अर्जुन रणगाडा पाकिस्तानी रणगाड्यांवर भारी पडणार?

रणगाडा

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, कमलेश
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारतीय लष्करात लवकरच अर्जुन MK-1A हा नवीन रणगाडा दाखल होणार आहे.

केंद्र सरकारने अर्जुन MK-1A(अल्फा) या रणगाड्याच्या उत्पादनासाठी 6000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

मंगळवारी (23 फेब्रुवारी) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण खरेदी परिषदेची बैठक पार पडली. यात अर्जुन रणगाड्यांसह संरक्षणसंबंधी उपकरणं आणि शस्त्रास्त्र खरेदीसाठी 13 हजार 700 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

अर्जुन MK-1A रणगाडा स्वदेशी आहे. भारतातच हा रणगाडा निर्मित आणि विकसित करण्यात आला आहे. भारताकडे यापूर्वी असलेल्या अर्जुन MK-1 रणगाड्याची ही सुधारित आवृत्ती आहे. भारताकडे याच साखळीतले MK-2 रणगाडेही आहेत.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नईमध्ये लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांना या रणगाड्याची एक प्रतिकृती सोपवली होती.

त्यावेळी बोलताना, देशाच्या दक्षिणेने तयार केलेला हा रणगाडा देशाच्या उत्तर सीमांचं रक्षण करणार आहे आणि म्हणूनच हे 'भारताच्या एकतेच्या भावनेचं प्रतीक' असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

रणगाडा

फोटो स्रोत, TWITTER/@NARENDRAMODI

अर्जुन MK-1Aमध्ये 14 मोठे बदल करण्यात आले आहेत. लक्ष्याचा वेगाने पाठलाग करत हल्ला करण्याची क्षमता या रणगाड्यात असल्याचं सांगितलं जातं. रात्र असो किंवा दिवस, ऊन असो किंवा पाऊस कुठल्याही मोसमात हा रणगाडा लक्ष्याचा भेद घेऊ शकतो.

क्षेपणास्त्रही डागता यावं, यादृष्टीने या रणगाड्याचं डिझाईन तयार करण्यात आलं आहे.

अर्जुन MK-1Aची वैशिष्ट्ये

अर्जुन MK-1A रणगाड्याचं एक मोठं वैशिष्ट्यं म्हणजे यातली 54.3 टक्के उपकरणं स्वदेशी आाहेत. याआधीच्या अर्जुन रणगाड्यात 41 टक्के उपकरणं स्वदेशी होती.

रणगाडा

फोटो स्रोत, Getty Images

या रणगाड्यात पूर्वीपेक्षा उत्तम ट्रान्समिशन यंत्रणा बसवण्यात आली आहे. ग्रेनेड आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले उत्तमरित्या झेलण्याची क्षमताही नव्या रणगाड्यात आहे. रासायनिक हल्ल्यापासून बचावासाठी खास सेंसर्सही लावण्यात आले आहेत.

या रणगाड्याचं कंचन मॉड्युलर कॉम्पोजिट आर्मर रणगाड्याचं अँटी टँक शस्त्रास्त्रांपासून बचाव करतं.

इतर वैशिष्ट्ये

  • कुठून आणि कोणत्या प्रकारचा धोका आहे, याचा पत्ता लावणारी लेझर वॉर्निंग यंत्रणा यात आहे. रिमोट कंट्रोल वेपन सिस्टिम, अँडव्हान्स्ड लँड नेव्हिगेशन सिस्टिमही यात आहे.
  • या रणगाड्यात 'फिन स्टेबलाईझ्ड पियर्सिंग डिसकार्डिंग सेबट' दारुगोळा आहे. या यंत्रणेमुळे शत्रू राष्ट्राच्या रणगाड्यावर कमी वेळेत आणि अचून निशाणा लावणं सोपं होणार आहे.
  • या रणगाड्यात स्वदेशी बनावटीची 120mm कॅलिबर रायफल गन आहे.
  • चित्र स्थिर करण्यासाठी कॉम्प्युटर नियंत्रित एकीकृत अग्नि नियंत्रण यंत्रणाही यात आहे. कुठल्याही प्रकाशात ही यंत्रणा काम करू शकते.
  • इतर शस्रास्त्रांमध्ये एक अँटी-पर्सनल को-एक्सल 7.62mm मशीनगन आणि अँटी-एअरक्रॅफ्ट आणि जमिनीवरून निशाणा लावण्यासाठी 12.7mm मशीनगनही आहे.
  • यापूर्वीच्या रणगाड्यांमध्ये रात्री बघण्याची क्षमता नव्हती. मात्र, नवीन रणगाड्यात रात्रीही स्पष्टपणे लक्ष्याचा भेद घेता येतो. या रणगाड्यात 1400 हॉर्स पॉवरचं इंजिन आहे आणि हा रणगाडा 70 किमी प्रती तास वेगाने धावू शकतो.

अर्जुन रणगाड्यांची सुरुवात

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) लढाऊ वाहने संशोधन आणि विकास आस्थापनेसोबत (CVRDE) 1972 सालापासून अर्जुन रणगाड्यांची निर्मिती सुरू केली होती. उत्तम मारक क्षमता असणारे, उत्कृष्ट वेग असणारे आणि उत्कृष्ट सुरक्षा असणारे रणगाडे तयार करणं, हे त्यांचं उद्देश होतं. 1996 सालापासून अर्जुन रणगाड्यांचं उत्पादन सुरू झालं.

रणगाडा

फोटो स्रोत, Getty Images

2004 साली भारतीय लष्करात 124 अर्जुन रणगाड्यांची रेजिमेंट तैनात करण्यात आली. पश्चिमेकडच्या वाळवंटात ही रेजिमेंट कार्यरत आहे. मात्र, नवीन गरजा बघता जुन्या रणगाड्यांमध्ये सुधारणा करणं गरजेचं होतं.

यानंतर डीआरडीओने अर्जुन रणगाड्यात सुधारणा केली. आता जे 118 अर्जुन रणगाडी लष्करात सामील होणार आहेत त्यांत अनेक नवीन वैशिष्ट्ये तर आहेतच शिवाय त्यांची भेदक क्षमताही जास्त आहे.

118 सुधारित अर्जुन रणगाडे खरेदीसाठी 2012 साली मंजुरी देण्यात आली होती. मात्र, रणगाड्याच्या मारक क्षमतेसह अनेक बाबतीत सुधारणा व्हायला हवी, अशी मागणी लष्कराकडून करण्यात आली होती.

दरम्यानच्या काळात 2015 साली लष्कराने रशियाकडून 14 हजार कोटी रुपयांना 464 मध्यम वजनाचे T-90 रणगाडे खरेदी केले होते. भारताकडे असलेल्या रणगाड्यांपैकी बहुतांश रशियन बनावटीचे T-72 आणि T-90 टँक्स आहेत.

लष्कराच्या मागणीनुसार सुधारित अर्जुन MK-1A रणगाड्यांना 2020 साली हिरवा कंदील देण्यात आला.

पाकिस्तानचे रणगाडे

भारत आणि पाकिस्तान यांच्या लष्करी सामर्थ्याची कायमच तुलना होत असते. या दोन देशांमध्ये तीन युद्धंही झाली.

रणगाडा

फोटो स्रोत, Getty Images

भारतीय प्रसार माध्यमांमध्येही अर्जुन MK-1A रणगाडे पाकिस्तानसाठी आव्हान असल्याचं सांगितलं जातंय. तेव्हा पाकिस्तानच्या रणगाड्यांची क्षमता किती आहे, हे बघूया.

पाकिस्तानकडे असणारे बहुतांश रणगाडे चीन आणि युक्रेनकडून आयात केलेले आहेत. काही रणगाडे त्यांनी चीनसोबत मिळून विकसितही केले आहेत. यात अल-खालिद आणि अल-जरार रणगाड्यांचा समावेश आहे. पाकिस्तानकडे यूक्रेनचा T80UD आणि चीनचे टाईप-85, 69, 59 रणगाडेही आहेत.

T-80UD रणगाडा

पाकिस्तानचा T-80UD रणगाडा अत्यंत सुरक्षित आणि अॅडव्हान्स्ड रणगाडा आहे. हा रणगाडा युक्रेनने निर्मित केला आहे. पाकिस्तानी लष्करात जवळपास 324 T-80UD रणगाडे आहेत. यात 1A45 फायर कंट्रोल यंत्रणा आहे. हा रणगाडा भारताच्या T-72 पेक्षा अधिक सुरक्षित असला तरी T-90 भीष्म रणगाड्यापेक्षा त्याची सुरक्षा क्षमता अधिक नाही.

T-80UD रणगाड्यात 125mm ची स्मूदबोर गन आहे. हा रणगाडा पाच किमीपर्यंत लक्ष्याचा भेद घेऊ शकतो. तसंच कमी उंचीवरून उडणारं हेलिकॉप्टरही पाडू शकतो.

यात 7.62mm मशीनगन आणि दुरून नियंत्रित होणारी 12.7mm ची अँटी-एअरक्राफ्ट गनही आहे. यात एक हजार हॉर्स पॉवरचं इंजीन आहे.

अल-जरार

अल-जरार सेकंड जनरेशन रणगाडा आहे. पाकिस्तानने चीनच्या मदतीने हा तयार केला आहे. यात 125mm ची स्मूदबोर गन आणि 12.7mm ची अँटी-एअरक्राफ्ट मशीनगन आहे. हा रणगाडा 65 किमी प्रती तासच्या वेगाने पळू शकतो. या रणगाड्याची इंजिन पॉवर कमी असली तरी तो 40 टन वजनाचा आहे.

अल खालीद रणगाडा

अल खालीद रणगाडाही पाकिस्तानने चीनच्या मदतीने निर्मित केला आहे.

यात 125mm ची स्मूदबोर गन आहे. या रणगाड्याचं वजन 46 ते 48 टन आहे. यात 1200 हॉर्स पॉवरचं सुपर चार्ज इंजिन बसवण्यात आलं आहे. अल-खालीद रणगाडा 72 किमी प्रती तास या वेगाने धावू शकतो.

तुलना करणं सोपं नाही

संरक्षण तज्ज्ञ राहुल बेदी सांगतात, "रणगाड्यांची प्रामुख्याने दोन वैशिष्ट्यं असतात. एक म्हणजे रणगाडा किती वेगाने पळू शकतो आणि दुसरं म्हणजे रणगाड्याची मारक क्षमता किती जबरदस्त आहे. अर्जुन रणगाडा पाकिस्तानच्या रणगाड्यांपेक्षा अनेक अंगांनी उत्तम आहे. एकतर यात अत्यंत शक्तीशाली जर्मन इंजिन आहे. पण, पाकिस्तानकडे बहुतांश रणगाडे युक्रेन बनावटीचे आहेत. मात्र, पाकिस्तानी रणगाड्यांचा वेग जास्त आहे."

मात्र, रणगाड्यांची तुलना इतकी साधी आणि स्पष्ट असू शकत नाही. रणगाड्यांची स्वतःची वैशिष्ट्ये असतात आणि युद्धात परिस्थितीनुरूप त्या-त्या वैशिष्ट्यांचा फायदा होत असतो. त्यामुळे ही एकप्रकारे बरोबरीची परिस्थिती आहे.

कमी वजनाच्या रणगाड्यांची गरज

भारतासाठी अर्जुन MK-1A अत्यंत फायदेशीर रणगाडा असल्याचं जाणकार सांगतात. मात्र, वजनी रणगाड्यांसोबतच कमी वजनाचे हलके रणगाडेही गरजेचे असल्याचं त्यांचं मत आहे.

राहुल बेदी सांगतात, "हा रणगाडा 68 टन वजनाचा आहे. वजनाचा रणगाड्याच्या वेगावर परिणाम होतो. पंजाबमधल्ये ज्या प्रकारचे रस्ते आणि पूल आहेत, तिथे याचा वापर होऊ शकत नाही. हे रणगाडे राजस्थानच्या सीमेवर वाळवंटातच उपयोगी आहेत. जास्त वजन आणि मोठा आकार यामुळे या रणगाड्यांची वाहतूक रेल्वेने करता येत नाही. त्यामुळे सरकार हे रणगाडे वाहून नेण्यासाठी कॅरियर मागवणार आहे."

"या रणगाड्याची मारक क्षमता आणि काही विशिष्ट भागांमध्ये त्याचा वेग उत्तम आहे. मात्र, भारताला आता कमी वजनाच्या रणगाड्यांची गरज आहे."

राहुल बेदी सांगतात, "तसं बघता भारतात रणगाड्यांचा वापर राजस्थान आणि पंजाबमध्येच अधिक होतो. मात्र, चीनने लद्दाख सीमेवरच्या तणावानंतर तिथे कमी वजनाचे रणगाडे तैनात केले आहेत. ते 30-34 किलो वजनाचे आहेत. मात्र, आपले T-72 आणि T-90 रणगाडे त्यापेक्षा खूप जास्त वजनी आहेत. त्यामुळे रणगाड्याचा वेग कमी होतो."

"इथे कमीत कमी 40 टनाचा रणगाडा हवा. कमी वजनाच्या रणगाड्यांवर जवळपास 15 वर्षांपूर्वीही विचार झाला होता. मात्र, ते फारसे गरजेचे नसल्याचं म्हणत काम पुढे सरकलंच नाही. आता मात्र केंद्र सरकारवे वेगाने या दिशेने कामाला लागलं आहे."

दुसरीकेड करारावर सह्या झाल्यानंतर भारतीय लष्कराला 30 महिन्यात अर्जुन MK-1A रणगाडे मिळतील. त्यानंतर प्रत्येक वर्षी 30 रणगाडे भारतीय लष्करात सामिल होतील.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)