हिटलरच्या सैन्याला चकवत खोटी कागदपत्रं बनवून ज्यूंचे प्राण वाचवणारा 'गे' चित्रकार

नाझी, हिटलर, ज्यू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अडॉल्फ हिटलर
    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी

"एखादा समाज जेव्हा जाणीवपूर्वक काय लक्षात ठेवायचं आणि काय विसरायचं याची निवड करतो, तेव्हा ती निवड इतिहासाबद्दल आणि वर्तमानकाळाबद्दलही बरंच काही सांगून जाते."

युनायटेड स्टेट्स हॉलोकास्ट मेमोरियल संग्रहालयाचे युरोप विभागाचे क्युरेटर असणाऱ्या डॉ क्लाऊस म्युलर यांनी एका कार्यक्रमात उच्चारलेलं हे वाक्य.

याचा इथे माझ्या लेखाच्या सुरुवातीला उल्लेख का ते सांगायचं झालं तर, दुसऱ्या महायुद्धातल्या अनेक कथा आपल्याला माहिती आहेत. हिटलरचा साम्राज्यवाद शाळा-कॉलेजच्या पुस्तकात अभ्यासला आहे.

विन्स्टन चर्चिलचं 'शेवटचा माणसाच्या अंगात शेवटचा रक्ताचा थेंब शिल्लक असेपर्यंत लढणार' हे भाषणही अनेकांनी इतिहासात वाचलं असेल, डॉक्युमेंट्रीत पाहिलं असेल, हिटलरच्या छळछावण्या, ज्यूंचा नरसंहार, मित्रराष्ट्रांचा विजय, त्यानंतर बदललेल जगाचा इतिहास-भूगोल यातलं थोडंफार तरी अनेकांना माहिती असेलच.

फक्त एका विशिष्ट वर्गाने सोसलेल्या हालअपेष्टा आणि त्यांच्यातल्या काही धाडसी व्यक्तींनी दिलेला लढा सोडून.

12 वर्षांच्या नाझी कालखंडात हिटलरच्या सैन्याने 1 लाख LGBTQ समुदायाच्या लोकांना अटक केली. नाझी राजवटीने एक कायदा पास केला होता ज्यामध्ये कोणत्याही दोन पुरुषांनी एकमेकांशी कोणत्याही प्रकारची शारिरीक जवळीक साधणं गुन्हा होता.

हा कायदा महिलांना लागू नव्हता कारण नाझी अधिकाऱ्यांना वाटलं की लेस्बियन स्त्रियांना 'हे खूळ' सोडून देण्यासाठी एकतर 'समजावलं' जाऊ शकतं किंवा जबरदस्ती करून त्यांच्याकडून शुद्ध आर्य रक्ताची मुलं जन्माला घालून घेता येऊ शकतात.

युनायटेड स्टेट्स हॉलोकास्ट मेमोरियल (ज्यूंचा जो नरसंहार हिटलरने केला त्याला हॉलोकास्ट असं म्हणतात) संग्रहालायाशी संलग्न असलेल्या इतिहासकार एडना फीडबर्ग यांनी या संग्रहालयाच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं होतं की जवळपास 15 हजार गे पुरुषांना नाझी सैन्याने तुरुंगात पाठवलं, कधी छळछावण्यांमध्ये पाठवलं तर कधी त्यांच्यावर चित्रविचित्र एक्सपेरिमेंट केले. या प्रयोगांचा उद्देश अशा 'समलैंगिकतेवर उपचार' शोधून काढणं हा होता.

1945 नंतर दुसरं महायुद्ध संपलं तसा होमोफोबिया, LGBTQ समुदायाबद्दल सामुदायिक घृणा बाळगण्याचा काळ सुरु झाला. महिलांनी पुन्हा आपल्या चूल आणि मूल या कर्तव्याकडे वळावं अशी अपेक्षा होती.

लेबेन्सबॉर्न योजनेतून दुसऱ्या महायुद्धादरम्यान जन्माला आलेली मुलं

फोटो स्रोत, Getty Images

जी राष्ट्र हिटलर आणि फॅसिझमच्या विरोधात लढली त्यात सगळेच पुरुष सैनिक होते. हिटलरने ज्या देशांवर आक्रमण केलं होतं अशा देशांमध्ये भूमिगत कार्यकर्ते लढत होते, खुद्द जर्मनीत काही लोक ज्यूंना वाचवण्यासाठी प्राण पणाला लावत होते.

"या लोकांमध्ये महिला होत्या, LGBTQ समुदायाचे लोक होते पण युद्ध संपल्यावर ज्यांच्या शुरवीरतेच्या गाथा लक्षात ठेवल्या गेल्या ते होते फक्त हेटरोसेक्शुअल (भिन्नलिंगी) पुरुष," क्लाऊस म्हणतात.

दुसऱ्या महायुद्धात बळी पडलेल्या, लढलेल्या आणि जिंकलेल्या LGBTQ समुदायातल्या व्यक्तींचा नंतर जगाला विसर पडला. कित्येक दशकांनी जेव्हा काही लोकांनी इतिहासाची पानं चाळली तेव्हा या लोकांचे उल्लेख आले आणि त्यांचं कार्य जगासमोर आणलं गेलं. त्यातल्याच एका धाडसी चित्रकाराची ही कहाणी. विलेम ऑरोन्ड्यस.

विलेम एक नेदरलँड्सचे राहाणारे होते. हूज हू इन गे अँड लेस्बियन हिस्ट्री : फ्रॉम अँटिक्विटी टू वर्ल्ड वॉर टू या पुस्तकात त्यांच्या लहानपणाविषयी सांगितलं आहे.

विलेम सात भावंडांपैकी एक होते. त्यांचे वडील नाट्य कलाकारांचे कपडे बनवायचं काम करायचे. विलेमला लहानपणापासून कलेची आवड होती. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे लहान विल्यमच्या आधीच लक्षात आलं होतं.

आपल्याला मुली आवडत नाहीत, मुलं आवडतात. आपण 'गे' आहोत हे जेव्हा वयात येणाऱ्या विलेमला कळलं तेव्हा घरात संघर्ष सुरू झाला.

नक्की काय वाद झाला याचे तपशील उपलब्ध नाहीत पण विल्यमच्या लैंगिकतेवरून त्यांच्या घरचे त्याला स्वीकारत नव्हते. म्हणूनच वयाच्या 18 व्या वर्षी त्याने घर सोडलं.

मतभेद इतके तीव्र होते की त्याने नंतर कधीही घराकडे मागे वळून पाहिलं नाही.

नाझी, हिटलर, ज्यू

फोटो स्रोत, HULTON ARCHIVE

फोटो कॅप्शन, हिटलर

विलेमने अनेक चित्रकरांशी दोस्ती केली, कलाशाळेत अधून मधून जायला लागला. पण तरी कलाकार म्हणून त्याच्या वाटेला ना प्रसिद्धी आली ना पैसा.

त्याला पहिलं मोठं काम मिळालं ते वयाच्या 28 व्या वर्षी. नेदरलँड्समधल्या रॉटरडॅम शहरातल्या सिटी हॉलमध्ये त्याने भलंमोठं चित्र काढलं. याचे त्याला बऱ्यापैकी पैसे मिळाले. अजून काही कामं मिळाली, वर्तमानपत्रांमध्ये कौतुक छापून आलं. आता कुठे विल्यमच जम बसत होता.

पण त्याकाळच्या प्रथेच्या विपरीत, विल्यमने कधी लपवून ठेवलं नाही की ते गे आहेत. चित्रकार म्हणून काम करत असतानाही ते आपल्या एका पार्टनरसोबत राहात होते.

चित्रकार म्हणून जम बसत असतानाच अचानक त्यांनी चित्रकला सोडली आणि लिखाण सुरू केलं. त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहाला काही फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

पण अनेक वर्षं त्यांनी डायरी लिहिली. या डायऱ्या त्यांच्यामृत्यूनंतर सापडल्या आणि यात त्यांनी आपल्या एकाकी आयुष्याबदद्ल, प्रेमाबद्दल आणि आपल्या लैंगिकतेबद्दल खुलेपणाने लिहिलेलं आहे.

विलेमचा वैयक्तिक आयुष्यात झगडा चालू होता, पैशांचा ओघ आटला होता आणि याचवेळी एक गोष्ट घडली ज्याने विलेमच्या आयुष्याला दिशा मिळणार होती, तो आयुष्यभर जे ध्येय शोधत होता ते गवसणार होतं.

मे 1940 मध्ये जर्मनीने नेदरलँड्सवर हल्ला केला आणि तो संपूर्ण देश ताब्यात घेतला.

नाझी सैन्याची राजवट नेदरलँड्समध्ये सुरू झाली. तिथल्या ज्यूंना त्यांनी हाकलायला सुरूवात केली. जर्मनीतून पळून आलेल्या अनेक ज्यूंनी नेदरलँड्समध्ये आश्रय घेतला होता. त्यांना आता पुन्हा जीव वाचवून जायला दुसरी वाट शोधणं खडतर झालं. अनेकांना अटक झाली, छळ छावण्यांमध्ये पाठवलं. तिथे त्यांचे छळ सुरू झाले.

याच सुमारास नाझी राजवटीने आणखी एक कायदा आणला. दोन पुरुषांमधले संबंध गुन्हा ठरवण्याचा. विलेम यांनी आपली ओळख कधी लपवली नव्हती पण या नव्या कायद्याने त्यांना अटक होऊ शकत होती आणि छळछावणीमध्येही पाठवलं जाऊ शकत होतं.

नाझी, हिटलर, ज्यू

फोटो स्रोत, Sepia Times

फोटो कॅप्शन, प्रसिद्ध चित्र

अजून एक कायदा पास झाला. सगळे कलाकार, मग त्यात चित्रकार असतील, शिल्पकार, नाटककार, संगीतकार, लेखक, आर्किटेक्ट सगळ्यांना आता नव्याने स्थापन झालेल्या नाझी जर्मन चेंबर ऑफ कल्चरमध्ये नोंदणी करणं गरजेचं होतं. ही नोंदणी नसेल तर ते कामच करू शकणार नव्हते.

क्लाऊस आपल्या युनायटेड स्टेट्स हॉलोकास्ट मेमोरियल संग्रहालयातल्या कार्यक्रमात म्हणतात, "ज्यू या संस्थेत नोंदणी करूच शकत नव्हते. म्हणजे त्यांना असंही कलेव्दारे उपजीविका करण्याची परवानगी नाकारली होती. कारण यात नोंदणी केलेले कलाकरच आपली चित्रं विकू शकत होते, पुस्तकं लिहू शकत होते, इमारती डिझाईन करू शकत होते. विलेम खरं ज्यू नव्हते, त्यांनी मनात आणलं असतं तर या नाझी चेंबरचा सदस्य होऊन ते आयुष्यभर आपलं काम करत राहू शकले असते. पण त्यांच्या मनात हा विचारही कधी आला नाही."

भूमिगत बंडखोर

नाझी आक्रमणानंतर ज्यू लोकांचे, समलैंगिकांचे छळ होत होते. विल्यम या काळात भूमिगत बंडखोर कार्यकर्त्यांच्या चळवळीत सहभागी झाले. या चळवळीला डच रेझिस्टन्स असं नाव होतं.

डच रेझिस्टन्सचे भूमिगत बंडखोर नेदरलँड्सचे नागरिक होते आणि त्यांच्या देशावर झालेल्या नाझी आक्रमणाचा विरोध करत होते. त्यातले अनेक कार्यकर्ते ज्यूंची मदत करत होते, त्यांना लपायला जागा मिळवून देत होते, त्यांच्यासाठी खोटी कागदपत्रं बनवत होते.

इथेच विलेम यांना खऱ्या अर्थाने आपल्या जगण्याचं सार सापडलं. चळवळीतला कार्यकर्ता ही ओळख त्यांना नवी जिद्द देऊन गेली.

डॉ क्लाऊस म्युलर यांनी विलेम यांच्या डायऱ्या वाचलेल्या आहेत, त्यांच्या अभ्यास केलाय. ते म्हणतात, "तुम्ही सुरुवातीच्या डायऱ्या वाचा, तुम्हाला असा एक माणूस भेटेल जो गोंधळलेला आहे, गरिबीने त्रस्त आहे, आपल्या लैंगिकतेवरून त्याचा समाजाशी झगडा सुरू आहे. ठिकठिकाणी घरमालक त्याला घराबाहेर काढतात, त्याच्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे. त्याला स्वतःच्या कलेबद्दल संशय आहे, स्वतःच्या यशाबद्दल खात्री नाही. असा माणूस जो कायम स्वतःला या जगात एकटा समजत आला आहे."

नाझी, हिटलर, ज्यू

फोटो स्रोत, KEYSTONE/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, हिटलर

पण रेझिस्टन्स जॉईन केल्यानंतर जणू विलेमचा पुनर्जन्म झाला. याच एका क्षणाची, या लोकांची वाट पाहत असल्यासारखं विलेमला वाटायला लागलं. इतर बंडखोर कार्यकर्ते त्याचं कुटुंब बनले आणि त्याला कधीच एकटं वाटलं नाही.

याच चळवळीतल्या दुसऱ्या एक लेस्बियन कार्यकर्त्या फ्रिडा बेलफान्टे यांनी वयाच्या नव्वदाव्या वर्षी क्लाऊस यांना दिलेल्या एका मुलाखतीत या बदलेल्या विलेमविषयी सांगितलं.

त्या म्हणतात, "एक दिवस आम्ही गप्पा मारत होतं. मी त्याला विचारलं, तुला वाटतं का आपण या युद्धाचा शेवट पाहायला जिवंत असू?"

विलेम म्हणाले, "नाही. मला नाही वाटतं आपल्या डोळ्यासमोर ते घडेल, पण आत्ता याक्षणी ही लढाई सोडून दुसरं काहीही करायचा विचारही माझ्या डोक्यात येत नाही. मी असाच मेलो तरी चालेल, हेच करताना मरायची माझी इच्छा आहे."

असं काय करत होते विलेम, फ्रीडा आणि डच रेझिस्टन्सचे कार्यकर्ते?

विलेमच्या डच रेझिस्टन्ससोबतच्या कामाची सुरुवात पॅम्फलेट डिझाईन करण्यापासून झाली. ते नाझी राजवटीच्या छळाची माहिती देणारी, ज्यूंच्या हालअपेष्टांचं वर्णन करणारी पत्रकं बनवायचे. हे काम धोकादायक होतं.

पण फ्रीडा आणि त्यांचं मुख्य काम ज्यू लोकांसाठी खोटी ओळखपत्रं बनवणं हे होतं. याचं महत्त्वाचं कारण होतं की नाझी आक्रमणाआधीही नेदरलँड्स सरकारने त्यांच्या नागरिकांची सगळी माहिती गोळा केली होती. नेदरलँड्समध्ये एक नॅशनल रजिस्ट्री होती ज्यात नागरिकांचं नाव, गाव, पत्ता, धर्म, लिंग अशी माहिती नोंदवून ठेवली होती.

नाझी आक्रमणानंतर त्यांनी ही माहिती आयतीच मिळाली. आता ते नेदरलँड्समधला एकन् एक ज्यू व्यक्ती शोधून काढून त्यांना तुरुंगात टाकू शकत होते, छळछावणीत पाठवू शकत होते, देशातून हाकलवून लावू शकत होते.

जर्मन सैन्याने डच रजिस्ट्री ऑफिसमधून ही माहिती घेतली आणि प्रत्येक ज्यूच्या ओळखपत्रावर कॅपटल अक्षरात 'J' लिहायचं बंधन डच अधिकाऱ्यांवर घातलं. आता रस्त्यावरून चालणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचं ओळखपत्र तपासून तो ज्यू आहे की नाही हे कळणार होतं.

डच ज्यू लोक नाझी सैन्याच्या हातात सहजासहजी सापडू नये म्हणून डच रेझिस्टन्सचे लोक प्रयत्न करत होते.

फ्रीडा आणि इतर सदस्य अशी खोटी ओळखपत्रं बनवत होते ज्यावर 'J' लिहिलेलं नव्हतं. आणि अशी ओळखपत्रं ज्यू लोकांना देत होते, म्हणजे ते नाझी सैन्याच्या हातात जरी सापडले तरी आपलं खोटं ओळखपत्र दाखवून निसटू शकत होते.

नाझी, हिटलर, ज्यू

फोटो स्रोत, United States Holocaust Memorial Museaum

फोटो कॅप्शन, विलेम

30 हजार ज्यू त्या काळात लपून बसले होते. परिस्थिती भयानक होती. जिची डायरी नंतर प्रसिद्ध झाली त्या अॅन फ्रँकचं कुटुंबही यातलंच एक. पण त्यांचा एका ओळखीच्या माणसाने विश्वासघात केला आणि तिच्या कुटुंबाला जीव गमवावा लागला.

रोजच ज्यू लोकांचे जीव जात होते. फ्रीडा आणि विलेमच्या गटाने जवळपास 70 हजार खोटी ओळखपत्रं तयार केली. इतक्या मोठ्या प्रमाणावर खोटी ओळखपत्रं वितरीत होणं धोक्याचं होतं.

सगळं नेटवर्क पकडलं जाण्याची भीती होती. डच रेझिस्टन्सच्या लोकांना लक्षात आलं की जर मुख्य रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये एका जरी नाझी अधिकाऱ्याने नोंदी तपासून पाहिल्या तर खोट्या ओळखपत्रांचा बाजार उठेल आणि कोणीच वाचणार नाही.

मग आता यावर उपाय काय? विलेम आणि सहकाऱ्यांनी एक धाडसी पण तितकीच धोकादायक योजना आखली. देशाच्या प्रत्येक मोठ्या शहरात नागरिकांच्या नोंदीचं मुख्य ऑफिस होतं.

या कार्यकर्त्यांनी अॅमस्टडॅममधलं नोंदणी ऑफिस बॉम्बने उडवून द्यायचं ठरवलं. ही योजना जर यशस्वी झाली असती तर मग सगळ्यांच नोंदी भस्मसात झाल्या असत्या आणि कोणती ओळखपत्रं खरी आणि कोणती खोटी हे कळायला काहीच जागा राहिली नसती.

अनेक महिने याची तयारी चालली. त्यांनी घरच्या घरी बॉम्ब तयार केले. आपल्या सुत्रांच्या मदतीने त्यांनी माहिती मिळवली की कोणत्या प्रकारचं कापड डच पोलिसांच्या युनिफॉर्मममध्ये वापरलं जातं.

नाझी, हिटलर, ज्यू

फोटो स्रोत, STEFFEN KUGLER/GETTY

फोटो कॅप्शन, मॅडम तुस्साद संग्रहालयातील हिटलरच्या पुतळ्याचे संग्रहित छायाचित्र

तसं कापड त्यांनी मिळवलं. एक गे टेलर होता ज्यांनी या लोकांना मदत म्हणून त्यांचे युनिफॉर्म शिवून दिले.

शनिवार, 27 मार्च 1943 चा दिवस उजाडला. अनेक महिन्यांच मेहनत कामाला येणार की सगळं वाटोळं होऊन सगळे पकडले जाणार हे या दिवशी ठरणार होतं.

संध्याकाळच्या सुमारास विलेम आणि त्याचे सहकारी डच पोलिसांचा युनिफॉर्म घालून रजिस्ट्री ऑफिसमध्ये गेले. त्यांनी असं भासवलं की बॉम्बची टीप मिळाल्यामुळे ते तिथे झडती घ्यायला आलेत.

सुरक्षारक्षकांना गुंतवून ठेवलं. तेवढ्यात त्यांच्यातल्या दोन शिकाऊ डॉक्टरांनी या सुरक्षारक्षकांना भुलीचं इंजेक्शन दिलं. हे शिकाऊ डॉक्टर नंतर बेशुद्ध पडलेल्या सुरक्षारक्षकांना घेऊन रस्त्याच्या पलीकडे गेले.

गटातल्या इतर सदस्यांनी रजिस्ट्री ऑफिसच्या प्रत्येक खोलीत बॉम्ब ठेवले. शेवटचा सदस्य बाहेर येता येता त्यांनी इमारतीबाहेर 'धोकादायक' असे बोर्ड ठेवले. कोणालाही जखमी करायची त्यांची इच्छा नव्हती.

दोन मिनिटं भयाण शांततेत गेली आणि आवाज झाला 'धडाम'. बॉम्ब फुटले होते. योजना फत्ते झाली होती. रजिस्ट्री ऑफिसमधल्या सगळ्या कागदांचा कोळसा झाला होता. जर्मन सैन्याला जबरदस्त धक्का बसला होता.

पण याची जबरदस्त किंमत त्यांना मोजावी लागली. गद्दारीचा शाप कोणत्याच लढवय्यांना चुकला नाहीये.

विलेम आणि त्यांच्या सहकाऱ्यांबाबत असंच झालं. काही दिवसात जर्मन पोलिसांपर्यंत कटात सहभागी असणाऱ्या सगळ्या लोकांची नावं आणि फोटो पोहचले.

रजिस्ट्री ऑफिस उडवून देण्याच्या कटात जे जे सहभागी होते सगळ्यांना अटक झाली. त्यांनी इतर साथीदारांची नावं सांगावीत म्हणून त्यांचा अन्वनित छळ झाला.

नाझी, हिटलर, ज्यू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हिटलर आणि त्याचं सैन्य

या लोकांना कडक शिक्षा करून नाझी सैन्याला लोकांपुढे उदाहरण ठेवायचं होतं की असं वागाल तर मृत्यूपेक्षा वाईट हाल होतील तुमचे.

खटला उभा राहिला तेव्हा विलेम यांनी स्वतः हल्ल्याची पूर्ण जबाबदारी घेतली. त्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. त्यासोबत त्यांच्या 11 साथीदारांना फाशी झाली. एकाच महिन्यात या सगळ्या लोकांना मृत्यूदंड दिला गेला.

महिला सदस्यांना छळछावणीत पाठवलं गेलं.

जून 1943 मध्ये विलेम यांना फाशी झाली. फाशीच्या आधी त्यांचे वकील त्यांना भेटायला आले होते.

त्यांना उद्देशून विलेम यांनी उच्चारलेले शेवटचे शब्द होते - 'जगाला कळू द्या, गे लोक पळपुटे नसतात.'

पण त्यांचा हा संदेश जगापर्यंत पोहचायला पुढची 40 वर्षं जावी लागली. नाझी सैन्याने विलेम यांना फाशी दिली पण डच समाजानेही त्यांची आठवण ठेवली नाही.

नाझी, हिटलर, ज्यू

फोटो स्रोत, encyclopedia of Brittanica

फोटो कॅप्शन, विलेम

ना त्यांच्याविषयी कधी इतिहासात शिकवलं गेलं ना, कधी त्यांना मरणोपरांत मानसन्मान दिले गेले.

रजिस्ट्रीवर झालेल्या बॉम्ब हल्ल्याबद्दल इतिहासाच्या पुस्तकात लिहिलं होतं. कित्येक दशकं हा इतिहास मुलांना शिकवला गेला. पण या हल्ल्यांचं नेतृत्व विलेम यांनी केलं होतं, एका गे पुरुषाने केलं होतं हे सोयिस्करपणे वगळलं गेलं.

ऐंशीच्या दशकापासून डच रेझिस्टन्सच्या गे आणि लेस्बियन सदस्यांनी केलेल्या कामाबदद्ल पुन्हा चर्चा सुरू झाली. जवळपास चाळीस वर्षांच्या अज्ञातवासातून त्यांची सुटका झाली.

विलेम यांना सगळीकडूनच वगळलं गेलं होतं म्हणा ना. आधी कुटंबाने 'गे' असल्यामुळे, नंतर प्रेमाने 'पैसे नसल्यामुळे' आणि मग इतिहासाने 'वेगळा' असल्यामुळे.

पण विलेम आपलं काम करत राहिले. जगाला दाखवून दिलं - 'गे लोक भित्रे नसतात.'

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)