जपान एयरलाईन्सच्या जळत्या विमानातून 379 प्रवासी सुखरूप कसे वाचले?

फ्लाईट JAL 516 ची अपघातानंतरची दृश्यं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फ्लाईट JAL 516 ची अपघातानंतरची दृश्यं.
    • Author, संकलन - जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

एक विमान रनवेवर उतरत असताना त्याची दुसऱ्या छोट्या विमानाशी टक्कर होते. दोन्ही विमानं पेट घेतात.

छोट्या विमानातले सहापैकी पाचजण वाचू शकत नाहीत. पण मोठ्या विमानातले सगळे 379 प्रवासी सुखरूप बाहेर पडतात.

जपानची राजधानी टोकियोमध्ये हानेडा विमानतळावर 2 जानेवारी 2023च्या संध्याकाळी जपान एयरलाईन्सच्या फ्लाईट 516 या विमानाला झालेल्या या अपघातानं जगाचं लक्ष वेधून घेतलं.

अंधार पडत असताना ज्वाळांनी वेढलेल्या विमानाचं भयावह दृश्य पाहून यातलं कुणी वाचलं असेल का असा प्रश्न पडला होता. सगळेजण सुखरूप वाचल्याचं कळल्यावर अनेकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

एकीकडे कोस्ट गार्डच्या छोट्या विमानात जीवितहानी होते पण मोठ्या विमानातल्या केवळ काहींना थोडीफार दुखापत होते, हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं.

विमानानं पेट घेतल्यावरही सगळे प्रवासी सुखरूपपणे कसे बाहेर पडले? तुम्ही विमानप्रवास करत असताना आग लागली तर काय करायचं? इव्हॅक्युएशन म्हणजे सुरक्षित बाहेर कसं पडायचं? जाणून घेऊया.

जळत्या विमानातून 379 लोक कसे बाहेर पडले?

एवढ्या प्रवाशांचा जीव वाचण्यामागे काही प्रमुख कारणं असल्याचं हवाई सुरक्षा तज्ज्ञ सांगतात. पहिलं म्हणजे कुठलीही चूक न करता वेगानं झालेलं इव्हॅक्युएशन आणि दुसरं म्हणजे नवीन तंत्रज्ञान.

फ्लाईट अटेंडंट्स म्हणजे विमानातल्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत दाखवलेली तत्परता आणि प्रवाशांनी नियमांचं केलेलं पालन यामुळे इव्हॅक्युएशन वेगानं होऊ शकलं.

प्रवासी कसे वाचले हे पाहण्यासाठी आधी अपघातानंतरच्या काही क्षणांमध्ये काय घडलं, हे समजून घेऊयात.

तर, हे विमान उतरत असताना अखेरच्या क्षणीच हा अपघात घडला. म्हणजे त्याची कुठली पूर्वसूचना प्रवासी किंवा कर्मचाऱ्यांना नव्हती.

विमान उतरलं, तेव्हा अचानक कसला तरी हादरा बसला, एखाद्या स्पीडब्रेकरला गाडी आदळते तसं जाणवल्याचं काही प्रवाशांनी म्हटलं आहे.

BBC

विमान पूर्ण थांबलही नव्हतं तेव्हा प्रवाशांना विमानाबाहेर ठिणग्या उडताना दिसत होत्या. काहींनी ती दृश्यं फोनच्या कॅमेऱ्यात टिपली. लगेचच केबिनमध्ये म्हणजे प्रवासी बसतात त्या जागी धूर भरू लागला. उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या.

एका प्रवाशानं बीबीसीला सांगितलं की, “यादरम्यानच आम्हाला फ्लाईट अटेंडंटनी केलेली घोषणा ऐकू आली. विमानाचे मागचे आणि मधले दरवाजे उघडू शकणार नाहीत. सगळ्यांनी पुढच्या दरवाजातून बाहेर पडा.”

पुढच्या दरवाजातून स्लाईड्स म्हणजे रबरी घसरगुंड्या बाहेर पडल्या आणि त्यातून प्रवासी खाली उडी मारून उतरतानाची दृश्यं एका प्रवाशानं टिपली. उतरल्यावर सगळे विमानापासून दूर जातायत आणि कुणीही बॅगा वगैरे घेऊन बाहेर पडलेलं नाही. प्रवासी बॅगा वगैरे घेत बसले असते, तर बाहेर पडण्याची प्रक्रिया एवढ्या वेगानं होऊ शकली नसती.

JAPAN

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दुर्घटनेनंत जपान एयरलाईन्सच्या विमानाचा दोन पंखांमधला मुख्य भाग (फ्युसलाज) आगीत पूर्णतः नष्ट झाला.

हे विमान एयरबस कंपनीचं A350-900 प्रकारचं अद्ययावत विमान होतं आणि दोन वर्षांपासून वापरात होतं म्हणजे तुलनेनं तसं नवं होतं.

या प्रकारची विमानं बनवताना कार्बन फायबर काँपोझिट मटेरियल वापरलं जातं जे मजबूत असतं आणि धडक किंवा आगीचा बऱ्यापैकी सामना करू शकतं.

कर्मचाऱ्यांची तत्परता आणि जपानची शिस्त

जपानमधले लोकही नियमांचं पालन करण्याविषयी जागरूक असतात, त्यामुळे एकाही प्रवाशानं बॅगा वगैरे घेतलेल्या दिसत नाहीत, याकडेही तज्ज्ञांनी लक्ष वेधलं आहे.

2016 साली दुबई विमानतळावर एमिरेट्सच्या विमानानं क्रॅश लँडिंग केलं आणि पेट घेतला होता. केरळहून दुबईत गेलेल्या त्या विमानात साधारण 300 जण बालंबाल बचावले.

पण बाहेर पडताना लोक आपलं सामान काढण्याचा प्रयत्न करतायत आणि गोंधळ माजलाय, असं दर्शवणारा एक व्हिडियो तेव्हा समोर आला होता.

टोकियोमध्ये तसं घडलं नाही आणि सगळे सहीसलामत बाहेर पडले. लोकांइतकंच कर्मचाऱ्यांचं योगदानही महत्त्वाचं आहे.

या विमानातून बाहेर पडणं किती कठीण होतं, याविषयी ग्रीनविच विद्यापीठातले अग्निसुरक्षा अभियांत्रिकी गटाचे प्राध्यापक एड गॅली सांगतात,

“अपघातानंतर विमान ‘नोज डाऊन’ स्थितीत होतं - म्हणजे विमानाचा पुढचा भाग खाली झुकला होता. अशा स्थितीत विमानातून वाट काढणं प्रवाशांसाठी सोपं नसणार. ”

एयरलाईन्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जपान एयरलाईन्स

जपान एयरलाईन्सनं दिलेल्या माहितीनुसार विमानातली उद्घोषक यंत्रणा बंद पडली. तेव्हा कर्मचाऱ्यांनी मेगाफोन वापरून आणि मोठ्यामोठ्यानं ओरडून सूचना दिल्या.

कर्मचाऱ्यांनी अगदी नियमाला धरून सुरुवातीच्या काही महत्त्वाच्या मिनिटांमध्ये ही इव्हॅक्युएशनची प्रक्रिया पार पाडली, याकडे हवाई वाहतूक तज्ज्ञ अलेक्स मॅकेरासज यांनी लक्ष वेधलंय.

बीबीसी न्यूजला माहिती देताना ते म्हणाले, “सुरुवातीच्या 90 सेकंदांमध्ये विमानाच्या एका भागातच आग लागली होती. त्यामुळे सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी थोडा अवधी मिळाला. आगीपासून कुठले दरवाजे दूर आहेत, हे कर्मचाऱ्यांना लगेच लक्षात आलं, त्यामुळेच त्यांनी सगळे दरवाजे उघडले नाहीत.”

BBC

मुळात अशा परिस्थितीत काय करायचं, हे या विमानातल्या कर्मचाऱ्यांना माहिती होतं.

हवाई वाहतूक तज्ज्ञ प्रा. ग्रॅहम ब्रॅथवेट सांगतात, "जपान हा हवाई वाहतूक सुरक्षेच्या बाबतीत वर्ल्ड लीडर आहे. विमानातून लोकांना वेळेत बाहेर काढण्यात यश आलं, ही गोष्ट कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग किती योग्य पद्धतीनं झालं होतं, ते दाखवते."

विमानाला आग लागली तर काय करायचं, विमान पाण्यावर उतरवलं जाणार असेल तर काय करायचं, अशा आपात्कालीन स्थितीसाठी कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलं जातं.

जपान एयरलाईन्सची एक माजी कर्मचारी बीबीसीला सांगते की त्यांना दरवर्षी साधारण तीन आठवडे अशा पद्धतीचं ट्रेनिंग दिलं जातं आणि कर्मचारीही ही गोष्ट गांभीर्यानं घेतात.

मागच्या अपघातातून धडा

ऑगस्ट 1985 मध्ये जपान एयरलाईन्सच्या फ्लाईट 123 या विमानाला अपघात झाला होता ज्यात 520 जण मारले गेले होते. तो आजवरचा एकाच विमानाला झालेला सर्वांत प्राणघातक अपघात आहे.

खरंतर त्यात एयरलाईनची चूक नसल्याचं आणि विमाननिर्मिती करणाऱ्या बोईंग कंपनीच्या तंत्रज्ञांनी विमानाच्या शेपटीच्या भागात दुरुस्ती करताना केलेल्या चुकीमुळे अपघात घडल्याचं स्पष्ट झालं होतं.

JAL 123

फोटो स्रोत, Sankei Archive via Getty Images

फोटो कॅप्शन, 1985 साली जपान एयरलाईन्सचं फ्लाईट 123 जिथे कोसळलं, तिथलं दृश्य.

तरीही तो अपघात गांभीर्यानं घेतला गेला आणि जपान एयरलाईन्सनं पुन्हा अशी जीवितहानी होऊ द्यायची नाही असा चंग बांधला.

ग्रॅहम ब्रॅथवेट सांगतात की त्यानंतर जपान एयरलाईन्स ही जगातल्या सर्वांत सुरक्षित विमानसेवांपैकी एक बनली.

हानेडा विमानतळाजवळ जपान एयरलाईन्सच्या मुख्यालयात 1985 सालच्या अपघाताचं संग्रहालय आणि विमानाचे अवशेष ठेवण्यात आलेत, जेणेकरून कंपनीतल्या सर्वच कर्मचाऱ्यांना सुरक्षेचं महत्त्व सतत पटत राहील.

आता 2 जानेवारी 2024 च्या अपघातातही सुरक्षा आणि ट्रेनिंगवर भर देण्यामुळेच एवढे जीव वाचले आहेत, असं तज्ज्ञांना वाटतं.

विमानात अचानक आग लागली तर काय करायचं?

विमान आकाशात असताना किंवा जमिनीवर असताना आग लागली तर पायलट ते सुरक्षित जमिनीवर उतरवायचा प्रयत्न करतात आणि प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम केबिनमधले कर्मचारी करतात.

प्रवाशांनी अशा परिस्थितीत काय करायला हवं, याविषयी हवाई सुरक्षा मॅन्युअल्स आणि सुरक्षा तज्ज्ञांनी काही टिप्स दिल्या आहेत.

  • सर्वांत आधी, विमान उड्डाण घेण्याआधी फ्लाईट अटेंडंट्स सुरक्षेविषयी जी माहिती देतात, त्याकडे लक्ष द्या.
  • विमानात आपात्कालीन दरवाजे कुठे आहेत, तुमच्या जवळचा दरवाजा कुठे आहे, ते लक्षात ठेवा.
  • आपात्कालीन स्थितीत तुमचं सामान वगैरे घेण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्यात वेळ जातो आणि दुसऱ्यांनाही इजा होऊ शकते.
  • घाबरून, गोंधळून जाऊ नका. शांत राहून विचार करा. फ्लाईट अटेंडंट्स देत असलेल्या सूचनांकडे लक्ष द्या, त्यांना अशी परिस्थिती हाताळण्याचं ट्रेनिंग दिलेलं असतं आणि ते तुम्हाला बाहेर पडण्यास मदत करतील.
  • विमानातून बाहेर पडताना डोकं हातांनी झाकून घ्या, विमानात धूर पसरत असेल तर खाली वाकून चालत राहा.
  • इव्हॅक्युएशन स्लाईडवरून उतरावं लागणार असेल तर तुमचे शूज किंवा कुठली अणकुचीदार गोष्ट काढा, कारण त्यानं ही स्लाईड पंक्चर होऊ शकते.
  • खाली उतरल्यावर विमानापासून दूर जा, कारण विमानातल्या इंधनामुळे स्फोट होऊ शकतो.

(टोकियोतील रिपोर्टिंग - मारिको ओई आणि केली एनजी, बीबीसी न्यूज)

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)