काबूलच्या बाजारात उष्ट्या, उरलेल्या, बुरशी आलेल्या शिळ्या भाकऱ्यांची दुकानं

- Author, सिकंदर किरमानी
- Role, बीबीसी प्रतिनिधी, काबूल
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील प्रसिद्ध निळ्या घुमटाच्या मशिदीच्या अगदी समोर एका माणसाने रस्त्यावर एक दुकान टाकलं होतं. एका चटईवर त्याने प्लास्टिकच्या केशरी रंगाच्या मोठमोठ्या पिशव्यांमध्ये शिळे आणि उरलेले नानचे (मैद्याची चपाती) तुकडे ठेवले होते.
हे तुकडे खरंतर गाईंना टाकले जायचे. पण, आता गाईंपेक्षा अफगाण नागरिकच ते खात असल्याचं दुकानदार सांगतात.
शफी मोहम्मद गेल्या 30 वर्षांपासून काबूलमधील पुल-ए-केश्ती बाजारात शिळा नान विकतात. ते सांगतात, "पूर्वी ही भाकरी घ्यायला दिवसभरातून जवळपास पाच माणसं यायची. पण, हल्ली 20 पेक्षा जास्त जण येतात."
बाजारात खूप वर्दळ होती आणि ज्यांच्याशी आम्ही बोललो तो प्रत्येकच अफगाणी नागरिक देशावर ओढावलेल्या आर्थिक संकटाविषयी काळजी व्यक्त करत होता.
गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात तालिबानने अफगाणिस्ताचा ताबा घेतला. तेव्हापासून उत्पन्न निम्म्याहून खाली आल्याचं आणि अन्नधान्याची महागाई शिगेला पोहोचल्याचं सामान्य अफगाणी नागरिकांचं म्हणणं आहे.
शफी मोहम्मद मला त्या शिळ्या भाकरीच्या तुकड्यांनी भरलेल्या गोण्यांमधून त्यातल्या त्यात चांगले तुकडे काढून दाखवत होते आणि लोकही शिळ्या आणि जवळपास बुरशी लागण्याच्या मार्गावर असलेल्या भाकरीच्या तुकड्यांमधून अशाच पद्धतीने चांगले तुकडे शोधून घेऊन जात असल्याचं सांगत होते.
ते म्हणाले, "सध्या अफगाणिस्तानातल्या लोकांची परिस्थिती पिंजऱ्यात बंद केलेल्या त्या पक्षासारखी झालीय ज्या पिंजऱ्यात दाना-पाणीही नाही. मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की माझ्या देशातून हे दुःख आणि दारिद्र्य दूर व्हावं."

फोटो स्रोत, AFP
अफगाणिस्तानात हिवाळ्यात अन्नधान्याचा मोठा दुष्काळ पडण्याचा धोका लक्षात घेऊन मानवतावादी मदत पोहोचवली जात आहे. पण, ही मदत पुरेशी ठरणार नसल्याची भीती व्यक्त होत आहे.
ताालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर पाश्चिमात्य राष्ट्रांनी अफगाणिस्तानात सुरू असलेली विकास कामं बंद केली, मध्यवर्ती बँकेच्या ठेवीही गोठवल्या. अफगाणिस्तानातील नागरिक सध्या ज्या संकटाला सामोरे जात आहेत, त्यामागची ही महत्त्वाची कारणं असल्याचं सांगितलं जातं.
पाश्चिमात्य राष्ट्रांनी असे निर्णय घेण्यामागे तालिबानी राजवटीत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करणं, हाही एक भाग होता. मात्र, या निर्णयांचा थेट परिणाम तीन मुलांचे वडील असणाऱ्या हशमतुल्लाहसारख्या गरीब अफगाणी जनतेला भोगावे लागत आहेत .
हशमतुल्लाह बाजारात इतरांची ओझी वाहण्याचं काम करतात. या मजुरीतून त्यांना तुटपुंज उत्पन्न मिळायचं. या तुटपुंज्या उत्पन्नातही गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे.

शिळ्या भाकरीची पिशवी दाखवत ते बीबीसीला सांगतात, "मी सकाळपासून राबतो आणि एवढं करून मी इतकंच विकत घेऊ शकतो."
या शिळ्या भाकरीमागेही एक छोटा उद्योग आहे. भंगार गोळा करणारे रेस्टॉरंट, हॉस्पिटल्स आणि घराघरात जाऊन शिळ्या भाकरीचे तुकडे गोळा करतात आणि ते दलालांना पुरवतात. दलाल या शिळ्या, उष्ट्या भाकरी दुकानदारांना विकतात.
पण, जिथे निम्मा देशच भुकेला आहे तिथे पुरेसे भाकरीचे तुकडे तरी कसे मिळणार? सगळ्याचीच वाणवा आहे.
आठवडाभर फिरून गोळा केलेल्या भाकरीच्या तुकड्यांनी भरलेली बॅग दाखवत एक भंगारवाला सांगत होता, "लोकांची उपासमार होत आहे." पूर्वी दिवसातून एक बॅग भाकरी गोळा करायचो आणि आता त्यासाठी आठवडाभर हिंडावं लागत असल्याचं ते सांगतात.
एक भंगारवाले सांगत होते, "स्वच्छ, ताजी भाकरी मिळाली तर आम्ही स्वतःच ती खातो."

काबूलमधल्या एका गरीब भागातल्या आपल्या घरात हशमतुल्लाह मुलांसाठी स्वयंपाक बनवत होते. इतर अनेकांनी आपल्या मुलांची शाळा सोडून त्यांना कामावर पाठवाायला सुरुवात केली आहे.
पण, हशमतुल्लाह मुलांचं शिक्षण थांबू नये, यासाठी जीवाचं रान करत आहेत. पण, त्यासाठी त्यांना रोज कांदा-टोमॅटो घालून मऊ केलेल्या या शिळ्या भाकरीवरच जगावं लागतंय.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "मी गरीब आहे, यची मला लाज वाटते. माझ्या मुलांना मी चांगलं पोटभर जेवणंही देऊ शकत नाही."
खिन्न मनाने हसमतुल्लाह म्हणतात, "मी काहीही करू शकत नाही. कुणाकडून पैसे उसने घ्यायचं म्हटलं तरी कुणी मला देणार नाही. माझी मुलं खूप बारीक झाली आहेत. कारण त्यांना पुरेसं खायलाच मिळत नाही."
संपूर्ण काबूल शहरात बेकरी दुकानांबाहेर संध्याकाळी मोफत नान वाटप होतं. ताज्या नानच्या तुकड्यांसाठी या दुकानांबाहेर रोज संध्याकाळी मुली आणि महिलांच्या लांबच लांब रांगा लागतात. काहीजणी तर सकाळपासूनच इथे येऊन शिवणकाम करत बसतात.
तालिबानी राजवटीपूर्वी अफगाणिस्तानात जगभरातून अब्जावधी डॉलर्सची मदत येत होती. मात्र, त्यावेळीसुद्धा भ्रष्टाचार आणि युद्धामुळे इथल्या सामान्य माणसाचं आयुष्य म्हणजे संघर्षच होता. आता युद्ध संपलं आहे. पण, संघर्ष सर्वच अंगांनी अधिकाधिक कठीण होतो आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








