मोरोक्को भूकंप : ‘आमच्या गावातली सगळी माणसं एकतर मारली गेलीत किंवा गायब आहेत’

मोरोक्को

मोरोक्कोतल्या टेफेघाटे गावात आम्हाला सुरुवातीला जे लोक भेटले त्यांनी या भीषण भूकंपाने केलेला विनाश आम्हाला सांगितला.

"या गावातले लोक एकतर हॉस्पिटलमध्ये आहेत किंवा मृत्यूमुखी पडलेत," असं ते म्हणाले.

इथल्या दगडमातीच्या ढिगाऱ्यातून वाट काढताना लक्षात येत होतं की, कोणीही सुखरूप निसटलं असण्याची शक्यता कमीच होती.

त्यांची दगड-विटांनी बनलेली पारंपरिक घरं या भयानक भूकंपासमोर टिकली नाहीत.

इथल्या 200 रहिवाशांपैकी 90 जणांचा मृत्यू झालाय.

"त्यांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. त्यांना स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळाली नाही," इथले एक रहिवासी हसन म्हणतात.

हसनही कसेबसे मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर आले.

हसन म्हणतात की त्यांचे काका अजूनही ढिगाऱ्याखाली गाडलेले आहेत. पण त्यांना वाचवण्यासाठी कोणी येत नाहीये.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याची यंत्रं इथे कोणाकडे नाहीयेत आणि बाहेरून बचाव पथक आलेलं नाही.

हसन म्हणतात, "अल्लाने हे केलं. अल्लाने जे आम्हाला दिलं त्यासाठी आम्ही अल्लाचे आभार मानतो. पण आता आम्हाला सरकारी मदतीची गरज आहे. लोकांना मदत करण्यात ते अत्यंत उशीर करत आहेत."

हसन यांच्यामते मोरोक्कोने आता आंतरराष्ट्रीय मदत स्वीकारली पाहिजे. पण सरकारचा अहंकार मदत स्वीकारणार नाही अशी त्याला भीती वाटते.

गावाच्या दुसऱ्या बाजूला बरेच जण एका माणसाला धीर देताना दिसतात.

त्याचं नाव विचारल्यावर अब्दुल रहमान आहे असं कळतं. अब्दुलची पत्नी आणि तीन मुलांचा मृत्यू झाला आहे.

अब्दुल म्हणतात, "तिथे आमचं घर होतं."

आता तिथे फक्त दगडमातीचा ढिगारा दिसतो.

"तुम्हाला पांढरे ब्लॅंकेट दिसेल, घरातलं सामान दिसेल, पण आता सगळं संपलंय," ते म्हणतात.

मोरक्को भूकंपातून सावरत आहे.

फोटो स्रोत, Getty Images

भूकंप झाला तेव्हा ते 3 किलोमीटर दूर असलेल्या पेट्रोल पंपावर काम करत होते. तिथून धावत घरी आले आणि मुलांना हाका मारायला सुरुवात केली.

पण कोणताच प्रतिसाद आला नाही.

"आम्ही काल त्यांना दफन केलं," ते म्हणतात.

"आम्हाला ते या इथे सापडले. त्यांनी एकमेकांना घट्ट धरलं होतं. भूकंप झाला तेव्हा ते गाढ झोपेत होते, तसेच गेले."

चारी बाजूने रडण्याचे आवाज येत आहेत.

नुकताच 10 वर्षांच्या मुलीचा, खलिफाचा मृतदेह वर काढण्यात आला. ते पाहून एका महिलेची शुद्ध हरपते, तर दुसरी हंबरडा फोडते.

मोराक्कोत जे घडतंय त्याचं प्रतिबिंब या गावात दिसतं.

इथल्या गावांमधले स्थानिक समुदाय आधुनिकीकरणाच्या दाबावपासून लांब राहिले असले तरी त्यांना आता बाहेरच्या जगाच्या मदतीची गरज आहे. तीही तातडीने.

अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली

मोरोक्कोमधील लोक 6.8 तीव्रतेच्या भूकंपानंतर झालेल्या विनाशातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

या भूकंपात आतापर्यंत 2000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर दोन हजारापेक्षा अधिक लोक जखमी आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

देशाच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक विनाश सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर मराकेशच्या दक्षिण भागात झाली आहे.

भूकंप आल्यानंतर पुन्हा धक्के बसतील की काय या भीतीने लोक घराच्या बाहेर रस्त्यावर किंवा पार्कात बसून रात्र घालवली.

या भूकंपाचं केंद्र हाय अटलास पर्वतरांगेत होतं आणि सर्वाधिक प्रभावित झालेल्या क्षेत्रांतून मिळालेल्या माहितीनुसार भूकंपानंतर अनेक गावं उद्धवस्त झाली आहेत.

आतापर्यंत पूर्ण माहिती मिळालेली नाही. अनेक ठिकाणी लोक ढिगाऱ्याखाली दबलेले आहेत. बचाव पथकाला त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास बऱ्याच अडचणी येत आहेत.

भूकंपाचा सर्वाधिक फटका बसलेल्या क्षेत्रात जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यास अडचणी येत आहेत. भूकंपानंतर निर्माण झालेल्या ढिगाऱ्यामुळे रस्ते बंद झाले आहेत किंवा तुटले आहेत.

पर्वतीय भागातील अनेक गावात बहुसंख्य लोकांचा मृत्यू झाला आहे. लाशेन नावाच्या व्यक्तीची बायको आणि चार मुलांनी या भूकंपात जीव गमावला आहे.

एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, “मी सगळंकाही गमावलं आहे. मी आता काहीही करू शकत नाही. मला जगापासून दूर जाऊन आपल्या लोकांच्या आठवणीत जगायचं आहे.”

गावात मृतांना दफन करण्यासाठी कबरी खोदल्या जात आहेत. स्थानिक राहिवासी हसना म्हणाल्या, “संपूर्ण गाव त्यांच्या मुलांच्या दु:खात बुडालं आहे.”

भूकंपाचं केंद्र मराकेशच्या दक्षिणेस 75 किमी दूर आहे आणि या पर्वतांमध्ये अनेक छोटी गावं आहेत.

मोरोक्को

पर्वतावर असलेल्या मौले ब्राहिम गावात पोहोचलेले बीबीसी प्रतिनिधी निक बीके यांना एक स्थानिक व्यक्ती म्हणाली, “खूप मोठ्या संख्येने लोक मेले आहेत. माझा एक मित्र दबून मेला. आज त्याचा दफनविधी केला, तो तर तरुण होता.”

मोहम्मद नावाच्या एका व्यक्तीने बीबीसी प्रतिनिधीला सांगितलं की, या गावात आतापर्यंत 16 लोकांना दफन केलं आहे.

मोहम्मद बचाव कार्यात मदत करत आहेत. ते म्हणतात, “ भूकंपानंतर आम्ही अथक काम करत आहोत. इथे बचावकार्यासाठी फक्त दहा लोक उपस्थित आहेत. आम्ही ढिगाऱ्यातून लोकांना काढायचा प्रयत्न करत आहोत. परिस्थिती अतिशय कठीण आहे.”

मोरोक्को येथील स्थानिक पत्रकार हसन अलाउई एका उद्धवस्त झालेल्या गावात पोहोचले. तिथे त्यांना एक अशी महिला सापडली जिला तिच्या शेजाऱ्यांनी ढिगाऱ्यातून बाहेर काढलं.

अलाउई यांनी बीबीसीला सांगितलं, “भूकंपात या महिलेचं घर पूर्णपणे उद्धवस्त झालं होतं. ती रडत होती, ओरडत होती. शेजाऱ्यांनी त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकला आणि ढिगाऱ्यातून तिला जिवंत बाहेर काढलं.

मराकेशमध्ये घरी परतायला लोक घाबरताहेत

मराकेशमध्ये उपस्थित असलेल्या बीबीसी प्रतिनिधी एना हॉलिगन यांच्या मते लोक अद्यापही घाबरले आहेत. घरी कधी परतता येतील हे त्यांना अद्याप माहिती नाही.

मराकेशच्या मध्य भागात असलेल्या ऐतिहासिक जेमा-अल-फना मशिदीत आता दगड मातीचे ढिगारे लागले आहेत.

मशि‍दीचा मनोरा कोसळला आहे. काही कचरा आसपासच्या मोटारींवर पडला आहे. त्यामुळे गाड्यांचं नुकसान झालं आहे.

मोरोक्को
फोटो कॅप्शन, मदिना मशीद

बीबीसी प्रतिनिधी एना हॉलिगन यांच्या मते तिथे अशक्त झालेल्या मांजरी फिरत आहेत. तिथून काही मीटर अंतरावर दुकानदार धूळ आणि ढिगारा हटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

सूर्य उगवल्यावर घराच्या बाहेर झोपायला आलेले कुटुंब त्यांचे बिछाने आवरताहेत. घरी कधी सुरक्षित परतता येईल याबद्दल ते अनभिज्ञ आहेत.

ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढणंही आता बचावपथकासाठी जिकिरीचं होऊ लागलं आहे.

मोरोक्को

एना हॉलिगन यांच्या मते मराकेश मध्ये अनेक लोक तात्पुरत्या तंबूत राहत आहेत.

हजारो कुटुंबं तंबूत राहत आहेत. जागतिक वारसास्थळ असलेल्या मेदिना येथील ऐतिहासिक मशि‍दीच्या आसपास लोक रांग लावून तंबूत बसले आहेत.

सगळ्यांनी आपल्याबरोबर फक्त गाद्या आणल्या आहेत. बहुतांश सामान घरातच आहे. लोकांच्या मनातून भूकंपाची भीती गेलेली नाही.

हा भूकंप शुक्रवारी रात्री स्थानिक वेळेनुसार 11 वाजून 11 मिनिटांनी आला होता.

रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट सोसायटीजच्या ऑपरेशन डायरेक्टर कॅरोलिन हॉल्ट यांनी शनिवारी (9 सप्टेंबर) इशारा दिला की, पुढचे 24 ते 48 तास बचाव कार्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत.

त्या म्हणाल्या, “शोध आणि बचाव मोहिमेला आधी प्राधान्य दिलं जाईल. लोक सुखरूप बाहेर येण्याला आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे.”

मोरोक्कोने भूकंपाच्या तीन दिवसानंतर राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. किंग मोहम्मद चतुर्थने लोकांना खाणं, राहण्याची जागा आणि प्रत्येक प्रकारची मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)