अफगाणिस्तानात वारंवार भूकंप का होतात?

अफगाणिस्तानात मोठा भूकंप झालाय

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, अफगाणिस्तानात मोठा भूकंप झालाय

अफगाणिस्तानमध्ये पाक्तिका भागात 22 जूनला पहाटे शक्तिशाली भूकंप झाला असून यामध्ये 1000 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 1500 हून अधिकजण जखमी झाले आहेत.

मृतांची संख्या आणखी वाढण्याचा धोका आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी नोंदली गेल्याचं अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्व्हेने म्हटलं आहे.

पाक्तिकामधल्या एका डॉक्टरांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांचाही या भूकंपात बळी गेला आहे."

"आमच्याकडे आधीच आरोग्य कर्मचारी आणि सोईसुविधांची वानवा होती. त्यात या भूकंपाने होतं नव्हतं ते सगळं हिरावून घेतलं आहे. मला हेही माहिती नाही की माझे सहकारी जिवंत आहेत की नाही."

अफगाणिस्तानातल्या संदेशवहनाच्या सुविधांवरही मोठा परिणाम झाला आहे. भूकंपामुळे अनेक मोबाईल टॉवर्स भुईसपाट झाले आहेत. इथल्या एका स्थानिक पत्रकारांनी सांगितलं की मृत्यूचा आकडा आणखी वाढू शकतो.

"कित्येकांना आपल्या नातेवाईकांची परिस्थिती नक्की काय आहे हे माहिती नाहीये. लोकांचा एकमेकांशी संपर्कच होऊ शकत नाहीये. माझा भाऊ आणि त्याचं संपूर्ण कुटूंब ठार झालं पण मला हे कित्येक तास समजलंच नाही. अनेक गावंच्या गावं उद्धस्त झालीयेत," असं एका पीडिताने सांगितलं आहे.

पण अफगाणिस्तानात असे विनाशकारी भूकंप होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही हा देश भूकंपाने हादरला आहे आणि अनेकदा मनुष्यहानी झाली आहे.

गेल्या 10 वर्षांत अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपांमुळे सुमारे 7000 लोकांचे जीव गेलेले आहेत, असं संयुक्त राष्ट्रांच्या एका विभागाचा अहवाल सांगतो.

पण इथेच इतके मोठे मोठे भूकंप होण्याची काय कारणं आहेत, जाणून घेऊया.

अफगाणिस्तान हिंदुकुश पर्वतांच्यामध्ये वसला आहे, आणि हिंदुकुश पर्वतरांग अल्पाईड बेल्टचा भाग आहे. पृथ्वीचा अल्पाईड बेल्ट जगातला दुसरा सगळ्यांत मोठा भूकंप्रवण भाग आहे. पहिला नंबर येतो पॅसिफिक रिंग ऑफ फायरचा.

जगातले 70 टक्क्यांहून अधिक सक्रिय ज्वालामुखी पॅसिफिक रिंग ऑफ फायरच्या प्रदेशात येतात. अफगाणिस्तान ज्या अल्पाईड बेल्टचा भाग आहे, तिथे सक्रिय ज्वालामुखी नसले तरी टेक्टोनिक प्लेट्स सक्रिय असणाऱ्या भूमीवर हा देश वसला आहे.

अनेक फॉल्ट लाईन्स (भूकंप होती अशा जागा) इथून जातात. यातल्या काही फॉल्ट लाईन्सची नावं आहेत चामान फॉल्ट, हरी रूद फॉल्ट, सेंट्रल बदक्षां फॉल्ट आणि दरवेज फॉल्ट.

अफगाणिस्तान भूकंप

अल्पाईन बेटाची लांबी जवळपास 15 हजार किलोमीटर आहे. दक्षिण युरेशियातून (युरोप आणि आशिय खंड मिळतात तो भाग) हा पट्टा जातो. या पट्ट्यात अनेक पर्वतरांगा येतात, यात हिमालय, हिंदुकुश, युरोपातले आल्प्स, अॅटलस आणि कॉकस पर्वतांचा समावेश होतो.

हिमालयचा समावेश असल्यामुळे या भारताच्या उत्तर भागातही अनेकदा भूकंपाचे धक्के बसतात.

अफगाणिस्तानात भूकंप होण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अफगाणिस्तानात पृथ्वीचं कवच सक्रिय आहे. इथेच पृथ्वीच्या अरबी, भारतीय आणि युरेशियन अशी तीन टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकींना मिळतात.

सोप्या शब्दात सांगायचं झालं तर पृथ्वीचं आवरण सफरचंदासारखं सलग नसून सीताफळासारखं तुकड्या तुकड्यांनी बनलेलं आहे. ते तुकडे पृथ्वीच्या अंतर्भागातल्या लाव्हावर तरंगत असतात आणि या तुकड्यांनाच टेक्टॉनिक प्लेट्स असं म्हणतात.

पृथ्वीचं आवरण अशा 15 तुकड्यांनी बनलेलं आहे. या तुकड्यांची हालचाल झाली की भूकंप येतो.

युरेशियन आणि भारतीय टेक्टॉनिक प्लेट अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर एकत्र येतात. पाकिस्तानच्या याच भागात 2013 साली भूकंप झाला होता ज्यात गावंच्या गावं ढिगाऱ्याखाली दबली गेली होती. हा भूकंप 7.7 रिश्टर स्केलचा होता.

अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवरच्या क्वेट्टा शहरापासून 47 किलोमीटर उत्तरेला (अफगाणिस्तानच्या दिशेने) 2008 साली भूकंप झाला होता ज्यात 300 लोकांचा मृत्यू झाला होता.

अफगाणिस्तान भूकंप

फोटो स्रोत, EPA

भारतीय प्रमाणवेळेनुसार 22 जूनला बुधवारी पहाटे जो भूकंप अफगाणिस्तानात झाला त्यामागेही टेक्टॉनिक प्लेटची हालचाल हेच कारण होतं. भारतीय प्लेट युरेशियन प्लेटवर जोराने आदळली म्हणून हा भूकंप झाला.

टेक्टॉनिक प्लेटची अशी हालचाल झाली की भूमी हालते आणि वर ढकलली जाते, यामुळेच भूकंप येतो. अशाच हालचालींमुळे या अल्पाईड बेल्टमध्ये हिमालय, हिंदुकुश आणि पामीर पर्वतरांगांची निर्मिती झाली आहे.

पण अफगाणिस्तानसाठी अशा नैसर्गिक आपत्ती अधिक जीवघेण्या ठरू शकतात कारण इथे पायाभूत सुविधांची वानवा आहे.

"बोटावर मोजण्याइतकी हेलिकॉप्टर्स मदतीला आली खरी पण मृतदेह हलवण्याखेरीज तेही काही करू शकले नाहीत," अफगाणिस्तानातल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.

काही वेळा तर बचाव पथकाला हाताने दगड-मातीचे ढिगारा बाजूला करत होते. पण हे बचाव पथकाचे कार्यकर्ते ग्रामीण भागात पोहचू शकलेच नाहीत. तिथे मदत पोहचवणं फारच अवघड आहे. त्यामुळे मृत्युंची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.

इथले स्थानिक रहिवासी अहमद नूर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "साधारण रात्री 1.30 वाजता हा भूकंप झाला. मी प्रचंड घाबरलो होतो. मी माझ्या मित्रांना शोधण्याचा प्रयत्न केला, त्यातल्या काहींचे नातेवाईक मृत्युमुखी पडले होते. काही ठीक होते पण त्यांची घर जमीनदोस्त झाली होती."

"तुम्हाला सगळीकडे सतत अँब्युलन्सचा आवाज ऐकू येत होता. लोक असहाय्य झालेले दिसत होते. जिथे कुठे जाल, प्रत्येक रस्त्यावर, नाक्यावर लोक आपल्या नातेवाईंकासाठी रडताना दिसत होते," एका स्थानिक पत्रकारानी सांगितलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)