पाकिस्तानः इम्रान खान यांच्या पक्षाचे खासदार लियाकत खान यांनी हिंदूंची माफी का मागितली?

फोटो स्रोत, Reuters
- Author, उमर दराज नंगियाना
- Role, बीबीसी उर्दू, लाहोर
पाकिस्तानातील सत्ताधारी 'पाकिस्तान तहरिक-ए-इंसाफ' (PTI) या पक्षाच्या नॅशनल असेंब्लीचे सदस्य आणि प्रसिद्ध टिव्ही अँकर आमीर लियाकत यांनी स्वतःच्या ट्वीटर अकाउंटवरून एका हिंदू देवतेचा फोटो पोस्ट केला होता. मात्र, हिंदू समाजाची माफी मागत त्यांनी ही पोस्ट डिलीट केली.
मरियम नवाज यांच्यावर टीका करण्यासाठी त्यांनी हा फोटो टाकला होता.
आमीर लियाकत यांनी 'काली माते'चा फोटो पाकिस्तान मुस्लीम लीग, नवाज गटाच्या उपाध्यक्ष मरियम नवाज यांचा टिव्हीवर दिलेल्या एका मुलाखतीतल्या फोटोसोबत शेअर करत, '#दुसरं रूप' असं लिहिलं होतं.
मरियम नवाज यांनीही त्या ट्वीटला उत्तर देत 'आता तुम्ही माझं दुसरं रुप बघाच', असं म्हटलं होतं.
मात्र, काही वेळाने आमीर लियाकत यांनी ती पोस्ट डिलीट करत लिहिलं, "हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. कुणाला दुखावण्याचा माझा हेतू अजिबात नव्हता. ट्वीट डिलीट केलं आहे. मी सर्व धर्मांचा आदर करतो आणि हीच माझ्या धर्माची शिकवण आहे. मी पुन्हा एकदा माफी मागतो."
आमीर लियाकत यांच्या ट्वीटवर टीका
आमीर लियाकत यांच्या या ट्वीटवर सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी त्यावर टीका केली. आमीर लियाकत यांनी हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचं अनेकंनी म्हटलं. तर काही यूजर्सने पाकिस्तान तहरिक-ए-इंसाफ पक्ष आणि पंतप्रधान इमरान खान यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणीही केली.
काही यूजर्सने आमीर लियाकत यांना ट्वीट डिलीट करण्याचा सल्लाही दिला. काही यूजर्सने 'पाकिस्तानातील ईश निंदा कायदा यावर लागू होत नाही का?', असा प्रश्न विचारला.

फोटो स्रोत, TWITTER/KDSINDHI
यासंबंधी बीबीसीने आमीर लियाकत हुसैन यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
आमीर लियाकत धार्मिक विषयाचे तज्ज्ञ म्हणून टिव्हीवर कार्यक्रमही घेतात.
पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या अधिकारांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते कपील देव लिहितात, "हे विद्यमान नॅशनल असेंब्लीचे सदस्य आणि पाकिस्तान तहरिक-ए-इंसाफ पक्षाचे सदस्य आहेत. ते एका हिंदू देवतेच्या फोटोचा वापर मुस्लीम लीग नवाज पक्षाच्या उपाध्यक्ष मरियम नवाज यांच्यावर राजकीय टीका करण्यासाठी करत आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
ते पुढे लिहितात, "इतर धर्म आणि आपल्याच देशातील 50 लाख हिंदू नागरिकांचा आदर करण्याची त्यांची ही पद्धत आहे."
नीरज सुनिल नावाचे यूजर लिहितात, "तुम्हाला विशेषाधिकार असल्याने ही ईशनिंदा नाही. एका प्रसिद्ध धार्मिक विद्वानाने अशाप्रकारची टीका केली आहे. त्यांनी खरंतर धार्मिक सहिष्णुता शिकवली पाहिजे."
आरती कुमारी नावाच्या यूजर लिहितात, "हिंदूंच्या भावना दुखवल्या गेल्या तरी त्यासाठी कुठलाच कायदा नसतो. हे ट्वीट तात्काळ डिलीट करावं आणि आमीर लियाकत यांच्याविरोधात कठोर कारवाई व्हावी, असं आम्हाला वाटतं."
मानवाधिकारांसाठी लढणाऱ्या वकील आणि कायदेतज्ज्ञ राबिया बाजवा यांनी बीबीसीशी बोलताना पाकिस्तानातील ईश निंदा कायदा सर्वच धर्मांसाठी असल्याचं सांगितलं.
त्या म्हणाल्या, "पाकिस्तानच्या दंड संहिता 295A नुसार कुठल्याही धर्माच्या व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या किंवा त्याच्या धार्मिक मान्यतेची थट्टा केली गेली तर त्याविरोधात ईश निंदा कायद्यान्वे कारवाई होऊ शकते."
अशा प्रकरणांमध्ये मॅजिस्ट्रेटकडे तक्रार दाखल करावी लागते. त्यानंतर कायदेशीर कारवाईला सुरुवात होते.
मात्र, पाकिस्तानात ईश निंदा कायदा लागू करण्याकडे दोन दृष्टीकोनातून बघितलं जातं. त्या म्हणतात, "पैगंबर किंवा कुराणची निंदा केल्याचा आरोप असेल तर अशा तक्रारी अधिक गांभीर्याने घेतल्या जातात."
विरोध करण्याचा इशारा
विनोद माहेश्वरी नावाच्या एका यूजरने पाकिस्तान तहरिक-ए-इंसाफ पक्षाच्या अकाउंटला टॅग करत, हे ट्वीट तात्काळ डिलीट करा अन्यथा विरोधासाठी तयार रहा, असा इशाराच दिला आहे.
आमीर लियाकत यांच्या ट्वीटनंतर ट्वीटरवर अनेकांनी कुणीही कुणाच्या धर्माची चेष्टा करू नये, असं म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
शुमाइल इस्माईल नावाच्या एका ट्वीटर यूजरने आमीर लियाकत यांच्या ट्वीटखाली लिहिलं, "तुम्ही कुणाच्या ईश्वराला वाईट म्हटलं नाही, तर तुमच्या ईश्वरालाही कुणी वाईट म्हणणार नाही. तुम्ही स्वतःला धार्मिक विद्वान म्हणवून घेता, कुणाच्या धर्माची थट्टा करणं, कुठे लिहिलं आहे?"
शहजाद अहमद नावाचे एक यूजर लिहितात, "सर, तुम्ही हे अत्यंत लज्जास्पद वक्तव्य केलं आहे. तुम्ही ज्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्या आमच्या हिंदू बंधू-भगिनींसोबत आम्ही एकजुटीने उभे आहोत."
ते पुढे लिहितात, "तुम्ही हे ट्वीट लगेच डिलीट कराल आणि तुम्ही ज्यांची थट्टा केली त्यांची माफी मागाल, अशी आशा करतो."

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








