'मी रात्रीच्या वेळी भर समुद्रात पडलो, 26 तास पोहलो, जेलीफिश चावले'; अथांग समुद्राशी झुंज देण्याची कहाणी

शिवमुरुगन
फोटो कॅप्शन, शिवमुरुगन
    • Author, सिराज
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

20 सप्टेंबर 2025 चा दिवस होता, रात्रीचे 1.15 वाजले होते. शिवमुरुगन समुद्रात प्रचंड लाटांवर तरंगत होते. अर्थात ते काही किनाऱ्याजवळ नव्हते, तर कन्याकुमारीच्या किनाऱ्यापासून तब्बल 16 नॉटिकल मैल (जवळपास 29 किलोमीटर) अंतरावर समुद्रात लाटांना झुंज देत होते.

शिवमुरुगन मच्छिमार आहेत. ते त्यांचे मित्र आणि भावासोबत भर समुद्रात मासेमारी करत असतानाच बोटीतून पडले होते. आता सकाळचे 5 वाजले होते.

त्या प्रसंगाबद्दल शिवमुरुगन यांनी बीबीसीला सांगितलं, "माझ्या डोळ्यांसमोर फक्त 1 नॉटिकल मैल (जवळपास 1.8 किलोमीटर) अंतरावर काही बोटी माझा शोध घेत होत्या. समुद्राच्या खाऱ्या पाण्यानं माझा घसा सुजला होता."

"मदत मागण्यासाठी मला ओरडतादेखील येत नव्हतं. ती रात्रीची वेळ होती आणि मी त्यांना समुद्रात दिसत नव्हतो. काही तासांमध्येच त्या बोटी पुन्हा किनाऱ्यावर परतल्या. मी समुद्रात पोहत होतो."

35 वर्षांचे शिवमुरुगन तामिळनाडूतील तिरुनेलवेली जिल्ह्यातील कुडनकुलम जवळच्या चेट्टीकुलम या किनारपट्टीच्या गावातील आहेत.

20 सप्टेंबरला शिवमुरुगन कन्याकुमारीतील चिन्नामुत्तम या मासेमारीच्या बंदरातून मोटरबोटमध्ये मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ आणि इतर मच्छिमार होते. बोट भर समुद्रात असतानाच शिवमुरुगन बोटीतून घसरले आणि समुद्रात पडले. तब्बल 26 तासांनी त्यांना वाचवण्यात यश आलं.

"शिवमुरुगन समुद्रात बेपत्ता झाल्याची बातमी किनाऱ्यावर पोहोचली. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नांना यश न आल्यामुळे, आम्हाला वाटलं होतं की, त्यांच्या वाचण्याची शक्यता नाही. कारण ते जर तामिळनाडूच्या दक्षिणेकडील समुद्रात हरवले असतील, तर जिवंत वाचवण्याची शक्यता खूपच कमी होती," असं पॉलिन म्हणाल्या. त्या कन्याकुमारीतील मच्छिमार आणि लेखिका आहेत.

समुद्र

फोटो स्रोत, Getty Images

कुलाचल मरीन पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, "शिवमुरुगन बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच त्यांना वाचवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले. मात्र ते सापडले नाहीत."

"जेव्हा कूटनकुली गावातील काही मच्छिमार मासे पकडण्यासाठी समुद्रात गेले, तेव्हा त्यांना शिवमुरुगन दिसले. 22 सप्टेंबरच्या पहाटे त्यांनी शिवमुरुगन यांना वाचवलं. ते शिवमुरुगन यांना घेऊन किनाऱ्यावर आले. नंतर शिवमुरुगन यांच्यावर उपचार करण्यात आले."

शिवमुरुगन यांच्याबाबतीत नेमकं काय घडलं?

ही घटना घडण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी, शिवमुरुगन यांनी समुद्रात मासेमारी करण्यास सुरुवात केली.

शिवमुरुगन म्हणाले, "आम्ही सर्वसाधारणपणे रात्री 2 वाजता चेट्टीकुलममधून निघतो. चिन्नामुत्तमला पोहोचल्यानंतर आम्ही दुपारी 4.30 च्या सुमारास मासेमारीसाठी बोटीतून निघतो. शनिवारी (20 सप्टेंबर) आम्ही असंच निघालो, जाळं लावलं आणि मासे पकडले. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास आम्ही किनाऱ्यावर परतू लागलो."

त्या रात्रीबद्दल शिवमुरुगन म्हणतात, "रात्री 8 वाजता, मी लघवी करण्यासाठी बोटीच्या एका बाजूला गेलो. मी जीपीएसवर शेवटचं आमचं ठिकाण पाहिलं, तेव्हा आम्ही कन्याकुमारीच्या किनाऱ्यापासून 15 नॉटिकल मैल अंतरावर होतो."

"मी लघवी करण्यासाठी गेलेलो असताना अचानक एक मोठी लाट बोटीवर आदळली. बोट अचानक हलली आणि मी घसरलो आणि समुद्रात पडलो. मी बोट गाठण्यासाठी पोहू लागलो आणि मी ओरडलो. मात्र बोटीच्या इंजिनाच्या आवाजामुळे माझा आवाज बोटीवरील कोणालाही ऐकू गेला नाही."

अथांग समुद्राशी 26 तास झुंज देण्याची कहाणी

फोटो स्रोत, Getty Images

शिवमुरुगन म्हणाले, "10-15 मिनिटं होऊनही मी जेव्हा परतलो नाही, तेव्हा माझा भाऊ बाहेर आला आणि मला शोधू लागला. एकंदरीत काय घडलं आहे याचा त्याला अंदाज आल्यानंतर तो ओरडला आणि त्यानं सर्वांना बोलावलं."

"जीपीएस उपकरणाचा वापर करून त्यांनी बोट मागे वळवली. ते मला समुद्रात शोधू लागले. मात्र लाटांनी मला आधीच दूर खेचून नेलं होतं."

ते पुढे म्हणाले, "अथांग समुद्र आणि रात्रीची वेळ, यामुळे मी त्यांना दिसत नव्हतो. मी माझे हात वर करत होतो आणि ओरडत होतो. मात्र बोटीत डिझेल मर्यादित असल्यामुळे ते पुन्हा किनाऱ्याकडे जाण्यासाठी निघाले."

"नंतर ते माझा शोध घेण्यासाठी आणखी काही बोटी सोबत घेऊन आले. मला बोटींवरील लाईट्स दिसले. मी ओरडलो, माझे हात हलवले. ते परत येईपर्यंत काही तास मी तसंच करत राहिलो."

'मी रात्रभर पोहत होतो'

शिवमुरुगन म्हणाले की समुद्राच्या लाटा सतत त्यांच्या चेहऱ्यावर आदळत होत्या. त्यामुळे त्यांची त्वचा सोलली गेली होती. त्यांच्या डोळ्यात समुद्राचं खारं पाणी जात होतं. तोंडातही समुद्राचं पाणी जात होतं. यामुळे त्यांचा घसा सुजला.

त्या घटनेबद्दल पुढे शिवमुरुगन म्हणतात, "आजूबाजूला सर्वत्र अंधार होता. मी समुद्राच्या मध्यभागी तरंगत होतो. त्यावेळी माझ्या मनात एकच विचार येत होता की, मी कसंतरी किनाऱ्यावर पोहोचलं पाहिजे. जर मी इथे मेलो, तर माझ्या कुटुंबाचं काय होईल याची मला चिंता वाटत होती."

"वजन कमी करण्यासाठी मी माझा टी-शर्ट काढून टाकला. त्यामुळे मी समुद्राच्या पाण्यात अधिक सहजपणे तरंगू लागलो. त्यानंतर माझ्या संपूर्ण शरीरावर काहीतरी चावू लागलं."

लेखिका पॉलिन यांना वाटतं की दक्षिण समुद्र हा इतर समुद्रांच्या तुलनेत जास्त धोकादायक आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लेखिका पॉलिन यांना वाटतं की दक्षिण समुद्र हा इतर समुद्रांच्या तुलनेत जास्त धोकादायक आहे

शिवमुरुगन पुढे म्हणाले, "जेलीफिश मला चावत होते. त्यावेळेस मला गावातील लोकांनी जेलीफिशबद्दल जी माहिती सांगितली होती ती आठवली. त्यांनी सांगितलं होतं की, जर जेलीफिश शरीराला चिकटून तिथे काही वेळ राहिले तर ते त्वचेला छिद्र पाडतात."

"मग मी एकेक करत त्यांना काढून टाकलं. मी तरंगत होतो, माझे हातपाय चालवत होतो. मात्र आता माझं शरीर थकलं होतं. काहीवेळा मी बुडू लागलो की पुन्हा पोहत पाण्यावर येत असे."

"दुसऱ्या दिवशी सकाळी (21 सप्टेंबर) सूर्य पाहिल्यावर माझ्या मनात आशा निर्माण झाली. मला वाटलं की, कसाबसा पोहत किनारा गाठू शकेन."

मग शिवमुरुगन यांनी किनाऱ्याकडे परतण्यासाठी पोहायला सुरुवात केली. मात्र समुद्राच्या लाटांचा त्यांना त्रास होत होता. ते कोणत्याही दिशेनं जरी पोहू लागले, तरी समुद्राच्या लाटा आणि वारा त्यांना दुसऱ्या दिशेला ढकलत होता.

तिथे पकडण्यासाठी लाकडाचा एखादा ओंडकासुद्धा नव्हता. लाटांच्या धक्क्यामुळे ते दूर ढकलले जात होते. त्यामुळे मग शिवमुरुगन यांनी पोहत पुढे जाण्याचा प्रयत्न करणं थांबवलं.

'माझी हिंमत संपली'

शिवमुरुगन म्हणाले, "मी पोहण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र मी कितीही पोहलो, तरी मला वाटत होतं की मी एकाच जागी अडकलो आहे. थंडीमुळे माझे पाय सुन्न झाले होते. सूर्यास्त झाला आणि अंधार पडू लागला. मग माझ्या शरीरातील सर्व ताकद आणि माझी हिंमत संपली."

"दक्षिण समुद्रात हरवलेला कोणीही वाचत नाही, असं का म्हणतात याची मला जाणीव झाली. आता माझ्याकडून वेदना सहन होत नव्हती. त्यामुळे मला आत्महत्या करायची इच्छा होत होती. तोपर्यंत गावातील लोकांनाही असंच वाटत होतं की मी जिवंत नसेन."

"पाण्यात बुडत असताना मला श्वास घेता येत नव्हता. मात्र मी पाण्याच्या वर येत राहिलो. मी भरपूर समुद्राचं पाणी प्यायलो होतो. आता मला वाटू लागलं होतं की मी नक्कीच बुडणार आहे. मात्र त्याचवेळी मला दूरवर एक प्रकाश दिसला," असं ते म्हणाले.

शिवमुरुगन त्यांचा मुलगा शिवरादेश याच्यासोबत
फोटो कॅप्शन, शिवमुरुगन त्यांचा मुलगा शिवरादेश याच्यासोबत

लेखिका पॉलिन म्हणाल्या की, शिवमुरुगन जिवंत वाचले हा एक चमत्कारच होता. इतर समुद्रांच्या तुलनेत दक्षिण समुद्र जास्त धोकादायक आहे.

तामिळनाडूचा दक्षिण समुद्र, रामनाथपुरममधील चेथुकराई आणि कीजकराईपासून कुमारिकरायपर्यंत पसरलेला आहे.

शिवमुरुगन यांना जेव्हा तो प्रकाश दिसला, तेव्हा त्यांना वाटलं की 'बोटीचा हेडलाईट' आहे.

शिवमुरुगन म्हणाले, "तो प्रकाश पाहिल्यावर, मी माझ्या शरीरातील सर्व शक्ती एकटवली आणि माझे हात हवेत हलवले. त्यांनी मला पाहिलं आणि बोट माझ्या दिशेनं वळवली. मीदेखील बोटीच्या दिशेनं पोहत गेलो. जवळपास 30 मिनिटं, मला समुद्रातून कोणी वाचवलं आहे किंवा ते काय म्हणत आहेत, हे मला समजलंच नाही."

"चहा आणि बिस्किटं घेतल्यानंतरच मी माझे डोळे उघडू शकलो. ती कूटंकुजी गावातील अरुलप्पन यांची बोट होती. त्यांच्या टीमनं मासे पकडण्यासाठी समुद्रात जाळं टाकलेलं होतं. ते गोळा करण्यासाठी ते आले होते."

समुद्र

किनाऱ्यावर पोहोचल्यावर शिवमुरुगन यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. शिवमुरुगन यांचा विवाह झालेला आहे आणि त्यांना एक 5 वर्षांचा मुलगा आहे.

"मी गेल्या महिनाभरापासून समुद्रात पाय ठेवलेला नाही. माझा मुलगा आणि माझ्या कुटुंबानं आता मला समुद्रात जाण्यास मनाई केली आहे. मला अजूनही शांत झोप लागत नाही. ही घटना घडल्यानंतर, माझा भाऊ कामासाठी परदेशात गेला आहे," असं शिवमुरुगन म्हणाले.

"मी अधूनमधून समुद्र किनाऱ्यावर उभा राहतो आणि समुद्राकडे पाहतो. त्या रात्री मी पाहिलेला समुद्र अजूनही मला आठवतो. माझ्या अंगावर जेलीफिश चढलेले होते, डोक्याभोवती समुद्री अळ्या फिरत होत्या. ते सर्व मला आठवतं. जोपर्यंत ती घटना, ते दृश्य मी विसरत नाही, तोपर्यंत मी समुद्रात पाय ठेवू शकत नाही," असंही त्यांनी नमूद केलं.

जर तुम्ही समुद्रात पडलात तर...

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

शिवमुरुगन यांच्यासारखाच प्रसंग कधीही, कोणावरही येऊ शकतो. अशावेळी धीरानं तो प्रसंग हाताळला पाहिजे.

पाण्यात पडल्यावर किंवा बुडण्याची स्थिती असताना काय केलं पाहिजे, यासंदर्भात ब्रिटनच्या रॉयल नॅशनल लाईफबोट इन्स्टिट्यूशनने एक सल्ला दिला आहे.

तो म्हणजे, "कोणत्याही पाण्यात तरंगत राहणं महत्त्वाचं असतं. पाण्यात असताना हळूहळू श्वास घेत राहावा. जर आवश्यक असेल तर तरंगत राहण्यासाठी तुम्ही तुमचे हात आणि पाय हळूहळू हलवू शकता. पाण्यात स्थिरपणे तरंगता यावं यासाठी तुम्ही हात आणि पाय पसरवा."

"जरी तुमचं संपूर्ण शरीर पाण्यावर तरंगत नसलं तरीदेखील तुम्ही डोकं मागच्या बाजूला झुकवून ठेवा आणि चेहरा आकाशाच्या दिशेनं ठेवून पाण्यावर तरंगत राहा."

(जर तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील, तर मदतीसाठी भारत सरकारच्या जीवन साथी हेल्पलाईनच्या 18002333330 या क्रमांकावर कॉल करा.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयदेखील 13 भाषांमध्ये 18005990019 ही हेल्पलाईन चालवत आहे.

08026995000 हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेसचा हेल्पलाईन क्रमांक आहे)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)