प्रिन्स फिलीप आणि राणी एलिझाबेथ : शाही जोडप्याची प्रेमकहाणी

23 नोव्हेंबर 1947 : प्रिन्सेस एलिझाबेथ आणि त्यांचे पती प्रिन्स फिलीप हनीमूनदरम्यान, ब्रॉडलँड्स, रॉम्से, हॅम्पशायर येथे.

फोटो स्रोत, Cantral Press / Getty Images

फोटो कॅप्शन, 23 नोव्हेंबर 1947 : प्रिन्सेस एलिझाबेथ आणि त्यांचे पती प्रिन्स फिलीप हनीमूनदरम्यान, ब्रॉडलँड्स, रॉम्से, हॅम्पशायर येथे.
    • Author, सारा कॅम्पबेल
    • Role, रॉयल करस्पाँडंट

प्रिन्स फिलीप यांनी राणींचे सार्वजनिक कार्यक्रमांतले साथीदार आणि राणींना खासगीमध्ये अगदी जवळून ओळखणारी व्यक्ती म्हणून तब्बल सात दशकांपेक्षा जास्त काळ महाराणी एलिझाबेथ यांना साथ दिली.

एका खासगी सचिवाने एकदा म्हटलं होतं, "प्रिन्स फिलीप हे जगातले एकमेव व्यक्ती आहेत जे राणींना इतरांसारखीच एक व्यक्ती म्हणून वागवतात. ते एकमेव आहेत, जे असं करू शकतात."

त्यांचा प्रेम विवाह होता. त्यांनी एकमेकांची निवड केली होती.

डार्टमथच्या नेव्हल कॉलेजला 1939 शाही कुटुंबाने दिलेल्या भेटीदरम्यानच्या एका फोटोत ते दोघेही दिसतात. पण एकमेकांसमोर येण्याची ही काही त्यांची पहिलीच पाळी नव्हती.

18 वर्षांच्या या तडफदार नेव्हल कॅडेटने 13 वर्षांच्या प्रिन्सेस एलिझाबेथ यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

प्रिन्सेस एलिझाबेथ (डावीकडून तिसऱ्या) आणि तेव्हा नौदलात कॅडेट असणारे ग्रीस आणि डेन्मार्कटे प्रिन्स फिलीप (अगदी उजवीकडे पांढरी टोपी घातलेले) यांचा एकत्र काढण्यात आलेला हा पहिला फोटो असल्याचं मानलं जातं. 23 जुलै 1939 रोजीच्या डार्टमथच्या रॉयल नेव्ही कॉलेजच्या भेटी दरम्यानचा हा फोटो आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रिन्सेस एलिझाबेथ (डावीकडून तिसऱ्या) आणि तेव्हा नौदलात कॅडेट असणारे ग्रीस आणि डेन्मार्कटे प्रिन्स फिलीप (अगदी उजवीकडे पांढरी टोपी घातलेले) यांचा एकत्र काढण्यात आलेला हा पहिला फोटो असल्याचं मानलं जातं. 23 जुलै 1939 रोजीच्या डार्टमथच्या रॉयल नेव्ही कॉलेजच्या भेटी दरम्यानचा हा फोटो आहे.

कुमारवयातल्या या हळुवार भावनांचं रूपांतर काही वर्षांनी मैत्रीत झालं. एकमेकांना पत्रं पाठण्यास सुरुवात झाली आणि युद्ध सुरु असतानाच्या वर्षांमध्ये काही गाठीभेठीही झाल्या. ते रॉयल नेव्हीमध्ये नेमणुकीवर दूर कार्यरत असताना तरूण प्रिन्सेस एलिझाबेथ आपल्या खोलीत त्यांचा फोटो ठेवायच्या.

प्रिन्स फिलीप यांचं बालपण खडतर होतं. ग्रीसचे प्रिन्स म्हणून त्यांचा जन्म झाला पण नंतर मात्र अज्ञातवासामध्ये त्यांना युरोपभर एका ठिकाणाहून दुसरीकडे जावं लागलं.

परिस्थितीमुळे त्यांना स्वावलंबी, भावनिक दृष्टा कणखर आणि स्व-प्रेरित व्हावं लागलं, तर प्रिन्सेस एलिझाबेथ यांचं बालपण जगाच्या नजरेपासून दूर चार भिंतींच्या सुरक्षित वातावरणात गेलं होतं. त्या स्वभावाने अंतर्मुख, लाजाळू आणि विचारी होत्या. त्या दोघांची व्यक्तीमत्त्वं एकमेकांना पूरक अशी होती.

त्यांच्यातल्या या अनुबंधाविषयी त्यांचे नातू प्रिन्स विल्यम यांनी एकदा म्हटलं होतं, "ते असं काहीतरी करतात किंवा बोलतात ज्याने राणींना हसू फुटतं. त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन राणींपेक्षा अर्थातच थोडा वेगळा आहे. म्हणूनच ते दोघे एक जोडपं म्हणून छान आहेत."

ल्गनसोहळा

खरंतर प्रिन्स फिलीप यांनी आपला इरादा 1946मध्येच स्पष्ट केला होता. पण तब्बल वर्षभरानंतर 1947मध्ये एलिझाबेथ 21 वर्षांच्या झाल्यानंतर त्यांच्या साखरपुड्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

प्रिन्स फिलीप यांनी त्यांची आई, ग्रीसच्या प्रिन्सेस अॅलिस यांच्या टियारामधली मौल्यवान रत्नं वापरून प्लॅटिनम आणि हिऱ्यांची 'एन्गेजमेंट रिंग' तयार करून घेतली होती.

लग्नानंतर बकिंगहॅम पॅलेसच्या बाल्कनीमधून अभिवादन स्वीकारताना प्रिन्सेस एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलीप

फोटो स्रोत, PA

फोटो कॅप्शन, लग्नानंतर बकिंगहॅम पॅलेसच्या बाल्कनीमधून अभिवादन स्वीकारताना प्रिन्सेस एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलीप

लग्नाच्या काही काळ आधी क्वीन मदरना लिहिलेल्या पत्रात प्रिन्स फिलीप आपण 'पूर्णपणे प्रेमात पडलो' असल्याचं सांगतात.

वेस्टमिनिस्टर अॅबीमध्ये 2,000 पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचं लग्न झालं. दुसरं महायुद्ध संपून फक्त दोनच वर्षं झालेली होती आणि देश अजूनही या युद्धाच्या परिणामांमधून सावरत होता. अशा परिस्थितीमध्ये त्यांचा लग्नसोहळा हा आनंदाचा दुर्मिळ क्षण होता. "आपण चालत असलेल्या खडतर रस्त्यावर अचानक झालेली रंगांची उधळण," असं विन्स्टन चर्चिल यांनी या सोहळ्याचं वर्णन केलं होतं.

पुढच्याच वर्षी त्यांच्या मोठ्या मुलाचा - चार्ल्स यांचा आणि त्यानंतर त्यांची मुलगी - अॅन यांचा जन्म झाला. प्रिन्स फिलीप नेव्हीमध्ये चांगली कामगिरी करत झपाट्याने वरच्या रँकवर जात होते आणि ते HMS चेकर्सवर तैनात असताना हे तरूण कुटुंब माल्टामध्ये रहात होतं.

माल्टामध्ये रहात असताना त्यांना तुलनेने सामान्य आयुष्य जगता येत होतं. त्या काळच्या व्हिडिओंमध्ये हे तरूण जोडपं महाल आणि कर्तव्यापासून दूर, माल्टाच्या उबदार वातावरणात एकमेकांच्या सोबतीमध्ये आयुष्याचा आनंद घेताना दिसतात.

6 फेब्रुवारी 1952 ला हे सगळं बदललं. किंग जॉर्ज (सहावे) यांचं अकाली निधन झालं. तेव्हा प्रिन्सेस एलिझाबेथ 25 वर्षांच्या होत्या आणि प्रिन्स फिलीप 30 वर्षांचे होते. प्रिन्सेस एक दिवस राणी होणार हे त्यांना कायम माहिती होतं. पण त्याआधी काही वर्षांचं सहजीवन आपल्याला घालवता येईल, असं त्यांना वाटलं होतं.

एलिझाबेथ यांनी राज्यकर्ता होणं - राज्ञी पदावर जाणं याचा अर्थ ड्यूक यांना रॉयल नेव्हीमधली नोकरी आणि महत्त्वाकांक्षा यांच्यावर पाणी सोडावं लागणं. ज्या माणसाला मोठ्या बोटीची सूत्रं हाती घेण्याची सवय होती त्याला अचानक सहाय्यकाच्या भूमिकेत जावं लागलं. हे सोपं नव्हतं.

आणि हा 1950च्या दशकातला काळ होता, हे विसरून चालणार नाही. एखाद्या पतीपेक्षा पत्नीने वरचढ असणं या काळात अतिशय दुर्मिळ होतं. लहान मुलांच्या आई असणाऱ्या राणींसाठी आता कर्तव्याला प्राधान्य होतं. त्यांचा जन्मच यासाठी होता.

भूमिका आणि जबाबदाऱ्या

पदामध्ये झालेल्या बदलांचा परिणाम त्यांच्या नात्यावर तर झालाच, पण इतर गोष्टींचाही झाला.

पत्नीचे साथीदार (Consort) या भूमिकेमध्ये स्थिरावण्यासाठी प्रिन्स फिलीप यांना काही काळ लागला. या दरम्यान राणींच्या सल्लागारांशी त्यांचे वादही झाले.

1956 मध्ये प्रिन्स फिलीप चार महिन्यांसाठी दूरवरच्या कॉमनवेल्थ देशांच्या दौऱ्यावर गेले. त्यातून त्यांच्या पत्नीसोबतच्या त्यांच्या नात्याविषयी काही सवाल केले गेले. पण नंतर मात्र या जोडप्याला सूर सापडला आणि मग पुढची काही दशकं सुरळीत गेली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन. एफ केनेडी आणि फर्स्ट लेडी जॅकलिन केनेडी यांच्यासोबत

फोटो स्रोत, PA

फोटो कॅप्शन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन. एफ केनेडी आणि फर्स्ट लेडी जॅकलिन केनेडी यांच्यासोबत

हेड ऑफ स्टेट म्हणून कर्तव्य चोख पार पाडण्यासाठी ड्यूक क्वीनना साथ देत, तर कुटुंब प्रमुख म्हणून सगळी जबाबदारी त्यांनी स्वतःकडे घेतली होती. बाहेरच्या जगासाठी त्या बॉस होत्या. पण खासगीमध्ये मात्र भूमिकांची अदलाबदल होत असते. शाही कुटुंबाबद्दल 1960च्या दशकात तयार करण्यात आलेल्या एका डॉक्युमेंटरीमध्ये प्रिन्स फिलीप बार्बेक्यू करताना तर राणी एलिझाबेथ इतर गोष्टी करताना दिसत आहेत.

मोठे राष्ट्रीय महत्त्वाचे क्षण - म्हणजे अधिकृत दौरे, संसदेच्या कामाकाजची सुरुवात, विविध गोष्टींच्या स्मरणार्थ वा स्मृतिदिनी होणारे कार्यक्रम, थँक्स गिव्हींग सर्व्हिस या सगळ्या वेळी प्रिन्स फिलीप राणींच्या सोबत असतं. या कार्यक्रमांचे व्हिडिओ पाहताना त्या दोघांमध्ये झालेली नजरानजर, उमटलेलं हसू पहायला मिळतं. सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यानचे या दोघांमधले खासगी क्षण.

अनेकदा ड्यूक एखाद्या कार्यक्रमासाठी राणींचं आगमन होण्यापूर्वी पाहुण्यांची वा जमलेल्या लोकांशी उत्साहाने गप्पा मारताना दिसत. राणींच्या येण्यापूर्वी लोकांच्या मनावरच दडपण कमी करण्याचं काम ते करत.

पण त्यांच्या या यशस्वी नात्यामागचं आणखी एक कारण म्हणजे ते एकमेकांपासून दूर एकटेही काही काळ घालवत. ड्यूक यांनी एकदा म्हटलं होतं, "दोघांना वेगवेगळ्या गोष्टीत रस असणं, हे आनंदी लग्नाचं गुपित आहे."

ट्रुपिंग द कलर परेड, 2009

फोटो स्रोत, PA

फोटो कॅप्शन, राणी एलिझाबेथ (द्वितीय) आणि प्रिन्स फिलीप, ट्रुपिंग द कलर परेड, 2009

राणींची कुत्रे आणि घोड्यांची आवड जगप्रसिद्ध आहे. त्यांना मिळणाऱ्या मोकळ्या वेळातला बहुतेक काळ त्या घोड्यांना रेसिंग ट्रेनिंग देणाऱ्या ट्रेनर्ससोबत आणि ब्रीडर्ससोबत घालवतात. तर प्रिन्स फिलीप यांना आयुष्यभर खेळांची आवड होती. शिवाय या कुटुंबाच्या मालकीच्या 'Estates' इस्टेट - म्हणजे घरं आणि त्याच्या आजूबाजूची शेतं आणि परिसर यांचीही काळजी घेण्यात त्यांना रस होता. विंडसर ग्रेट पार्क किंवा सँड्रिंघमच्या परिसरात घोडागाडीवरून फेरफटका मारताना ते अनेकदा दिसत.

प्रिन्स हॅरी यांनी 2012मध्ये म्हटलं होतं, "जरी माझे आजोबा, स्वतःचं वेगळं काहीतरी करताना दिसत असले, तरी ते स्वतः प्रत्यक्ष तिथे हजर असतात, ही वस्तुस्थिती आहे. मला वाटत नाही त्यांच्याशिवाय राणींना हे करणं शक्य झालं असतं."

आपण आपली भूमिका पार पाडली असल्याचं ठरवत 2017मध्ये प्रिन्स फिलीप सार्वजनिक आयुष्यातून निवृत्त झाले. त्यानंतर मग क्वीन एलिझाबेथ कार्यक्रमांमध्ये एकट्या दिसू लागल्या, किंवा मग शाही कुटुंबातील इतर कोणी सदस्य त्यांच्या सोबत असत. मार्च 2020पर्यंत ड्यूक ऑफ एडिंबरांचा मुक्काम नॉरफ्लॉकमधल्या सँड्रिघम इस्टेटमधल्या वुड फार्मवर बहुतेकदा असे.

HMS बबल

प्रिन्स फिलीप यांना गोष्टींचा गाजावाजा करायला आवडत नसे. वर्षानुवर्षं चांगले कपडे घालून तयार होत, गप्पा मारत हँड शेक करत वेळ घालवल्यानंतर त्यांना वाचन, लेखन आणि चित्र रंगवण्यात आनंद मिळत असे. राणी एलिझाबेथ यांना त्यांच्या कर्तव्यांमुळे बहुतेक काळ लंडन आणि विंडसरला रहावं लागत होतं. ते एकमेकांच्या संपर्कात असले तरी एकमेकांपासून दूर रहात होते.

पण कोव्हिड -19ची जागतिक साथ सुरू झाल्यानंतर त्या दोघांनी एकत्र विंडसर कॅसलला रहावं असं ठरवण्यात आलं. कर्तव्यदक्ष सेवकांची लहान टीम त्यांची काळजी घेत होती. याला HMS बबल (HMS - Her Majesty's Ship) म्हटलं जाऊ लागलं.

ड्यूक ऑफ एडिंबरा आणि राणी एलिझाबेथ (द्वितीय)

फोटो स्रोत, PA Media

फोटो कॅप्शन, ड्यूक ऑफ एडिंबरा आणि राणी एलिझाबेथ (द्वितीय)

या कोव्हिड -19च्या साथीमुळे मार्च 2020 पासून ते त्यांच्या अखेरच्या क्षणांपर्यंत त्यांनी एकत्र वेळ घालवला. कदाचित यापूर्वी इतका एकत्र वेळ त्यांना कधीच मिळाला नसावा. एकत्र अनुभवलेले क्षण आणि आयुष्यात पाहिलेल्या गोष्टींबद्दल चिंतन करण्याची संधी कदाचित त्यांना मिळाली असावी.

70 वर्षांपेक्षा अधिक काळ ते एकमेकांच्या आयुष्याचे जोडीदार होते आणि राणी एलिझाबेथ यांना प्रिन्स फिलीप यांची मोठी उणीव नक्कीच भासेल.

त्यांनी उघडपणे एकमेकांवरचं प्रेम कधीच दाखवलं वा व्यक्त केलं नाही. पण त्यांची ही चिरकाळ शाही प्रेमकहाणी कायम लोकांच्या स्मरणात राहील.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)