भारत-चीन सीमावाद : पूर्व लडाख भागात दोन्ही देशात झालेल्या सहमतीवर आक्षेप का?

फोटो स्रोत, Getty Images
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या तणावानंतर अखेरीस भारत आणि चीनमध्ये सहमती झाली आहे. मात्र, या सहमतीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
भारताने आपल्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या पूर्व लडाखमधील पेंगाँग तलावाच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावर 10 किलोमीटर रुंदीचा बफर झोन बनवण्यासाठी परवानगी दिली आहे.
भारताच्या या निर्णयावर संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहीजण भारत सरकारनं बफर झोन बनविण्यासाठी दिलेल्या सहमतीची पाठराखण करत आहेत, तर काहीजणांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात लष्कर प्रमुख असलेल्या वेद मलिक यांनी एकापाठोपाठ एक ट्वीट करत भारताच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे.
1. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चिनी सैनिकांच्या मागं हटण्याबद्दल झालेल्या सहमतीवर होणारी टीका आश्चर्यचकित करणारी आहे. वस्तुस्थिती माहीत नसल्यामुळे तसंच राजकीय-लष्करी गोष्टींची फारशी जाण नसल्याने अनेक जण टीका करत आहेत. किंवा ते पूर्वग्रहदूषित पद्धतीनं विचार करत आहेत. या सहमतीनुसार पेंगाँग लेकच्या परिसरात असलेले सैनिक 20 एप्रिल 2020 च्या आधी ज्या ठिकाणी होते, तिथेच परत जातील.

फोटो स्रोत, @vedmalik1
2. फिंगर-4 आणि फिंगर-8 च्या दरम्यान तापमान अतिशय कमी असल्यामुळे कोणत्याही पद्धतीचा संघर्ष टाळणं आवश्यक आहे. सहमतीनुसार एप्रिल 2020 नंतर या भागात ज्या काही चौक्या बनवल्या होत्या, त्या हटविल्या जातील. जेव्हा कैलास रेंज मोकळी होईल, तेव्हा आपले सैनिक चुशुलमध्ये तैनात राहतील.
3. या सगळ्या घटनाक्रमानंतर 48 तासांनंतर डेपसांग, गोरा, हॉट स्प्रिंग आणि गलवानमध्ये सैन्य मागे घेण्यात आल्याच्या बातम्या येऊ लागल्या.
दोन्ही देशांचं शिष्टमंडळ या प्रकरणावर नजर ठेवण्यासाठी, तसंच तोडगा काढण्यासाठी सातत्याने भेट घेत राहील. एकमेकांवरच्या अविश्वासामुळे आपलं सैन्य सावध असणं अत्यंत आवश्यक आहे. चिनी सैन्य कोणत्याही प्रकारचा गैरफायदा घेणार नाही तसंच आपला शब्द मोडणार नाही, याची आपल्याला खात्री करावी लागेल.
4. माझ्या मते, सैनिक मागे गेल्यानंतरसुद्धा तणाव पूर्णपणे मिटण्यास आणखी काही काळ लागू शकतो. भारत आणि चीनदरम्यान कोणत्याही प्रकारचं युद्ध राष्ट्रीय किंवा क्षेत्रीय हिताचं नाही. चीनने प्रयत्न केला पण त्यांना कोणत्याही प्रकारचं राजकीय किंवा लष्करी वर्चस्व मिळवता आलं नाही. आपल्या सैनिकांनी चिनी सैन्याला रोखण्यात आपली संपूर्ण क्षमता आणि प्रतिबद्धतेचा परिचय दिला.
5. आपण चीनला जैसे थे परिस्थिती कायम राखण्यास भाग पाडलं. यादरम्यान भारत स्पष्टपणे खालील संदेश देण्यात यशस्वी ठरला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
अ) LACचं उल्लंघन दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणामकारक ठरेल. ब) आपल्या सीमेवर होत असलेली बांधकामं सुरू राहतील. क) भारताने स्वतःला भौगोलिक, राजकीय, रणनितीक आणि आर्थिक स्वरूपात जास्त मजबूत केलं आहे.
6. आतापासून LAC वर आधीसारखी शांतता आणि भारत-चीनदरम्यान आधीसारखे संबंध निर्माण होतील, असं म्हणणं घाईचं ठरेल. भारताने LAC वर जशा प्रकारचा सैन्य बंदोबस्त ठेवला आहे. ज्या प्रकारची स्ट्रॅटेजिक आणि आर्थिक पावलं उचलली आहेत, ते पुढे सुरू ठेवणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भारताने चीनपेक्षा जास्तवेळा LACचं उल्लंघन केलं?
भारताने चीनपेक्षा जास्तवेळा LACचं उल्लंघन केल्याबाबतच्या वक्तव्यावर व्ही. के. सिंह यांचं स्पष्टीकरण काय आहे?
भारत-चीन मुद्द्यावर माजी लष्करप्रमुख आणि भाजप खासदार जनरल व्ही. के. सिंह यांच्या वक्तव्यावरून नुकताच वाद निर्माण झाला होता. या वक्तव्याबाबत सिंह यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
"भारताने चीनच्या तुलनेत जास्त वेळा LAC चं उल्लंघन केलं आहे," असं जनरल व्ही. के. सिंह यांनी आधी म्हटलं होतं. यामुळे व्ही. के. सिंह यांना बरखास्त करावं, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती.
राहुल गांधींनी ट्वीट करत म्हटलं, "भाजपचे मंत्री भारताविरोधात चीनची मदत का करत आहेत? त्यांना आतापर्यंत बरखास्त करायला हवं होतं. त्यांना बरखास्त करण्यात आलं नाही तर तो प्रत्येक सैनिकाचा अपमान असेल."

फोटो स्रोत, @vedmalik1
राहुल गांधी यांनी हे प्रकरण संसदेत मांडण्याचा प्रयत्नही केला. पण त्याची परवानगी मिळाली नाही. आता व्ही. के. सिंह यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.
जनरल व्ही. के. सिंह यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "मदुरैमध्ये मला एका पत्रकाराने भारत-चीन सीमावादावर स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यावेळी मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. या लोकांनी माझ्यावर देशद्रोहाचा आरोप लावला. त्यांना या मुद्द्याची जराशीही समज नाही. विरोध करण्याच्या प्रयत्नात ते स्वतःच तर देशद्रोह करत नाहीत ना? हा व्हीडिओ त्या लोकांची समज चांगली बनवेल, अशी अपेक्षा करतो."
सोबतच्या व्हीडिओत व्ही. के. सिंह यांनी म्हटलं, "LAC चा विचार केल्यास ही सीमारेषा चीनचे राजदूत चोऊलाई यांच्या नकाशावर आधारित आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना 1959 मध्ये हा नकाशा देण्यात आला होता. तुम्ही इतक्या मोठ्या नकाशाबाबत निर्णय घेत असताना प्रत्यक्षात त्यावर काम करत असताना अनेक अडचणी येतात."
"कोणताही नकाशा जमिनीवर प्रत्यक्षात उतरवत असताना काही बाबींचा विचार करावा लागतो. याच सिद्धांतांच्या आधारे आपण LAC चं आकलन केलं. चीननेसुद्धा असंच केलं असणार असं मला वाटतं. पण गेल्या काही वर्षांपासून चीन LAC बाबतची भूमिका आपल्या फायद्यानुसार सातत्याने बदलत असल्याचं आपण पाहू शकतो."

फोटो स्रोत, Getty Images
सिंह यांच्या मते, "यामुळेच LAC वर भारतीय आणि चिनी सैन्य आमनेसामने येतं. पेट्रोलिंगदरम्यान दोन्ही बाजूंनी झटापट, धक्का-बुक्की आणि संघर्ष होताना दिसतो. जमिनीवर कोणतीच रेषा नसल्याने असं होणं स्वाभाविक आहे."
"आपण LAC चं आकलन ज्याप्रकारे करतो, त्यानुसार आपल्या सीमेत कुणी आल्यास आपण त्याचं उल्लंघन मानतो. याप्रकारे आपण पेट्रोलिंग करत असताना चीन आपला भूभाग मानत असलेल्या क्षेत्रातही आपण जातो. हे LAC चं उल्लंघन आहे, असं चीनला वाटू शकतं. या गोष्टी समजवण्याचा प्रयत्न मी केला होता," असं ते म्हणाले.
व्ही. के. सिंह यांच्यानुसार, "दोन्ही देशांमध्ये प्रत्यक्ष सीमारेषा निश्चित करण्यात आलेली नाही. सगळं काही अनुमानावर आधारित आहे. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते."
पेंगाँग सरोवर परिसरात भारतीय भूभागावर चीनचे तंबू
भारतीय लष्करातील निवृत्त कर्नल एस. डिनी यांनी 'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्राशी चर्चा केली होती. चिनी सैन्याने पँगाँग त्सो सरोवरावरील परिस्थिती बदलली असल्याचं त्यांनी सांगितलं.
कर्नल डिनी पुढे सांगतात, "आपलं लक्ष 15 जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीवर असताना चिनी सैन्याने करार मोडताना पँगाँग सरोवर परिसरात फिंगर 4 आणि फिंगर 8 दरम्यान झेंडे लावले आहेत. तसंच बाकीचे तंबू उभे केले आहेत.
त्यांच्या मते, आधी कधीच चिनी सैन्याने इतकं मोठं पाऊल उचललं नव्हतं.
जनरल डिनी यांच्यानुसार, "ही समस्या फिंगर 4 बाबत चीनचं आकलन आणि फिंगर 8 बाबत भारताचं आकलन यांच्यामुळे निर्माण झाली आहे.
ते सांगतात, "पश्चिमेकडून पूर्वेकडे आठ किलोमीटरच्या पट्ट्याबाबत वाद सुरू आहे. भारतीय चौकी फिंगर 2 आणि फिंगर 3 दरम्यान आहे. एका रस्त्याने त्या जोडल्या गेल्या आहेत.
तर फिंगर 8 वर सिरीजाप येथे चीनी चौकी आहे. चीनी लष्कराने 1999 मध्ये फिंगर 4 पर्यंतचा रस्ता बनवला होता. त्यावेळी कारगिल युद्धामुळे भारतीय सैनिकांची संख्या त्याठिकाणी कमी होती.
आता कोणतंच भारतीय वाहन फिंगर 4 पर्यंत जाऊ शकत नाही.
फिंगर 8 वर गस्त घालण्यासाठी भारतीय सैनिकांना पायी जावं लागतं, तर चिनी सैनिक फिंगर 4 पर्यंत गाडीने येऊ शकतात. त्यांच्यासाठी हा फायद्याचा व्यवहार आहे.
कर्नल डिनी यांच्यानुसार भारतीय सैनिकांच्या याठिकाणच्या उपस्थितीमुळे चीन अस्वस्थ होतो. कारण, फिंगर 4 पर्यंत रस्ता बनवल्यानंतर या भागावर आपलं वर्चस्व असेल, असं चीनला वाटलं होतं.
ते सांगतात, "भारतीय सैनिक फिंगर 8 पर्यंत येऊ नयेत, असं चिनी सैन्याला वाटतं. त्यामुळे ते नेहमीच भारतीय सैन्याला रोखण्याचा प्रयत्न करतात.
गेल्या काही वर्षांपासून इथं चीनचा दबदबा होता. पण मागच्या सात-आठ वर्षांत भारतीय सैनिकांनी इथं आपली बांधकामं सुरू केली. त्यामुळे भारतीय सैनिकांची इथली संख्याही बरीच वाढली आहे. त्यामुळे आधी एक-दोन महिन्यात जे व्हायचं, ते एक दिवसाआड होऊ लागलं आहे.
भारत-चीन सीमेवर गेल्या नऊ महिन्यांपासून तणाव कायम आहे.
विरोधी पक्ष, विशेषतः काँग्रेस या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने निशाणा साधताना दिसते.

हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)









