हिमालयातील 'या' धोक्यांकडे कुणाचंच लक्ष नाही

अमरनाथ

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, नवीन सिंह खडका
    • Role, पर्यावरण प्रतिनिधी, बीबीसी

हिमालयातील हिमनद्यांमुळे तिथले तलाव मोठ्या प्रमाणात भरत चालले आहेत. इतकंच नव्हे तर त्याचे इतर काही धोकेही आहेत. या धोक्यांवर लक्ष ठेवणारं कुणीच नसल्यामुळे हा धोका जास्तच वाढत चालल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

उत्तराखंडमध्ये हिमस्खलनामुळे नुकतीच पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही घटना या धोक्यांचं एक उदाहरण म्हणून संबोधलं जाऊ शकतं.

पृथ्वीवर दक्षिण अथवा उत्तर गोलार्धानंतर सर्वाधिक हिमनद्या हिमालयातच आढळून येतात. जगभरातील तापमान वाढीमुळे इथल्या हिमनद्या वितळत चालल्या आहेत.

याबाबत प्राध्यापक जेफ्री कर्गेल यांनी अधिक माहिती दिली. कर्गेल हे अमेरिकेतील ज्येष्ठ भूशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी हिमालयातील आपत्तींचा अभ्यास केला आहे. उत्तराखंडमध्ये नुकत्याच आलेल्या आपत्तीबाबतही ते अभ्यास करत आहेत.

प्रा. कर्गेल सांगतात, "या प्रकारच्या आपत्तींमुळे कशा प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो, याबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाही. उत्तराखंडसारख्या आपत्ती येतात, त्यावेळी आपण त्यावर फक्त प्रतिक्रिया देतो. आपण या हिमनद्यांची देखरेख करत नाही."

हिमनद्या वितळण्याचे धोके

हिमनद्या वितळणं हे धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. अनेकवेळा हिमनदी खालच्या बाजूने वितळल्यानंतर पर्वतांवरील बर्फ वरील बाजूस लटकत राहतो. हा बर्फ कधीही कोसळण्याची शक्यता असते.

एव्हरेस्ट

फोटो स्रोत, Getty Images

हा बर्फ खाली कोसळल्यास भूस्खलन, रॉक-फॉल किंवा हिमस्खलन होण्याची शक्यता निर्माण होते. अशा स्थितीत संपूर्ण डोंगर उतारावरील हिमनग खाली कोसळण्याची शक्यता असते.

शास्त्रज्ञांच्या मते, "अशा घटनांमुळे नद्यांचा प्रवाह बदलू शकतो. पूर परिस्थिती निर्माण होते. उत्तराखंडमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती पाहायला मिळाली.

हिमनद्यांवर नजर ठेवणं अवघड

हिमालय पर्वतांवरील प्रतिकूल परिस्थितीमुळे या हिमनद्यांवर नजर ठेवणं अत्यंत आव्हानात्मक काम आहे.

हिमालय तसंच हिंदूकुश पर्वतरांगांमध्ये 50 हजारांहून अधिक हिमनद्या आहेत. त्यापैकी फक्त 30 हिमनद्यांचं आपण निरीक्षण करू शकतो, अशी माहिती इंदूर IIT मधील हिमनदी तज्ज्ञ मुहम्मद फारुख आझम यांनी दिली.

"त्यापैकी फक्त 15 नद्यांचा अभ्यास होऊन त्यांचा अहवाल प्रकाशित झालेला आहे. आपण या हिमनद्यांवर बारीक नजर ठेवणं आवश्यक आहे," असं आझम यांना वाटतं.

भूकंप आणि हवामान बदल

हिमालय पर्वतरांगा या पृथ्वीवरच्या सर्वांत तरुण पर्वतरांगा मानल्या जातात. येथील पर्वतांची उंची दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या परिसरात सतत भूकंपही होत असतात. त्यामुळे इथल्या चढ-उतारांची रचना नेहमीच बदलत असते.

जगातील हवामान बदलाचा फटकाही इथल्या वातावरणाला बसत आहे. जागतिक तापमान वाढीमुळे इथल्या हिमनद्या वितळत चालल्या आहेत.

अन्नपूर्ण बेस कॅम्प

फोटो स्रोत, Getty Images

तिबेटमधील अरू पर्वतावरील एक हिमकडा 2016 मध्ये अचानक कोसळला होती.

यामुळे या परिसरात प्रचंड मोठं हिमस्खलन झालं होतं. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. तर शंभराहून अधिक वन्यप्राणी मृत्यूमुखी पडले होते.

यानंतर काही महिन्यांनी याच पर्वतावरील दुसरी एक हिमनदी कोसळली होती.

2012 मध्ये सियाचीन परिसरातील हिमनदी कोसळली होती. या दुर्घटनेत तब्बल 140 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यातील बहुतांश व्यक्ती पाकिस्तानी सैनिक होते.

तज्ज्ञांच्या मते, त्यावेळी एक मोठं हिमस्खलन झालं होतं. पण त्या घटनेचं कारण अद्याप स्पष्टपणे कळू शकलेलं नाही.

हिमस्खलनापेक्षा भूस्खलनाचं प्रमाण जास्त

आशिया खंडातील हिमालयासह पूर्वेकडील पामीर, काराकोरम आणि हिंदूकुश या उंच पर्वतरांगांच्या परिसरात 1999 ते 2018 दरम्यान भूस्खलनात वाढ झाली आहे.

चमौली

फोटो स्रोत, Getty Images

चायनीज अॅकेडमी ऑफ सायन्सने याबाबत एक अभ्यास केला होता. त्यासाठी त्यांनी अमेरिकेच्या भूशास्त्रीय सर्वेक्षणाकरिता उपग्रहाद्वारे घेण्यात आलेल्या छायाचित्रांची मदत घेतली होती. त्यामध्ये 2009 ते 2018 दरम्यान 127 भूस्खलनाचे प्रकार घडल्याचं निदर्शनास आलं होतं.

मागच्या दशकात भूस्खलनाचे प्रकार वाढले तसंच हिमाच्छादित भागही कमी झालाय, असं या अभ्यासानंतर जानेवारीत प्रकाशित करण्यात आलेल्या नेचर या अहवालात म्हटलं आहे.

दलिया किर्स्चबॉम हे नासाच्या हायड्रोलॉजिकल सायन्स विभागात भूस्खलन तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

ते सांगतात, "हिमनद्या मोठ्या प्रमाणात वितळत चालल्यामुळे त्याचा धोका वाढला आहे. यापूर्वी या सगळ्या हिमनद्यांमुळे डोंगरउतारावरील मोठमोठे खडक चिकटून बसलेले होते. पण या नद्या वितळल्यानंतर हे खडक आता लटकू लागले आहेत. हे धोकादायक आहे.

पर्वत

फोटो स्रोत, Getty Images

इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) या संस्थेने क्रायोस्फीअरबाबत 2018 मध्ये एक अहवाल प्रकाशित केला होता. हिमनद्या वितळल्यामुळे डोंगरउतार आणि संपूर्ण संरचनेचं स्थैर्य बिघडल्याचं यामध्ये सांगण्यात आलं आहे.

जमिनीवर हिमनद्यांच्या स्वरुपात गोठलेल्या पाण्याच्या भागाला क्रायोस्फीअर असं संबोधलं जातं.

हिमतलावांवर नजर

हिमालयातील हिमनद्यांवर आतापर्यंत अनेक संशोधनं झाली. त्यापैकी बहुतांश संशोधनांमध्ये वितळत चाललेलं पाणी हेच केंद्रस्थानी होतं. या पाण्यामुळे येथील हिमतलाव भरून फुटणार तर नाही ना, यासाठी हे संशोधन होतं.

दरम्यान, हिमनद्या वेगाने वितळल्यामुळे उद्भवणाऱ्या इतर धोक्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप तज्ज्ञांकडून केला जातो. या गोष्टी कुणीच लक्षात घेतल्या नाहीत, असं युनिव्हर्सिटी ऑफ उटाचे भूगोल विषयाचे प्राध्यापक समीर रुपर यांचं मत आहे. त्यांनी हिमालयातील हिमनद्यांमधील बदलांचा अभ्यास केलेला आहे.

हिमस्खलनाचा प्रकार दुर्मिळ असल्यामुळे असं घडलेलं असू शकतं, असं त्यांना वाटतं.

इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंटमधील तज्ज्ञ हिमालयातील डोंगररांगांबाबत गेली अनेक वर्षं अभ्यास करत आहेत. हिमतलावांशी संबंधित पूरस्थितीमुळे या परिसराने वर्षानुवर्षं अनेक समस्यांना तोंड दिलं आहे.

धोक्याची कोणतीही पूर्वसूचना न देता या हिमनद्या कोसळतात, त्यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्यावर होतो. या सगळ्याचा प्रचंड धोका निर्माण होऊ शकतो, असं मरियम जॅकसन सांगतात. मरियम या क्रायोस्फीअर विषयक अभ्यासाच्या समन्वयक म्हणून काम पाहतात.

हिमनद्यांचा अभ्यास

भारत सरकारच्या स्वतःच्या यंत्रणा या धोक्याकडे विशेष लक्ष देत नसल्याबाबत टीका करण्यात येत आहे. हिमनदी तज्ज्ञ डॉ. डी. पी. डोभाल नुकतेच वाडिया इन्स्टीट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजी या संस्थेतून निवृत्त झाले आहेत. ही संस्था विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारित असलेली एक स्वायत्त संस्था आहे.

अमरनाथ

फोटो स्रोत, Getty Images

ते सांगतात, "हिमनद्यांच्या अभ्यासाकरिता आम्ही एक केंद्र 2009 मध्येच उघडलं होतं. भारतातील हिमनद्यांचा अभ्यास करणारी संस्था म्हणून हे केंद्र पुढे येणं अपेक्षित होतं. पण असं काही घडताना दिसलं नाही. त्यामुळे हिमनद्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला. त्याशिवाय, आम्ही प्रशिक्षित केलेल्या बारा हिमनदी तज्ज्ञांवर बेरोजगारीची कुऱ्हाडसुद्धा कोसळली.

भारत सरकारने हवामान बदलाबाबत बनवलेल्या नॅशनल अॅक्शन प्लॅनअंतर्गत धोरण ठरवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये हिमालयातील परिसंस्थेचं संवर्धन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.

हिमालयातील हिमनद्यांसह तेथील परिसंस्थेचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करणं तसंच यासंबंधित माहिती गोळा करणं, हा त्याचा प्रमुख उद्देश आहे.

हिमालयातील बहुतांश परिसरात भारताला चीन आणि पाकिस्तान यांची सीमा लागून आहे. शेजाऱ्यांसोबतच्या तणावपूर्ण संबंधांमुळेही भारताच्या हिमालय मोहिमेत अनेक अडथळे निर्माण होतात, असं तज्ज्ञांचं मत आहे.

या तिन्ही देशांनी एकत्रित येऊन अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यांनी आपल्याकडची हिमनद्यांची माहिती एकमेकांना देणं या मोहिमेसाठी महत्त्वाचं ठरेल, असं IPCC चे समन्वयक अंजल प्रकाश यांना वाटतं.

हिमनद्या वितळण्याशी संबंधित धोका मोठा आहे. सर्वांनी एकत्रितरित्या याचा सामना केला तरच भविष्यात उद्भवणाऱ्या समस्येला तोंड देणं शक्य होईल, असंही प्रकाश म्हणाले.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)