जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंपानंतर 30 जणांचा मृत्यू, मालमत्तेचंही नुकसान

जपान भूकंप

फोटो स्रोत, Reuters

    • Author, केली एनजी
    • Role, बीबीसी न्यूज

जपानमध्ये सोमवारी, 1 जानेवारीला आलेल्या भूकंपामुळे आतापर्यंत 30 लोकांचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे.

स्थानिक प्रशासनाने याला दुजोरा दिला आहे. 1 तारखेला जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंप आला होता.

यानंतर प्रशासनाने त्सुनामीचा इशारा दिला होता आणि किनारपट्टी भागात राहाणाऱ्या लोकांना दुसरीकडे जाण्यास सांगितलं होतं.

पण मंगळवारी, 2 जानेवारीला त्सुनामीच्या इशाऱ्याची तीव्रता कमी करून आता सरकारने म्हटलंय की किनारपट्टी भागात राहाणाऱ्या लोकांना दुसरीकडे जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

वाजिमा भागात आतापर्यंत 16 आणि सुजू भागात आतापर्यंत 6 लोकांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

भूकंपानंतर लोकांना वाचवण्यासाठी बचावपथकं कार्यरत आहेत आणि यात 1000 हून जास्त लोक बचावाच्या कामी लागले आहेत.

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी म्हटलं की भूकंपप्रवण लोकांना मी सांगू इच्छितो की त्यांच्यापर्यंत मदत लवकरच पोचेल.

ते म्हणाले, “भूकंपप्रवण क्षेत्रात काम करताना बचावपथकांना अनेक अडचणी येत आहेत कारण रस्ते नष्ट झालेत. जे लोक इमारतींमध्ये अडकलेत त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोचलं पाहिजे म्हणजे इमारत कोसळ्याआधी त्यांना वाचवता येईल.

जपान भूकंप

फोटो स्रोत, Reuters

जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार देशात त्सुनामीच्या लाटाही उसळल्या.

जपानमधून येत असेल्या वृत्तांनुसार, देशाच्या मध्यवर्ती भागात काही मीटर उंच त्सुनामीच्या लाटा उसळू उसळल्या. या लाटा या भागातील किनारपट्टीपर्यंत पोहोचल्.ा,

जपानच्या राष्ट्रीय प्रसारक एनएचके (NHK) ने सांगितलं, "इशिकावा प्रांतातील वाजिमा शहरात 1.2 मीटर उंच समुद्राच्या लाटा दिसल्या. तोयामा प्रांतातील तोयामा शहरातही त्सुनामीमुळे समुद्रात लाटा उसळताना दिसत होत्या.

"इशिकावा प्रांतातील किनारी नोटो भागातील रहिवाशांना "ताबडतोब उंचवटा असणाऱ्या भागात जाण्यास सांगितलं गेलं आहे."

जपान भूकंप

फोटो स्रोत, Reuters

जपानच्या हवामान विभागाने 'या भागातील लाटा 5 मीटरपर्यंत पोहोचू शकतात,' असा इशारा दिला आहे.

अधिकाऱ्यांनी शेजारच्या निगाटा आणि तोयामा प्रांतांसाठी देखील त्सुनामीचा इशारा जारी केला आहे.

वाजिमा येथे घरांचे मोठे नुकसान झाले

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, वाजिमा येथे घरांचे मोठे नुकसान झाले.

या भागात तीन मीटर उंचीच्या लाटा उसळतील, असा इशारा देण्यात आला आहे.

2011 मध्येही जपानमध्ये जोरदार भूकंप झाला होता. यानंतर त्सुनामी येऊन खूप नुकसान झालं होतं. यामुळे हजारो लोकांना जीव गमवावा लागला होता.

2011 मध्ये आलेल्या त्सुनामीमुळे जपानचा अणु प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता.

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)