कोरोना व्हायरस: माऊंट एव्हरेस्टवर चढाईचा पुढचा हंगाम बंद करण्याचा नेपाळ सरकारचा निर्णय

फोटो स्रोत, AFP
कोरोना व्हायरसच्या साथीमुळे जगभरात अनेकांचे व्यवसाय मंदावले आहेत. अनेक देशांनी परदेशातून येणाऱ्या विमानांवर, परदेशी प्रवाशांवर बंदी घातली आहे. जागतिक आरोग्य संकट ठरलेल्या कोरोनाने आता माऊंट एव्हरेस्टही बंद पाडला आहे.
कोरोनाचा वाढता फैलाव बघता जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर चढाईचा पुढचा हंगाम पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय नेपाळ सरकारने घेतला आहे.



14 मार्च ते 30 एप्रिलपर्यंतचे चढाईचे सर्व परवाने रद्द करण्यात आले आहेत.
चीनच्या नियंत्रणाखाली असलेल्या चीनच्या उत्तरेकडून सुरू होणाऱ्या माऊंट एव्हरेस्टसाठीच्या चढाई मोहिमांवर चीनने यापूर्वीच बंद घातली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पर्यटन हा नेपाळसाठी महसूल जमवण्याच्या मुख्य स्रोतांपैकी एक आहे. मात्र, नेपाळ सरकारतर्फे एव्हरेस्ट चढाई करण्यासाठी देण्यात येणाऱ्या परवान्यातून त्यांची भरभक्कम कमाई होत असते.
'काठमांडू पोस्ट'च्या माहितीनुसार, गिर्यारोहकांना देण्यात येणाऱ्या एव्हरेस्टच्या चढाई परवान्यातून नेपाळ सरकारला दरवर्षी 40 लाख डॉलर्सचं उत्पन्न मिळत असल्याचं काठमांडू पोस्टने छापलं आहे.
30 एप्रिलपर्यंतचे सर्व पर्यटक व्हिसा थांबवण्याचा निर्णय आम्ही घेतल्याची माहिती नेपाळच्या पंतप्रधान कार्यालयातील सचिव नारायणप्रसाद बिदारी यांनी दिली.
तसंच, परदेशी पर्यटकांनी नेपाळला येऊ नये, अशा सूचनाही नेपाळच्या पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आल्या आहेत. मात्र, ज्यांना नेपाळ प्रवास टाळता येणं शक्य नाही अशा 14 मार्चपासून येणाऱ्या परदेशी प्रवाशांनी पुढचे 14 दिवस स्वतःला विलग म्हणजेच आयसोलेशनमध्ये ठेवावं, असंही पंतप्रधान कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
माऊंट एव्हरेस्ट शिखर मोहिमांसाठी अमेरिका, भारत, चीन, युरोप, जपान आणि दक्षिण कोरियातून मोठ्या प्रमाणात गिर्यारोहक नेपाळमध्ये जात असतात. यातून नेपाळ सरकारला मोठा महसूल मिळतो.

परदेशी गिर्यारोहकाला एव्हरेस्ट सर करण्याच्या एका परवान्यासाठी नेपाळ सरकारला 11 हजार डॉलर्स मोजावे लागतात. यात टूर कंपन्यांचा खर्च अंतर्भूत नाही.
एव्हरेस्ट गिर्यारोहण मोहिमा बंद ठेवण्याच्या नेपाळ सरकारच्या निर्णयाचा केवळ नेपाळ सरकारला मिळणाऱ्या महसुलाला फटका बसणार नाही तर स्थानिक शेर्पांचंही मोठं आर्थिक नुकसान होणार आहे.
स्थानिक शेर्पा गाईड म्हणून चढाई मोहिमांच्या हंगामात चांगली कमाई करतात.

फोटो स्रोत, Getty Images
पायोनिअर अॅडव्हेंचर टूर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लक्पा शेर्पा यांनी बीबीसी नेपाळीला सांगितलं, "माझ्या चीनच्या 9 आणि जपानच्या ग्राहकांनी बुकिंग रद्द केलं आहे. अनेक ट्रेकिंग मोहिमाही रद्द झाल्या आहेत. त्यामुळे या काळात कमाई करणाऱ्या आमच्यासारख्या शेर्पांसाठी हा मोठा तोटा आहे."
नेपाळमध्ये आतापर्यंत केवळ एकच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं आहे. मात्र, नेपाळला लागून असलेल्या भारतात कोरोनाचे 70 हून अधिक रुग्ण आढळले आहेत.
कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी नेपाळ सरकारनेही प्रतिबंधात्मक उपाय आखायला सुरुवात केली आहे. लग्न समारंभासह इतरही गर्दीची ठिकाणी टाळावी, अशा सूचना नेपाळ सरकारने केल्या आहे.
हेही नक्की वाचा -
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








