प्रियांका मोहिते : हिमालयातलं अन्नपूर्णा शिखर प्रियांका मोहिते आणि गिरीप्रेमीच्या टीमनं कसं सर केलं?

प्रियांका मोहिते

फोटो स्रोत, Priyanka Mohite

फोटो कॅप्शन, प्रियांका मोहिते
    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

"अन्नपूर्णा शिखर चढणारी पहिली भारतीय महिला बनायचं असं काही ठरवलं नव्हतं. बस, हे सर करायचं हेच मोठं स्वप्न होतं," साताऱ्याची गिर्यारोहक प्रियांका मोहिते अन्नपूर्णा मोहिमेविषयी सांगते.

16 एप्रिल 2021 रोजी प्रियांका जगातल्या या सर्वात खडतर पर्वतशिखरावर यशस्वी चढाई करणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली.

विशेष म्हणजे प्रियांकापाठोपाठ त्याच दिवशी उत्तराखंडची महिला गिर्यारोहक शीतलनंही योगेश गार्ब्याल यांच्या साथीनं अन्नपूर्णा सर केलं.

इतकंच नाही, तर पुण्याच्या गिरीप्रेमी संस्थेच्या टीममधील भूषण हर्षे, डॉ. सुमित मांदळे, जीतेंद्र गावरे हे तिघे आणि भगवान चवले, केवल कक्का यांनीही अन्नपूर्णा सर केलं.

म्हणजे एकाच दिवशी महाराष्ट्राच्या सहा आणि एकूण आठ भारतीयांनी या शिखरावर तिरंगा फडकवला.

यावेळची अन्नपूर्णा मोहिम अशी अनेक बाबतींत दखल घेण्यासारखी ठरली. त्याविषयीच प्रियांका आणि गिरीप्रेमीच्या टीमशी आम्ही संवाद साधला.

अन्नपूर्णा मोहिमेवर महिलांचा ठसा

यावर्षी प्रियांका आणि शीतलसोबतच नेपाळच्या सहा महिलांनीही अन्नपूर्णा-1 वर यशस्वी चढाई केली. महिला गिर्यारोहकांचं हे यश लक्ष वेधक ठरलं आहे.

प्रियांकाच्या मते ही गोष्ट महिला गिर्यारोहकांमधली ताकद दाखवून देते. "तुम्हाला ठरलेल्या दिवशीच पर्वत चढावा लागतो. तुमचे पीरियड्स सुरू असतानाही. अन्नपूर्णा मोहिम असो किंवा त्याआधीही मी स्वतः महिन्यातल्या 'त्या दिवशी' शिखर सर केलं आहे.

महाराष्ट्राच्या सहा आणि एकूण आठ भारतीयांनी या अन्नपूर्णा शिखरावर तिरंगा फडकवला.

फोटो स्रोत, Priyanka Mohite

फोटो कॅप्शन, महाराष्ट्राच्या सहा आणि एकूण आठ भारतीयांनी या अन्नपूर्णा शिखरावर तिरंगा फडकवला.

"सगळ्या महिलांना माहिती असेल की त्यावेळी कसं वाटत असतं ते. वेदना होत असतात, मूडस्विंग्स असतात, तरीही त्या पर्वत चढू शकतात, कारण महिला खरंच कणखर असतात."

जगातलं सर्वात खडतर शिखर

अन्नपूर्णा-1 हे हिमालयाच्या अन्नपूर्णा रांगेतलं मुख्य शिखर हे 8,091 मीटर किंवा 26,545 फूट उंचीचं आहे. उंचीच्या मानानं हे जगातलं दहाव्या क्रमांकाचं शिखर असलं, तरी चढाईसाठी ते जगात सर्वात कठीण मानलं जातं.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

प्रियांका सांगते, "बेस कँप सोडला, की सगळं आव्हानात्मक वाटू लागतं. कँप वनलाच पोहोचेपर्यंत चार तास लागतात. तिथे वाटेत खडकाळ पट्टा आहे, जो चढून जावं लागतं. बर्फातनं चालतानाही कसोटी लागते. अन्नपूर्णावर तर पावलोपावली हिमस्खलनाचा धोका आहे"

गिर्यारोहणाची सगळी कौशल्यं या मोहिमेत पणाला लागतात, असं प्रियांका नमूद करते.

पुण्याच्या गिरीप्रेमी संस्थेच्या टीममधील भूषण हर्षे, डॉ. सुमित मांदळे, जीतेंद्र गावरे हे तिघे आणि भगवान चवले, केवल कक्का यांनीही अन्नपूर्णा सर केलं.

फोटो स्रोत, Giripremi

फोटो कॅप्शन, पुण्याच्या गिरीप्रेमी संस्थेच्या टीममधील भूषण हर्षे, डॉ. सुमित मांदळे, जीतेंद्र गावरे हे तिघे आणि भगवान चवले, केवल कक्का यांनीही अन्नपूर्णा सर केलं.

"कँप थ्रीमध्ये रात्र घालवणं हा भीतीदायक पण तितकाच अविस्मरणीय अनुभव होता. रात्री आवाज यायचे कुठेतरी हिमकडे कोसळल्याचे आवाज येत होते. उंची वाढत जाते, तसं हवेतला ऑक्सिजन कमी होत जातो आणि पाठीवर जड सामान घेऊन चढाई करणं सोपं नसतं."

गिरीप्रेमीच्या भूषण हर्षे यांनाही तसाच अनुभव आला. "अन्नपूर्णावर शिखरावर उभे होतो, तेवढे काही क्षण सोडले तर कुठेही क्षणभरही विश्रांती घेणं शक्य नव्हतं. तिथे पुढे गेलेल्या टीमला वाटेत दोरही कमी पडले, तेव्हा एकेका टीमकडचे दोर जमा करून ते लावण्यात आले आणि त्याआधारानं सगळे वर चढले. पण मधल्या काही भागात दोराचा आधार नव्हता. अशी अनेक आव्हानं समोर होती."

जगात सर्वात उंचीवर असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर आजवर पाच हजारांहून अधिक गिर्यारोहकांनी यशस्वी चढाई केली आहे तर केवळ 298 जणांनाच अन्नपूर्णा-1 हे शिखर सर करता आलं आहे. इथे झालेल्या मृत्यूंचं प्रमाणही तुलनेनं सर्वाधिक आहे.

प्रियंका मोहिते

फोटो स्रोत, Giripremi

गिरीप्रेमीच्या टीमचं नेतृत्व करणारे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे सांगतात, "ज्या ज्या गिर्यारोहकांनी 14 अष्टहजारी शिखरं म्हणजे 8 हजार मीटरच्या उंचीवरची शिखरं सर करायचं ठरवलं, त्यांनी अन्नपूर्णा शेवटी सर केलं आहे. कारण हे अतिशय धोकादायक शिखर आहे. तिथे कुठलीही सुरक्षित जागा नाही. प्रत्येक टप्प्यावर हिमस्खलन होण्याचा, दरीत कोसळण्याचा धोका जाणवत राहतो."

'महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण'

तसं सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत वावरणाऱ्या मराठी गिर्यारोहकांनी हिमालायतली शिखरं सर करणं ही आता नवी गोष्ट राहिलेली नाही. पण यंदाची अन्नपूर्णा मोहिम मात्र विशेष ठरली आहे.

महाराष्ट्रातून अन्नपूर्णा शिखरावर पहिल्यांदाच अशा मोहिमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यात सगळेजण यशस्वी झाले.

फोटो स्रोत, Giripremi

फोटो कॅप्शन, महाराष्ट्रातून अन्नपूर्णा शिखरावर पहिल्यांदाच अशा मोहिमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यात सगळेजण यशस्वी झाले.

महाराष्ट्रातून अन्नपूर्णा शिखरावर पहिल्यांदाच अशा मोहिमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यात सगळेजण यशस्वी झाले.

प्रियांका सांगते, "इतका अभिमान वाटत होता ना, महाराष्ट्रातल्या सहा जणांनी एकाच दिवशी अर्ध्या एक तासाच्या फरकानं शिखर सर केलं याचा. तिथे भगवान दादांनी व्हीडियोही रेकॉर्ड केला की महाराष्ट्रातल्या सहा मावळ्यांनी अन्नपूर्णा शिखर सर केलं."

लॉकडाऊनमध्ये सराव, विलगीकरणानंतरच परवानगी

गेल्या वर्षी हिमालयातल्या मोहिमांना सुरुवात होण्याआधीच लॉकडाऊनची घोषणा झाली. त्यानंतर बराच काळ जिम बंद होते, सरावासाठी बाहेर जाणं सोपं नव्हतं.

त्या काळातही गिर्यारोहकांनी मेहनत सुरू ठेवली. "काळ सर्वांसाठीच कठीण होता, पण खेळाडूंसमोर त्या विचित्र परिस्थितीतही आपला फिटनेस चालू ठेवण्याचं आव्हान होतं. मानसिक कणखरता कायम राहावी यावरही आम्ही भर दिला" असं उमेश झिरपे सांगतात.

गिर्यारोहक

फोटो स्रोत, Giripremi

गिर्यारोहकांना विपरीत परिस्थितीत राहण्याची सवय असावी लागते. भूषण हर्षे सांगतात, "पर्वतावर तुम्हाला कुठलंही संकट सांगून येत नाही. त्या त्या संकटांना तोंड दिल्यावर बाकीच्या जगण्यातली संकंटं अवघड वाटत नाही. ती वाटचाल माणसाला बदलते, घडवते. अनेकदा तुम्ही तंबूमध्येच सुरक्षित असता. बाहेर शून्यापेक्षा खाली तापमान असतं. त्या परिस्थितीत सकारात्मक राहावंच लागतं. लॉकडाऊनमध्येही आम्ही तेच करत होतो."

नेपाळच्या सरकारनं यंदा मोहिमेसाठी कडक नियम आखले होते. "सगळे गिर्यारोहक RT-PCR टेस्ट करूनच नेपाळला गेले होते. पण तिथे पोहोचल्यावरही सर्वांना पाच दिवस विलगीकरणात राहावं लागलं. त्यानंतर पुन्हा टेस्ट करून निगेटिव्ह आल्यावरच काठमांडूहून पोखराला येण्याची परवानगी मिळाली."

गिर्यारोहक जेव्हा कोव्हिड योद्धा बनले

गिरीप्रेमी संस्थेनं खरं तर गेल्या वर्षीच अन्नपूर्णा मोहीम आखली होती. पण कोरोना विषाणूची साथ आणि लॉकडाऊनमुळे ती पुढे ढकलावी लागली.

पण लॉकडाऊनच्या काळात हे गिर्यारोहक घरी फक्त बसून राहिले नाहीत. लोकांना मदत करणं, जिथे कुणी जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी मदत पोहोचवणं, पुणे महापालिकेच्या वॉर रूमध्ये स्वयंसेवक म्ह्णून काम करणं अशा अनेक बाबतींत त्यांनी योगदान दिलं.

"लोकांना मदत करावी यासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या गिर्यारोहकांना साद घातली, तेव्हा पंधराशेहून अधिक जणांनी प्रतिसाद दिला," असं उमेश झिरपे सांगतात.

गिरीप्रेमी

फोटो स्रोत, Giripremi

फोटो कॅप्शन, गिरीप्रेमी

प्रियांका मोहितेनं तर या मोहिमेआधी एक कोव्हिड टेस्ट किट तयार कऱण्यास मदत केली. ती किरण मुझुमदार शॉ यांच्या बायोकॉनशी संलग्न सिंजेन इंटरनॅशनल या फार्मा कंपनीत रिसर्च असिस्टंट पदावर आहे.

या कंपनीनं अँटीबॉडी टेस्ट करण्यासाठी विकसित केलेल्या Elisa test kit ला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आयसीएमआरची मान्यता मिळाली. ते किट विकसित करणाऱ्या टीममध्ये प्रियांकाचंही योगदान होतं.

पुढचं लक्ष्य

प्रियांकानं याआधी माऊंट एव्हरेस्ट, ल्होत्से, मकालू आणि आता अन्नपूर्णा ही 8,000 मीटर उंचीवरची चार शिखरं सर केली आहेत. 8000 मीटरवरची जास्तीत जास्त शिखरं सर करण्याचं तिचं स्वप्न आहे.

प्रियांका मोहिते

फोटो स्रोत, Priyanka Mohite/Facebook

तर गिरीप्रेमी संस्थेच्या टीमनं एव्हरेस्ट, ल्होत्से, मकालू, धौलागिरी, चो ओयू, मन्सालू आणि कांचनजुंगा आणि आता अन्नपूर्णा ही आठ शिखरं सर केली आहेत. तिबेटमधलं शिशापांगमा शिखर सर करण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

चीननं 2022 पर्यंत विदेशी गिर्यारोहकांना शिशापांगमावर चढाईसाठी परवानगी दिलेली नाही. ते शिखर पुन्हा गिर्यारोहणासाठी खुलं होईल, अशी अपेक्षा आहे.

आठ हजार मीटरवरच्या चौदा शिखरांपैकी पाच शिखरं पाकिस्तान प्रशासित प्रदेशात असल्यानं, भारतीयांना सध्या तिथे चढाई करणं मात्र सध्या शक्य नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)