महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जीवनप्रवास पाहा फोटोमधून

फोटो स्रोत, Yousuf Karsh / Camera Press
महाराणी एलिझाबेथ द्वितीय, सर्वाधिक काळ राजेपदी राहिलेल्या युकेच्या महाराणी यांचं वयाच्या 96 व्या वर्षी बालमोरल कॅसलमध्ये निधन झालं. त्यांनी 70 वर्षं राज्य केलं.
महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांची कारकीर्द कर्तव्याप्रति निष्ठा आणि महाराणीपदासाठी तसंच प्रजेच्या हितासाठी त्यांनी आयुष्यभर दिलेलं योगदान यासाठी स्मरणात राहील.
बदलत्या जागतिक समीकरणांमध्ये ब्रिटिशांचा जगावरील प्रभाव ओसरला. सामाजिक संरचनेत बदल झाले. राजघराण्यांचं समाजातील नक्की स्थान काय? हाही मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी असताना महाराणी एलिझाबेथ हा अनेकांसाठी स्थिर बिंदू होत्या.
अस्थिर वातावरणात राजघराण्याची सत्ता टिकवून ठेवणं हे महाराणीचं यश आहे. विशेषत: महाराणीच्या जन्मावेळी भविष्यात त्या महाराणीपदी असतील याची पुसटही शक्यता नव्हती.
एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी विंडसर यांचा जन्म 21 एप्रिल 1926 रोजी झाला. लंडनमधील बर्कले स्ट्रीट इथं त्यांचा जन्म झाला. अल्बर्ट, ड्यूक ऑफ यॉर्क हे त्यांचे वडील. अल्बर्ट हे पंचम जॉर्ज यांचे द्वितीय पुत्र. डचेस, फॉर्मर लेडी एलिझाबेथ बोव्स-लियॉन या एलिझाबेथ यांच्या आई.

फोटो स्रोत, Getty Images
एलिझाबेथ आणि मार्गारेट रोझ या दोघींचं शिक्षण घरच्या घरीच झालं. मार्गारेट यांचा जन्म 1930 मध्ये झाला. अत्यंत खेळकर वातावरणात या दोघींचं बालपण गेलं. एलिझाबेथ यांचे वडील आणि आजोबांशी खास ऋणानुबंध होते.
खूप सारे घोडे आणि कुत्र्यांची फौज असलेली ग्रामीण महिला मला व्हायचं आहे, असं एलिझाबेथ यांनी आपल्या घोडेस्वारी प्रशिक्षकांना सहाव्या वर्षी सांगितलं होतं.
लहानपणापासूनच एलिझाबेथ यांच्या व्यक्तिमत्वात जबाबदारीची प्रचंड जाणीव दिसून येत होती. अधिकारवाणीने बोलण्याची आणि वावरण्याची हातोटी त्यांच्याकडे लहानपणापासूनच होती, असं इंग्लंडचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी सांगितलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
शाळेत जाऊन शिक्षण घेतलेलं नसतानाही एलिझाबेथ यांनी अनेक भाषांमध्ये प्राविण्य मिळवलं होतं. ब्रिटिश राज्यघटनेचा इतिहास हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता. आपल्या वयाच्या मुलींना भेटता-बोलता यावं यादृष्टीने एलिझाबेथ यांच्यासाठी बकिंगहॅम पॅलेसमध्ये स्पेशल गर्ल्स गाइड्स सुरू करण्यात आलं होतं.
वाढता तणाव
1936 मध्ये जॉर्ज पंचम यांचं निधन झाल्यानंतर एलिझाबेथ यांचे काका डेव्हिड हे राजेपदी आले आणि नंतर ते राजे एडवर्ड आठवे म्हणून ओळखले जाऊ लागले.
मात्र पत्नीच्या पार्श्वभूमीमुळे त्यांनी राजेपदाचा त्याग केला. वॉलीस सिम्पसन या त्यांच्या पत्नी होत्या. दोनदा घटस्फोटित असलेल्या वॉलीस सिम्पसन यांना राजकीय आणि धार्मिक कारणांमुळे राजघराण्याकडून मान्यता मिळू शकली नाही.
डेव्हिड यांनी राजेपदाचा त्याग केल्यामुळे एलिझाबेथ यांचे वडील ड्यूक ऑफ यॉर्क काहीशा अनिच्छेनेच राजेपदी विराजमान झाले. तेव्हा ते किंग जॉर्ज सहावे म्हणून ओळखले गेले. वडिलांच्या राज्यभिषेकामुळे एलिझाबेथ यांना राज्यपदाची धुरा सांभाळणं म्हणजे काय असतं याची कल्पना आली.

युरोपातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजघराण्यावरील नागरिकांचा विश्वास परत मिळवण्याच्या दृष्टीने राजे जॉर्ज सहावे आणि त्यांची पत्नी राणी एलिझाबेथ यांनी मोलाचं योगदान दिलं. त्याचंच अनुकरण पुढे महाराणी एलिझाबेथ यांनी केलं.
1939 मध्ये डार्टमाऊथ येथील 'रॉयल नेव्हल कॉलेज'मधल्या एका कार्यक्रमाला महाराणी एलिझाबेथ यांनी त्यांचे वडिल राजे जॉर्ज सहावे आणि आईबरोबर हजेरी लावली.
लहान बहिण मार्गारेट यांच्याबरोबर यावेळी महाराणी एलिझाबेथ यांना 'रॉयल नेव्हल कॉलेज'च्या एका विद्यार्थ्याने समारंभात आदरपूर्वक आणलं. तो विद्यार्थी होता 'प्रिन्स फिलीप ऑफ ग्रीस.'
महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) आणि प्रिन्स फिलीप ऑफ ग्रीस तेव्हा काही पहिल्यांदाच भेटत नव्हते. मात्र यावेळी एलिझाबेथ यांना त्यांच्याबद्दल आकर्षण वाटलं.
अडथळा
नौदलात कार्यरत असताना सुट्टी घेऊन 'प्रिन्स फिलीप ऑफ ग्रीस' यांनी राजघराण्यातील नातेवाईकांची भेट घेतली. त्यावेळी 1944 च्या सुमारास एलिझाबेथ 18 वर्षांच्या होत्या. एलिझाबेथ प्रिन्स फिलीप यांच्या प्रेमात असल्याचं उघड झालं. एलिझाबेथ यांच्या प्रासादात प्रिन्स फिलीप यांचा फोटो ठेवला होता. त्यावेळी ते एकमेकांना पत्रही पाठवत असत.

फोटो स्रोत, PA
युद्ध संपता संपता तरुण प्रिंसेस एलिझाबेथ यांनी 'ऑक्झिलरी टेरिटोरिअल सर्व्हिस'मध्ये प्रवेश घेतला. यावेळी त्यांनी वाहन चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं. त्यावेळी त्या लॉरीही चालवायला शिकल्या.
युद्ध संपल्याचा आनंद साजरा करण्यासाठी हजारो नागरिक 'द मॉल' याठिकाणी एकत्र जमलेले असताना एलिझाबेथ शाही राजघराण्याच्या सदस्यांसमवेत तिथं आल्या होत्या.
"त्यावेळी आम्ही एकमेकांना भेटू शकतो असं आम्ही घरच्यांना विचारलं," अशी आठवण महाराणी एलिझाबेथ यांनी सांगितली होती.
"आम्हाला कोणीतरी ओळखेल याचीसुद्धा प्रचंड भीती आम्हाला वाटत होती. अनोळखी लोकांच्या रांगा हातात हात घालून व्हाईटहॉलच्या रस्त्याने चालत होत्या ते मला अजूनही आठवतं. आम्ही सगळे एका आनंदाच्या आणि सुटकेच्याही लाटेत वाहून गेलो होतो."
युद्धानंतर एलिझाबेथ यांनी प्रिन्स फिलीप यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्यांच्यासमोर अनेक आव्हानं उभी राहिली.
आपल्या काळजाचा तुकडा असलेल्या एलिझाबेथला दुसऱ्या घरी देण्याचा विचार राजाच्या पचनी पडला नव्हता. दुसरीकडे परक्या देशातून असल्यामुळे फिलीप यांना अनेक पूर्वग्रहदूषित व्यक्तींना सामोरं जावं लागलं.
वडिलांचा मृत्यू
मात्र त्या दोघांचा लग्नाचा निर्धार पक्का होता. 20 नोव्हेंबर 1947 रोजी वेस्टमिन्स्टर ॲबी इथं दोघांचं थाटामाटात लग्न झालं.
लग्नावेळी फिलीप यांना 'द ड्यूक ऑफ एडिनबरा' ही उपाधी मिळाली. एलिझाबेथ (द्वितीय) यांच्याशी लग्न झाल्यानंतरही फिलीप नौदलात कार्यरत होते. त्यावेळी थोड्या कालावधीसाठी त्यांची नियुक्ती माल्टामध्ये झाली. परिणामी तिथं नवदांपत्याला एकांत मिळाला.

फोटो स्रोत, PA
फिलीप आणि एलिझाबेथ यांना पहिलं अपत्य 1948 मध्ये झालं. त्याचं नाव चार्ल्स. 1950 मध्ये चार्ल्सला बहीण मिळाली. तिचं नाव ॲन.
त्याच दरम्यान युद्धकाळातील अतितणाव आणि सततच्या धुम्रपानामुळे राजे जॉर्ज सहावे यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाला.
जानेवारी 1952 मध्ये पंचवीस वर्षीय एलिझाबेथ आणि त्यांचे पती फिलीप परदेश दौऱ्यासाठी रवाना होणार होते. एलिझाबेथ यांच्या वडिलांना डॉक्टरांनी घराबाहेर पडण्यास मनाई केली होती. मात्र हा सल्ला न जुमानता ते मुलगी आणि जावयांना सोडायला विमानतळावर पोहोचले. वडिलांची ही शेवटची भेट असेल याची कल्पनाही एलिझाबेथ यांनी त्यावेळी केली नसावी.
केनियात असताना एलिझाबेथ यांना राजे जॉर्ज सहावे यांच्या निधनाची बातमी कळली. त्या तात्काळ लंडनला नवीन महाराणी या नात्याने परतल्या. या भावुक प्रसंगाला त्यांनी नंतर उजाळा दिला. त्या म्हणाल्या होत्या, "राजघराण्याची धुरा सांभाळण्याचा माझ्याकडे कोणताही अनुभव नव्हता. वडिलांचं आकस्मिक निधन झालं. अचानकच माझ्यावर सगळी जबाबदारी आली. तिचा स्वीकार करून त्या कामाला शंभर टक्के न्याय देणं हे माझं काम होतं."
इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचा विरोध असतानाही महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांचा राज्याभिषेक सोहळा टेलिव्हिजनवर थेट प्रसारित करण्यात आला. लक्षावधी नागरिकांनी टीव्हीवर महाराणीला राजघराण्याची सूत्रं हाती घेताना पाहिलं. महाराणी एलिझाबेथ यांनी औपचारिक शपथ घेताच एका नव्या पर्वाला आरंभ झाला.
राज्याभिषेकावेळी इंग्लंड महायुद्धाच्या झळा सोसत होता, मात्र महाराणीचा अर्थात एलिझाबेथ (द्वितीय) यांचा राज्याभिषेक नव्या युगाची नांदी असल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलं.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
दुसऱ्या महायुद्धासह जगात अनेक ठिकाणी ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य लयाला गेला. 1953 मध्ये महाराणीने कॉमनवेल्थ देशांचा प्रदीर्घ दौरा सुरू करेपर्यंत भारतासह अनेक ब्रिटिश वसाहतींना स्वातंत्र्य मिळालं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या इंग्लंडच्या पूर्वीच्या वसाहत राष्ट्रांना महाराणी एलिझाबेथ यांनी भेट दिली. राजघराण्याचं प्रमुखपद भूषवणाऱ्या व्यक्तीने या देशांना भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील बहुतांश नागरिकांनी महाराणी एलिझाबेथ यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
1950च्या दशकात अनेक देशांवरचा युनियन जॅक खाली उतरला आणि इंग्लंडचं राज्य संपुष्टात आलं. अनेक स्वतंत्र राष्ट्र कॉमनवेल्थ कुटुंबाचा भाग झाली. युरोपात नव्याने तयार झालेल्या आर्थिक समुदायाला, कॉमनवेल्थ पसाऱ्यातील नवीन देश आव्हान ठरू शकतील अशी भीती तत्कालीन राजकारण्यांनी व्यक्त केली होती. काहीप्रमाणात इंग्लंडचं धोरण युरोप खंडाच्या ध्येयधोरणापासून वेगळं ठरलं.
वैयक्तिक हल्ले
1956 सुएझ कालवा प्रकरणाने ब्रिटिश साम्राज्याचा अंमल कमी झाल्याचं स्पष्ट झालं. अवघड परिस्थितीतून मार्ग काढताना कॉमनवेल्थ सदस्य राष्ट्र एकजुटीने एकत्र येत नाहीत हे उघड झालं. सुएझ कालव्याचं राष्ट्रीयीकरण करण्याचा इजिप्तचा एल्गार मोडून काढण्यासाठी इंग्लंडच्या फौजा धाडण्यात आल्या. मात्र या फौजांना नामुष्कीने माघार घ्यावी लागली. याची परिणती पंतप्रधान अँथनी एडन यांच्या राजीनाम्यात झाली.
या घटनेने महाराणी एलिझाबेथ यांना राजकीय संकटाचा सामना करावा लागला.
द कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाकडे एडन यांच्याऐवजी नवा नेता नियुक्त करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. चर्चेच्या असंख्य फेऱ्यांनंतर महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी हॅरॉल्ड मॅकमिलन यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केलं. यादरम्यान महाराणी एलिझाबेथ यांच्यावर लॉर्ड अल्टरिनचाम यांनी मासिकातील लेखातून वैयक्तिक आरोप केले.
राणी एलिझाबेथ यांचा राज्यकारभार चालवणाऱ्या अधिकाऱ्यांची मानसिकता खूपच अतिब्रिटिश आणि उच्चवर्णीय आहे असं अल्टरिनचाम यांनी लिहिलं. लिहून दिल्याशिवाय महाराणी एलिझाबेथ साधं भाषणही करू शकत नाहीत असंही त्यांनी लिहिलं. त्यांच्या लिखाणाने खळबळ उडाली. लीग ऑफ एम्पायर लॉयलिस्ट सदस्याने अल्टरिनचाम यांच्यावर हल्ला केला.
याप्रसंगाने ब्रिटिश समाजाचा राजघराण्याप्रतीचा दृष्टिकोन वेगाने बदलत असल्याचं समोर आलं. जुन्या पंरपरांवर प्रश्न उपस्थित केले जात होते.
राजेशाही ते राजघराणं
राजदरबारातल्या अनेक जुन्या संकल्पना पती फिलीप यांच्या मदतीने महाराणी एलिझाबेथ यांनी बदलल्या किंवा बंद केल्या. राजदरबारात होणारे उपवर मुलींच्या परिचयांचे कार्यक्रम बंद करण्यात आले. तसंच राजेशाही शब्द मोडीत काढून त्याऐवजी राजघराणं ही संज्ञा अंगीकारण्यात आली.
1963 मध्ये हॅरॉल्ड मॅकमिलन यांनी पंतप्रधानपद सोडल्यानंतर महाराणी एलिझाबेथ पुन्हा एकदा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी सापडल्या. कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाकडे पर्यायी नेता निवडण्याची व्यवस्था नसल्याने महाराणी एलिझाबेथ यांनी हॅरॉल्ड यांचा सल्ला मानत अर्ल ऑफ होम यांची नियुक्ती केली.

फोटो स्रोत, Terry Disney / Getty Images
महाराणी एलिझाबेथ यांच्यासाठी तो कठीण कालखंड होता. मात्र त्यादरम्यानही महाराणी एलिझाबेथ यांनी संविधानाच्या कलमांचं काटेकोरपणे पालन केलं. शाही राजघराण्याला शासनाच्या दैनंदिन कामकाजापासून वेगळं केलं. महाराणीने माहिती करून घेण्याच्या, सल्ला आणि इशारा देण्याच्या त्यांच्या भूमिकेच्या पलीकडे न जाण्याचा निर्णय घेतला.
अशा परिस्थितीच्या कोंडीत सापडण्याची महाराणी एलिझाबेथ यांची ही शेवटची वेळ होती. कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाने कात टाकली आणि नवीन नेता नियुक्ती करण्याची शास्त्रोक्त प्रक्रिया राबवण्यात आली.
निवांत
1960 च्या दशकात बकिंगहॅम पॅलेसने राजघराण्याला अनौपचारिक पद्धतीने जनतेसमोर मांडण्याचा दृष्टिकोन अमलात आणला. याचाच भाग म्हणून रॉयल फॅमिली या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली. शाही राजघराण्याचं निवासस्थान अर्थात विंडसर याठिकाणी चित्रीकरण करण्याची अनुमती बीबीसीला मिळाली.
या डॉक्युमेंट्रीत राजघराण्यातील व्यक्ती वनभोजनाचा आनंद लुटताना दिसतात. ख्रिसमस ट्रीची सजावट करताना दिसतात. आपल्या लहानग्यांना ड्राइव्ह अर्थात दूरवरच्या प्रवासासाठी घेऊन जाताना दिसतात. शाही राजघराण्यातील व्यक्ती सर्वसामान्य माणसांप्रमाणेच जगताना नागरिकांना प्रथमच दिसले. मात्र टीकाकारांनी रिचर्ड कॉस्टन यांनी दिग्दर्शित केलेल्या या डॉक्युमेंट्रीवरही टीका केली.

या माहितीपटामुळे राजघराण्याविषयी असणारं सुप्त आकर्षण / गूढरम्यता नष्ट झाली अशी टीका करण्यात आली. ड्यूक ऑफ एडिनबरा बालमोरल याठिकाणी वनभोजनादरम्यान बार्बेक्यूमध्ये सॉस आणि अन्य गोष्टी समाविष्ट करताना दिसतात. मात्र या माहितीपटाने त्यावेळचं निवांत सामाजिक वातावरण प्रतीत झालं.
राजघराण्याप्रती नागरिकांचा विश्वास पुनर्गठित होण्यास मदत झाली. 1977 मध्ये महाराणी एलिझाबेथ यांच्या शाही राजघराण्याच्या प्रमुखपदी असण्याचा रौप्य महोत्सव सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. रस्त्यावर मिरवणुका आणि देखावे आयोजित करण्यात आले होते. इंग्लंडमध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
दोन वर्षांनंतर मार्गारेट थॅचर यांच्यारुपात इंग्लंडला पहिल्यांदाच महिला पंतप्रधान लाभल्या. राजघराण्याच्या प्रमुखपदी असलेल्या महाराणी एलिझाबेथ आणि सरकारच्या प्रमुखपदी असलेल्या थॅचर या दोन स्त्रियांमधील कामकाजाचे संबंध दुरावलेले होते.
घोटाळे आणि वाद
महाराणी एलिझाबेथ यांचं कॉमनवेल्थ कुटुंबाकडे जातीने लक्ष होतं. कॉमनवेल्थची धुरा त्या समर्थपणे सांभाळत होत्या. एलिझाबेथ यांना आफ्रिका खंडातील नेत्यांची सखोल माहिती होती. त्यांच्या प्रश्नांची त्यांना जाण होती.
थॅचर यांचा दृष्टिकोन आणि वादविवादाची शैली महाराणी एलिझाबेथ यांना चक्रावून टाकत असे. वर्णभेदाला खतपाणी घालणाऱ्या दक्षिण आफ्रिकेवर कठोर निर्बंध घालण्याच्या मुद्द्यावरून मतभेद समोर आले होते.
वर्षं सरत गेली. महाराणी एलिझाबेथ प्रजेप्रतीची कर्तव्यं निभावत राहिल्या. 1991च्या आखाती युद्धानंतर महाराणी एलिझाबेथ यांनी अमेरिकेला भेट दिली. अमेरिकन काँग्रेस अर्थात संसदेच्या संयुक्त सभागृहासमोर भाषण करणाऱ्या राजघराण्याच्या त्या पहिल्याच व्यक्ती ठरल्या. स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या ही त्यांची ओळख सदैव स्मरणात असेल असं अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष एच.डब्ल्यू. बुश यांनी सांगितलं. मात्र वर्षभरात काही घटनांमुळे राजघराण्याला अडचणींचा सामना करावा लागला.

फोटो स्रोत, PA
महाराणी यांचा दुसरा मुलगा, ड्यूक ऑफ यॉर्क आणि त्यांच्या पत्नीचा घटस्फोट झाला. प्रिन्सेस ॲन आणि मार्क फिलीप्स यांचं लग्नही टिकलं नाही. प्रिन्स आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स यांच्यात बेबनाव आहे हे उघड झालं. थोड्यात दिवसात हे दोघेही विभक्त झाले.
महाराणी एलिझाबेथ यांचं आवडतं निवासस्थान असलेल्या विंडसर कॅसल येथे भीषण आग लागली. कौटुंबिक पातळीवर पेटलेला संघर्ष एका परीने प्रत्यक्षात लागलेल्या आगीचं रुपक होतं. या आगीमुळे वास्तूचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी डागडुजी आणि नूतनीकरणाचा खर्च महाराणीने उचलावा का करदात्यांनी यावरून वाद उफाळला.
... आणि आब राखला
1992 मध्ये लंडन शहरात केलेल्या एका भाषणात हे वर्ष भयंकर असल्याचं महाराणींनी म्हटलं. कठोर भाषेत टीका करणाऱ्या प्रसारमाध्यमांना काटशह देण्यासाठी राजघराण्याबाबत अधिक खुला दृष्टिकोन अंगीकारत असल्याचं महाराणी एलिझाबेथ यांनी स्पष्ट केलं.
"कोणतीही संस्था, शहर, राजघराणं किंवा कोणीही त्यांची चौकशी होणार नाही अशा भ्रमात राहू नये. आपण एकाच समाजाचा भाग आहोत, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं वर्गीकरण किंवा चौकशी सौम्यपणे, विनोदी अंगाने आणि समजूतीने झाली तर ती परिणामकारक ठरू शकते," असं त्या म्हणाल्या होत्या.
राजघराण्याने अतिबचावात्मक पवित्रा स्वीकारला. विंडसर आगीचा खर्च भरून काढण्यासाठी बकिंगहम पॅलेस जनतेला पाहण्यासाठी खुला करण्यात आला. महाराणी एलिझाबेथ आणि प्रिन्स ऑफ वेल्स गुंतवणूक उत्पन्नावर कर भरतील, असंही जाहीर करण्यात आलं.

फोटो स्रोत, AFP
महाराणी एलिझाबेथ यांच्या कार्यकाळात कॉमनवेल्थ देशांना खूप अपेक्षा होत्या. मात्र या अपेक्षांची पूर्तता झाली नाही. युरोपातल्या नव्या संरचनेसाठी इंग्लंडने जुन्या सहकारी देशांवर पुन्हा विश्वास ठेवला.
महाराणी एलिझाबेथ यांना अजूनही कॉमनवेल्थ व्यवस्थेत विश्वास वाटत होता. दक्षिण आफ्रिकेने वर्णद्वेषी व्यवस्था उलथावून टाकली तेव्हा महाराणींना भरून आलं. मार्च 1995 मध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेला भेट देत त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं.
मायदेशी महाराणींनी जनसामान्यांमध्ये राजघराण्याची प्रतिष्ठा कायम राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. राजघराण्याला सत्ता केंद्र म्हणून भवितव्य आहे का? यावर इंग्लंडमध्ये वादविवाद घडत होते.
इंग्लंडला नवं राजघराणं मिळणं कठीण होतं. त्यामुळे महाराणींनी आश्वासक नेतृत्त्व म्हणून वावर कायम राखला. त्यांच्या निखळ स्मितहास्याने गंभीर वातावरणही हलकं होत असे. आपण स्वीकारलेली नेतृत्त्वाच्या भूमिकेकडे देशाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं याची जाणीव त्यांना कायम असे.
डायना यांचा मृत्यू
मात्र काही दिवसातच राजघराण्याच्या प्रतिमेला धक्का लागेल अशी घटना घडली. सून डायना अर्थात 'प्रिन्सेस ऑफ वेल्स' यांचा 1997 मध्ये पॅरिसमध्ये अपघाती मृत्यू झाल्यानंतर महाराणी एलिझाबेथ यांना टीकेला सामोरं जावं लागलं.

फोटो स्रोत, PA
लंडनमधल्या राजवाड्यांबाहेर श्रद्धांजली वाहण्यासाठी लोकांनी पुष्पगुच्छ घेऊन गर्दी केली, पण त्यापूर्वीच्या महत्त्वाच्या राष्ट्रीय घटनांकडे ज्याप्रमाणे महाराणींनी जातीनं लक्ष घातलं होतं तसं यावेळी घातलेलं दिसलं नाही.
पण त्यांच्या टीकाकारांपैकी अनेकांनी ही गोष्ट लक्षात घेतली नाही की त्यांच्या पिढीने सार्वजनिक शोकाचं इतकं तीव्र प्रदर्शन पाहिलं होतं की त्यापासून त्यांनी स्वतःला दूर ढकललं होतं. तसंच शोकप्रदर्शन प्रिंसेस डायनांच्या मृत्यूनंतरही पाहायला मिळालं.
मायाळू आजी या नात्याने डायना यांच्या मुलांची काळजी घेणं हे कुटुंबाच्या दृष्टीने महत्त्वाचं असल्याचं महाराणी एलिथाबेथ यांना वाटलं.
त्यांनी टीव्हीवरील थेट प्रक्षेपण होणाऱ्या कार्यक्रमाद्वारे आपली सून अर्थात प्रिन्सेस ऑफ वेल्स अर्थात डायना यांना आदरांजली वाहिली. बदलत्या परिस्थितीशी राजघराणं जुळवून घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काही गमावलं, काही कमावलं
2002 मध्ये महाराणी एलिझाबेथ यांच्या राजेपदाचा सुवर्णमहोत्सव होता. मात्र आई आणि लहान बहीण अर्थात प्रिन्सेस मार्गारेट यांच्या मृत्यूमुळे हा जल्लोष झाकोळला गेला. मात्र तरीही आणि राजघराण्याचं सत्ताकेंद्र म्हणून भवितव्याविषयी साशंकता असतानाही लाखभर माणसं बकिंगहॅम पॅलेसच्या प्रवेशद्वारापाशी जमली होती.

फोटो स्रोत, PA
2006 मध्ये महाराणी एलिझाबेथ यांच्या 80 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने हजारो लोकांनी विंडसर गाठलं. त्यावेळी महाराणींनी त्या साऱ्यांना अभिवादन केलं. पुढच्या वर्षी महाराणी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलीप यांच्या लग्नाला 60 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला 2000 माणसं उपस्थित होती.
एप्रिल 2011 मध्ये महाराणी एलिझाबेथ या नातू विल्यम अर्थात ड्यूक ऑफ केंब्रिज यांच्या लग्नाला उपस्थित होत्या. ड्यूक ऑफ केंब्रिज यांनी कॅथरिन मिडलटन यांच्याशी लग्न केलं. त्याच वर्षी महाराणी एलिझाबेथ यांनी आयर्लंड प्रजासत्ताकला भेट दिली. आयर्लंडला भेट देणाऱ्या त्या इंग्लंडच्या पहिल्याच महाराणी आहेत. ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता ही महत्त्वाची भेट होती.
आयर्लंडमध्ये केलेल्या भाषणात त्या म्हणाल्या होत्या, "सर्वांनी संयम आणि सलोखा बाळगणं आवश्यक आहे. काही गोष्टी आपण वेगळ्या पद्धतीने करायला हव्या होत्या किंवा करणं योग्य नव्हतं."
सार्वमत
वर्षभरानंतर हीरक महोत्सवाच्या सोहळ्याचा भाग म्हणून महाराणी एलिझाबेथ यांनी नॉर्दन आयर्लंडला भेट दिली. त्यांनी IRA कमांडर मार्टिन मॅकगिनेस यांच्याशी हस्तांदोलन केलं. महाराणी एलिझाबेथ यांच्यासाठी हा भावनिकदृष्ट्या हळवा क्षण होता.
कारण महाराणींचा लाडका भाऊ लॉर्ड लुईस माऊंटबॅटन यांचा मृत्यू IRA (आयरिश रिपब्लिक आर्मी)च्या बॉम्बने झाला होता.

फोटो स्रोत, PA
हीरक महोत्सवाच्या निमित्ताने इंग्लंडच्या जनतेने आठवडाभर लंडन शहरात आनंद जल्लोषात साजरा केला.
सप्टेंबर 2014 मध्ये स्कॉटलंडच्या स्वातंत्र्यासंदर्भात सार्वमत घेण्यात आलं. महाराणी एलिझाबेथ यांच्यासाठी तो कसोटीचा क्षण होता. मात्र इंग्लंडप्रती असलेल्या निष्ठेसंदर्भात महाराणींनी 1977 मध्ये इंग्लंच्या संसदेत केलेलं भाषण बहुतांश जण विसरले.
"इंग्लंड आणि स्कॉटलंडचे तमाम राज्यकर्ते, राजे, राण्या आणि प्रिन्स ऑफ वेल्स यात माझेही पूर्वज आहेत. मला त्यांचं स्मरण आहे आणि म्हणूनच मला त्यांच्या महत्त्वाकांक्षा समजू शकतात. पण मी युनायटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दन आयर्लंडची महाराणी म्हणून पदभार स्वीकारला आहे हे मी विसरू शकत नाही."
स्कॉटलंडच्या सार्वमताच्या पूर्वसंध्येला जनतेला उद्देशून महाराणी एलिझाबेथ यांनी संदेश दिला. हा संदेश काळजीपूर्वक ऐकला जाणं स्वाभाविक होतं. सार्वमत चाचणीत मतदान करण्यापूर्वी नागरिक काळजीपूर्वक विचार करतील असा विश्वास असल्याचं महाराणींनी आपल्या संदेशात म्हटलं.
सार्वमताचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराणी एलिझाबेथ यांनी जनहितार्थ संदेश जाहीर केला. संघराज्य अखंड राहिल्याने त्यांना दिलासा मिळाल्याचं त्या भाषणात स्पष्ट झालं. मात्र राजकीय चित्र बदलल्याचं त्यांनी मान्य केलं.
भाषणात त्या म्हणाल्या, "आपण पुढे जात असताना भलेही वेगवेगळ्या स्वरुपाचे मतप्रवाह नांदत असतील. पण स्कॉटलंडविषयीचं प्रेम हा आपल्या सगळ्यांमधला समान दुवा आहे."
9 सप्टेंबर 2015 रोजी महाराणी एलिझाबेथ इंग्लंडच्या इतिहासातल्या सर्वाधिक काळ राज्यपदार राहिलेल्या व्यक्ती झाल्या. सर्वाधिक काळ महाराणी म्हणून राज्य करण्याचा मान त्यांच्याअगोदर त्यांची खापर पणजी राणी व्हिक्टोरिया यांच्या नावावर होता. मात्र या विक्रमाला फार महत्त्व देण्यास महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी नकार दिला. या पदाची मला महत्त्वाकांक्षा नव्हती.
अवघ्या वर्षभरात म्हणजेच एप्रिल 2016 मध्ये महाराणी एलिझाबेथ यांनी 90वा वाढदिवस साजरा केला.
2017 मध्ये ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतल्यानंतरही महाराणी एलिझाबेथ सार्वजनिक जीवनात सक्रिय होत्या.

फोटो स्रोत, Richard Stone
या काळात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांना अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. त्यांचा पतीचा कार अपघात झाला. ड्युक ऑफ यॉर्क यांची गुन्हेगार ठरवलेल्या अमेरिकन व्यापाऱ्यांबरोबरची मैत्री आणि प्रिंस हॅरी यांचे राजघराण्याशी दुरावलेले संबंध ही त्यातली काही ठळक उदाहरणं आहेत.
तरीही महाराणी एलिझाबेथ यांची सत्ता अबाधित राहील याची काळजी करण्यात आली होती. त्यात एप्रिल 2021 मध्ये कोव्हिडची साथ सुरू असताना प्रिंस फिलीप यांचा मृत्यू झाला. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये त्यांच्या राजवटीला 75 वर्षं पूर्ण झाली.
महाराणीच्या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात राजेशाही तितकी अस्तित्वात नव्हती. तरीही ब्रिटिश लोकांच्या मनात त्यांनी प्रेमाचं आणि आदराचं स्थान निर्माण केलं होतं.
त्यांनी वयाची 75 वर्षं पूर्ण केली तेव्हा दक्षिण अफ्रिकेत 30 वर्षांपूर्वी घेतलेल्या शपथेची त्यांना आठवण झाली.
"मी जेव्हा 21 वर्षाची होते तेव्हा मी लोकसेवेला आयुष्य समर्पित करण्याची प्रतिज्ञा केली होती. ही प्रतिज्ञा प्रत्यक्षात यावी यासाठी मी देवाला साकडं घातलं होतं. ही प्रतिज्ञा केली तेव्हा मी ऐन तारुण्यात होते. माझी निर्णय क्षमता बहरली होती. तरी मला एका शब्दाचाही पश्चाताप होत नाही."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









