नागपूरचे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. पाखमोडेंचं निधन, तीन दिवसांपूर्वीच आला होता ECG रिपोर्ट नॉर्मल

फोटो स्रोत, Imran Qureshi
- Author, इम्रान कुरैशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
नागपूरचे न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं. रुग्णालयात जाण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.
केवळ 53 वर्षांच्या पाखमोडे यांच्या आकस्मिक निधनानंतर अनेक रुग्णांसह वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी दुःख व्यक्त केलं आहे.
त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे.
मृत्यूआधी डॉ. पाखमोडे यांनी तीन दिवस आधीच इसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम चाचणी केली होती. ही चाचणी सामान्य म्हणजे 'नॉर्मल' आली होती. मात्र, हृदयरोग तज्ज्ञांच्यामते फक्त इसीजी योग्य असणं हा याबाबतीत एकमेव निकष असू शकत नाही. (म्हणजेच सखोल तपासणी, विविध चाचण्या आवश्यक आहेत, केवळ इसीजीवर विसंबून राहाता येणार नाही.)
इसीजी ही एक सामान्य चाचणी आहे. यात हृदयाच्या इलेक्ट्रिकल हालचालींचं रेकॉर्गिंग असतं. यावरुन हार्ट ऱ्हिदम आणि इलेक्ट्रिक सिग्नलबाबत तपासणी केली जाते.
या चाचणीत इलेक्ट्रोड म्हणून एक सेन्सर छातीवर आणि हातावर लावले जातात. त्यावरुन हृदयाच्या धडधडण्यामुळ तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक सिग्नलची माहिती मिळते.
'इसीजी एकमेव मार्ग नाही'
नागपूरच्या न्युरॉन रुग्णालयात डॉ. अनिल जवाहरानी यांनी डॉ. पाखमोडे यांची तपासणी केली होती. डॉ. जवाहरानी हृदयरोगतज्ज्ञ आहेत. डॉ. पाखमोडे त्यांच्याकडून तपासणी करुन घेत असत.
पाखमोडे यांच्या मृत्यूआधी आदल्या रात्रीच डॉ. फुलवानी यांनी त्यांच्याबरोबर जेवण केलं होतं. त्यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं, "हृदयरोगाचा अंदाज येण्यासाठी इसीजी हा काही एकमेव मार्ग नाही. अगदी 10 टक्केही नाही."

फोटो स्रोत, Imran Qureshi
"इसीजी हृदयाशी संबंधित आजाराच्या सुरुवातीच्या तपासणीचा एक आवश्यक भाग आहे. यात हृदयाची मुलभूत अनॉटॉमी आणि इलेक्ट्रिक कंडक्शन सिस्टिमचं अवलोकन केलं जातं."
"एखाद्या डॉक्टरांना रुग्णामध्ये हृदयरोगाची शंका आली तर ते इसीजी चाचणी करण्याचा सल्ला देतात. तुमच्या हृदयात काही समस्या आहे की नाही याची इसीजी चाचणी एक नॉर्मल रेंज दाखवत असते."
डॉ. महेश फुलवानी हे नागपूरच्या श्रीकृष्ण हृदयालय रुग्णालयात संचालक आणि हृदयरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ते म्हणाले, "इसीजी नॉर्मल आला म्हणजे तो किती तास, महिने किंवा वर्षं जिवंत राहिल याची काही गॅरंटी मिळत नाही. हृदय हा एक गतिशिल अवयव आहे. त्याच्या आत अनेक हालचाली होत असतात. त्यांचं आकलन करण्याचा इसीजी हा एक मार्ग आहे."
डॉ. पाखमोडे यांच्याबाबतीत असं का झालं?
मग आता डॉ. पाखमोडे यांच्याबाबतीत हे काय झालं आणि का झालं? हे प्रश्न उरतातच. या प्रश्नांची उत्तरं बहुतांशप्रमाणात त्यांचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर जवाहरानी यांनी दिले आहेत.
डॉ. जवाहरानी सांगतात, "ते अत्यंत कष्टाळू होते. सकाळी पाच वाजता उठायचे. जिममध्ये सायकल आणि ट्रेडमिलवर चालायचे. सकाळी साधारण सहाच्या आसपास ते रुग्णालयात राऊंडला सुरुवात करायचे."
"सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3 पर्यंत ते ऑपरेशन थिएटरमध्ये असत. लंच नंतर ते संध्याकाळी 5 वाजता ओपीडीमध्ये येत."
ते सांगतात, "ओपीडीमध्ये डॉ. पाखमोडे रात्री 11 वाजेपर्यंत 150 किंवा त्याहून अधिक रुग्णांची तपासणी करत. रात्री 11 ते 12 च्या मध्ये ते जेवत आणि मग झोपत. गेल्या दोन दशकात व्यावसायिक जीवनामध्ये त्यांची अशीच जीवनशैली होती."
"रुग्णांसाठी ते देवासारखे होते. आणि हिच गोष्ट कोणत्याही व्यक्तीवर सतत अधिक चांगलं काही करुन दाखवण्याचा ताण आणण्यासाठी पुरेशी आहे. अशाप्रकारचा दबाव ताण आणतो."

फोटो स्रोत, Imran Qureshi
डॉ. फुलवानी यांनी पाखमोडे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक वेगळा पैलू सांगितला.
ते म्हणाले, "रोजचा तणाव काळानुसार वाढत जातो. ते इतके प्रेमळ होते की तपासणीसाठी रुग्णांना पाठवणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना कधीच नकार देत नसत. ते सगळं काम स्वतःवर घ्याचे. ते कमी वेळ झोपायचे आणि जास्त काम करायचे."
"वास्तवात ते अतिरिक्त कामाच्या ओझ्याखाली दबले हेले होते. त्यांनी कामाला वाहून घेतलं होतं. त्यांचं निधन व्हायला नको होतं. तीन दिवस आधीच छातीत दुखत होतं किंवा आपण इसीजी काढलाय असं त्यांनी मला कधीच सांगितलं नाही."
हृदयरोगाचं मूल्यांकन कसं केलं जातं?
डॉ. पाखमोडे यांनी आपल्या इसीजी रिपोर्टबाबत डॉ. जवाहरानी यांच्याशी चर्चा केली नव्हती. मात्र त्यांनी एका रुग्णाबाबतीत त्यांच्याशी चर्चा केली होती.
खंत व्यक्त करत डॉ. जवाहरानी म्हणतात, "खरंच... त्यांनी त्यांच्या रिपोर्टबद्दल सांगितलं असतं तर हे घडलं नसतं."
डॉ. पाखमोडे यांच्या पत्नी भूलतज्ज्ञ आहेत. सकाळी सव्वापाचच्या सुमारास त्यांचा फोन आला. पाखमोडे डॉक्टरांच्या छातीत दुखतंय आणि ते अंथरुणावर पडले आहेत, असं त्यांनी सांगितलं. पाखमोडेंना शुद्ध यावी यासाठी घरी आणि रुग्णालयात प्रयत्न झाले पण त्यांना यश आलं नाही.

फोटो स्रोत, Imran Qureshi
डॉ. जवाहरानी म्हणाले, "इसीजीद्वारे हृदयात हृदयरोगाच्या झटक्यासारखी गंभीर समस्या तर नाही ना याची माहिती मिळते. 65 ते 70 % रुग्णांमध्ये त्याची लक्षणं दिसतात. मात्र हृदयरोगाचा झटका अतिशय किरकोळ स्वरुपाचा असेल तर कदाचित ते इसीजीत दिसत नाही."
"अशावेळेस साधारण तासाभराने आणखी एकदा इसीजी करण्याचा मार्ग असतो. मात्र त्याबरोबरच रक्ताची चाचणी आणि इमेजिंगही केलं पाहिजे."
दोन्ही डॉक्टर सांगतात की, हृदयरोगाचा झटका येणाऱ्या रुग्णांपैकी किमान 65 टक्के लोकांत त्याचे संकेत मिळत असतात.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. फुलवानी सांगतात, "यात अस्वस्थ वाटणं, पोटात गॅस होणं, ढेकर येणं, पाठ आणि गळ्यात दुखणं, थकवा, पाय लटपटणं, श्वास वाढणं अशी लक्षणं हृदयरोगाचा झटका येण्याआधी सात दिवस दिसू शकतात."
अशा रुग्णांची तपासणी करतात डॉक्टर त्यांचं वय, लैंगिक ओळख, आरोग्याचा कौटुंबिक इतिहास, रक्तदाब यासारख्या घटकांचीही माहिती घेतात.
डॉक्टर फुलवानी सांगतात, "जर छातीत, पाठीत किंवा खांद्यात दुखत असेल. या वेदना दोन दिवसांपासून असतील तर ट्रोपोनिन सारख्या कार्डिअक एन्झाइमची तपासणी केली जाऊ शकते. जर रुग्णाला काही दिवस आधीपासूनच वेदना होत असतील तर ट्रेडमिल टेस्ट (टीएमटी) केली जाते."
शेवटी सीटी अँजिओग्राफी किंवा सीटी कोरोनरी अँजिओग्राफी होते. यासर्व तपासण्यांतून काही आजार तर नाही ना याचा तपास केला जातो.
आपल्या आरोग्याची माहिती असली पाहिजे असंही डॉ. फुलवानी सांगतात. म्हणजेच रुग्णाच्या शरीरातील कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण, रक्तातील साखरेची पातळी, पोटाचा घेर (पोटावरचा मेद) याची माहिती असली पाहिजे.
पोटावरचा मेद कमी करण्यासाठी हृदयरोगतज्ज्ञ योग्य आहार आणि व्यायाम करण्याचा सल्ला देतात.
डॉ. फुलवानी सांगतात, "जाडी कमी असावी, कर्बोदकं कमी घ्यावीत. आवश्य प्रथिनं घ्यावीत. दररोज 50 मिनिटं व्यायाम करावा. एकदिवसआड जीमचा व्यायाम, पोहणं, स्नायू बळकट होतील असे व्यायाम करणं. ताण कमी करणं, हे हृदयरोगापासून वाचण्यासाठी आवश्यक आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











