तेनजिंग आणि हिलरी यांनी एव्हरेस्ट सर केल्याची बातमी 5 दिवस का लपवली गेली?

महाराणी एलिझाबेथ II आणि ड्यूक ऑफ़ एडिनबरा (राज्याभिषेकाच्या दिवशी, 2 जून, 1953)

फोटो स्रोत, PRINT COLLECTOR

फोटो कॅप्शन, महाराणी एलिझाबेथ II आणि ड्यूक ऑफ़ एडिनबरा (राज्याभिषेकाच्या दिवशी, 2 जून, 1953)
    • Author, शुभज्योति घोष
    • Role, बीबीसी बांगला, दिल्ली

29 मे 1953 रोजी न्यूझीलंडचे नागरिक एडमंड हिलरी आणि नेपाळचे शेर्पा तेनजिंग नोर्गे यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले होते. आज 29 मे आहे, त्या निमित्ताने ही बातमी पुन्हा शेअर करत आहोत.

माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी सुनियोजित आणि व्यावसायिक मोहिमांची सुरुवात 1922 पासून झाली होती. म्हणजेच आजपासून 102 वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली. मात्र जगातील सर्वात उंच शिखर पादाक्रांत करण्यासाची पहिली मोहीम यशस्वी व्हायला 31 वर्षं लागली.

29 मे 1953 रोजी न्यूझीलंडचे नागरिक एडमंड हिलरी आणि नेपाळचे शेर्पा तेनजिंग नोर्गे यांना मिळालेल्या यशाची बातमी संपूर्ण जगासाठी रोमांचकारक होती.

पण एवढी मोठी बातमी सगळ्या जगापासून पाच दिवस अत्यंत गोपनीयतेने लपवून ठेवण्यात आली होती हे तुम्हाला माहिती आहे का? राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी सकाळी याची घोषणा करण्यासाठी ती लपवण्यात आली होती.

आज त्याची कल्पनाही करता येणार नाही, त्यावेळेस ही गोष्ट आजिबात सोपी नव्हती. त्यावेळेस 'द टाईम्स'चे वार्ताहर जेम्स मॉरिस यांना हे पूर्णत्वास नेण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागले होते.

महाराणीसाठी विशेष भेट

एव्हरेस्ट मोहिमेचं वार्तांकन करण्यासाठी मॉरिस यांची अधिकृत बातमीदार म्हणून नियुक्त झालेली. ब्रिटिश सरकारने आर्थिक मदत केलेली असल्यामुळे ही मोहीम पूर्णपणे ब्रिटिश मोहीम झालेली होती. राणीला राज्याभिषेकाच्यावेळेस एक विशेष भेट देणं हासुद्धा यामागचा एक हेतू होता. ही विशेष भेट म्हणजेच एव्हरेस्ट शिखर सर केल्याची बातमी.

जेम्स मॉरिस यांनी या मोहिमेवर 'कोरोनेशन एव्हरेस्ट' नावाचं पुस्तक लिहिलं. त्यांनी या अद्भूत घटनेची माहिती सविस्तर लिहिली आहे.

'द टाइम्स' मासिकानं नंतर लिहिलं होतं, "सांकेतिक शब्द किंवा कोडचा वापर करुन तयार झालेल्या माहितीमुळे राणीचा राज्याभिषेकाचा आनंद कित्येक पटींनी वाढला."

एवरेस्ट विजय

फोटो स्रोत, FOX PHOTOS

फोटो कॅप्शन, महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा राज्याभिषेक 2 जून 1953 रोजी झाला.

तेनजिंग नोर्गे यांचे पुत्र जामलिंग बीबीसी बांगलाशी बोलताना म्हणाले, "सर्व प्रकरण अत्यंत गोपनीय ठेवलं गेलं. राणीच्या राज्याभिषेकाआधी एव्हरेस्टवर युनियन जॅक फडकावा असं ब्रिटनला वाटत होतं. राज्याभिषेकाच्या दिवशी राणीसाठी ही विशेष भेट होती असं म्हटलं जाऊ शकतं."

अर्थात, त्यांचे वडील तेनजिंग यांनी एव्हरेस्टवर फक्त ब्रिटनचाच नाही तर संयुक्त राष्ट्र, नेपाळ आणि भारताचा झेंडाही फडकावला होता.

बातमी पाठवण्यासाठी भाऊगर्दी

एव्हरेस्ट मोहिमेची बातमी पाठवण्यासाठी फक्त जेम्स मॉरिसच नाही तर आणखी दोन ज्येष्ठ पत्रकार नेपाळच्या खुम्बू प्रांतात फिरत होते.

गिर्यारोहणाचे इतिहासकार मार्क हॉरेल यांच्या मते, "जेम्स मॉरिस यांनाच या मोहिमेचं वार्तांकन करण्याचं काम देण्यात आलं असलं तरी त्यांच्याशिवाय 'द डेली मेल'चे राल्फ इजार्ड आणि रॉयटर्सचे पिटर जॅक्सनही तिथंच तंबू ठोकून होते."

ते लोक गाईड आणि हमाल घेऊन रोज इकडे-तिकडे फिरत होते आणि माहिती मिळवत होते. मोहीम कुठवर आली कोण पुढे गेलं कोण मागे परतलं अशी माहिती ते गोळा करत होते.

महारानी एलिजाबेथ द्वितीय

फोटो स्रोत, BETTMANN

फोटो कॅप्शन, एव्हरेस्ट विजयानंतर लंडनला पोहोचलेले गिर्यारोहक

मोहिमेत थोडं जरी यश-अपयश आलं तर ती बातमी एव्हरेस्ट बेस कॅम्पवरुन रनर पाठवून नामचे बाजार या पहाडी गावात पाछवली जायची. सर्वात जवळचं तार ऑफिस तिथंच होतं.

तिथं तिवारी नावाचे गृहस्थ ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. रनर किंवा तिवारी यांच्याकडे चौकशी केल्यावर बातमी फुटण्याची भीती होती किंवा तारेद्वारे पाठवली जाणारी माहिती ऑफिसमध्ये कोणाच्या कानावरही पडू शकली असती.

म्हणूनच या मोहिमेची बातमी सांकेतिक भाषेत काठमांडूमार्गे लंडनला पाठवायचं जेम्स मॉरिस यांनी ठरवलं. या गोपनीय कोडची माहिती जेम्स मॉरिस यांच्याशिवाय काठमांडूत टाइम्सचे दुसरे पत्रकार हचिन्सन यांनाच होती. ती बातमी लंडनला पाठवायची जबाबदारी हचिन्सन यांच्याकडे होती. अर्थात नंतर ही माहिती तिवारींना अनिच्छेने का होईना सांगावीच लागली.

'अॅडव्हान्स बेस अॅबन्डंड'

सांकेतिक शब्दांची जी सूची तयार करण्यात आली होती ती एखाद्या कोड्यासारखी होती.

त्यात एडमंड हिलरी ऐवजी 'अॅडव्हान्स बेस अॅबन्डंड' आणि तेनजिंग नोर्गेच्या जागी 'अवेटिंग इम्प्रूव्हमेंट' असे शब्द वापरले होते.

यावरुन हवामान अजून चांगलं होण्याची वाट पाहिली जात आहे असं वाटतं होतं. असे अनेक शब्द होते.

एवरेस्ट विजय

फोटो स्रोत, LAKPA SHERPA

या कोडचा वापर फक्त एव्हरेस्ट सर होण्याच्या वेळेसच वापर केला जाईल, असं लंडनमधील 'टाईम्स'च्या संपादकीय विभागाला सांगण्यात आलं होतं. बाकी बातम्या जेम्स नेहमीच्या भाषेतच पाठवणार होते.

त्यामुळेच एव्हरेस्ट मोहीम फत्ते झाल्यावर मॉरिस यांनी पाठवलेला संदेश असा होता-''स्नो कंडिशन्स बॅड स्टॉप अॅडवांस्ड बेस अॅबन्डंड यस्टरडे स्टॉप अवेटिंग इम्प्रूवमेंट ऑल वेल''

वरवर पाहिलं तर मोहीम रद्द झालीय असं वाटू शकतं पण, काल 29 मे रोजी एडमंड हिलरी आणि तेनजिंग नोर्गे यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले, सगळं नीट आहे, असा त्याचा अर्थ होता.

'स्नो कंडिशन्स बॅड'चा अर्थ मोहीम पूर्ण झाली असा होता.

हा संदेश घेऊन एक रनर नामचे बाझारच्या दिशेने वेगाने गेला. तेथे असलेल्या तिवारी यांनी रेडिओमधून ती बातमी काठमांडूमधील आर्थर हचिन्सन यांना पाठवली.

हचिन्सन यांच्याद्वारे ही बातमी त्याच दिवशी दुपारी लंडनला टाईम्सच्या कार्यालयात पोहोचली.

माउंट एवरेस्ट

फोटो स्रोत, ULLSTEIN BILD DTL

फोटो कॅप्शन, एडमंड हिलरी आणि तेनजिंग नोर्गे

पुढच्याच दिवशी नामचे बाजारमध्ये जेम्स मॉरिस यांची रॉयटर्सचे बातमीदार पीटर जॅक्सन यांच्याशी अचानक भेट झाली.

तेव्हा ब्रिटिश मोहीमेला यश आलं नसल्याचं मॉरिस यांनी नाटक केलं. त्याच्या पुढच्या वर्षी मोहीम आखण्याचं परमिट फ्रेंच लोकांनी घेतलं होतं. त्याचा संदर्भ देत मॉरिस म्हणाले, तुम्हाला माहितीय फ्रेंच लोक असं करतातच.

पीटर यांना थोडी शंका आली होती, पण त्यांनी मॉरिस यांना जास्त काही विचारलं नाही.

अशी झाली घोषणा

2 जूनच्या सकाळी 'द टाईम्स'च्या बातमीचं शीर्षक होतं- 'एव्हरेस्ट कॉंकर्डः हिलरी अँड तेनजिंग रिच द समिट'. म्हणजेच एव्हरेस्ट विजय संपन्नः हिलरी आणि तेनजिंग शिखरावर पोहोचले.

एवरेस्ट विजय

फोटो स्रोत, TIMESONLINE/TWITTER

त्याच्या शेजारीच त्या दिवशी होणाऱ्या राज्याभिषेकाची बातमी होती.

राज्याभिषेकासाठी निश्चित केलेल्या रस्त्यावर हजारो लोकांनी कशी रात्र काढली याचं वर्णन त्यात होतं.

एवरेस्ट विजय

फोटो स्रोत, BETTMANN

फोटो कॅप्शन, लंडनच्या रस्त्यांवर रात्र काढणारे लोक

जेम्स मॉरिस त्या दिवशी नामचे बाजारच्या दक्षिणेस सहा मैल खाली उतरले होते. दूधकोशी नदीच्या किनारी त्यांनी तंबूत रेडिओवर बीबीसी लावून बातमी ऐकली.

अखेर माऊंट एव्हरेस्टवर माणूस पोहोचला आणि राज्याभिषेकाआधी थोडावेळ आधी राणीला ही चांगली बातमी सांगण्यात आलीय, अशी ती बातमी होती.

एव्हरेस्ट सर होण्याची बातमी 'द टाइम्स'ला एका डिस्पॅचमधून सर्वात आधी मिळाली होती, असं प्रतिनिधीनं सांगितलं होतं.

ही बातमी ऐकल्यावर जेम्स यांचे चेहरा आनंदानं उजळून गेला. 'कोरोनेशन एव्हरेस्ट' या पुस्तकात त्यांनी ही आठवण लिहून ठेवलीय.

माउंट एवरेस्ट

फोटो स्रोत, MARK HORRELL

या बातमीमुळे राणीच्या राज्याभिषेकाच्या ऐतिहासिक क्षणाला एक नवी उंची लाभली अशी एक सार्वत्रिक भावना ब्रिटिश माध्यमात होची. चार पाच दिवस ही बातमी लपवून ठेवणं सार्थकी लागलं असं त्यांनाही वाटत होतं.

या कथेतली पात्रं आज कुठे आहेत?

या गोष्टीतली बहुतेक पात्रं आज या जगात नाहीत. पत्रकार जेम्स मॉरिस ट्रान्सजेंडर होते. ते लिंग बदलून महिला झाले आणि त्यांनी जेन मॉरिस हे नाव घेतलं. प्रवासवर्णनकार म्हणून ते अत्यंत प्रसिद्ध होते. नोव्हेंबर 2020मध्ये वयाच्या 94 व्या वर्षी त्यांचं वेल्समध्ये निधन झालं.

एडमंड हिलरी यांना 1953मध्येच नाईटहूड किताबाने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांचा वयाच्या 88 व्या वर्षी न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे मृत्यू झाला.

एलिजाबेथ द्वितीय

फोटो स्रोत, DAVID LEVENSON

फोटो कॅप्शन, पत्रकार मॉरिस लिंगबदलानंतर जेन मॉरिस झाले.

त्यांचे मित्र तेनजिंग नोर्गे काही काळाने भारतात दार्जिलिंगमध्ये राहू लागले. त्यांचं वयाच्या 72 व्या वर्षी 9 मे 1968 रोजी निधन झालं.

तेनजिंग यांचे पुत्र जामलिंग तेनजिंगसुद्धा गिर्यारोहक आहेत, त्यांनीही एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली आहे.

तेनजिंग नोर्गे यांचे पुत्र आणि महाराणी यांची भेट

29 मे 2013 रोजी जागतिक एव्हरेस्ट दिनानिमित्त एलिझाबेथ द्वितीय आणि जामलिंग यांची भेट झाली.

एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याला 60 वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ ब्रिटनच्या रॉयल जिऑग्राफिकल सोसायटीने लंडनमध्ये एक भव्य सोहळा आयोजित केला होता. त्यात जगभरातील अनेक प्रसिद्ध गिर्यारोहक सहभागी झाले होते.

महारानी एलिजाबेथ द्वितीय

फोटो स्रोत, JAMLING TENZING

फोटो कॅप्शन, महारानी एलिझाबेथ यांच्यासमवेत जामलिंग

एलिझाबेथ द्वितिय या सोहळ्याच्या मुख्य पाहुण्या होत्या. त्या समारंभात तेनजिंग नोर्गे यांचे पुत्र जामलिंग यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं

एलिझाबेथ यांच्या आठवणी सांगताना जामलिंग नोर्गे बीबीसी बांगलाला म्हणाले, "त्या अत्यंत विनम्र होत्या. आमच्या गप्पांमध्ये त्यांनी माझ्या वडिलांचा उल्लेख केला तसेच राज्याभिषेकाच्या आठवणीही जागवल्या."

ज्या राणीचा राज्याभिषेक सोहळा अधिकाधिक आनंदी व्हावा यासाठी हे सगळं करण्यात आल्या त्या राणीने 8 सप्टेंबर 2022 रोजी वयाच्या 96 व्या वर्षी बालमोरल पॅलेसमध्ये अखेरचा निरोप घेतला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)