हिंडनबर्ग दुर्घटना काय होती? तिला 'आकाशातलं टायटॅनिक' का म्हणतात?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
आताच्या बोईंग 747 विमानाच्या तिप्पट आकाराचं, आणि टायटॅनिकपेक्षा फक्त 80 फुट कमी लांबीचं उडतं जहाज होतं ते, त्याचं नाव हिंडनबर्ग. 6 मे 1937 साली याच हिंडनबर्ग एअरशिपचा हवेत स्फोट झाला आणि 36 लोकांचा मृत्यू झाला.
तिथून जगाच्या हवाई प्रवासाचं भविष्य बदललं. ही घटना घडली नसती तर कदाचित आजही आपण हवेत तरंगणाऱ्या फुग्यातून कुठेतरी प्रवास करत असतो.
आता या प्रसंगाची कथा सांगण्याचं आज औचित्य काय म्हणाल, तर साहाजिक आहे हिंडेनबर्ग हे नाव. गेल्या चार दिवसांपासून सतत कानावर आदळतंय, त्यावरून उलट-सुलट बोललं जातंय.
राजकारण, अर्थकारण ढवळून निघालं या हिंडनबर्ग शब्दाने. त्यामुळे या शब्दाचा ओरिजिन कसा झाला, काय आहे याची उगम कथा हे सांगायला हवं नाही का?
हिंडनबर्ग जगाच्या इतिहासातलं सर्वांत मोठं उडतं जहाज होतं. उडतं जहाज, म्हणजे शब्दशः उडतं जहाज. तेवढं मोठं, तेवढंच आलिशान, त्यात प्रवास करणाऱ्यांसाठी वेगळ्या केबिन, साग्रसंगीत जेवणाचा डायनिंग हॉल... तात्पर्य पाण्यावर तरंगणारं आलिशान जहाज असायचं, तसं हवेत उडणारं जहाज.
पायाच्या चार घड्या कराव्या लागतील इतकी लहान लेगस्पेस, आणि कोणता आर्मरेस्ट कोणाचा या भांडणात तुम्ही सध्याचा विमानप्रवास केला असेल तर हिंडनबर्गचं कौतुक वाटल्याशिवाय राहाणार नाही. मनात विचारही येईल, शी बाबा, आपल्या का नशीबात नाही हे? उत्तर साधं आहे, जिवंत राहायचं असेल तर नकोच.
सध्याची विमानं टीनच्या डब्ब्यासारखी असली तरी त्याने प्रवास वेगाने, आणि सुरक्षित होतो.
उडती जहाजं धोकादायक का होती? कारण त्यांचा अवास्तव आकार हे एक होतंच, दुसरं म्हणजे ही जहाजं मुळात एक लांबुडक्या आकाराचे फुगे असायचे. रॉड्स आणि इतर गोष्टींनी हे फुगे न फुगवताही त्याच आकारात राहायचे. मग यात हिलीयम किंवा हायड्रोजन वायू भरला जायचा. हे वायू जहाजाला हवेत न्यायचे.
तुम्ही हॉलिवूड पिक्चर्सचे फॅन असाल, आणि ‘अराऊंड द वर्ल्ड इन 80 डेज’, ‘इंडियाना जोन्स’, ‘ममी रिटर्न्स’, ब्लेड, ‘चिटी चिटी बँग बँग’, आणि डिस्नेचा ‘अप’ असे पिक्चर पाहिले असतील तर यात तुम्हाला एअरशिप दिसले असतील.
पण सततच्या लांबच्या प्रवासासाठी अशी उडती जहाजं सोयिस्कर नव्हती. कारण त्यात मानवी कंट्रोल कमी व्हायचा. फट् म्हणता काहीही होऊ शकत होतं. हायड्रोजन गॅस भरला असेल तर स्फोट होण्याची शक्यता अनेक पटींना वाढायची, पण अर्थात तेव्हाच्या लोकांना असं वाटत नव्हतं.
आता येऊ पुन्हा हिंडेनबर्गकडे. हिंडनबर्ग हा एक प्रपोगंडा होता, यात लोकांचे जीव पणाला लागले होते आणि एका हुकूमशाही सरकारने लोकांना ‘आपण किती भव्य’ हे जगाला दाखवण्यासाठी केलेली धडपड होती. पण यात सत्याचा अवशेष कमी होता, असं सांगितलं तर तुम्ही म्हणाल – काव्यात्मक न्याय.
असो, सुरुवातीपासून सुरू करू...
उडत्या जहाजांचा काळ
राईट बंधूंनी आपल्या पहिल्या विमानचं यशस्वी उड्डाण केलं ते 1903 साली. पण प्रत्यक्षात विमानांची टेक्नॉलॉजी वापरात येऊन लोकांनी दोन खंडांच्या दरम्यान प्रवास करण्यासाठी विमानांचा वापर करायला बरीच वर्षं गेली.
तोपर्यंत समुद्र ओलांडून जायचं एकच साधन होतं, ते म्हणजे जहाज.
थोड्या काळासाठी आकाशातल्या जहाजांनी लोकांचं लक्ष वेधलं खरं. पण ही उडती जहाजं आली कुठून?
1670 साली ख्रिश्चन धर्मगुरू फादर फ्रान्सेक्सो लाना दे टेर्झी यांनी ‘एरियल शीप’ (उडतं जहाज) चं एक डिझाईन प्रसिद्ध केलं. या डिझाईनमध्ये एका जहाजाला चार मोठे तांब्याचे पोकळ खांब लावले होते आणि या खांबांमधून हवा बाहेर फेकली जात होती.

फोटो स्रोत, Getty Images
अर्थात त्याकाळी असं डिझाईन प्रत्यक्षात येणं अशक्य होतं. पण तरीही उडण्याची कल्पना मांडली म्हणून त्यांना ‘हवाई प्रवासाचे जनक’ असं म्हटलं जातं.
1709 साली ब्राझीलियन पोर्तुगिज धर्मगुरू बार्टोलोमू डे गुस्तामाओ यांनी एक गरम हवेचा फुगा बनवला आणि तो उडवून दाखवला. पहिल्या प्रात्याक्षिकात तो फुगा जमिनीवरून न उठताच पेटला, दुसऱ्या प्रात्याक्षिकात मात्र 95 मीटर उंच उडाला.
1852 साली हेन्री ग्रिफीथ या माणसाने वाफेवर चालणारं एअरशिप तयार केलं आणि 27 किलोमीटरचा प्रवास त्यातून केला. जगाच्या इतिहासातलं हे पहिलं एअरशिप होतं. यानंतरच्या दोन दशकात एअरशिपच्या तंत्रज्ञानात खूप प्रगती झाली.
पण जगावर एकेकाळी राज्य करणाऱ्या एअरशिप्सचा उदय झाला 1900 साली. लुफ्टशिफ झेपलिन या जर्मन कंपनीने झेपलिन एअरशिप्सची निर्मिती करायला सुरुवात केली. एअरशिप्सच्या इतिहासातले सर्वात यशस्वी एअरशिप्स ठरले हे.
1906 साली त्यांनी आपलं तंत्रज्ञान सुधारून अजून चांगल्या प्रकारचे झेपलिन्स (एअरशिप्सला त्यांनी ठेवलेलं नाव) आणले. हिंडेनबर्गही यांनीच आणलं होतं.
म्हणजे ज्यांनी एअरशिप्सची सुरुवात केली त्यांनीच शेवट केला, पण त्याकडे थोड्या वेळाने येऊ.
पहिल्या महायुद्धात वापर
झेपलिन्सचं तंत्रज्ञान पहिल्या महायुद्धाच्या काळात आणखी सुधारलं. जर्मनीने या क्षेत्रात प्रगती केली होती त्यामुळे त्यांनी या तंत्रज्ञानाचा शस्त्र म्हणून वापर केला नसता तर नवलंच. इंग्लंडच्या शहरांवर बॉम्ब टाकायला या एअरशिप्सचा वापर केला गेला.
अर्थात हे एअरशिप्स पाडणंही खूप सोपं होतं. ते आकाराने इतके मोठे असायचे की अनेकदा त्याचे अपघात व्हायचे.
इटलीने टर्कीशी केलेल्या युद्धात या एअरशिप्सचा पहिल्यांदा बॉम्ब टाकण्यासाठी वापर केला. हळूहळू युरोपातल्या अनेक देशांनी बॉम्ब हल्ल्यांसाठी याचा वापर करायला सुरुवात केली.
पण आधी म्हटल्याप्रमाणे युद्धात या एअरशिप्सचा उपयोग कमी आणि उपद्रवच जास्त होता. एकतर बॉम्ब योग्य त्या ठिकाणी पडत नव्हते, दुसरं त्यामुळे शत्रू देशाचं फारसं नुकसानही व्हायचं नाही. दुसरी खालून आधुनिक दारूगोळ्याने हल्ला केला तर हे शिप्स फुटायचे.
त्यामुळे सगळ्यांच्या लक्षात आलं की हे पांढरे हत्ती युद्धात वापरण्यालायक नाहीत. 1917 साली युरोपियन देशांनी एकत्र येत ठरवलं की एअरशिप्स बॉम्ब हल्ल्यांसाठी वापरण्यायोग्य नाहीत.
दुसरीकडे विमानांच्या तंत्रज्ञानावर काम होत होतंच.
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटन, अमेरिका आणि जर्मनी एअरशिप्स बनवण्यावर भर देत होती.
लवकरच ब्रिटनच्या लक्षात आलं की या एअरशिप्समध्ये काही राम उरलेला नाही आणि त्यांनी विमान बनवण्यावर भर द्यायला सुरुवात केली.
अमेरिकेने तीन एअरशिप्स बनवले होते. काही यशस्वी उड्डाणंही या शिप्सने केली पण लवकरच तिन्ही उडत्या जहाजांचे अपघात झाले. जवळपास 50 हून जास्त लोकांचे या अपघातात मृत्यू झाले.

फोटो स्रोत, Getty Images
आता फक्त जर्मनी शिल्लक राहिलं होतं एअरशिप्सच्या धंद्यात. त्यांना काहीतरी भव्य करून दाखवायचं होतं आणि त्यांनी हिंडनबर्ग बनवलं.
काय घडलं त्या दिवशी?
त्या आधी या उडत्या जहाजाची रचना समजून घेऊ. हे एअरशिप 804 फुट लांब होतं. यातला थोडा भाग लोकांच्या प्रवासासाठी, तसंच जहाजाच्या कॅप्टनच्या केबिनसाठी होता. तरी आजच्या विमानाच्या तुलनेत भरपूरच जागा होती.
उरलेले सगळा भाग हायड्रोजन गॅस साठवण्यासाठी वापरला गेला होता. या हायड्रोजन वायूमुळेच हिंडनबर्ग उडू शकत होतं.
वरच्या आणि मागच्या भागात हायड्रोजन वायू असायचा. तर पुढे होड्यांच्या आकाराचे हौद होते. या हौदांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाची आणि प्रवाशांच्या बसण्याची, जेवणाची, झोपण्याची सोय होती.
खरंतर एअरशिप्ससाठी ज्वलनशील नसलेला हेलीयम वायू वापरणं जास्त योग्य होतं. तोच वायू जो आजकाल लहान मुलं खेळतात त्या उडत्या फुग्यांमध्ये भरलेला असतो.
पण त्याकाळी हेलियमवर अमेरिकेची मक्तेदारी होती. या वायूचे बहुतांश साठे अमेरिकेत होते. हेलीयमच्या निर्यातीवर अमेरिकेने बंदी घातली होती. 1935 पर्यंत जर्मनीत नाझीवादने चांगलाच जोर पकडला होता त्यामुळे नाझी जर्मनी अमेरिकेकडून मागच्या दाराने हेलियम विकत घेईल, त्यासाठी जास्तीचे पैसे मोजेल अशी शक्यता कमी होती.
नाझींच्या आधी जर्मनीत जे सरकार होतं त्यांनी अमेरिकेतल्या अधिकाऱ्यांना लाच देऊन हेलियम विकत घेतला होता पण आता तसं होणार नव्हतं.
दुसरा पर्याय होता हायड्रोजन हा ज्वलनशील वायू. त्यावरच रेटायचं ठरलं.
जर्मनीतलं फ्रँकफर्ट ते अमेरिकेतलं लेकहर्स्ट असा प्रवास तीन दिवसात होणार होता. अटलांटिक ओलांडायला फक्त तीन दिवस. त्याकाळी या दोन खंडातला प्रवास जहाजाने कमीत कमी महिना-दोन महिने चालायचा.
तीन दिवस म्हणजे काहीच नाही. हिंडेनबर्गच्या एका फेरीचं तिकीट जर्मनीमधल्या सामान्य माणसाच्या वार्षिक उत्पन्नाएवढं होतं. अशा उडत्या जहाजांमधून प्रवास करणं श्रीमंतांसाठीच बनलेलं होतं.
हिंडेनबर्गने 1936 साली म्हणजे हा अपघात व्हायच्या आदल्या वर्षी युरोप ते अमेरिका अशा 10 फेऱ्या मारल्या होत्या.
1937 चं प्रवासी वेळापत्रक सुरू झालं तसं मार्च महिन्यात ते एअरशिप ब्राझीललाही जाऊन आलं. 3 मे 1937 ला हिंडेनबर्ग फ्रँकफर्टहून निघालं आणि 6 मेला सकाळी ते अमेरिकेतल्या लेकहर्स्टला पोचणार होतं.
या उडत्या जहाजात एकूण 97 लोक होते. 36 प्रवासी आणि 61 कर्मचारी. हिंडेनबर्गमध्ये प्रवाशांसाठी 70 जागा होत्या, पण या प्रवासात त्यांनी निम्मेच सीट भरले होते.
लेकहर्स्ट फ्लाईंग स्टेशनवर मात्र 60 प्रवासी हिंडनबर्गची वाट पाहात होते. हे प्रवासी अमेरिकेहून युरोपला जाणार होते.

फोटो स्रोत, Getty Images
अटलांटिक पार करताना हिंडनबर्गला तुरळक वादळी वाऱ्यांचा सामना करावा लागला. पण इतर काही त्रास झाला नाही. पण त्यांना उशीर झाला होता. त्यात बोस्टनच्या पुढे वादळ आलं असल्यामुळे अजून उशीर झाला.
लेकहर्स्टला सकाळी पोचायचं, ते संध्याकाळी पोचलं. लेकहर्स्ट फ्लाईंग बेसवर गर्दी जमली होती. पत्रकार होते, बघे होते. तिथल्या लोकांनाही हिंडेनबर्ग आलेलं दिसलं.
ही एअरशिप्स जमिनीवर पूर्णपणे उतरायची नाहीत. तर फ्लाईंग बेसवर असलेल्या मोठ्या मोठ्या उंच खांबावर बांधली जायची.
हवेतून हळूहळू वेग कमी करत एअरशिप्स त्या खांबापर्यंत यायची. अर्थात हे वाटतं तेवढं सोपं नव्हतं. बरोबर योग्य ठिकाणीच एअरशिपचा योग्य तो भाग आला पाहिजे, तरच हे लँडिंग शक्य होतं.
अचूक जागा शोधण्याच्या नादात हिंडनबर्ग हवेतल्या हवेत तीनदा फिरलं. पण शेवटी चौथ्यांदा ते योग्य ठिकाणी आलं. संध्याकाळचे साडेसात वाजले होते. लँडिंगची प्रक्रिया सुरू असतानाचा जमिनीवरच्या काही प्रत्यक्षदर्शींना वरच्या भागातून वायूगळती होतेय असं दिसलं.
काहींनी म्हटलं की त्यांना निळ्या रंगाची ज्वाला दिसली.
काही क्षणातच हिंडनबर्गने पेट घेतला, लाल-पिवळ्या रंगाच्या ज्वाळांचा लोट उठला. हिंडेनबर्गचा स्फोट झाला होता.
एअरशिपमध्ये असलेल्या 97 लोकांपैकी 35 आणि जमिनीवरची एक व्यक्ती अशा 36 लोकांची जीव गेला.
अनेकांनी पेटत्या एअरशिपमधून उड्या टाकून आपला जीव वाचवला. पण जे वाचले तेही गंभीररित्या भाजले होते.
37 सेकंदात हिंडनेबर्गचा खेळ संपला होता.
घातपात घडवून आणण्याचं मोठं कारस्थान?
हिंडनबर्ग अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली ती घातपाताची. ही शक्यता ह्युगो एकनर यांनी बोलून दाखवली.
ह्युगो एकनर कोण, तर ज्यांनी हिंडनबर्ग प्रत्यक्षात आणलं. एअरशिप्स बनवणाऱ्या झेपलीन कंपनीचे ते माजी प्रमुख होते.
त्यांनीच जर्मन एअरशिप्समध्ये नवीन तंत्रज्ञान आणलं, संशोधन केलं. हिंडेनबर्गची आयडियाही त्यांचीच. पण पहिल्या महायुद्धानंतर जागतिक मंदी आली. त्यामुळे ह्युगोंना जगाच्या इतिहासातलं सर्वात मोठं एअरशिप हिंडेनबर्ग बनवण्यासाठी कोणी पैसे देईना.
हा प्रकल्प काही वर्षं बासनात गेला. पण नंतर उदय झाला नाझी जर्मनीचा. नाझी सरकारने हिंडनबर्गमध्ये पैसा ओतायची तयारी दाखवली, पण एका अटीवर... त्याबद्दलचे सगळे निर्णय सरकार घेईल.
नाझी जर्मनीला हिंडनबर्ग आपल्या प्रपोगंडासाठी हवं होतं. हळूहळू ह्यूगो एकनर यांच्या हातातून गोष्टी सुटत गेल्या.
हिंडनबर्गचा घातपात झाला असावा अशी शक्यता लेकहर्स्ट नेव्हल एअर स्टेशनचे प्रमुख चार्ल्स रोझेनडाहल यांनीही व्यक्त केली होती. त्यांनी या प्रसंगावर 1938 साली ‘व्हॉट अबाऊट द एअरशिप’ हे पुस्तकही लिहिलं होतं.
विमानाचे कॅप्टन मॅक्स प्रुस यांनाही वाटत होतं की घातपात झालाय.
त्यांनी 1960 साली कोलंबिया विद्यापीठात दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं की, “मी एअरशिप्सच्या एवढ्या फेऱ्या मारल्या कधी असं झालं. दक्षिण अमेरिकेत जर्मन पर्यटकांना घेऊन जाताना तर आम्ही जोराच्या वादळी वाऱ्यात सापडलो, दोनदा वीज एअरशिपवर कोसळली, तरी काही झालं नाही. त्यामुळे फक्त तांत्रिक गोष्टीमुळे हिंडनबर्गला आग लागली असेल हे शक्य नाही.”

फोटो स्रोत, Getty Images
एअरशिप्सच्या कर्मचाऱ्यांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली पण हेही ठामपणे सांगितलं की कर्मचाऱ्यांपैकी कोणी हे केलेलं नाही. कमांडर रोझनडाहल, कॅप्टन प्रुस आणि काही कर्मचाऱ्यांनी एका प्रवाशावर संशय व्यक्त केला.
त्याचं नाव होतं जोसेफ स्पेह. हा जर्मन जिमनॅस्ट होता आणि अपघातातून वाचला होता. जोसेफ हिंडनबर्गवर आला तेव्हा त्याच्याबरोबर एक कुत्रा होता. हा कुत्रा एअरशिपच्या मागच्या बाजूला एका पिंजऱ्यात ठेवला होता आणि त्याला खायला घालायच्या बहाण्याने जोसेफ अनेकदा जिथे प्रवाशांना यायला परवानगी नाही अशा भागात यायचा.
काही लोकांनी सांगितलं की जोसेफने प्रवासात अनेक नाझीविरोधी विनोद सांगितले आणि जेव्हा एअरशिपला लेकहर्स्टला पोचायला उशीर झाला तेव्हा तो खूपच अस्वस्थ झाला होता. तो कसरतपटू असल्याने जहाजाच्या कोणत्याही भागात चढून काहीही करू शकत होता असंही काहींना वाटतं.
नाझी राजवटीला विरोध करण्यासाठी त्याने हे केलं असा संशय काहींनी व्यक्त केला. त्याने विमान नष्ट करण्यासाठी बॉम्ब ठेवला असेल, त्याला लोकांना मारायचं नसेल, सगळे प्रवासी उतरून गेल्यावर त्याचा बॉम्ब फुटणार असेल पण एअरशिप पोचायला 12 तास उशीर झाल्याने त्यांचं वेळापत्रक बिघडलं आणि म्हणून लोकांचे जीव गेले असे उल्लेख काहींनी केलेले आढळतात.
1962 साली ए ए होहिलिंग या लेखकाने ‘हू डिस्ट्रॅईड हिंडेनबर्ग’ हे पुस्तक प्रकाशित केलं. यात एरिक श्पेल या कर्मचाऱ्यावर संशय व्यक्त केला होता. यात म्हटलं होतं की की श्पेलची गर्लफ्रेंड कम्युनिस्ट होती आणि नाझीवादाची विरोधक होती.
जिथे आग लागली त्या गॅस सेल 4 पाशी स्पेल होता. पण श्पेलचा हिंडनबर्ग अपघातात मृत्यू झाला होता.
पुढे स्पेह आणि श्पेल दोघांच्या विरोधात काही पुरावे सापडले नाहीत.
काहींनी म्हटलं की नाझी जर्मनीला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेनेच हिंडनबर्गवर हल्ला केला तर काही म्हणतात हिटलरनेच हिंडनबर्गमध्ये स्फोट घडवून आणला कारण त्याचा निर्माता ह्युगो एकनर नाझीविरोधी मतांचा होता.
जर्मन किंवा अमेरिकन तपासकर्त्यांना घातपाताचे पुरावे मिळाले नाहीत. यावरही काहींनी म्हटलं की नाझी जर्मनीने हे पुरावे हेतुपुरस्सर दाबून टाकले नाहीतर जगात त्यांची मान शरमेने खाली गेली असती.
तांत्रिक गडबडींमुळे आग
हाही एक प्रवाद आहे. अनेकांचं म्हणणं आहे की हिंडनबर्गमध्ये तांत्रिक गडबड झाल्यामुळे हायड्रोजन वायूचा स्फोट झाला आणि आग लागली.
हायड्रोजन ज्वलनशील वायू असतो त्यामुळे अश एअरशिप्समध्ये धुम्रपानासाठी किंवा स्वयंपाकासाठी वेगळ्या खास खोल्या असायच्या. इथलं केबिन प्रेशर वेगळं असायचं कारण एका ठिणगीने हायड्रोजन पेट घेऊ शकत होता.
घातपात झाला नाही असं म्हणणाऱ्यांपैकी काही म्हणतात की स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी (स्थिर विद्यूत प्रवाह) मुळे ठिणगी उडाली म्हणून असं झालं.

फोटो स्रोत, Getty Images
स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे शाळेत असताना प्लास्टिकची पट्टी केसांवर घासून आपण कागदचे कपटे उचलायचा प्रयत्न करायचो ना, किंवा थंडीच्या दिवसात केसातून कंगवा फिरवताना केसांत जाणवते ती. याचमुळे ठिणगी उडाली आणि हायड्रोजनला आग लागली असं काहींचं म्हणणं आहे.
तर काहींना वाटतं त्या दिवशी लेकहर्स्टमध्ये पाऊस पडत होता, त्यावेळी जोराची वीज कडाडल्याने किंवा हिंडेनबर्गवर पडल्याने हायड्रोजन पेटला असावा.
शेवटची थिअरी अशी आहे की खांबावर लँड करता करता इंजिन फेल झालं असावं आणि त्यामुळे ठिणग्या उडाल्या असाव्यात.
हिंडनबर्ग घटनेला आज 86 वर्षं होऊन गेली आहेत. त्या घटनेवर असंख्य पुस्तकं, चित्रपट, डॉक्युमेंट्रीज, आता तर पॉडकास्ट निघाले आहेत. इंग्लिश भाषेत एखाद्या गोष्टीचा ‘हिंडनबर्ग होणे’ म्हणजे ‘वाटोळं होणे’ असा वाक्प्रचारही प्रचलित आहे.
हिंडनबर्ग घटनेनंतर या उडत्या जहाजांना उतरती कळा लागली. दुसऱ्या महायुद्धाची बीजं रोवली जात होती त्यामुळे विमानांना अधिकाधिक अचूक, सुरक्षित बनवण्यावर युरोप अमेरिकेतले शास्त्रज्ञ काम करत होते.
1914 साली न्यूयॉर्क ते टँपा असा पहिला व्यावसायिक विमानप्रवास घडला होता. या घटनेनंतर 21 वर्षांनी, 1958 साली पहिली व्यावसायिक ट्रान्सअंटलांटिक – म्हणजे अटलांटिक समुद्र ओलांडून युरोप ते अमेरिका असा प्रवास करणारी फ्लाईट टेकऑफ झाली. हवाई प्रवासाचं भविष्य बदललं.
पण 6 मे 1937 या दिवशी नक्की काय झालं हे ठोसपणे कुणाला कळलेलं नाही. ऐतिहासिक गोष्टींचं असंच असतं नाही का? त्या सत्याला अनेक बाजू असतात आणि प्रत्येकाला आपली बाजू खरी वाटते.
हिंडनबर्ग संशोधन संस्थेनी हे नाव का घेतलं?
जगातील सर्वांत मोठ्या उद्योजकांपैकी एक उद्योजक असलेल्या गौतम अदानी यांच्या अदानी समूहावर एक अहवाल 'हिंडनबर्ग रिसर्च' या संशोधन संस्थेनी प्रकाशित केला.
त्यानंतर हिंडनबर्गची चर्चा सर्वत्र सुरू झाली. या संस्थेनी आपले नाव हिंडनबर्ग या दुर्घटनेवर ठेवले आहे. हे नाव त्यांनी का ठेवलं असा प्रश्न अनेकांना असू शकतो.
तर संशोधन संस्थेचं म्हणणं असं आहे की ही दुर्घटना टाळता आली असती. याच घटनेचं रूपक वापरून ते म्हणतात की शेअर बाजारातील खाचखळगे पाहून अर्थव्यवस्थेतील घटना टाळता येऊ शकतात आणि आम्ही तेच काम करतो. म्हणून हिंडनबर्ग या संस्थेचं नाव त्यांनी या दुर्घटनेवरून दिलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








