'आमचं हिंदुत्व घरात चूल देणारं, भाजपचं हिंदुत्व घर पेटवणारं'

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे
    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

“एकनाथ शिंदे यांच्याकडे एमएसआरडीसी, नगरविकास खातं होतं. ते ठाणे, गडचिरोलीचे पालकमंत्री होते. त्यांच्याकडे 25 गाड्यांचा ताफा होता. तीन-तीन बंगले आहेत. म्हणजे सगळं काही असताना तुम्हाला ते लपवता आलं नाही, म्हणून ईडीची भीती होती. तुम्ही अडीच वर्षं मजा-मस्ती करत होता. त्यावेळी काँग्रेससोबत आहोत ते दिसलं नाही.

आता नवाब मलिक, प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतच युतीत आहेत ना? अजित पवार निधी देत नाहीत, हे कारण सांगितलं होतं ना? मग आता कोण आहे त्यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री?” शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते, आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

बीबीसी मराठीच्या मुलाखतीत त्यांनी आताच्या शिवसेनेची (ठाकरे गट) हिंदुत्वाची व्याख्याही स्पष्ट केली.

ते म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादी नेता होते; पण त्यांनी कोणाच्या खाण्यावरून त्याला जाळा, कापा असं नाही केलं. कोणीतरी कोणता रंग घातला म्हणजे मॉब लिंचिंग करा, असे ते म्हणत नव्हते. 'हृदयात राम, हातात काम' हे आमचं हिंदुत्व आहे. बाळासाहेबांची लढाईसुद्धा हाताला काम देण्यासाठी होती.

कोणीतरी नॉनव्हेज खात आहे, हिरवा रंग घातला, पिवळा रंग घातला, यावरून धर्म ठरायला धर्म एवढा पोकळ नाही. आमचं हिंदुत्व घरात चूल देणारं, भाजपचं घर पेटवणारं हिंदुत्व आहे,”

विधानसभा निवडणुकीचा प्रचार महाराष्ट्रात अंतिम टप्प्यात आहे. महाविकास आघाडी की महायुती हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईलच. पण शिवसेनेसाठी ही निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे.

विशेषत: ठाकरे कुटुंबासाठीही पक्षाच्या अस्तित्वाची आणि भविष्याची ही लढाई आहे. यासंदर्भात आम्ही आदित्य ठाकरे यांची मुलाखत घेतली.

बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आदित्य ठाकरे यांनी पक्षफुटीबद्दल, हिंदुत्व, राज ठाकरे, मुख्यमंत्रीपद अशा अनेक विषयांवर भाष्य केलं. ते या मुलाखतीत काय म्हणाले पाहूया...

आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

फोटो स्रोत, X/ Aaditya Thackeray

फोटो कॅप्शन, आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

1) शिवसेना फुटल्यानंतर होणारी ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. ठाकरे म्हणून तुमच्यासाठी आणि पक्षासाठीही ही वेळ किती महत्त्वाची आहे?

आदित्य ठाकरे: ही निवडणूक महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे. 'खोके' सरकारने राज्यात एक तरी नवा उद्योग, रोजगार राज्यात आणला का? कोणतं राज्य आहे जिथं काम आलंय? शेतकरी हैराण नाहीयेत असं कोणत्या जिल्ह्यात चित्र आहे.

कुठच्याही अनोखळी माणसापासून सेलिब्रेटींपर्यंत सर्वांना धमक्या येत आहेत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. महापालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. आम्हाला जरी बाजूला ठेवलं तरी महाराष्ट्र हा महाराष्ट्र राहणार की 'गुजराष्ट्र' होणार? यासाठीची ही निवडणूक आहे.

2) सत्ताधारी पक्षाकडून मात्र सातत्याने सांगितलं गेलं आहे की उद्योगधंदे महाराष्ट्रात आले आहेत. 'दावोस'च्या दौऱ्यात अनेक करार झाल्याचंही ते सांगतात. मग हा आरोप का?

आदित्य ठाकरे: 'दावोस'चा दाखला दिला जातो; पण त्यासाठी दोन्ही वेळेला चाळीस कोटींचा खर्च केला, याचे डिटेल्स नाहीत. गेल्यावर्षी ते 28 तासांत चाळीस कोटी उडवून आलेत. दावोसमध्ये साईन झालेला करार दाखवा, ज्याचं जमिनीवर काम सुरू झालं आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

3) पक्ष फुटल्यानंतर वैयक्तिकरित्या हा काळ किती कठीण किंवा आव्हानात्मक होता?

आदित्य ठाकरे: आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला गेला. पक्षाचं नाव आणि चिन्ह घेतलं. नेते घेतले. धनाने जे गब्बर झाले ते पळाले. चाळीस आमदार, 13 खासदार, 50 नगरसेवक, नेते पळवल्यानंतर जनता आमच्यासोबत राहिली.

विधानपरिषद, सिनेट, लोकसभा आम्ही जिंकलो. पण भाजपा जी 26 जागांवर होती ती 9 जागांवर थांबली. हे आकडे बोलके आहेत. वैयक्तिकरित्या जखम झाली, पाठीवर वार झाले, या गोष्टी आहेतच.

लाल रेष

निवडणुकीसंदर्भातील या बातम्याही वाचा:

लाल रेष

4) निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे गटातील आमदारांनी संपर्क साधला तर त्यांना परत घेणार का? किंवा आताही आमदार संपर्कात आहेत का?

आदित्य ठाकरे: आठ ते नऊ आमदार आणि दोन मंत्र्यांनी संपर्क केला होता. ज्या लोकांनी महाराष्ट्र लुटलेला आहे. भाजपला महाराष्ट्र लुटायला मदत केली. टेबलवर उभं राहून नाचले होते. म्हणजे आम्हाला लाज वाटते की, यांच्यासाठी कधी आम्ही प्रचार केला होता.

परत घेतलं तर महाराष्ट्रातील जनता आम्हाला काय म्हणेल? हा आदर्श नेता म्हणून मुलांना दाखवू? सडकछापपणा दिसतो यांचा.

व्हीडिओ कॅप्शन, 'एक रहेंगे तो सेफ रहेंगे' ही नरेंद्र मोदींची लाईन आदित्य ठाकरे का म्हणाले?

5) बाळासाहेब ठाकरे यांची देशातील एक हिंदुत्ववादी नेते म्हणून प्रतिमा होती. पण आता शिवसेनेची विचारधारा काय? तुमची आताची शिवसेना बदलली आहे का?

आदित्य ठाकरे: बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादी नेता होते पण त्यांनी कोणाच्या खाण्यावरून त्याला जाळा, कापा असं नाही केलं. कोणीतरी कोणता रंग घातला म्हणजे मॉब लिंचींग करा, असे ते म्हणत नव्हते. 'हृदयात राम, हातात काम' हे आमचं हिंदुत्व आहे.

बाळासाहेबांची लढाई सुद्धा हाताला काम देण्यासाठी होती. राम मंदिराबाबत आजही आमची भूमिका तीच आहे. मंदिराचं उद्घाटन घाई-गडबडीत केलं गेलं. सेलिब्रिटी ज्यांना ते एरव्ही ट्रोल करतात अशा सर्वांना बोलवलं होतं. कोणीतरी नॉनवेज खात आहे, हिरवा रंग घातला, पिवळा रंग घातला यावरून धर्म ठरू शकतो. पण धर्म एवढा पोकळ नाही.

धर्मावरचा विश्वास वेगळा आहे. उगीच कोणाला तरी त्यावरून मारणं, जाळणं हे आमचं हिंदुत्व नाही. आमचं हिंदुत्व घरात चूल देणारं, भाजपचं घर पेटवणारं हिंदुत्व आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे.

6) भाजपचा प्रचार सुरू आहे. यात ते ‘कटेंगे तो बटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ अशा घोषणा देऊन प्रचार केला जात आहे. यावर काय उत्तर आहे?

आदित्य ठाकरे: ‘कटेंगे तो बटेंगे’ बरोबर आहे. कारण आपण महाराष्ट्र म्हणून विखुरले गेलो तर भाजप आपला खिसा कापणार. ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ हे पण बरोबर आहे. म्हणजे महाराष्ट्र म्हणून एक राहिलो तरच सेफ राहू.

धर्माचा वाद, जातीचा वाद, रंगाचा वाद, हे 'भाजपकरण' आहे. हे कोण येऊन उपदेश देत आहे? योगी आदित्यनाथ? हे आपल्याला मराठी माणसाला राज्य करायला शिकवणार का? महाराष्ट्र एकत्र राहिला तर सुरक्षित राहणार.

7) महाविकास आघाडीतही मुख्यमंत्रिपदावरून अद्याप एकमत झालेलं दिसत नाही. कारण तुमची भूमिका ही निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करणं अशी होती. तुमच्या जाहीरनाम्याचं शिर्षक ‘कुटुंबप्रमुखांचा जाहीरनामा’ असं आहे.

आदित्य ठाकरे: शिवसैनिकांना, मविआच्या नेत्यांना आणि जनतेला वाटतं की उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, हे खरं आहे. पण आमच्यात यावरून वाद नाहीत. भाजप आणि एकनाथ शिंदेंना सत्तेतून बाहेर काढण्याला आमचं प्राधान्य आहे. महाविकास आघाडीत भांडण न करता महाराष्ट्राला चांगल्या मार्गावर न्यायचं आहे.

हे खरं आहे की आमची भूमिका होती. आमच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तयार होता. आम्ही स्वार्थासाठी मागत नव्हतो. आमची पदासाठी लढाई नाही. महाराष्ट्र हिताचा मुख्यमंत्री होईल.

आदित्य ठाकरे, सोबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि गाडीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे प्रमुख शरद पवार

फोटो स्रोत, X/ Aaditya Thackeray

फोटो कॅप्शन, आदित्य ठाकरे, सोबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि गाडीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे प्रमुख शरद पवार

8) काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला तर पाठिंबा देणार का?

आदित्य ठाकरे: 'जर-तर...' बाबत मी उत्तर देत नाही.

9) अमित ठाकरे म्हणाले की, वरळीत आदित्य ठाकरेंनी अपेक्षित काम केलं असतं तर मनसेने उमेदवार दिला नसता. तुमची प्रतिक्रिया?

आदित्य ठाकरे: मी अमित ठाकरे यांच्यावर बोलत नाही. मी मर्यादा पाळतो. नातं जपतो. पण मी मनसे पक्षावर बोलेन. मनसेची भूमिका तळ्यात मळ्यात दिसली आतापर्यंत. 2024 मध्ये बिनशर्थ पाठिंबा दिला. तो कशासाठी होता? गुजरातला उद्योग गेले यासाठी पाठिंबा दिला का?

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं राज ठाकरे म्हणाले. मनसे आता महाराष्ट्रातील भूमिपुत्रांसाठी लढत नाही, गुजरातमधील भूमिपुत्रांसाठी लढते.

10) राज ठाकरे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘बाण गेला केवळ खान राहिला’ यावर काय म्हणणं आहे?

आदित्य ठाकरे: मी त्यांच्यावर बोलणार नाही. आमची मर्यादा मी पाळणार. पण ते गुजरातच्या भूमिपुत्रांना कधीपासून पाठिंबा द्यायला लागले?

आदित्य ठाकरे, सोबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे नेते शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात

फोटो स्रोत, X/ Aaditya Thackeray

फोटो कॅप्शन, आदित्य ठाकरे, सोबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे नेते शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात

11) पक्षफुटीनंतर राज ठाकरेंकडून कधी संपर्क झाला का? काही बोलणं झालं का?

आदित्य ठाकरे: राज ठाकरेंकडून कधीही संपर्क झाला नाही, आता काही गोष्टींच्या पलीकडे आपण गेलं पाहिजे. आमच्याबद्दल आतापर्यंत ते चिकन सूपपर्यंत अनेक गोष्टी बोलले आहेत. मला त्यावर आता काही बोलायचं नाही.

12) शिवसेनेबाबत कोर्टातला निकाल अद्याप लागलेला नाही. असं का झालं?

आदित्य ठाकरे: सुप्रीम कोर्टात सर्वांत संवैधानिक केस महाराष्ट्राची असायला हवी होती. यावर फार काही बोलू शकत नाही, कारण मर्यादा असतात. पण निवडणूक आली तरी न्याय मिळत नाही.

‘जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड.’ भाजपकडून जे केलेलं आहे, एकनाथ शिंदेंनी केलेलं जर असंच दुर्लक्षित होत राहिलं तर उद्या इतर राज्यातही हे होईल.

उद्या भाजपसोबत पण होईल. खरोखर आपल्यासारख्या लोकशाहीत हे होऊ शकतं का? निकाल अपेक्षित होता. याचा काय अर्थ काढायचा तुम्ही मला सांगा? जनताच न्याय देऊ शकेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)