Climate Change : माऊंट एव्हरेस्टचा बेसकँप हलवण्याची वेळ का आली?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ऋजुता लुकतुके
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
माऊंट एव्हरेस्टच्या खुंबा बेसकॅम्पच्या फोटोतील काळ्या रेषा प्रथमदर्शनी एखाद्या वाहनाच्या खुणा असल्यासारखं वाटेल. पण, प्रत्यक्षात ती हिमनगावर पडलेली भेग आहे. आणि गिर्यारोहक तसंच तिथे काम करणारे कर्मचारी यांनी एका रात्रीत बेसकँपला अशा भेगा पडलेल्या बघितल्या आहेत.
झालंय असं की, ज्या खुंबा हिमनदीवर किंवा ग्लेसियरवर हा बेसकँप आहे तो वितळतोय. त्यामुळे नेपाळ सरकारला बेसकँप बदलण्याचा निर्णय घ्यावा लागलाय.
जागतिक तापमान वाढीचाच हा दृश्य परिणाम आहे. जाणून घेऊया या घडामोडीबद्दल आणि नव्या बेसकँपबद्दल…
एव्हरेस्ट चढाईचे दोन बेसकँप
माऊंट एव्हरेस्टचं शिखर हे गिर्यारोहकांसाठी सर्वोच्च स्वप्न. तिथे चढाई करण्यापूर्वी हिमालयातल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आणि वैद्यकीय सुविधा तसंच चढाईचा मार्ग समजून घेण्यासाठी आधी बेसकँपला जायचं आणि तिथून एव्हरेस्ट सर करण्याची मोहीम सुरू करायची हा गिर्यारोहकांचा शिरस्ता.
एव्हरेस्टच्या पायथ्याशी दक्षिणेला आणि उत्तरेला असे दोन बेसकँप आहेत. उत्तरेचा कँप हा तिबेट म्हणजे चायनीज सरकारच्या अखत्यारीत येतो. 2019 पासून तो पर्यटकांसाठी बंद आहे.
तर दक्षिणेला नेपाळच्या खुंबा हिमनदीवर वसलेला बेसकँप हा गिर्यारोहकांमध्ये जास्त लोकप्रिय आहे. तुम्ही सराईत गिर्यारोहक नसाल तर या बेसकँपला पोहोचणंही कठीणच आहे. कारण, त्यासाठी नेपाळच्या काठमांडूहून लुकलापर्यंत विमानाने आलात की पुढे 5,364 मीटरच्या उंचीवर हा बेसकँप आहे. आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी लुकलाहून सात दिवसांचा ट्रेक करावा लागतो.

फोटो स्रोत, Getty Images
तिथे 3 ते 4 दिवस थांबून मग गिर्यारोहक प्रत्यक्ष एव्हरेस्टच्या चढाईला सुरुवात करतात. खुंबाला पोहोचणं तुलनेनं सोपं असल्यामुळे आणि नेपाळच्या पर्यटन विभागाने पुरवलेल्या सुविधांमुळे हा बेसकँप लोकप्रिय आहे. आणि दरवर्षी साधारण 40,000 गिर्यारोहक इथूनच चढाई करतात.
शिवाय फक्त पर्यटनासाठी आणि बेसकँपपर्यंतच्या ट्रेकिंगसाठीही लोक इथं भेट देतात. आता 17 जूनला नेपाळने एक घोषणा केली की हा बेसकँप हलवण्यात येणार आहे. नवा कँप 200 ते 400 मीटर खाली आहे. पण, बेसकँप बदलण्याची गरज का पडली?
माऊंट एव्हरेस्टचा बेसकँप का बदलला?
वसंत ऋतूत दर दिवशी सरासरी 1,500 लोक बेसकँप परिसरात असतात.
बेसकँप स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले नेपाळ सैन्यदलातले कर्नल किशोर अधिकारी म्हणाले, "आम्ही झोपलेल्या ठिकाणी एका रात्रीत हिमनदीवर भेगा पडलेल्या दिसतात. सकाळी बघूनही भीती वाटते. असं वाटतं, अशी एखादी मोठी भेग आपला जीवही घेऊ शकली असती."
किशोर अधिकारी यांच्यासारखाच अनुभव अलीकडच्या काळात अनेकांनी घेतला आहे. डोळ्यासमोर हिमनदीवर भेग पडतानाही काही जणांनी पाहिलं आहे. हिमनदी वितळत असल्याचं आणि बर्फ ठिसूळ होत असल्याचंच हे लक्षण आहे.
तुम्हाला आठवत असेल 25 एप्रिल 2015 ला याच बेसकँपवर 7.8 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला होता. आणि त्यानंतर सतराच दिवसांनी पुन्हा 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप त्याच परिसरात झाला. 19 लोकांचा यात मृत्यूही झाला होता. याशिवाय हिमनगाचे तुकडे कोसळणे, दगड वाहून येणे अशा घटनाही इथं वाढल्यात. शिवाय बर्फाचे तुकडे दगडावर किंवा एकमेकांशी आदळून मोठे आवाजही इथं होतात.

फोटो स्रोत, Google Earth
सांगण्याचा हेतू हा की, या बेसकँपची भौगोलिक रचना आणि स्थिती बदलतेय. आणि खुंबा कँप ज्या हिमनदी किंवा ग्लेसियरवर वसलाय ती हिमनदी झपाट्याने वितळतेय.
अनेक जागतिक पर्यावरणविषयक संस्थांनी या ग्लेसियरचा अभ्यास केलाय. यातल्या लिड्स विद्यापीठातल्या अभ्यास गटाने 2018मध्ये आपला अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यांनी असं म्हटलं की, खुंबा ग्लेसियरमधून दरवर्षी 95 लाख घनमीटर इतकं पाणी वितळतं. तर बेसकँपच्या जवळच्या एका भागात तर हे प्रमाण दरवर्षी 10 लाख लीटर इतकं आहे. म्हणजेच खुंबा ग्लेसियर वितळतोय. आणि बर्फही ठिसूळ होतोय.
शेवटी मग बदलत्या परिस्थितीचा आढावा घेऊन नेपाळच्या पर्यटन विभागाला बेसकँपच दुसरीकडे हलवाला लागत आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा निर्णय घेण्यामागे जसं हवामान बदल हे एक कारण आहे. तसंच पर्यावरणाचा ऱ्हास आणि मनुष्य प्राणी पर्यावरणाचं करत असलेलं नुकसान हेही आहे.
बेसकँप बदलण्याचा निर्णय घेण्यापूर्वी जी समिती नेमण्यात आली होती त्या समितीचे एक सदस्य खिमलाल गौतम यांनी हा मुद्दा आणखी स्पष्ट केला.
"बेसकँपवर दररोज साधारण 4,000 लीटर लघवी जमा होते. इथं राहणारे लोक ऊब मिळवण्यासाठी तसंच जेवणासाठी रॉकेल, पेट्रोल जाळतात. हजारो टन कचरा रोज इथं जमा होतो. आणि त्यातून ही परिस्थिती ओढवली आहे."

फोटो स्रोत, Punnawit Suwuttananun
तज्ज्ञांचं यावर एकमत आहे की, निदान हिमकडे कोसळणं, दगड खाली येणं असे प्रकार आपण रोखू शकलो असतो. महाराष्ट्राचे उमेश झिरपे यांनी एव्हरेस्ट बेसकँपच्या अनेक मोहिमा केल्या आहेत. पर्यटन तसंच गिर्यारोहकांनाही ते अनेकदा इथं घेऊन आलेत. हा ऐतिहासिक बेसकँपच बदलणार म्हटल्यावर त्यांच्या भावना त्यांनी बीबीसी मराठीकडे व्यक्त केल्या.
ते सांगतात, "त्या परिसरात मागची वीस वर्षे मी जातोय. 2012 मध्ये जेव्हा गेलो होतो तेव्हा रात्री प्रचंड मोठे आवाज आम्ही अनुभवले आहेत. 'बर्फ फाटणे' ज्याला म्हणतात, त्या भेगांचा अनुभव घेतलाय. अख्खे लावलेले तंबू या भेगांमध्ये जातात, असं दृश्य आम्ही पाहिलंय. म्हणून लोकांच्या सुरक्षिततेसाठी नेपाळ सरकारने हा निर्णय घेतलाय. त्याचं स्वागतच करावं लागेल."
बेसकँप बदलल्यामुळे एव्हरेस्ट चढाईत काय बदल होईल हे सांगताना झिरपे यांनी काही व्यवहारिक गोष्टी सांगितल्या. "चढाईसाठी येणाऱ्यांसाठी अंतर वाढणार आहे. त्यामुळे खर्च तितका वाढेल. दुसरा नहत्त्वाचा बदल म्हणजे सामान जास्त वाहून न्यावं लागेल. नवं वाढलेलं अंतर बघून चढाईचं नियोजन करणं हे आव्हान असेल."
बेसकँप बदलण्याचं काम 2024 मध्येच पूर्ण होईल. मात्र हालचाली तत्परतेनं सुरू झाल्या आहेत. हा बेसकँप आधीच्या तुलनेत खाली असल्यामुळे बेसकँप ते गुर्यारोहकांचा पहिला तळ हे अंतरही आता वाढणार आहे. आणि गिर्यारोहकांना त्यादृष्टीने नवं नियोजन करावं लागेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








