इंडिगोच्या विमानाला 13 तास उशीर, प्रवाशाने पायलटलाच फटकावलं

फोटो स्रोत, evgeniabelskaia/instagram
दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका प्रवाशाने पायलटला मारहाण केल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मागच्या काही दिवसांपासून उत्तर भारतात दाट धुक्यामुळे अनेक विमान उड्डाणांना उशीर होतो आहे.
दिल्ली विमानतळावर येणाऱ्या अनेक विमानांचे मार्ग बदलण्यात आलेत.
दिल्लीहून जाणाऱ्या विमानांची उड्डाणं उशिरा होत आहेत.
यालाच कंटाळून इंडिगोच्या (6E-2175) विमानात बसलेल्या एका प्रवाशाने पायलटला मारहाण केल्याचा प्रकार घडलाय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडिओमध्ये पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला एक माणूस पायलटवर हल्ला करताना दिसतो आहे. विमानातल्या एका प्रवाशाने ट्विटरवर (X) हा व्हीडिओ शेअर केलाय.
एका रशियन अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर या प्रकरणाचा व्हीडिओ शेअर केलाय. इव्हगेनिया बेलस्काया असं तिचं नाव असून ती आणि तिचे सहकारी या विमानातून प्रवास करत असल्याची माहिती आहे.
या विमानाच्या उड्डाणाला तब्बल 13 तास उशीर झाल्याची माहिती या व्हीडिओत देण्यात आलीय. साहिल कटारिया हे हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव असल्याची माहिती आहे.
विमानाला अधिक उशीर झाल्यामुळे फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन(FDTL)नुसार नवीन पायलट विमानात आले आणि ते याची माहिती प्रवाशांना देत असताना मागच्या रांगेत बसलेल्या या हल्लेखोराने पायलटवर हल्ला केल्याचं या व्हीडिओमध्ये दिसत आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त
नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या नियमांनुसार विमानातील कर्मचाऱ्यांना आराम करण्यासाठी वेळ मिळावा आणि त्यांच्या आरोग्यासाठी ठराविक कालावधीनंतर आराम करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. विमान प्रवासाची सुरक्षितता वाढविण्यासाठी हे नियम बनवण्यात आले आहेत.
या घटनेनंतर हल्लेखोराला अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
विमान प्रवासाची माहिती देणाऱ्या flightradar24 या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली विमानतळावरील 110 विमान उड्डाणं उशिरा झाली तर तब्बल 79 विमानं रद्द करण्यात आली.
याच पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याची माहिती आहे. दिल्ली विमानतळावरील अनेक विमानांना सरासरी 50 मिनिटांचा उशीर होत असल्याची माहिती आहे.

फोटो स्रोत, evgeniabelskaia/instagram
इंडिगो, स्पाईसजेट आणि विस्तारा यांसारख्या प्रमुख विमान कंपन्यांनी प्रवाशांना खबरदारीच्या सूचना दिलेल्या आहेत.
दिल्ली आणि कोलकाता येथील खराब हवामानामुळे उड्डाणांच्या वेळापत्रकावर आणखी परिणाम होऊ शकतो अशी माहिती त्यांनी दिलीय.
प्रवाशांची बेशिस्त सहन केली जाणार नाही - ज्योतिरादित्य सिंधिया
राजधानी दिल्लीतल्या प्रतिकूल हवामानामुळे अनेक विमानांच्या उड्डाणांना उशीर झाला आहे. यातच दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानातील एका प्रवाशाने पायलटवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विटरवर पोस्ट करून नागरिकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे.
सिंधिया यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये लिहिलं की, "या परिस्थितून निघण्यासाठी आवश्यक ते उपाय केले जातायत. यासोबतच धुक्यामुळे होणारा विलंब टाळण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असल्याची माहितीही त्यांनी दिलीय."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
धुक्यामुळे विमानांना उशीर होऊ नये यासाठी दिल्ली विमानतळाच्या धावपट्टी क्रमांक चारचा वापर तातडीने सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय. दिल्ली विमानतळावर कमी दृश्यमानतेच्या काळात विमानांना उतरण्यासाठी मदत व्हावी म्हणून CAT III धावपट्ट्या तयार करण्यात आलेल्या आहेत.
विमान वाहतुकीसाठी प्रवाशांची सुरक्षितता सर्वोपरी असून ती सुनिश्चित करण्यासाठी हे निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलीय.
विमान वाहतूक संचालनालयातर्फे (DGCA) या विलंबाचा त्रास होऊ नये म्हणून विमान कंपन्यांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आलेली आहेत, जेणेकरून खराब हवामानामुळे एखादं विमान रद्द होणार असेल किंवा त्याचं उड्डाण उशिराने होणार असेल तर अशा परिस्थितीत प्रवाशांशी योग्य संवाद साधला जावा.
'हेही नक्की वाचा'
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








