नेपाळ विमान अपघात : पायलटने चुकीचं बटन दाबलं, वीज गेली आणि विमान कोसळलं

फोटो स्रोत, REUTERS
15 जानेवारीला नेपाळमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत 72 लोकांचा मृत्यू झाला होता. वैमानिकांनी चुकीचा लिव्हर खेचल्यामुळे हा अपघात झाल्याचं नेपाळ सरकारने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने म्हटलंय.
वैमानिकांनी चुकून विमानाची वीज कापल्यामुळे हे विमान हवेतच 'स्टॉल' झालं आणि अतिशय वेगाने जमिनीवर कोसळलं.
येती एअरलाईन्सचं हे विमान नेपाळची राजधानी काठमांडूहून पोखरा इथे जात होतं.
मागच्या तीस वर्षांमध्ये नेपाळमध्ये घडलेली ही सगळ्यात मोठी विमान दुर्घटना होती.
15 जानेवारीला येती एअरलाईन्सच्या ATR 72 विमानाने काठमांडूवरून उड्डाण केलं होतं. काठमांडू ते पोखरा या मार्गावर या विमानाची ही तिसरी फेरी होती.
अपघात झाला त्यादिवशी हे विमान विमानतळापासून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर सेती नदीच्या घाटात कोसळलं.
अपघातानंतर शेकडो नेपाळी सैनिकांना बचावकार्यासाठी तैनात केलं गेलं होतं पण विमानातला एकही प्रवासी वाचू शकला नाही.
चौकशी समितीच्या अहवालात काय ?
या चौकशी समितीचे सदस्य दीपक प्रसाद बस्तोला यांनी रॉयटर्स सांगितलं की, "विमानाच्या गतीमुळे जमिनीवर कोसळण्यापूर्वी ते 49 सेकंद हवेत तरंगत होतं."
बिस्तोला म्हणाले की, "वैमानिकांनी फ्लॅप लीव्हरच्या ऐवजी कंडिशन लीव्हर खेचलं. कंडिशन लिव्हरमुळे विमानाचा वीजपुरवठा नियंत्रित होत असतो. चुकीचं लिव्हर खेचल्यामुळं विमानाचा वीजपुरवठा खंडित झाला आणि इंजिन बंद पडलं."
या अहवालात हेही सांगितलं आहे की, "दोन्ही इंजिन प्रोपेलर स्थिर झाल्यानंतर फ्लाइट क्रू नेमकी समस्या ओळखण्यात आणि त्यावर उपाय करण्यात अयशस्वी ठरला."
कर्मचाऱ्यांना योग्य तांत्रिक आणि कौशल्याधिष्ठित प्रशिक्षणाचा अभाव, कामाचा उच्च ताण आणि त्याचं नियोजन करण्यासाठीच्या उपाययोजनांचे पालन न करणे ही तीन मुख्य कारणं असल्याचं या चौकशी अहवालात सांगितलं आहे.
विमानाची योग्य देखभाल करण्यात आली होती, त्यात कोणतेही ज्ञात दोष नव्हते आणि नेपाळच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाच्या नियम आणि नियमांनुसार या विमानतळे कर्मचारीही पात्र ठरले होते.
या चौकशी समितीत अमेरिका, कॅनडा, फ्रान्स आणि सिंगापूरमधील डझनहून अधिक लोकांचा सहभाग होता.
‘आणि विमान खाली कोसळलं’
बीबीसी नेपाळी सेवेच्या रिपोर्टनुसार प्रत्यक्षदर्शींनी जी माहिती दिली त्यानुसार लँडिंगसाठी धावपट्टी ऐनवेळी बदलण्यावरून प्रश्न विचारले जात होते.
विमानतळावरच्या एका अधिकाऱ्यानुसार पोखरात अपघातग्रस्त झालेल्या यती एअरलाईन्सचं विमान धावपट्टीपासून 24.5 किलोमीटरवर आल्यानंतर त्यांनी आपली लँडिंगची जागा बदलली.
अधिकाऱ्यांच्या मते कॅप्टन कमाल केसी यांच्या नेतृत्वाखाली प्रवास करणाऱ्या या विमानाला उतरण्याची परवानगी दिली होती. तोवर या विमानात कोणतीही तांत्रिक अडचण नव्हती.
मग अचानक विमान पायलटने एअर ट्राफिक कंट्रोलला म्हटलं की, “मी माझा निर्णय बदलतोय.”
अधिकाऱ्यांच्या मते पायलटला रनवे 30 वर उतरण्याची परवानगी दिली होती पण त्यांनी रनवे 12 वर उतरण्याची परवानगी मागितली.

फोटो स्रोत, KRISHNAMANI BARAL
लँडिंगची परवानगी मिळाल्यानंतर विमान ‘व्हिजिबलिटी स्पेस’ मध्ये आलं होतं. म्हणजे ते विमान कंट्रोल टॉवरमधून दिसत होतं. यानुसार एअर ट्राफिक कंट्रोलचा अंदाज होता की विमान 10 ते 20 सेकंदात रनवेवर उतरेल.
आपलं नाव न जाहीर करण्याच्या अटीवर एअरपोर्टच्या एका ट्राफिक कंट्रोलरने म्हटलं की, “वळताना जेव्हा विमानाने लँडिंग गिअर उघडला तेव्हा विमान ‘स्टॉल’ झालं आणि खाली जायला लागलं.”
एव्हिएशनच्या क्षेत्रात स्टॉल होणं म्हणजे विमान आपली विशिष्ट उंची न राखू शकणं.
या अधिकाऱ्याच्या मते विमान कंट्रोल टॉवरवरून स्पष्ट दिसत होतं.
पोखरा विमानतळाचे प्रवक्ता विष्णु अधिकारी यांनीही सांगितलं की अपघात झाला त्या दिवशी इथलं वातावरण स्वच्छ होतं आणि सगळी उड्डाणं वेळेत होत होती.
प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं होतं?
बीबीसी नेपाळीशी बोलताना काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की लँडिंगच्या आधी वळताना विमानाचं नियंत्रण सुटलं.
बीबीसी या अपघाताबदद्ल माहिती घेण्यासाठी अनेक प्रत्यक्षदर्शींशी बोललं. त्यांनी सांगितली की ही घटना इतकी अचानक घडली की कोणाला काहीच समजलं नाही.

43 वर्षांच्या कमला सुरुंग यांनी म्हटलं की, “मी माझ्या डोळ्यादेखत विमान जळताना पाहिलं.”
कमला गुरुंग घरीपाटन भागात राहाणाऱ्या आहेत. इथल्याच एका घराच्या अंगणात विमान कोसळून पडलं. तिथे अजूनही विमानाच्या खिडक्यांचे तुकडे, चहाचे कप आणि जळालेलं सामान पडलं आहे.
‘बॉम्बसारखं विमान फुटलं’
कमला सांगतात की हा अपघात पाहून लहान मुलं घाबरून घरात पळाली.
त्या पुढे म्हणतात, “सकाळी 11.30 वाजेपर्यंत सगळं काही ठीक होतं. मी रोजसारखी मुलांना घेऊन उन्हात बसले होते. विमानांचा आवाज घरात येणं फारच सामान्य बाब आहे. पण रविवारी घरावरून जाणाऱ्या विमानाचा वेगळाच आवाज आला आणि मी काय घडतंय हे पहाणार तोवर विमान कोसळलं होतं.”
कमल म्हणतात असा भयानक अपघात त्यांनी आधी कधी पाहिला नव्हता.
त्या म्हणतात, “जेव्हा विमान कोसळलं तेव्हा खूप मोठा आवाज झाला. काही क्षणात धुराचे लोट उठताना दिसले आणि पाहता पाहता आगीच्या ज्वाळा भडकल्या.”
अपघातस्थळापासून फक्त 200 मीटर अंतरावर काही घरं आहेत. इथले स्थानिक बाल बहादुर गुरुंग यांनी म्हटलं की ‘लोकांचं नशीब चांगलं की या घरांवर विमान कोसळलं नाही.’
बहादुर गुरुंग पुढे म्हणतात, “विमान खूप खाली आलं होतं. रनवेकडे जाताना अचानक बॉम्बसारखं फुटलं. आसपासच्या जंगलातही या स्फोटामुळे आग लागली.”
लँडिंगच्या काही क्षण आधी अपघात
पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळ 1 जानेवारीपासून सुरू झालं आहे. इथे पूर्व आणि पश्चिम दिशांनी विमानं येतात.
पूर्वेकडून येणारी विमानं रनवे– 30 वर उतरतात तर पश्चिमेकडून येणारी विमानं रनवे-12 वर उतरतात.
या विमानतळाच्या अधिकाऱ्यांच्या मते अपघातग्रस्त विमान ‘व्हिज्युअल फ्लाईट रूल्स’ (VRF) या तंत्राचा वापर करून लँड करण्याच्या प्रयत्नात होतं.
जेव्हा हवा स्वच्छ असेल तेव्हा पायलट टेकऑफ आणि लँडिंगसाठी VRF हे तंत्र वापरतात.

अधिकाऱ्यांनी सांगितल, विमान जेव्हा पहिल्यांदा संपर्कात आलं तेव्हा त्याने एटीसीकडे रनवे-30 वर उतरण्याची परवानगी मागितली. विमानाला परवानगी दिली गेली. पण 24.5 किलोमीटर अंतरावर आल्यावर विमानाने रनवे -12 वर उतरण्याची परवानगी मागितली.
विमानाच्या पायलटने एअर ट्राफिक कंट्रोलला म्हटलं, “मी माझा निर्णय बदलतोय आणि मी पश्चिमेकडून लँड करेन.”
नव्या विमानतळावर काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे तर हा अपघात झाला नाही ना असं विचारलं असतं विमानतळाचे प्रवक्ते विष्णु अधिकारी म्हणाले की, “सध्या असं काही ठोस सांगणं अवघड आहे. अपघाताचं कारण सविस्तर चौकशीअंती कळेल.”
नेपाळमध्ये विमान उड्डाण कठीण का आहे?
मागच्या दहा वर्षांपासून नेपाळच्या विमान कंपन्यांवर युरोपियन युनियनने बंदी घातली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही बंदी घातल्याचं युरोपने सांगितलं आहे.
हिमालयातल्या नेपाळमध्ये हवाई वाहतूक नेहमीच आव्हानात्मक असते. इथला लुकला विमानतळ जगातल्या सर्वांत धोकादायक विमानतळापैंकी एक मानला जातो. याआधीही नेपाळच्या पर्वतराजींत मोठे अपघात झाले होते.
गेल्या वर्षी म्हणजे 2022 साली मे महिन्यात तारा एअरच्या विमानाला झालेल्या अपघातात ठाण्यातील वैभवी बांदेकर त्यांची दोन मुलं आणि विभक्त पती यांचा मृत्यू झाला होता. या अपघातात विमानातील कर्मचाऱ्यांसह एकूण 22 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
2018 साली यूएस-बांग्ला एयरलाईनच्या विमानानं काठमांडूमध्ये उतरताच पेट घेतला होता आणि त्या अपघातात 51 जणांचा मृत्यू झाला होता.
1992 साली पाकिस्तान इंटरनॅशनल एयरलाईन्सच्या विमानाची एका पर्वतशिखराशी टक्कर झाली होती आणि विमानातील सर्व 167 जणांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








