोफांमुळे फुटली होती.

फोटो स्रोत, OM BOOK
चिनॉय लिहितात, "ते माझ्याच स्क्वार्डनचे होते. पाकिस्तानात बॉम्बहल्ले करून परतत असताना मी त्यांच्या मागे दुसऱ्या क्रमांकावर होतो. ते बेसवर पोहोचणारच होते, इतक्यात त्यांच्या इंजिनाने पेट घेतला. ते पॅराशूटच्या मदतीने आदमपूर गावाजवळ उतरले. मी वरून पाहिलं की त्यांच्या चारही बाजूंनी गावकऱ्यांनी घेराव घातला होता.
त्यांच्या हातात तलवारी होत्या. मी वरूनच याची माहिती नियंत्रण कक्षाकडे पाठवली."
यानंतर दोन सैनिकांना तत्काळ दुचाकीवरून गावात पाठवण्यात आलं. पण दोन्ही सैनिक पोहोचेपर्यंत इक्बाल गंभीररित्या जखमी होऊन बेशुद्ध पडले होते. त्यांना सोडवून लगेच सैनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर ते चार दिवस ICU मध्ये होते. पण गावकऱ्यांना आपल्या चुकीची जाणीव झाल्यानंतर त्यांनी त्यांच्यासाठी रक्तदान केलं.
पाकिस्तानच्या तोफांना नष्ट करण्याची जबाबदारी
या प्रसंगातून वाचल्याच्या एका वर्षानंतर इकबाल हुसेन आदमपूर ते जम्मू असा विमान प्रवास करत होते.
पण बिकट हवामानामुळे विमान नियंत्रणाबाहेर जाऊन एका डोंगरावर कोसळलं. 90 टक्के भाजूनसुद्धा इक्बाल यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या दोन सहकाऱ्यांना जळत्या विमानातून बाहेर काढलं.

फोटो स्रोत, DARA PHIROZE CHINOY
तिसऱ्या प्रवाशाला वाचवत असताना विमानात मोठा स्फोट होऊन इक्बाल यांचा त्यात बळी गेला.
1965 च्या युद्धाच्या अंतिम टप्प्यात पाकिस्तानच्या L-155 तोफा भारतीय ठिकाणांवर जबरदस्त हल्ला चढवत होत्या.
तिथे पाकिस्तानी वायुदलाच्या जेट विमानांनीही सतत हल्ले करून भारतीय लष्कराला पुढे येण्यापासून रोखलं होतं.
10 डिसेंबर 1965 च्या सकाळी 7 वाजता आदमपूर एअर बेसवरील अधिकाऱ्यांनी भारतीय लढाऊ वैमानिकांना पुढच्या मोहिमेबद्दल माहिती दिली.
पाकिस्तानच्या तोफा नष्ट करणं, हेच आपलं लक्ष्य असल्याचं त्यांनी सांगितलं. या तोफांच्या भोवतीने चारही बाजूंना विमानभेदी तोफाही होत्या.
या मोहिमेचं नेतृत्व स्क्वार्डन लीडर TPS गिल यांच्याकडे होतं. फ्लाईंग ऑफिसर दारा फिरोज चिनॉय त्यांचे नंबर-2 होते. तर फ्लाईट लेफ्टनंट रवि कुमार हे नंबर-3 आणि फ्लाईट लेफ्टनंतर गिगी रत्नपारखी हे नंबर-4 होते.
रेल्वेवरील हल्ल्यात दारुगोळा संपला
भारतीय विमानांच्या दोन जोड्यांनी तोफांना बॉम्बहल्ल्याने उडवण्याच्या उद्धेशाने हवेत झेप घेतली. पण या तोफा त्यांना सापडल्या नाहीत. अखेरीस, एक रेल्वे तिथून जाताना दिसल्याने तिच्यावर हल्ला करण्याचं ठरलं. रेल्वेवर जोरदार बॉम्बहल्ला करून ती उद्ध्वस्त करण्यात आली.
पण, मागे परतत असतानाच त्यांना हव्या असलेल्या तोफा त्यांना दिसल्या. पण यावेळी त्यांच्याकडील सगळा दारूगोळा संपलेला होता.

फोटो स्रोत, DARA PHIROZE CHINOY
यामुळे परत येऊन त्यांनी GLO ना आपला अहवाल दिला. त्यांनी आदेश दिला की लवकर जेवण करून पुन्हा त्या ठिकाणी जा आणि बॉम्बहल्ला करा.
फ्लाईंग ऑफिसर चिनॉय मेसमध्ये जेवण्यासाठी गेले, तेव्हा तिथे अधिकाऱ्यांची गर्दी होती. जेवण वाढणाऱ्या लोकांवर ताण येत होता.
चिनॉय यांनी सकाळी मोहिमेवर जाण्यापूर्वी काहीही खाल्लेलं नव्हतं. त्यांना खूप तहानही लागलेली होती.
त्यांनी वेटरला पाणी मागितलं, पण तो कामात असल्याने त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि निघून गेला.
यानंतर चिनॉय हे क्रू रूममध्ये फिलीप राजकुमार यांच्याकडे गेले. राजकुमार त्यांना म्हणाले, "तू आधी पाणी पिऊन घे. आता पाणी मिळेल की नाही माहीत नाही."
मग चिनॉय एक ग्लास पाणी ढसाढसा प्यायले आणि खोलीतून बाहेर निघून गेले.
चिनॉय यांच्या विमानाला भगदाड
बेसवर पोहोचताच चिनॉय यांनी आपल्या सहकाऱ्याला विमानाच्या दिशेने जाताना पाहिलं. चिनॉय यांनीही तत्काळ फ्लाईंग गिअर घातलं आणि आपल्या मिस्टिअर विमानाकडे निघाले. चारही विमानं पाकिस्तानी तोफांच्या दिशेने रवाना झाली.
पण, त्यांच्यावर विमानभेदी तोफांचा हल्ला सुरू झाला. तेजा गिल यांनी रेडिओवर म्हटलं, "पुलिंग अप टारगेट लेफ़्ट, टेन ओ क्लॉक."

फोटो स्रोत, DARA PHIROZE CHINOY
दोन सेकंदांनी चिनॉय यांनीही रेडिओवर संदेश दिला, "नंबर 2, कॉन्टॅक्ट टारगेट नाइन ओ क्लॉक रोलिंग इन."
त्याच वेळी चिनॉय यांना आपल्या सीटखाली मोठा धक्का लागल्यासारखी जाणीव झाली. ते याविषयी लिहितात, "हा धक्का असा होता, जसं एखाद्या खेचराने आपल्याला लाथ मारली असावी. त्याच वेळी माझं इंजिन निकामी झालं आणि फायर अलार्म वाजू लागलं. माझ्या विमानाचा वेग तत्काळ कमी झाला. माझं कॉकपीट धुराने भरलं. मागून लागलेल्या आगीची झळ मला बसू लागली."
चिनॉय यांनी संदेश पाठवला, "आय एम हिट. इंजिन फ्लेम आऊट."
काही सेकंदातच विमानाच्या कॉकपीटपर्यंत आग पोहोचण्यास सुरुवात झाली.
पॅराशूटच्या मदतीने ऊसाच्या शेतात उतरले
चिनॉय यांच्या विमानात 2x68 mm चे रॉकेट्सचे पॉड ठेवलेले होते. तर टँकमध्येही तीन तृतीयांश इंधन बाकी होतं. अशा स्थितीत त्यांचं विमान 2 हजार फूटांवरून खाली कोसळलं असतं, तर चिनॉय यांचा मृत्यू निश्चित होता.
प्रसंगावधान राखत चिनॉय यांनी तत्काळ इजेक्शनचं बटण दाबलं.

फोटो स्रोत, OM BOOK
ते याविषयी लिहितात, "पॅराशूटच्या मदतीने मी खाली येत होतो, तेव्हा रायफलीच्या गोळ्यांचा आवाज मला येत होता. सोबतच विमानभेदी तोफांचे गोळे माझ्या आजूबाजूने जात होते. अनेक गोळ्या माझ्या पॅराशूटमधून आपपार निघून गेल्या होत्या. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते माझ्यावरच निशाणा साधत होते."
हे जिनेव्हा कराराचं उल्लंघन होतं. कारण विमान पाडल्यानंतर पायलटचं वाचण्याचं एकमेव साधन हे त्याचं पॅराशूटच असतं.
ते पुढे लिहितात, "सुदैवाने मी ऊसाच्या शेतात पडलो. ऊस कापलेलं नव्हतं, त्यामुळे मला लपण्यासाठी जागा मिळाली. मी खाली पडताच पाकिस्तानी सैनिकांचा आरडाओरडा, ऑटोमेटिक बंदुका चालवण्याचा आवाज आला."
पाकिस्तानी सैनिकांना दिला गुंगारा
चिनॉय यांनी नागमोडी रेषेत ऊसाच्या शेतात पळणं सुरू केलं. भीतीने त्यांच्या धावण्याचा वेगही वाढला.
पण त्यांना लक्षात आलं की आपण आता भारताच्या सीमेच्या दिशेने पूर्वेकडे जाऊ, असं पाकिस्तानी सैनिकांना वाटेल. त्यामुळे तसं न करता चिनॉय पश्चिम दिशेने धावू लागले.
यानंतर वाहने, सैनिक आणि गोळीबाराचा आवाज हळूहळू कमी झाला.

फोटो स्रोत, BHARATRAKSHKDAL.COM
दारा फिरोज चिनॉय लिहितात, "मी पुन्हा शेतात धावू लागलो, लपण्यासाठी जागा शोधू लागलो. काही वेळाने मी उत्तर दिशेने धावू लागलो. तब्बल दोन तास धावल्यानंतर मी एके ठिकाणी थांबून विश्रांती घेऊ लागलो."
ते पुढे म्हणतात, "मी शक्य तितकी कमी हालचाल करून पडून राहिलो. कारण, पाकिस्तानी सैनिकांनी पकडलं तर माझे हाल काय होतील, हे मला माहीत होतं. अंधार होताच मी एक खड्डा खणून त्यात नकाशा, रडार ऑथेंटिकेशन शीट आणि महत्त्वाच्या गोष्टी लपवल्या. हे पाकिस्तानी सैनिकांच्या हाती लागणं धोक्याचं होतं."
माझा चेहरा चिखलाने मढवला. शिवाय माझा सूटही घामाने डबडबून, माती लागून काळा पडलेला होता."
थकूनही कालवा पार केला
थोडा वेळ आराम केल्यानंतर चिनॉय यांनी पूर्व दिशेने जायला सुरुवात केली. तोपर्यंत खूप रात्र झाली होती.
गाव आणि रस्ता टाळून ते प्रवास करत होते, कारण कुणीही पाहिलं तरी गोंधळ उडाला असता, याची त्यांना कल्पना होती.

फोटो स्रोत, DARA PHIROZE CHINOY.
चिनॉय यांना लक्षात आलं, की ते सकाळी फक्त चहा पिऊन बाहेर पडले होते. गेल्या 20 तासांपासून त्यांनी एक घोट पाणीही प्यायलेलं नव्हतं. याचा त्यांना त्रास होऊ लागला.
थकव्याने आपण बेशुद्ध पडलो तर पाकिस्तानी सैनिकांच्या हाती लागू, याची भीती त्यांच्या मनात होती.
याच परिस्थितीत त्यांनी पहिल्यांदा कंबरेपर्यंत पाणी असलेला एक कालवा पार केला. त्यानंतर वेगाने वाहणारा इच्छोगिल कालवाही त्यांनी पार केला.
भारतीय सैनिकांनी म्हटलं 'हँड्स-अप'
चिनॉय लिहितात, "मी अमृतसर-बटाला रस्त्याला लागलो, तेव्हा मला लक्षात आलं की मी भारतात प्रवेश केला आहे. तिथे एका गावाबाहेर मला विहीर दिसली. मी एका बादलीने पाणी बाहेर काढून पहिल्यांदा पिऊन घेतलं. नंतर डोक्यावर ओतून घेतलं. पाणी पिल्यानंतर मला बरं वाटू लागलं. नंतर, मी दक्षिण दिशेने चालू लागलो."

फोटो स्रोत, BHARATRAKASHAK.COM
इथेही मी मुख्य रस्ता टाळून चालू लागलो होतो. तोपर्यंत पहाट झाली होती. तेव्हा मला काहींच्या कुजबुजण्याचा आवाज ऐकू आला.
ते म्हणतात, "मला माहीत होतं की आपल्या सैनिकांनी कशा प्रकारे फ्लाईट लेफ्टनंतर विजय मायादेव आणि बो फाटक यांच्यावर हल्ला केला होता. त्यामुळे, मी स्वतःहून त्यांना ओरडलो. कोण आहे तिथे?
मला पाहून ते आश्चर्यचकित झाले. त्यांच्यापैकी एकाने माझ्यावर रायफल रोखली. तो मला म्हणाला, हँड्स-अप. यानंतर मी तत्काळ हात वर करून गुडघ्यांवर खाली बसलो."
पोहोचल्यानंतरचं नाट्य
भारतीय सैनिकांनी फिरोज चिनॉय यांना प्रश्न विचारले. हे आपल्याच भारतीय वायु दलाचे पायलट आहेत, यावर त्यांचा विश्वास नव्हता.
ते म्हणाले, "तुमच्या वरिष्ठांना बोलवा. यानंतर एक सुभेदार जीपने त्यांच्याकडे पोहोचला. त्यांनाही चिनॉय यांच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही."

फोटो स्रोत, OM BOOK
सुभेदारांनी त्यांना जीपमध्ये मागे बसण्यास सांगितलं. चिनॉय लिहितात, "मी जीपमध्ये बसलो, तेव्हा माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी बसलेला एक भारतीय सैनिकही जीपमध्ये चढला. पण त्याचं बोट त्याच्या बंदुकीच्या ट्रिगरवरच होतं. चुकून ते ट्रिगर दाबलं गेल्याने माझ्या डोक्याच्या बाजूने एक इंचावरून ती गोळी गेली."
या चुकीमुळे त्या सैनिकाला सुभेदाराकडून गालावर एक जोरदार चापट खावी लागली. याचा आवाज बंदुकीच्या गोळीपेक्षाही मोठा होता, असं ते लिहितात.
यानंतर चिनॉय यांना कॅप्टनसमोर उभं करण्यात आलं. कॅप्टननी ओळखपत्र मागितलं, पण चिनॉय यांनी आपल्याकडे ते नसल्याचं सांगितलं. मिशनवर जाताना आपल्याकडे ओळखपत्र दिलं जात नाही, असं ते म्हणाले.
कॅप्टननी चिनॉय यांच्या युनिटचं लोकेशन तसंच कमांडर यांच्याविषयीचे प्रश्न विचारले. यावर जॉक लॉईड आपले स्टेशन कमांडर आहेत, असं चिनॉय उत्तरले.
यानंतर, आणखी काही प्रश्नोत्तरे झाली. खात्री पटल्यानंतर चिनॉय यांना नाश्ता देण्यात आला. कॉफीही पाजण्यात आली.
विशिष्ट सेवा मेडल
आंघोळ करून चिनॉय अमृतसर एअरफोर्स सेंटरकडे रवाना झाले. ते इतके थकलेले होते की तत्काळ त्यांना झोप लागली.
नंतर जीप एअरफोर्स सेंटरमध्ये प्रवेश करत असताना त्यांना जाग आली. तेव्हा पाकिस्तानच्या वायुदलाने एअरफोर्स सेंटरवर हल्ला चढवलेला होता.

फोटो स्रोत, OM BOOK
इतक्या अडचणीतून बाहेर पडल्यानंतर आता या हल्ल्यात चिनॉय यांना मरायचं नव्हतं. त्यामुळे तिथून बाहेर पडून ते एका बंकरमध्ये जाऊन लपले.
नंतर अमृतसरच्या स्टेशन कमांडरनी त्यांना आदमपूरला सोडलं. चिनॉय आपल्या ऑफिसर्स मेसमध्ये गेले, तसा त्यांच्या सहकाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
नंतर चिनॉय यांची वैद्यकीय चाचणी झाली. ते विमान चालवण्यास पात्र आहेत, असा निष्कर्ष देण्यात आला.

फोटो स्रोत, OM BOOK
23 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध समाप्त झालं. त्यावेळी चिनॉय भारतात परतल्याची बातमी लपवून ठेवण्यात आली होती.
यानंतर तीन महिन्यांनी 1 जानेवारी 1966 रोजी तत्कालीन हवाई दल प्रमुख अर्जन सिंह यांनी दारा फिरोज चिनॉय यांना विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित केलं.
चिनॉय नंतरच्या काळात भारतीय हवाई दलात ग्रुप कॅप्टन होऊन निवृत्त झाले. सध्या ते बंगळुरुत पत्नी मार्गारेट यांच्यासोबत राहतात.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








