कॅन्सरच्या या 10 लक्षणांकडे कदाचित तुमचं दुर्लक्ष होऊ शकतं

फोटो स्रोत, Getty Images
बहुतेक लोक जेव्हा कॅन्सर किंवा कर्करोग हा शब्द ऐकतात तेव्हा तो त्यांच्यासाठी प्राणघातक अशा दुर्धर रोगाशी संबंधित असतो.
परंतु 1970 च्या दशकापासून, आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या तिप्पट झाली आहे, सर्वांत महत्त्वाचं म्हणजे लवकर निदान झाल्यामूळं हे शक्य झालं आहे.
कॅन्सर जास्त पसरण्याआधीच निदान झाल्यास रुग्णासाठी अनुकूल परिणामांसह उपचार शक्य असतात.
समस्या अशी आहे की अनेक वेळा, आपल्याला डॉक्टरांकडे जाता येत नाहीत किंवा आपण डॉक्टरांकडे जाण्याला महत्त्व देत नाहीत. आपण काही लक्षणांकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे लवकर निदान होत नाही.
कॅन्सर रिसर्च यूके या संस्थेनं केलेल्या अभ्यासानुसार, अर्ध्याहून अधिक ब्रिटनमध्ये कर्करोगाची उपस्थिती दर्शविणारी लक्षणं आढळली होती, पण केवळ 2% लोकांना असं वाटलं की त्यांना या आजाराचा त्रास होऊ शकतो आणि एक तृतीयांश लोकांनी धोक्याच्या पूर्व सूचनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि डॉक्टरकडे गेले नाहीत.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधक आणि या संशोधनाच्या प्रमुख लेखिका कॅटरिना व्हिटेकर म्हणाल्या: "लोकांना वाटतं की आपण लोकांना 'हायपोकॉन्ड्रियाक' ( एखादा गंभीर आजार असल्याची अकारण ,अवास्तव भीती वाटणं) होण्यासाठी प्रोत्साहित करू नये, परंतु आम्हाला अशा लोकांची भीती आहे, ज्यांना डॉक्टरकडे जाण्यास लाज वाटते. कारण त्यांचा असा विश्वास आहे की, ते तुमचा वेळ वाया घालवतील आणि आरोग्य यंत्रणेची संसाधनं अनावश्यक वाया घालवतील. "
त्या म्हणाल्या, "आम्हाला हा संदेश द्यायचा आहे की जर तुमच्यात लक्षणं दिसत असतील, तर तो तुमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नका, तुम्ही डॉक्टरांकडे जावं आणि मदत घ्यावी "
बीबीसीनं कॅन्सरची 10 सामान्य लक्षणं सांगितली आहेत, ज्याकडे अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार तुम्ही दुर्लक्ष करू नये.

फोटो स्रोत, Getty Images
1. अनपेक्षितपणे वजन कमी होणं
कर्करोगानं ग्रस्त बहुतेक रुग्णांचं आजाराच्या एखाद्या पातळीवर वजन कमी होतं.
जेव्हा कोणतंही स्पष्ट कारण नसताना आपल वजन कमी होतं, तेव्हा त्याला अनपेक्षितपणे वजन कमी होणं म्हणतात.
5 किलो किंवा त्याहून अधिक वजन अचानक कमी होणं हे कर्करोगाचं पहिलं लक्षण असू शकतं.
स्वादुपिंड, पोट, अन्ननलिका किंवा फुफ्फुसाच्या कर्करोगात हे वारंवार होतं.

फोटो स्रोत, Getty Images
2. ताप
कर्करोग असलेल्या रूग्णांमध्ये ताप खूप सामान्य आहे, कॅन्सर पसरत असताना तापाची वारंवारता वाढते .
कर्करोग असलेल्या प्रत्येकाला कधीतरी ताप येतो, विशेषतः जर कर्करोग किंवा त्याच्या उपचारांचा रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होत असेल तेव्हा.
सामान्यपणे, वारंवार ताप हे ल्युकेमिया किंवा लिम्फोमा सारख्या कर्करोगाचं प्रारंभिक लक्षण असू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
3. थकवा येणं
अत्यंत थकवा येणं, विश्रांती घेऊनही तो न जाणं हे कर्करोग वाढत असल्याचं एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं.
पण, काही कर्करोगांमध्ये, जसं की ल्युकेमिया ज्याच्या सुरुवातीलाच खूप थकवा येऊ शकतो.
कोलन किंवा पोटाच्या कर्करोगामुळे रक्त कमी होऊ शकतं. त्यामुळेही थकवा येऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
4. त्वचेवर होणारे बदल
त्वचेच्या कर्करोगाबरोबरच, इतर काही कर्करोगांमुळे त्वचेत बदल होऊ शकतात.
याची चिन्ह आणि लक्षण पुढील प्रमाणं -
- त्वचा गडद होणं (हायपरपिग्मेंटेशन)
- त्वचा आणि डोळे पिवळे होणं (कावीळ)
- त्वचेचा लालसरपणा (एरिथेमा)
- खाज सुटणे
- केसांची जास्त वाढ
5. मलमूत्र विसर्जनात होणारे बदल
बद्धकोष्ठता, अतिसार किंवा तुमच्या स्टूलचा आकार बराच काळ बदलणं हे कोलन कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
दुसरीकडे, लघवी करताना वेदना होणं, लघवीमध्ये रक्त येणं किंवा मूत्राशयाच्या कार्यात बदल होणं (जसं की लघवी वारंवार किंवा कमी होणं ) मूत्राशय किंवा प्रोस्टेट कर्करोगाशी संबंधित असू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
6. बऱ्या न होणाऱ्या जखमा
बर्याचं लोकांना माहिती आहे की तीळ वाढणं, दुखापत होणं किंवा रक्त येणं ही त्वचेच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात, परंतु आपण लहान जखमांकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. ज्या चार आठवड्यांपेक्षा जास्त काळ बऱ्या होत नाहीत.
घसा जर बरा होत नसेल तर तो तोंडाच्या कर्करोगामुळे असू शकतो.
तुमच्या तोंडातील कोणतेही बदल दीर्घकाळ राहिले तर डॉक्टर किंवा दंतवैद्याकडे ताबडतोब तपासलं पाहिजे.
पुरुषाचं जननेंद्रिय किंवा योनिमार्गावरील फोड हे संक्रमण किंवा सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोगाची चिन्हं असू शकतात आणि त्यांची डाॅक्टरकडे जाऊन तपासणी केली पाहिजे.
7. रक्तस्त्राव
कर्करोगाच्या सुरुवातीच्या किंवा प्रगत अवस्थेत असामान्य रक्तस्त्राव होऊ शकतो.
खोकल्यामुळे रक्त येणं हे फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षण असू शकतं.
दुसरीकडे, जर स्टूलमध्ये रक्त दिसलं (ज्याचा रंग खूप गडद असू शकतो) तर ते कोलन कॅन्सर किंवा रेक्टल कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
एंडोमेट्रियम (गर्भाशयाचं अस्तर) च्या गर्भाशयाच्या कर्करोगामुळे योनीतून रक्तस्त्राव होऊ शकतो.
तसंच, लघवीमध्ये रक्त येणं हे मूत्राशय किंवा किडनीच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं.
स्तनातून रक्ताचा स्त्राव येणं हे स्तनाच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
8. शरीराच्या कोणत्याही भागात कडकपणा किंवा गाठ
अनेक कर्करोग हे स्पर्शाने जाणवू शकतात.
हे कर्करोग प्रामुख्यानं स्तन, अंडकोष, लिम्फ नोड्स ( लसीका ग्रंथी) आणि शरीराच्या मऊ उतींमध्ये होतात.
गाठ किंवा कडकपणा हे कर्करोग असल्याचं लवकर किंवा उशिरा दिसणार लक्षण असू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
9. गिळण्यात अडचण
सतत अपचन किंवा अन्न गिळताना अडचण येणं ही अन्ननलिका, पोट किंवा घशाच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात.
या यादीतील बहुतेक लक्षणं ही अनेकदा कर्करोगाव्यतिरिक्त इतर कारणांमुळेही होतात.
10. सततचा खोकला किंवा घशात होणारी खवखव
सतत खोकला येणं हे फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षण असू शकतं.
तुम्हाला तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ त्रास होत असल्यास तुम्ही डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घ्यावा.
तसंच, स्वरयंत्र कर्कश होणं थायरॉईड ग्रंथीच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








