प्रिन्स फिलीप: 99 वर्षं, 143 देश आणि एक प्रसिद्ध पत्नी

फोटो स्रोत, Terry O'Neill
ड्युक ऑफ एडिनबरा प्रिन्स फिलीप यांचं काही वेळापूर्वीच निधन झालं. प्रिन्स फिलीप यांनी राणी एलिझाबेथ यांना आयुष्यभर खंबीर आणि सातत्यपूर्ण साथ दिली.
प्रिन्स फिलीप यांच्याकडे आलेली भूमिका ही कुणासाठीही महत्कठीण अशीच होती. विशेषत: एकेकाळी नौदलाची कमान सांभाळलेल्या आणि विविध विषयांवर ठाम मतं असणाऱ्या त्यांच्यासाठी ती आणखी कठीण होती.
त्यांच्या याच स्वभाववैशिष्ट्यांमुळे त्यांना आपल्या जबाबदाऱ्या परिणामकारकरीत्या निभावता आल्या. तसंच आपल्या पत्नीला राणीपदाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यातही त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला.
राणीचे पती म्हणून प्रिन्स फिलीप यांच्याकडे कोणतंही घटनात्मक पद नव्हतं. पण राणीच्या सगळ्यांत जवळची आणि महत्त्वाची व्यक्ती म्हणून ते ओळखले जायचे.
ग्रीसचे प्रिन्स फिलीप यांचा जन्म 10 जून 1921 रोजी कोर्फू या बेटावर झाला. त्यांच्या जन्म दाखल्यावर मात्र 28 मे 1921 असा तारखेचा उल्लेख आहे. कारण त्याकाळी ग्रीसनं ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारलेलं नव्हतं. त्यांचे वडील, ग्रीसचे प्रिन्स अँड्र्यू हे हेलेनेसचे राजे जॉर्ज पहिले यांचे कनिष्ठ पुत्र. त्यांच्या आई, प्रिन्सेस अॅलीस ऑफ बॅटेनबर्ग या प्रिन्स लुई ऑफ बॅटेनबर्ग यांच्या थोरल्या कन्या आणि बर्माच्या अर्ल माऊंटबॅटन यांच्या भगिनी होत्या.

फोटो स्रोत, Royal Collection
सन 1922मध्ये झालेल्या बंडानंतर, त्यांच्या वडिलांना सत्तेवरून दूर करण्यात आलं आणि ग्रीसमधून बाहेर काढण्यात आलं.
प्रिन्स अँड्र्यू यांचे चुलत बंधू किंग जॉर्ज पाचवे यांनी त्यांच्यासाठी एक ब्रिटीश युद्धनौका पाठवून त्यांना फ्रान्सला पोहोचतं केलं.
सर्व भावंडांत सगळ्यांत छोटा आणि त्यात एकुलता एक मुलगा म्हणून छोट्या फिलीपचं लहानपण अतिशय प्रेमळ वातावरणात गेलं.
त्यांचं शिक्षण फ्रान्समध्ये सुरू झालं. वयाच्या सातव्या वर्षी ते त्यांच्या माउंटबॅटन परिवारात राहण्यासाठी इंग्लंडला आले. तिथं सरे प्रांतात त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं.
दरम्यानच्या काळात, त्यांच्या आईला स्किझोफ्रेनिया असल्याचं निष्पन्न झालं आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. छोट्या फिलीपची आईशी भेट त्यामुळे दुर्मिळ झाली.
1933मध्ये त्यांना, शिक्षणमहर्षी कर्ट हान यांनी स्थापन केलेल्या शुले श्क्लॉस सेलम या जर्मनीतल्या संस्थेत पाठवण्यात आलं. काही महिन्यांतच, ज्यू पंथीय हान यांच्यावर नाझी अत्याचारामुळे देश सोडून जाण्याची वेळ आली.
युद्धपत्रांत उल्लेख
जर्मनीतून पलायन केल्यानंतर हान स्कॉटलंडला गेले. तिथं त्यांनी गॉर्डनस्टन स्कूलची स्थापना केली. प्रिन्स फिलीप यांना जर्मनीत दोन शैक्षणिक सत्र पूर्ण केल्यानंतर लागलीच तिथं पाठवण्यात आलं.
आईवडिलांपासून वेगळ्या असलेल्या कुमारवयातील प्रिन्सना तिथं पोषक वातावरण मिळालं. स्वावलंबनाचे धडे त्यांनी इथेच गिरवले.
युध्दाचं सावट असल्याने प्रिन्स फिलीप यांनी सैन्यात जाण्याचं ठरवलं. त्यांना रॉयल एअर फोर्समध्ये जाण्याची इच्छा होती. मात्र, आईच्या कुटुंबाची दर्यावर्द्यांची पार्श्वभूमी असल्यानं त्यांनी ब्रिटानिया रॉयल नेव्हल कॉलेज, डार्टमथ इथं प्रवेश घेतला.
तिथे राजे जॉर्ज पाचवे एकदा कॉलेजच्या पाहणीसाठी आले होते. त्या दौऱ्यात एलिझाबेथ आणि मार्गारेट या दोन्ही तरुण राजकन्यांना सोबत करण्याची जबाबदारी प्रिन्स फिलीप यांना देण्यात आली होती.

फोटो स्रोत, Getty Images
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्याप्रमाणे, प्रिन्स फिलीप यांनी ही जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली आणि आपली छाप पाडण्याचाही पुरेपूर प्रयत्न केला. 13 वर्षीय प्रिन्सेस एलिझाबेथ यांच्या मनावर या भेटीचा खोलवर ठसा उमटला.
फिलीप यांनी अभ्यासात उत्तम प्रगती दाखवली आणि जानेवारी 1940 मध्ये ते अव्वल दर्जानं पास झाले. त्यानंतर हिंदी महासागरातली युद्ध कारवाई हा त्यांचा पहिला नौदलसंबंधित अनुभव होता.
त्यानंतर त्यांची नेमणूक भूमध्यसागरातल्या एचएमएस व्हॅलियंट या युद्धनौकेवर करण्यात आली. इंग्लंडला पाठवलेल्या युद्धविषयक कागदपत्रांत त्यांनी 1941मध्ये केप मॅटपॅनच्या युध्दात बजावलेल्या कामगिरीची प्रशंसा झालेली आढळते. जहाजावरील सर्चलाईट विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची भूमिका, रात्रीच्या मोहिमेत महत्त्वाची ठरली.
"मला तिथं दुसरं एक जहाज दिसलं. त्याच्या मध्यभागावर प्रकाश पडला आणि काही क्षणांतच 15 इंची बाँबगोळ्यांच्या माऱ्यात ते जहाज उद्ध्वस्त झालं."
ऑक्टोबर 1942च्या सुमारास, फिलीप रॉयल नेव्हीतल्या सगळ्यात तरुण फर्स्ट लेफ्टनंटपैकी एक होते आणि एचएमएस वॉलेस या विनाशिकेवर कार्यरत होते.
साखरपुडा
फ्रिन्स फिलीप आणि तरुण प्रिन्सेस एलिझाबेथ यांच्यात बराच काळ पत्रव्यवहार सुरू होता. तसंच फिलीप यांना अनेकदा राजपरिवाराबरोबर राहण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं.
शांतताकाळात त्या दोघांचे प्रेमसंबंध बहरत गेले, पण राजदरबाराच्या काही सदस्यांचा या नात्याला विरोध होता. एका सदस्याने प्रिन्स फिलीप यांचं वर्णन "उद्धट आणि बेशिस्त" असं केलं होतं.

फोटो स्रोत, PA
पण साखरपुड्याची घोषणा करण्याआधी फिलीप यांना नवं राष्ट्रीयत्व आणि आडनाव घेणं आवश्यक होतं. आपल्या ग्रीक पदाचा त्याग करून ते ब्रिटीश नागरिक झाले आणि आपल्या आईचं माउंटबॅटन हे नाव त्यांनी स्वीकारलं.
एलिझाबेथ आणि फिलीप यांच्या लग्नसोहळ्याआधी राजे जॉर्ज सहावे यांनी फिलीप यांना 'हिज रॉयल हायनेस' हे पद दिलं आणि लग्नाच्या दिवशी त्यांना 'ड्युक ऑफ एडिनबरा, अर्ल ऑफ मेरिओनेथ अँड बॅरॉन ग्रिनविच' हा किताब बहाल करण्यात आला.
20 नोव्हेंबर 1947 रोजी वेस्टमिन्सटर अॅबीमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. विन्स्टन चर्चिल यांच्या शब्दांत सांगायचं झालं तर युद्धानंतरच्या बेरंगी ब्रिटनमध्ये हा रंगीबेरंगी सोहळा होता.
करिअर कसं घडलं
नौदल सेवेत पुन्हा रुजू झाल्यानंतर प्रिन्स फिलीप यांना माल्टात नियुक्त करण्यात आलं, त्यानंतर काही काळ या नवविवाहित जोडप्याला इतर सामान्य कुटुंबांप्रमाणे वेळ घालवता आला.
त्यांचा पहिला मुलगा प्रिन्स चार्ल्स याचा 1948 साली बकिंगहॅम पॅलेसमध्ये जन्म झाला आणि पाठोपाठ 1950 साली प्रिन्सेस अॅन यांचा जन्म झाला.
2 सप्टेंबर 1950 ला फिलीप यांचं कमांडर होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. एचएमएस मॅगपाय या बोटीवर त्यांना स्वतःची कमांड दिली गेली.

फोटो स्रोत, Getty Images
पण त्यांची लष्करी कारकीर्द लवकरच संपुष्टात आली. राजे जॉर्ज सहावे यांची ढासळती प्रकृती लक्षात घेता त्यांच्या कन्या एलिझाबेथ यांना सत्तेची सूत्रं हातात घेणं प्राप्त होतं आणि फिलीप यांची साथही तितकीच आवश्यक होती.
1951 साली फिलीप यांनी रॉयल नेव्हीला कायमचं अलविदा केलं. प्रिन्स फिलीप कुढत बसणाऱ्यांपैकी नव्हते पण आपल्याला नौदलात पुढे काम करता आलं नाही, याची खंत त्यांनी एकदा बोलून दाखवली होती.
त्यांचे समकालीन म्हणतात की आपल्या कौशल्याच्या जोरावर ते फर्स्ट सी लॉर्ड होऊ शकले असते.
1952 साली फिलीप आणि एलिझाबेथ कॉमनवेल्थ म्हणजे राष्ट्रकुलाच्या दौऱ्यावर निघाले, प्रत्यक्षात राजे जॉर्ज सहावे आणि महाराणींनी हा दौरा करणं अपेक्षित होतं.
आधुनिकीकरणाच्या कल्पना
फेब्रुवारी महिन्यात फिलीप आणि राजकुमारी एलिझाबेथ केनियात असताना राजे जॉर्ज सहावे मरण पावल्याची बातमी आली. कॉरोनरी थ्राँबोसिस म्हणजे हृदयात रक्ताची गाठ झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
आपल्या पत्नीला ती आता महाराणी झाल्याचं वृत्त सांगण्याची जबाबदारी फिलीप यांच्यावर होती.
"आपल्यावर अर्ध जग कोसळल्याचा भाव" फिलीप यांच्या चेहऱ्यावर होता असं वर्णन त्यांच्या एका मित्राने केलं होतं.
आपली नौदलातली कारकीर्द संपुष्टात आल्याने फिलीप यांना स्वतःसाठी नवीन भूमिका शोधणं गरजेचं होतं. एलिझाबेथ महाराणी झाल्याने ही भूमिका काय असेल हा मोठा प्रश्न होता.

फोटो स्रोत, Getty Images
राज्यारोहण जवळ येत चालला असताना एका राजपत्रातून अशी घोषणा केली गेली की, प्रत्येक घटनेत/समारंभात राणी एलिझाबेथ यांच्यानंतर प्रिन्स फिलीप यांचा मान असेल, पण असं असूनही त्यांच्याकडे कोणतंही घटनात्मक पद नव्हतं.
राजेशाहीच्या आधुनिकीकरणाबद्दल फिलीप यांच्याकडे अनेक कल्पना होत्या, पण महालातल्या जुन्या-जाणत्या अनेकांच्या विरोधामुळे त्यांचा लवकरच भ्रमनिरास झाला.
कटू धक्का
फिलीप यांनी सामाजिक जीवनात सक्रिय सहभाग घेतला. आपल्या काही मित्रांसह ते दर आठवड्याला मध्य लंडनच्या सोहोमधल्या एका रेस्टॉरंटमध्ये भेटत असत.
रेस्टॉरंटमधली जेवणं आणि नाईटक्लबच्या वाऱ्यांदरम्यानचे देखण्या जोडीदारांबरोबरचे त्यांचे फोटो अनेकदा प्रसिद्ध झाले.
कौटुंबिक निर्णयांबाबत त्यांना पूर्ण मोकळीक देण्यात आली होती. पण आपल्या मुलांचं आडनाव ठरवण्यावरून झालेल्या वादात त्यांना कटू धक्का बसला.

आपली मुलं माउंटबॅटन नव्हे तर विंडसर हे नाव घेतील हा निर्णय राणी एलिझाबेथ यांनी घेतला.
"आपल्या मुलांना स्वतःचं आडनाव न देऊ शकणारा मी देशातला एकमेव माणूस आहे," अशी तक्रार त्यांनी आपल्या मित्रांकडे केली होती. "माझी गत एखाद्या अमिबासारखी झाली आहे."
पालक म्हणून प्रिन्स फिलीप कठोर आणि असंवेदनशील होते असं वाटू शकतं.
चरित्रकार जोनाथन डिंबलबी यांच्या म्हणण्यानुसार आपल्या वडिलांनी चारचौघांत ओरडल्यामुळे तरुण फिलीपना अनेकदा रडू कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या दोघांचं नातं फारसं सहज नव्हतं.
धैर्यशीलता
आपला मुलगा चार्ल्स यानेही गॉर्डनस्टन इथल्या शाळेत जावं असा फिलीप यांचा आग्रह होता. चार्ल्स यांच्या बुजऱ्या स्वभावाला इथल्या कडक शिस्तीचा फायदा होईल, असा त्यांना भरवसा होता.
तरुण चार्ल्सना ही शाळा अजिबात आवडत नव्हती. त्यांना सतत घरची आठवण यायची आणि मोठ्या मुलांच्या टिंगलटवाळीला सामोरं जावं लागायचं.
आपल्या एकलकोंड्या आणि कठीण बालपणाचा प्रभाव फिलीप यांच्या स्वभावावर स्पष्टपणे दिसत असे.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांना कोवळ्या वयातच स्वावलंबी होणं भाग पडलं होतं आणि प्रत्येक जण त्यांच्यासारखा कणखर स्वभावाचा नसतो, हे त्यांना अनेकदा लक्षात येत नसे.
फिलीप यांना असलेल्या तरुणांच्या कल्याणासाठी कळकळीतूनच 1956 साली ड्युक ऑफ एडिनबरा पुरस्कार सुरू झाला.
जगभरातल्या 15 ते 25 वयोगटातल्या 60 लाख तरुणांना मैदानी खेळांत भाग घेऊन सांघिक कामगिरी, मदत करण्याची वृत्ती आणि निसर्गाप्रती आदरभाव हे गुण विकसित करण्यात यामुळे मदत झाली.
बीबीसीशी बोलताना फिलीप म्हणाले होते, "तरुणांना एखाद्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मदत केलीत तर ती विजिगीषू वृत्ती इतर क्षेत्राच सहज पसरते."
आयुष्यभर प्रिन्स फिलीप यांनी या योजनेला खूप वेळ दिला, अनेक कार्यक्रमांत सहभाग घेतला आणि त्याच्या दैनंदिन संचालनावरही लक्ष दिलं.
'नैतिक भान'
वन्यजीव आणि पर्यावरणाच्या संरक्षणाचे ते खंदे पुरस्कर्ते होते, पण 1961 साली भारत दौऱ्यावर असताना त्यांनी एका वाघाची शिकार केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
मारलेल्या वाघाबरोबरच्या त्यांच्या फोटोमुळे या संतापात भरच पडली.
पण वर्ल्ड वाईल्डलाईफ फंडसाठी, जो नंतर वर्ल्डवाईड फंड फॉर नेचर म्हणून ओळखला जाऊ लागला, त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.

फोटो स्रोत, PA
बीबीसीच्या एका मुलाखतकाराशी बोलताना ते म्हणाले होते "इतकी वैविध्यपूर्ण आणि परस्परावलंबी जीवसृष्टी पृथ्वीवर आहे ही कमालीची गोष्ट आहे.
"माणसांकडे जर जीवन-मृत्यूची किंवा नष्टप्राय होण्याची किंवा टिकून राहण्याची ताकद असेल तर आपण ती वापरताना नैतिक भान ठेवलं पाहिजे. एखादी गोष्ट विनाकारण नष्टप्राय का करावी?"
ग्राउस शूटिंगचा पुरस्कार करून त्यांनी काही संवर्धनवाद्यांना नाराज केलं.
"जर एखादी शिकार केली जाणारी प्रजाती असेल तर ती टिकवून ठेवली पाहिजे कारण पुढच्या वर्षी शिकारीला ती लागते ना? शेतकरीही तेच करतात. तुम्हाला छाटणी करायची असते, पूर्ण कत्तल नाही."
स्वष्टवक्ता
जगभरातल्या जंगलांचं संवर्धन आणि समुद्रात अतिरिक्त मासेमारीविरोधी भूमिकेबद्दल त्यांचं जगभर कौतुक झालं.
प्रिन्स फिलीप यांनी उद्योगक्षेत्रातही तितकाच रस घेतला. कारखान्यांना भेटीगाठी देत ते इंडस्ट्रिअल सोसायटीचे (आताचे वर्क फाउंडेशन) पेट्रनही (आश्रयदाते) झाले.
1961 साली कारखानदारांच्या एका गटाशी बोलताना ते आपल्या स्पष्टवक्त्या शैलीत म्हणाले होते, "आपण यातून अंग काढून घेतलं पाहिजे."

फोटो स्रोत, PA
या स्पष्टवक्तेपणाला काहींनी शिष्टाचार संमत नसल्याचंही म्हटलं. विशेषतः परदेशात असताना परिस्थितीचा नीट अंदाज न येण्याबद्दल त्यांची दुष्किर्ती झाली.
1968 साली राणी एलिझाबेथ यांच्यासह चीन दौऱ्यावर असताना त्यांनी त्यांच्या सगळ्यात वादग्रस्त विधानांपैकी एक विधान केलं होतं, "चपट्या डोळ्यांबद्दल".
टॅब्लॉइड्सनी हा विषय उचलून धरला, पण चीनमध्ये यावर फारशा प्रतिक्रीया उमटल्या नाहीत. 2002 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना तिथल्या मूलनिवासी वंशाच्या एका व्यावसायिकाला त्यांनी विचारलं, "तुम्ही अजूनही एकमेकांवर भाले चालवता का?" यावरूनही ते चर्चेत आले होते.
तणाव
अशाप्रकारच्या वक्तव्यांबद्दल त्यांच्यावर टीका होत असली तरी काही जणांनी फिलीप हे राजशिष्टाचारांनी दडपून न जाणाऱ्या स्वभावाचं द्योतक असल्याचं म्हटलं.
त्यांची अशाप्रकारची विधानं वातावरण हलकं-फुलकं ठेवण्याचा प्रयत्न होती असाही युक्तीवाद काही जणांनी केला आहे.
फिलीप यांना विविध खेळांमध्ये विशेष रस होता. ते नौकानयन करायचे, क्रिकेट आणि पोलो खेळायचे, ते उत्तम घोडेस्वारीही करत आणि आंतरराष्ट्रीय अश्वारुढ खेळांच्या संघटनेचे अध्यक्षही होते.

फोटो स्रोत, PA
जोनाथन डिंबलबी यांनी लिहिलेल्या प्रिन्स चार्लस यांच्या चरित्राच्या प्रकाशनानंतर त्यांचे त्यांच्या मोठ्या मुलाबरोबर असलेले तणावपूर्ण संबंध पुन्हा प्रकाशात आले.
ड्युक ऑफ एडिनबरा यांनी चार्ल्स यांना लेडी डायना स्पेन्सर यांच्याशी लग्न करण्यास भाग पाडलं असं बोललं जात असे. पण चार्ल्स आणि डायना यांच्या वैवाहिक आयुष्यात तणाव उत्पन्न झाल्यावर ते परिस्थिती काळजीपूर्वक हाताळत होते.
त्या दोघांमधल्या समस्या समजून घेण्यात त्यांनी पुढाकार घेतला. कदाचित राजघराण्यात लग्न करण्याच्या स्वतःच्या अनुभवातून त्यांनी हे पाऊल उचललं असावं.
तीर्थयात्रा
प्रिन्स फिलीप यांना आपल्या चारपैकी तीन मुलांचे म्हणजे, प्रिन्सेस अॅन, प्रिन्स अॅन्ड्र्यू आणि प्रिन्स चार्ल्स, यांचे विवाह असफल झाल्याचं अपार दुःख होतं.
पण त्यांनी वैयक्तिक गोष्टींबद्दल सार्वजनिक रुपात बोलायला नेहमीच नकार दिला, 1994 साली त्यांनी एका वृत्तपत्राला सांगितलं होतं की आपण हे यापूर्वी केलं नाही, आणि इथून पुढेही करणार नाही.
वय वाढलं तरी त्यांचा उत्साह कमी झाला नाही. वर्ल्डवाईड फंडसाठी आणि राणी एलिझाबेथ यांच्याबरोबर त्यांनी देश-विदेशात भरपूर प्रवास केला.
1994 साली आपल्या आईच्या स्मृतीस्थळाला भेट देण्यासाठी ते जेरुसलेमला गेले होते. आपली कबर जेरुसलेममध्ये असावी अशी त्यांच्या आईची इच्छा होती.

फोटो स्रोत, PA
1995 साली 'व्हीजे डे' च्या सुवर्णमहोत्सवानिमित्तच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते.
दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्करली तेव्हा ते टोक्यो उपसागरातल्या एका ब्रिटीश विनाशिकेवर होते.
सुवर्णमहोत्सवी समारंभात ते युद्धातल्या आपल्या इतर सहकाऱ्यांबरोबर राणी एलिझाबेथ यांना दिलेल्या सलामी संचलनात सहभागीही झाले होते.
कणव आणि सहानुभूती
जपानकडे असलेल्या ज्या युद्धकैद्यांना आपल्यावर अन्याय करणाऱ्यांना माफ करणं शक्य झालं नव्हतं त्यांच्याप्रती त्यांनी सहानुभूती व्यक्त केली होती.
प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना यांच्या मृत्यूनंतर लोकांना राजघराण्याप्रती राग होता, कदाचित याचाच परिणाम म्हणून फिलीप यांनी आपल्या सडेतोडपणाला मुरड घातली.
प्रिन्स फिलीप आपल्या सुनेशी नीट वागले नव्हते हा आरोप खोडून काढण्यासाठी 2007 साली फिलीप आणि डायना यांच्यातला पत्रव्यवहार प्रकाशित करण्यात आला.

फोटो स्रोत, Rex Features
डिअर पा लेटर्स नावाने प्रसिद्ध झालेल्या या पत्रांमधल्या त्यांच्या मृदू स्वरातून ते डायना यांच्यासाठी मोठा आधार होते हेच दिसून आलं.
डायना यांचे एकेकाळचे जोडीदार डोडी यांचे वडील मोहम्मद अल फायेद यांनी डायना यांच्या पंचनाम्याच्यावेळी असा आरोप केला होता की प्रिन्स फिलीप यांच्या आदेशांवरून डायना यांची हत्या झाली होती. पण कॉरोनरने हा आरोप फेटाळून लावला होता.
प्रिन्स फिलीप, ड्युक ऑफ एडिनबरा, हे अत्यंत कणखर आणि स्वतंत्र स्वभावाचे व्यक्ती होते जे सतत ब्रिटीश समाजाच्या केंद्रस्थानी होते.
'नो-नॉन्सेन्स अप्रोच'
जात्याच नेतृत्वगुण असणाऱ्या फिलीप यांना त्यांच्या पदामुळे दुय्यम स्थान पत्करावं लागलं, त्यांची मूळची लढाऊ वृत्ती त्यांच्या पदाच्या विसंगत होती.
बीबीसीला त्यांनी एकदा सांगितलं होतं, "मी कायम माझं सर्वोत्तम काम करण्याचा प्रयत्न केला. मी माझी काम करण्याची शैली पूर्णतः बदलू शकत नाही. मी माझ्या आवडीनिवडी किंवा माझी मतंही बदलू शकत नाही. ती माझी शैली आहे."
2011 साली पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी ड्युक ऑफ एडिनबरा यांच्या 90 व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या याच गुणांचं कौतुक केलं होतं.

फोटो स्रोत, PA
"त्यांनी कायमच आपल्या अनोख्या शैलीत गोष्टी केल्या आहेत. त्यांचा विनम्र, नो-नोन्सेन्स स्वभाव ब्रिटीश लोकांना भावतो."
आपल्या पदाचा वापर करत त्यांनी ब्रिटीश समाजात मोठं योगदान दिलं. ब्रिटीश राजघराण्याला कालपरत्वे बदलत जाणाऱ्या सामाजिक प्रवृत्तींशी जुळवून घेण्यातही त्यांनी मदत केली.
राणी एलिझाबेथ यांना त्यांच्या प्रदीर्घ राजवटीदरम्यान दिलेला अविचल पाठिंबा हेच फिलीप यांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व म्हणावं लागेल.
"राणीला राज्य करता यावं" याची खातरजमा करणं हे आपलं प्रमुख कर्तव्य होतं असं त्यांनी त्यांच्या चरित्रकाराला सांगितलं होतं.

फोटो स्रोत, PA
एलिझाबेथ आणि फिलीप यांच्या लग्नाची पन्नाशी साजरी करण्यासाठी झालेल्या समारंभात बोलताना महाराणी एलिझाबेथ यांनी आपल्या पतीची प्रशंसा केली होती. ब्रिटीश इतिहासात सर्वाधिक काळ राज्यकर्त्याचा जोडीदार म्हणून फिलीप यांची नोंद झाली आहे.
"कौतुक ऐकण्याची त्यांना सवय नाही पण गेली इतकी वर्ष ते माझी ताकद बनून राहिले आहेत. मी आणि त्यांचा सगळा परिवार आणि इंग्लंडसह इतर अनेक देश त्यांचे कायम ऋणी असतील. हे ऋण ते स्वतः बोलून दाखवणार नाहीत आणि त्याचा आवाका आपल्या लक्षातही येणार नाही."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त








