किंग चार्ल्स तृतीय आता युकेचे नवीन राजे

फोटो स्रोत, © Nadav Kander
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर त्यांची राजगादी ताबडतोब त्यांचे सर्वांत मोठे पुत्र चार्ल्स यांच्याकडे गेली आहे. चार्ल्स हे माजी प्रिन्स ऑफ वेल्स आहेत.
पण, राजा म्हणून राज्याभिषेक होण्यासाठी चार्ल्स यांना अनेक व्यावहारिक आणि पारंपरिक गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे.
उपाधी काय मिळणार?
चार्ल्स यांच्या पहिल्या कृतींपैकी एक म्हणजे ते स्वत:ला राजा चार्ल्स तिसरे म्हणवून घेणार आहेत की त्यांना दुसरं नाव घ्यायचं आहे, हे ठरवावं लागणार आहे.
उदाहरणार्थ, त्यांचे आजोबा जॉर्ज सहावे यांचं पहिलं नाव अल्बर्ट होतं. पण, त्यांनी त्यांच्या मधल्या नावापैकी एका नावाचा वापर करुन राज्य केलं. चार्ल्सही त्यांच्या 4 (चार्ल्स फिलिप आर्थर जॉर्ज) नावांपैकी कोणतंही नाव निवडू शकतात.
अशाप्रकारे उपाधी बदलाचा सामना करणारे ते काही एकमेव व्यक्ती नाही.
ते सिंहासनाचे वारसदार असले तरी प्रिन्स विल्यम आपोआप प्रिन्स ऑफ वेल्स होणार नाहीत. असं असलं तरी त्यांना ताबडतोब त्याच्या वडिलांची दुसरी पदवी, ड्यूक ऑफ कॉर्नवॉलचा वारसा मिळेल. त्यांची पत्नी कॅथरीन यांना डचेस ऑफ कॉर्नवॉल म्हणून ओळखलं जाईल.
चार्ल्स यांच्या पत्नीसाठीही एक नवीन उपाधी असेल. ज्याचं संपूर्ण शीर्षक क्वीन कन्सोर्ट असेल. कन्सोर्ट हा शब्द राजाच्या जोडीदारासाठी वापरला जातो.
औपचारिक समारंभ
आईच्या मृत्यूनंतर पहिल्या 24 तासांत चार्ल्स यांना अधिकृतपणे राजा म्हणून घोषित केलं जाईल. ही प्रक्रिया लंडनमधील सेंट जेम्स पॅलेसमध्ये अॅक्सेशन काऊंसिल म्हणून ओळखल्या जाणार्या औपचारिक मंडळासमोर पार पडेल.
यात प्रिव्ही काऊन्सिलचे सदस्य म्हणजे ज्येष्ठ आजी-माजी खासदारांचा असतील. तसंच काही वरिष्ठ नागरी सेवक, कॉमनवेल्थ उच्चायुक्त आणि लंडनच्या महापौरांचाही समावेश असेल.
या प्रक्रियेसाठी 700 हून अधिक लोक उपस्थित राहू शकतात. पण, सध्या वेळेची उपलब्धता पाहता वास्तविक संख्या खूपच कमी असण्याची शक्यता आहे. 1952 मधील शेवटच्या अॅक्सेसेशन काऊंसिल जवळपास 200 जण उपस्थित होते.

फोटो स्रोत, PA Media
यावेळी परंपरेनुसार राजा उपस्थित राहत नाही.
या बैठकीत राणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूची घोषणा लॉर्ड प्रेसिडेंट ऑफ प्रिव्ही कौन्सिल (पेनी मॉर्डाउंट) करतील आणि एक उद्घोषणा मोठ्यानं वाचली जाईल.
या उद्घोषणेचे शब्द बदलू शकतात. पण ती परंपरागतपणे प्रार्थना आणि प्रतिज्ञांची एक मालिका असते. ज्यात मागील राजाचं कौतुक करणं आणि नवीन राजाला पाठिंबा देण्याचं वचन दिलेलं असतं.
या उद्घोषणेवर नंतर पंतप्रधान, कँटरबरीचे मुख्य बिशप आणि लॉर्ड चॅन्सेलर यांच्यासारखे अनेक ज्येष्ठ व्यक्ती स्वाक्षरी करतील.
यावेळी या समारंभांप्रमाणेच एका नवीन युगाचं चिन्ह म्हणून काय बदललं गेलं, जोडलं गेलं किंवा अद्ययावत केलं गेलं याकडेही लक्ष दिलं जाईल.
राजाची पहिली घोषणा
यानंतर सामान्यपणे एका दिवसानंतर अॅक्सेशन काऊंसिलची पुन्हा भेट होते आणि यावेळी राजा प्रिव्ही काऊंसिलह उपस्थित असेल.
ब्रिटिश राजाच्या कारकिर्दीचा प्रारंभ हा शपथ ग्रहण समारंभानं होत नसतो.
पण, नवीन राजाला एक घोषणा करायची असते. 18 व्या शतकाच्या सुरुवातीच्या परंपरेनुसार ती घोषणा असते. ज्यात तो चर्च ऑफ स्कॉटलंडचे रक्षण करण्याची शपथ घेईल.

फोटो स्रोत, Getty Images
तुतारीच्या वादनानंतर चार्ल्स यांची नवीन राजा म्हणून सार्वजनिक घोषणा केली जाईल. ती गार्टर किंग ऑफ आर्म्स म्हणून ओळखल्या जाणार्या अधिकाऱ्याद्वारे सेंट जेम्स पॅलेसमधील फ्रायरी कोर्टच्या वरच्या बाल्कनीतून केली जाईल.
तो म्हणेल, "गॉड सेव्ह द किंग". आणि 1952 नंतर प्रथमच जेव्हा राष्ट्रगीत वाजवले जाईल तेव्हा "गॉड सेव्ह द किंग" असे शब्द ऐकू येतील.
हायड पार्क, टॉवर ऑफ लंडन आणि नौदलाच्या जहाजांमधून बंदुकीची सलामी दिली जाईल आणि चार्ल्स यांनाराजा म्हणून घोषित करणारी घोषणा एडिनबर्ग, कार्डिफ आणि बेलफास्टमध्ये वाचली जाईल.
राज्याभिषेक
चार्ल्स यांच्या पदग्रहणाचा राज्याभिषेक हा सर्वांत महत्त्वाचा घटक असेल. या समारंभासाठीच्या आवश्यक तयारीमुळे चार्ल्स यांच्या राज्यारोहणानंतर लगेच राज्याभिषेक होण्याची शक्यता नाही. राणी एलिझाबेथ फेब्रुवारी 1952 मध्ये सिंहासनावर बसल्या होत्या. पण जून 1953 पर्यंत त्यांचा राज्याभिषेक झाला नव्हता.
गेल्या 900 वर्षांपासून राज्याभिषेक वेस्टमिनिस्टर अॅबे इथं होत आहे. विल्यम द कॉन्करर हा तिथं राज्याभिषेक होणारा पहिला सम्राट होता आणि चार्ल्स हे 40वे राजे असतील.

फोटो स्रोत, Mirrorpix / Getty Images
इथं होणारा राज्याभिषेक समारंभ ही कँटरबरीच्या आर्चबिशपद्वारे केली जाणारी एक अँग्लिकन धार्मिक सेवा आहे. समारंभाचा रोमांचक क्षण तेव्हा असेल जेव्हा ते चार्ल्स यांच्या डोक्यावर सेंट एडवर्डचा मुकूट ठेवला जाईल. हा एक सोन्याचा मुकूट असून तो 1661 पासून राजाच्या डोक्यावर ठेवला जातो.
हा मुकूट टॉवर ऑफ लंडन येथे ठेवण्यात आला आहे आणि केवळ राज्याभिषेकाच्या वेळीच राजा तो परिधान करत असतो.
राज्याभिषेक समारंभ हा राज्याच्या घडामोडींसदर्भातला एक भाग असल्यानं सरकार त्यासाठी पैसे देतं आणि पाहुण्यांची यादी ठरवतं.
यावेळी संगीत, वाचन यांची रेलचेल असेल. तसंच संत्रा, गुलाब, कस्तुरी आणि तेलांचा वापर करून नवीन राजाला अभिषेक करण्याचा विधी असेल.

फोटो स्रोत, Getty Images
अख्ख्या जगासमोर नवा राजा राज्याभिषेकाची शपथ घेणार आहे. या समारंभात त्याला त्याच्या नवीन भूमिकेचं प्रतीक म्हणून रत्नजडित राजचिन्ह आणि राजदंड मिळेल. तसंच कँटरबरीचे मुख्य बिशप त्याच्या डोक्यावर सोन्याचा मुकूट ठेवतील.
कॉमनवेल्थचे प्रमुख
चार्ल्स हे 56 स्वतंत्र देश आणि 2.4 अब्ज लोकांची संघटना असलेल्या कॉमनवेल्थचे प्रमुख बनले आहेत. यापैकी 14 देश तसंच यूकेसाठी राजा हाच राज्याचा प्रमुख असतो.
कॉमनवेल्थ क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे हे देश आहेत: ऑस्ट्रेलिया, अँटिग्वा आणि बारबुडा, बहामास, बिलीझ, कॅनडा, ग्रेनडा, जमैका, पापुआ न्यू गिनी, सेंट क्रिस्टोफर आणि नेव्हिस, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रॅनिडीझ, न्यूझीलंड, सॉलोमन आयलंड, टुवालू.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








