भूकंप का होतात? भूकंपांना माणूसच जबाबदार आहे का?

भूकंप

फोटो स्रोत, Alamy

    • Author, ख्रिस ब्राऊनिक
    • Role, बीबीसी फ्युचर

गेल्या 24 तासांमध्ये सलग 2 वेळा आलेल्या शक्तीशाली भूकंपामुळे तुर्की आणि सीरियामध्ये मोठी जीवित आणि वित्त हानी झालीय. आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोक जखमी आणि बेघर झालेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर भूकंप नेमके का होतात, याविषयीचा हा लेख...

वरून शांत दिसणाऱ्या पृथ्वीच्या गर्भात नेहमी उलथापालथ होत असते. पृथ्वीच्या आतील प्लेट्स एकमेकांवर आदळतात आणि त्यामुळे भूकंप होतो.

जगभरातील भूकंप मापन केंद्र दरवर्षी भूकंपाचे साधारण 20 हजार झटके नोंदवतात. असं मानलं जातं की पृथ्वीवर दरवर्षी भूकंपाचे लाखो झटके बसतात. यातले बहुतेक इतके सौम्य असतात की ते रेकॉर्ड करणं शक्य नसतं.

15 नोव्हेंबर 2017 रोजी दक्षिण कोरियात एक विचित्र गोष्ट घडली. एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान स्टुडिओ हलायला लागला. कॅमेरा आणि स्टुडिओमधलं टेबल थरथरू लागलं. यानंतर स्टुडिओच नाही तर आख्ख्या न्यूजरूममध्ये पळापळ झाली.

ही घटना टीव्हीवर लाईव्ह दाखवली गेली. या भूकंपाची रिश्टर स्केलवर तीव्रता होती 5.5. यामुळचे अनेक इमारतींना हादरे बसले आणि अनेक लोक जखमी झाले.

हा भूकंप इतर भूकंपांसारखा नव्हता. ही अगदी नवी गोष्ट होती. कारण या भूकंपाचं कारण ही पृथ्वीच्या गर्भात होणारी उलथापालथ नसून यामागे माणसाचा हात होता.

यावर्षी मार्चमध्ये याविषयीचा अहवाल प्रसिद्ध झाला. यानुसार 15 नोव्हेंबर 2017 ला दक्षिण कोरियातल्या पोहांग शहरात झालेल्या भूकंपासाठी माणूस कारणीभूत होता. यामध्ये 135 लोक जखमी झाले तर 1700 जणांना सुरक्षित स्थळी हलवावं लागलं होतं.

या झटक्यांमुळे हजारो इमारतींचं नुकसान झालं होतं. एका ढोबळ अंदाजानुसार पोहांगमध्ये या भूकंपामुळे 7.5 कोटी डॉलर्सचं नुकसान झालं.

मार्चमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार पोहांगमध्ये जो भूकंप झाला त्याचं कारण होतं पृथ्वीच्या आत खोलवरपर्यंत एका प्रकल्पासाठी खोदकाम करण्यात आलं होतं. ज्या ठिकाणी हे काम करण्यात आलं होतं, ती जागा भूकंपाच्या जागेपासून अगदी जवळ होती.

भूकंप कसा होतो?

माणसाच्या कारवायांमुळे पृथ्वीवर मोठी उलथापालथ होत आहे. माणसाच्या कृत्यांमुळे भूकंप होतात असं नव्यानं समोर आलं आहे.

म्हणूनच आता अशा शास्त्रज्ञांची एक नवी फळी तयार होत आहेत जे अशा प्रकारच्या भूकंपांचा शोध घेतील. त्यांना सेस्मिक डिटेक्टिव्ह म्हटलं जातं.

भूकंप

फोटो स्रोत, Alamy

एखाद्या भागामध्ये झालेला भूकंप नैसर्गिक कारणांमुळे झाला की यामागे कोणत्या औद्योगिक घडामोडी होत्या, याचा शोध हे वैज्ञानिक घेतात.

आता पृथ्वीच्या पोटातून तेल काढण्यासाठी अनेक किलोमीटर्सपर्यंतचं खोदकाम केलं जातं. तेल शोधण्यासाठी दरवर्षी 10 हजारांपेक्षा जास्त विहिरी खोदल्या जातात. यासाठी 'जिओथर्मल एनर्जी'चा वापर केला जातो.

पृथ्वीच्या आत असणाऱ्या संसाधनाच्या खोदकाराची गती वाढली आहे. 2050पर्यंत अशा प्रकारचं खोदकाम सहा पटींनी वाढण्याचा अंदाज आहे.

तेलाच्या शोधासाठी ठिकठिकाणी पृथ्वीला जखमी केलं जातंय आणि यामुळे पृथ्वीच्या आतमध्ये खोलवर असणाऱ्या खडकांचं संतुलन बिघडतंय.

भूकंप

फोटो स्रोत, Alamy

खरं तर वरच्या थरानंतर आपल्या पृथ्वीच्या आतमध्ये खडक, वाळू, दगडांचे अनेक थर आहेत. पण जेव्हा खोलवर ड्रिलिंग केलं जातं तेव्हा हे थर उद्ध्वस्त होतात आणि त्यांच्यातली ऊर्जा मोकळी होते. यामुळे भूकंप होतो.

मानवी कृत्यांमुळे होणाऱ्या भूकंपांचा बिल एल्सवर्थ अभ्यास करतात. पोहांगच्या भूकंपाविषयी ते सांगतात, "लोकांचं नशीब चांगलं होतं म्हणून कोणाचा जीव गेला नाही. भूकंपांचं हे दृश्य भीतीदायक वाटतं."

पृथ्वीच्या पोटातल्या ऊर्जेपासून वीज निर्मिती

बिल एल्सवर्थ अमेरिकेतल्या स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीच्या भूकंप विज्ञान विभागाशी निगडीत आहेत. तपास करताना काही गडबड तर होणार नाही ना याची भीती पोहांगमध्ये झालेल्या भूकंपाचा तपास सुरु करताना त्यांना होती.

एखाद्या झटक्यामागे माणसाचा हात आहे असं सांगणं धोकादायक ठरू शकतं.

एखाद्या भूकंपाची तीव्रता 3 पेक्षा जास्त असेल तरच हा झटका आपल्याला जाणवतो. पोहांगमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 5.5 होती.

भूकंप

फोटो स्रोत, Alamy

यासाठी आपलं काम कारणीभूत असल्याचं जवळच खोदकाम करणारी कंपनी नेक्सजियोने भूकंपाच्या एक दिवसानंतरच फेटाळलं होतं.

पण बिल एल्सवर्थ आणि त्यांच्या टीमला नंतर तपासणी दरम्यान असं आढळलं होती की या कंपनीने खोलवर खोदकाम करताना दगडांचा समतोल बिघडला आणि भूकंप झाला.

प्रत्यक्षामध्ये नेक्सजिओ कंपनी जिओथर्मल पॉवर प्लांटची उभारणी करण्यासाठी खोदकाम करत आहे. या प्लांटमध्ये पृथ्वीच्या अंतर्भागातल्या ऊर्जेपासून वीज निर्मिती करण्यात येते.

काही कंपन्या खोलवर खोदून तिथून निघणाऱ्या वाफेपासून वीज निर्मिती करतात. तर काही कंपन्या खडक फोडून त्यामध्ये अडकलेली ऊर्जा बाहेर काढतात.

भूकंप

फोटो स्रोत, Alamy

त्यानंतर याच्या मदतीने वीज निर्मिती केली जाते. नेक्सजिओ कंपनी हेच करत होती. हे करताना खडक तुटल्याने पृथ्वीच्या आत अडकलेली मोठ्या प्रमाणावरची ऊर्जा मोकळी झाली आणि भूकंप झाला.

नेक्सजिओच्या खोदकामादरम्यान अशा ठिकाणी खडक फुटला जिथे पृथ्वीचे दोन थर एकमेकांना मिळतात. म्हणूनच मोठ्या तीव्रतेचा भूकंप झाला.

असं सहसा होत नसल्याचं बिल एल्सवर्थ म्हणतात. खोदकाम करणाऱ्यांना अशा जागांची माहिती असेल तर ते अशा ठिकाणी खोलवर खोदणं टाळतात.

नेक्सजिओने असं का केलं, हे तेच सांगू शकतील. पण यामुळे त्यांनी हजारो लोकांचं आयुष्य धोक्यात घातलं.

बिल एल्सवर्थ यांच्या अहवालानंतर आता पोहांगमध्ये जिओथर्मल प्लांट उभारण्याचं काम थांबवण्यात आलं आहे.

भूकंप

फोटो स्रोत, Alamy

बिल एल्सवर्थ आणि त्यांच्यासारखे अनेक वैज्ञानिक जगभरामध्ये मानवी कृत्यांमुळे होणाऱ्या भूकंपांविषयीची आकडेवारी एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत.

यातलेच एक वैज्ञानिक आहेत स्टीफन हिक्स. इंग्लंडमधल्या सरे शहराजवळ एका मशीनच्या मार्फत ते भूकंपांच्या झटक्यांविषयीची आकडेवारी गोळा करत आहेत. स्टीफन हिक्स हे लंडनच्या इंपिरियल कॉलेजमध्ये भूकंप शास्त्रज्ञ आहेत.

इंग्लंड मधल्या सरे शहराची निवड त्यांनी अशासाठी केली कारण सरेमध्ये कधीही भूकंप नोंदवण्यात आलेला नाही. पण यावर्षी 27 फेब्रुवारीपासून भूकंपाचे अनेक लहान-लहान झटके जाणवलेले आहेत. ही सामान्य बाब नाही.

ब्रिटनची ऑईल एण्ड गॅस कंपनी सरेच्या जवळच खोदकाम करत आहे. आणि हे झटके त्याचाच परिणाम आहेत. आता स्थानिक या कामाला विरोध करत आहेत.

या भागामध्ये जाणवणारे भूकंपाचे धक्के स्टीफन हिक्स डिजिटायझर नावाच्या एका यंत्राने मोजत आहेत. या कामामध्ये ब्रिटिश जिओलॉजिकल सर्व्हेदेखील त्यांची मदत करत आहे.

इंडोनेशियातल्या भूकंपानंतर निर्माण झालेली स्थिती

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या काही महिन्यांमध्ये हिक्स यांच्या टीमने सरे काऊंटीमध्ये जितके भूकंप नोंदवले आहेत त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 1 पेक्षा कमी आहे. असे धक्के सामान्यांना जाणवतही नाहीत.

हे भूकंप नैसर्गिक कारणांमुळे होत असल्याचं हिक्स यांचं म्हणणं आहे. यामागे तेलासाठी करण्यात येणाऱ्या खोदकामाचा हात नाही. पण तेलासाठी होणारं हे खोदकाम थांबवण्यासाठी स्थानिक लोक गाजावाजा करत आहेत.

मानवी कृत्यांमुळे होणाऱ्या भूकंपांना वैज्ञानिक एंथ्रोपॉजेनिक सेस्मिसिटी म्हणतात. स्वित्झर्लंडचे विशेषज्ञ फ्रांसेस्को ग्रिगोली म्हणतात स्थानिकांना काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे.

ग्रिगोली यांचं म्हणणं आहे की असे भूकंप थांबवण्यासाठी कोणताही ठराविक फॉर्म्युला नाही. माणसांच्या गरजांसाठी अशी खोदकामं तर होतच राहणार.

पण अशा कामांमुळे येणाऱ्या भूकंपांच्या झटक्यांची आकडेवारी गोळा करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे एखाद्या प्रोजेक्टमुळे निर्माण होऊ शकणाऱ्या धोक्यांचा आधीपासूनच अंदाज लावता येईल.

आता जगभरातल्या भूकंपांच्या झटक्यांवर अगदी बारकाईने लक्ष ठेवलं जातंय. ब्रिटनच्या ब्रिस्टल युनिव्हर्सिटीचे जेम्स वर्डोन म्हणतात की आता 1 तीव्रतेच्या भूकंपाचीही नोंद केली जाते.

जगभरामध्ये अशा हजारो झटक्यांची नोंद केली जात आहे.

वैज्ञानिकांचं आता असं म्हणणं आहे की जमिनीत खोलवर खोदकाम करताना अतिशय काळजी घेणं आवश्यक आहे. जिओथर्मल पॉवर प्लांटसाठी करण्यात आलेल्या खोलवरच्या खोदकामामुळे पोहांगमध्ये झालं तसं नुकसान होऊ शकतं.

म्हणूनच असं खोदकाम गजबजलेल्या भागांपासून दूर करणंच योग्य असेल. भूकंपांचा तपास करणाऱ्या वैज्ञानिकांनी अशी आकडेवारी गोळा केली आहे जी या खोदकामांदरम्यान गोळा करण्यात आली होती.

म्हणजे भविष्यामध्ये अशी एखादी घटना थांबवायला मदत होईल.

म्हणूनच मानवाने पृथ्वीची हाक वेळीच ऐकून या इशाऱ्यानुसार आपलं वर्तन सुधारणं गरजेचं आहे. नाहीतर भयंकर गोष्टी घडायला फार वेळ लागणार नाही.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
फोटो कॅप्शन, बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)