Air Force Day: रफाल विमानांमुळे भारतीय वायुदलाची शक्ती कशी वाढणार

फोटो स्रोत, ANI
- Author, टीम बीबीसी हिंदी
- Role, नवी दिल्ली
8 ऑक्टोबर हा वायुसेना दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि त्याच दिवशी भारताला पहिली रफाल लढाऊ विमान मिळाली.
भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्वतः फ्रान्समध्ये दाखल होऊन या विमानांची पूजा केली आणि त्यानंतर एका भारतीय वायुदलाच्या पायलटबरोबर उड्डाणही केलं.
भारत घेत असलेली ही लढाऊ विमानं फ्रान्समधल्या दासाँ कंपनीने तयार केली असून या खरेदीवरून वाद झाले होते.
कधी झाला करार?
डॉ. मनमोहन सिंग UPA सरकारने 2010 साली या खरेदी प्रक्रियेला फ्रान्समध्ये सुरुवात केली. 2012 ते 2015 दरम्यान दोन्ही देशांदरम्यान वाटाघाटी सुरू होत्या. 2014 साली UPAच्या जागी नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेत आलं.
36 रफाल विमानांसाठीच्या तब्बल 59 हजार कोटींच्या फ्रान्ससोबतच्या करारावर सप्टेंबर 2016 मध्ये भारताने स्वाक्षऱ्या केल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सप्टेंबर 2016 मध्ये म्हटलं होतं, "संरक्षण सहकार्याबाबत 36 लढाऊ रफाल विमानांच्या खरेदीबद्दल आनंदाची गोष्ट ही की दोन्ही देशांदरम्यान काही आर्थिक बाबी वगळता करार झालेला आहे."
करारावरून नेमका वाद काय?
रफाल फायटर जेटची किंमत UPA सरकारच्या कार्यकाळादरम्यान 600 कोटी रुपये ठरवण्यात आली होती, पण मोदी सरकारने जेव्हा हा करार नक्की केला तेव्हा त्यामध्ये प्रत्येक रफाल विमानासाठी सुमारे 1,600 कोटी किंमत ठरवण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
या करारामध्ये अनियमितता असल्याचा आरोप करत पत्रकार आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी आणि यशवंत सिन्हा यांच्यासोबतच ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली. या कराराचा स्वतंत्र तपास करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
पण डिसेंबर 2018 मध्ये या कराराशी संबंधित सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या आणि कोर्टाच्या निगराणीखाली स्वतंत्र तपासाची मागणीही फेटाळली.
याविषयी या तिघांनी पुनर्विचार याचिका दाखल केली. कोर्टाच्या निर्णयामध्ये अनेक वस्तुस्थितीविषयक चुका असल्याचं या पुनर्विचार याचिकेत म्हटलं होतं. सरकारकडून देण्यात आलेल्या एका सीलबंद पाकिटामधल्या अनेक चुकीच्या गोष्टींवर सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आधारित असून यावर कोणाचीही सही नसल्याचंही या पुनर्विचार याचिकेत म्हटलं होतं.
रफालची किंमत, त्यांची संख्या आणि इतर अनियमिततांविषयी जस्टिस रंजन गोगोई म्हणाले होते, "रफालची ठरवण्यात आलेली किंमत तपासून पाहणं हे कोर्टाचं काम नाही. आम्ही या प्रकरणाचा अभ्यास केला, संरक्षण अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. आम्ही या निर्णय प्रक्रियेविषयी समाधानी आहोत."
कोर्टाने असं म्हटलं, "126च्या जागी ३६ विमानांसाठीच करार का करण्यात आला, या निर्णयाचा तपास आम्ही करू शकत नाही. तुम्ही 126 रफाल विमान विकत घ्या, असं आम्ही सरकारला सांगू शकत नाही."

फोटो स्रोत, dassault
पण संरक्षण विशेषज्ञ मारूफ रजा यांच्या म्हणण्यानुसार रफाल भारताला मिळणं ही एक अतिशय चांगली आर्थिक बाब आहे.
मारुफ रजा म्हणतात, "भारतीय सेनेसाठी एखादं नवीन आयुध विकत घेण्याआधी त्याबद्दल भरपूर तपास केला जातो. या गोष्टीची दीर्घ काळ तपासणी केल्यानंतर सेना ती विकत घेण्याचा सल्ला देते. चीन असो वा पाकिस्तान, वा इतर कोणताही देश, भारतीय उपखंडात इतर कोणाकडेही रफालच्या तोडीचं विमान नाही. म्हणूनच या गोष्टीची खूप चर्चाही झाली. सोबतच या रफाल खरेदीवरून वाद झाले. पण अजूनही काही सिद्ध होऊ शकलेलं नाही."
32 विमानं अपुरी
भारत प्रत्येकी 16 विमानांची जी दोन स्क्वाड्रन्स (पथकं) विकत घेत आहे, त्यामुळे संरक्षण विषयक गरजा पूर्ण होणार असल्याचं एकीकडे मारुफ रजा म्हणतात. पण संरक्षण तज्ज्ञ राहुल बेदींचं मत मात्र याच्या अगदी उलट आहे. एवढी विमानं पुरेशी नसल्याचं त्यांनी बीबीसीला सांगितलं.

फोटो स्रोत, dassault
रफालमुळे भारतीय वायुसेनेची ताकद वाढणार असली तरी या विमानांची संख्या कमी असल्याचं ते म्हणतात. ही 36 रफाल विमानं अंबाला आणि पश्चिम बंगालच्या हासीमारा स्क्वाड्रनमध्येच संपून जातील, असं ते म्हणतात.
"दोन स्क्वाड्रन पुरेशी नाहीत. भारतीय वायु सेनेकडे एकूण 42 स्क्वॉड्रन असू शकतात. आणि यापैकी आता वायु सेनेकडे 32 स्क्वाड्रन्स आहेत. स्क्वॉड्रन्सची ही संख्या पाहता तेवढी लढाऊ विमानं आपल्याकडे नाहीत. आपल्याला दर्जेदार उपकरणं हवी आहेत, पण ते पुरेशा संख्येत असणंही गरजेचं आहे. जर तुम्हाला चीन वा पाकिस्तानचा मुकाबला करायचा असेल तर तुमच्याकडे लढाऊ विमानांचा मोठा ताफा असायला हवा."
रफालची क्षमता
रफाल एक अतिशय चांगलं लढाऊ विमान असून, याची क्षमता जबरदस्त असल्याचं भारतीय वायुदलाने म्हटलंय.
इतर लढाऊ विमानांपेक्षा आणि हत्यारांपेक्षा रफालची फ्लाईंग रेंज किती तरी पटींनी जास्त असून, रफालच्या या वैशिष्ट्यामुळेच या विमानाला 'फोर्स मल्टीप्लायर' म्हटलं जाऊ शकतं असं मारुफ रजा म्हणतात.

फोटो स्रोत, dassault
"रफालने 300 किलोमीटरच्या टप्प्यापर्यंत क्षेपणास्त्रं डागली जाऊ शकतात. आणि ही क्षेपणास्त्रं आपल्या लक्ष्याचा नेमका वेध घेतात. रफालची ऑपरेशनल उपलब्धता 65 ते 70 टक्के आहे. तर सुखोईची 50 टक्के. म्हणजे अर्धी सुखोई विमानं ही कोणत्याही वेळी दुरुस्तीखाली असतात."
"हे विमान मल्टी रोल म्हणजे वेगवेगळ्या भूमिका निभावत नाही. 'ओम्नी रोल' भूमिका बजावतं. डोंगराळ भागात लहानशा ठिकाणीही हे विमान उतरू शकतं. समुद्रातून मार्गक्रमण करणाऱ्या एअरक्राफ्ट कॅरियरवर हे विमान उतरू शकतं."
रफाल फायटर विमानाची वैशिष्ट्यं
- आण्विक क्षेपणास्त्रं वाहून नेण्याची क्षमता
- जगातली सर्व अत्याधुनिक हत्यारं वापरण्याची क्षमता.
- यामध्ये दोन प्रकारची क्षेपणास्त्रं आहेत. यातल्या एकाचा टप्पा दीडशे किलोमीटर्सचा आहे तर दुसऱ्याचा टप्पा सुमारे ३०० किलोमीर्टसचा आहे.
- अण्वस्त्र सज्ज रफाल हवेमधून हवेमध्ये १५० किलोमीटर्सपर्यंत क्षेपणास्त्रं डागू शकतं आणि हवेतून जमीनीवर मारा करण्याची याची क्षमता ३०० किलोमीटर्सची आहे.
- चीन आणि पाकिस्तानकडे रफालसारखं विमान नाही.
- वायुसेना वापरत असलेल्या मिराज 2000ची ही सुधारित आवृत्ती आहे.
- भारतीय वायुसेनेकडे 51 मिराज 2000 विमानं आहेत.
- दासाँ एव्हिएशनने दिलेल्या माहितीनुसार रफालचा वेग माक (Mach) 1.8 आहे. म्हणजे ताशी सुमारे 2020 किलोमीटर्स.
- या विमानाची उंची आहे 5.30 मीटर तर लांबी आहे 15.30 मीटर. रफाल हवेत असतानाही त्यात इंधन भरलं जाऊ शकतं.
- अफगाणिस्तान, लिबिया, माली, इराक आणि सीरिया या देशांमध्ये झालेल्या युद्धांमध्ये आतापर्यंत रफाल विमानांचा वापर करण्यात आला आहे.
- रफालचं टार्गेट अचूक असेल असं माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटलं होतं. वर-खाली, डावी-उजवीकडे अशा सगळ्या बाजूंवर लक्ष ठेवण्यास रफाल सक्षम आहे. म्हणजे याची 'व्हिजीबिलिटी' ३६० अंशांची आहे. पायलटला फक्त शत्रू हेरून बटण दाबायचंय. बाकी सगळं काम काँप्युटर करेल.
अशी अनेक वैशिष्ट्यं असणाऱ्या रफाल फायटर जेटची खरेदी फ्रान्सकडून करण्यात येत असली तरी अधिकृत रित्या अजूनही ही विमानं 'अण्वस्त्र सज्ज' करण्यात येणार नाहीत. आंतरराष्ट्रीय करारांमुळे असं करण्यात येतंय. पण मिराज 2000 प्रमाणेच भारत हे विमान देखील आपल्या गरजांनुसार विकसित करून घेईल असं अनेक विशेषज्ञांचं म्हणणं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








