टोकियोत विमानानं पेट घेतला, धावपट्टीवर उतरताच भडका, सगळे 379 प्रवासी सुरक्षित

व्हीडिओ कॅप्शन, विमानतळावर उतरल्यावर विमानाला आगीनं वेढलं

जपानची राजधानी टोकियोमध्ये विमानतळावर एक प्रवासी विमानानं एका दुसऱ्या लहान विमानाशी टक्कर झाल्यावर पेट घेतला.

जपान एयरलाईन्सचं JAL 516 हे विमान मंगळवारी (2 जानेवारी 2024) संध्याकाळी टोकियोच्या हानेडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत होतं, त्यावेळी हा अपघात घडला.

NHK या सरकारी वृत्तवाहिनीनं दिलेल्या माहितीनुसार रनवेवर उतरताना या विमानाची तटरक्षक दलाच्या (कोस्ट गार्ड) एका विमानाशी टक्कर झाली आणि आग लागली.

प्रवासी विमानात किमान 379 प्रवासी होते आणि त्या सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं. पण कोस्ट गार्डच्या विमानातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती टोकियो पोलिसांनी दिली आहे.

या छोट्या विमानातील पायलट बाहेर पडू शकला, पण तो गंभीर जखमी असल्याची माहिती स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिली आहे.

कोस्ट गार्डचं हे विमान निगाटा द्वीपकल्पावरील भूकंपग्रस्तांना मदत घेऊन चाललं होतं.

आदल्या दिवशीच जपानला भूकंपाचा मोठा धक्का (7.6 रिश्टर स्केल) बसला होता आणि त्यानंतर एक दिवसानं हा अपघात घडला आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

जपानच्या NHK या सरकारी वृत्तवाहिनीनं अपघाताचं फुटेज जारी केलं आहे.

त्यात या विमानाखालून आणि विमानाच्या खिडक्यांमधून आग येताना दिसली आणि नंतर संपूर्ण विमानानंच पेट घेतला. तसंच कोस्ट गार्डच्या विमानानंही पेट घेतला. रनवेच्या काही भागावरही आग पसरली.

नेमकं काय घडलं, कशामुळे ही टक्कर झाली असावी याचा तपास सुरू आहे.

अग्निशमन दलाचे कर्मचारी अजूनही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. आगीमुळे विमानाच्या शेपटीकडचा भाग आधी नष्ट झाला. संपूर्ण विमानच आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं.

दुर्घटनेच्या चार तासांनंतरही आग पूर्णपणे विझलेली नव्हती.

REUTERS/ISSEI KATO

फोटो स्रोत, REUTERS/ISSEI KATO

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, जपान एयरलाईन्सचं विमान हे एयरबस A350-900 प्रकारचं विमान होतं. ते दोनच वर्ष जुनं होतं.

या विमानानं सपारो शहरातल्या न्यू चितोसे विमानतळावरून उड्डाण केलं होतं आणि स्थानिक वेळेनुसार 17:40 वाजता (भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 10 वाजता) हानेडा विमानतळावर ते उतरणार होतं. पण उतरतानाच विमानाला अपघात झाला.

दुर्घटनेनंतर हानेडा विमानतळावरचे सगळे रनवे बंद करण्यात आले आहेत.

'कर्मचाऱ्यांमुळे 379 जण वाचले'

हवाई वाहतूक तज्ज्ञ आणि युकेमधल्या क्रॅनफील्ड विद्यापीठातल्या वाहतूक प्रणाली विभागाचे संचालक प्रा. ग्रॅहम ब्रॅथवेट यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार एवढ्या लोकांचा जीव वाचवण्याचं श्रेय जपान एयरलाईन्सच्या विमानातील कर्मचाऱ्यांना जातं.

JIJI PRESS/AFP VIA GETTY IMAGES

फोटो स्रोत, JIJI PRESS/AFP VIA GETTY IMAGES

फोटो कॅप्शन,

प्राध्यापक ब्रॅथवेट सांगतात की जपान हा वाहतूक सुरक्षेच्या बाबतीत 'वर्ल्ड लीडर' आहे.

ते सांगतात, "जपानचा याबाबतीतली आजवरची कामगिरी लक्षणीय आहे. विमानातून लोकांना वेळेत बाहेर काढण्यात यश आलं आहे आणि ही गोष्ट कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग किती योग्य पद्धतीनं झालं होतं, ते दाखवते."

"जपानमध्ये सुरक्षेवर भर दिला जातो, सगळे बाहेर पडल्यावर मग कर्मचारी बाहेर पडता. सध्या जे दिसतंय ते चित्र पाहता या कर्मचाऱ्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे."

विमानाच्या उड्डाणाआधी कर्मचारी सूचना देतात, आपात्कालीन परिस्थितीत काय करायचं याविषयी सांगतात. या सूचनांकडे लक्ष देणं किती महत्त्वाचं आहे हेही यानिमित्तानं पुन्हा दिसून आल्याचं प्रा. ब्रॅथवेट सांगतात.

विमानातून सुखरूप बाहेर पडलेल्या लोकांनी काही व्हिडियो शेअर केले आहेत. त्यात प्रवासी विमानातून बाहेर पडताना दिसत आहेत. आपण फक्त मोबाईल फोनसह कसे बाहेर पडलो हे काहींनी सोशल मीडियावर लिहिलं आहे.

हानेडा विमानतळ का महत्त्वाचा?

हानेडा विमानतळ टोकियोतल्या दोन मुख्य विमानतळांपैकी एक आहे. तसंच जपान एयरलाईन्स आणि निप्पॉन एयरलाईन्स या जपानमधल्या मुख्य एयरलाईन्सचा मुख्य तळ इथेच आहे.

फक्त जपानमधली देशांतर्गत हवाई वाहतूकच नाही तर आंतरराष्ट्रीय वाहतुकीच्या दृष्टीनंही हा विमानतळ महत्त्वाचा आहे. पूर्व आणि आग्नेय आशियातील महत्त्वाच्या शहरांना हाच विमानतळ जपानशी जोडतो.

साहजिकच इथे झालेल्या अपघाताचा परिणाम आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवरही होईल.

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)