लक्षणं ओळखून हार्ट अटॅक येण्याआधीच कसा रोखायचा? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' उपाय

फोटो स्रोत, Getty Images
- Author, आमिर अहमद
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्विस
आपलं शरीर व्यवस्थितरित्या काम करावं यासाठी हृदय निरोगी असणं फार गरजेचं असतं.
हृदय रक्ताभिसरण करतं. त्याने शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक घटक पोहोचतात.
जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितल्याप्रमाणे, जगात सगळ्यात जास्त मृत्यू हे हृदयविकारानं होतात. दरवर्षी जवळपास 1 कोटी 80 लाख लोकांना हृदयविकारामुळे जीव गमवावा लागतो.
पाच पैकी चार मृत्यू हे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकमुळे होतात. पण आपण आपल्या हृदयाची रोज थोडी काळजी घेऊ शकतो, असं हृदयरोग तज्ज्ञ सांगतात.
एका निरोगी प्रौढ व्यक्तीचे हृदयाचे ठोके प्रती मिनिट 60 ते 100 असायला हवेत, असं डॉक्टर सांगतात.
डॉ. इव्हान लेविन या अमेरिकेत हृदयरोगतज्ज्ञ म्हणून काम करतात. त्या म्हणतात, "सुरूवातीपासून आपण संतुलित आहार घेतला, नियमित व्यायाम केला आणि व्यसनांपासून लांब राहिलो तर हृदयाचं नुकसान होणार नाही."
पण असं निरोगी हृदय असेल तर हार्ट अटॅकचा धोका पूर्णपणे टळतो की फक्त हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी होते हे समजून घ्यायला हवं.
हार्ट अटॅक म्हणजे काय?
तुम्हाला हृदयविकाराचा झटका येणार आहे, असं वाटल्यास सगळ्यात आधी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
रक्ताचा पुरवठा हृदयापर्यंत होणं थांबतं तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो.
रक्तपुरवठा थांबल्यानं हृदयांच्या स्नायूंना आणि पेशींना दुखापत होऊ शकते किंवा त्यांचं काम बंद होऊ शकतं.
हृदयाच्या मोठ्या भागावर त्याचा परिणाम झाला तर हृदयाची धडधड थांबते. त्यालाच हार्ट अटॅक म्हणजे 'हृदयविकाराचा झटका' असं म्हटलं जातं. त्यामुळे माणसाचा मृत्यूही होऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
हार्ट अटॅकमुळे ज्यांचा मृत्यू होतो त्यापैकी सुमारे अर्ध्या लोकांमध्ये झटका येणार असल्याची लक्षणं तीन ते चार तासाआधीच सुरू झालेली असतात.
त्यामुळे हार्ट अटॅकची लक्षणं कोणती हे समजून घेऊन ती जाणवल्यावर लगेचच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे.
कोरोनरी हृदय विकार हे हार्ट अटॅकमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं. हृदयाच्या धमन्यांमध्ये एक तेलकट, चिकट पदार्थ जमा होतो. त्याला प्लाक असं म्हणतात.
या प्लाकमुळे धमन्या आकुंचन पावतात आणि रक्त वाहण्यात अडथळा निर्माण होऊ लागतो.
दरवर्षी अमेरिकेत जवळपास 8 लाख 5 हजार लोकांना हृदयविकाराचा झटका येतो. त्यातल्या 6 लाख 5 हजार लोकांना पहिल्यांदाच हा त्रास झालेला असते. तर उरलेल्या 2 लाख लोकांनी आधीही हार्ट अटॅकचा सामना केलेला असतो.
युएस सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिवेन्शनने दिलेल्या माहितीनुसार, या आकडेवारीनुसार दर 40 सेकंदाला एका व्यक्तीला हार्ट अटॅक येतो.
हार्ट अटॅक येतोय हे कसं ओळखायचं?
हृदयविकाराचा झटका आला की, छातीपासून हातापर्यंत वेदना जाणवू लागतात.
तसं पहायला गेलं तर हार्ट अटॅक येत असताना आणखीही अनेक लक्षणं दिसतात. पण छातीत वेदना होणं हे बहुतेक सगळ्यांमध्ये दिसणारं लक्षण आहे.
ही वेदना तीव्र नसते. पण हृदयावर दबाव आल्यासारखं किंवा कुणीतरी पकडून ठेवल्यासारखं जाणवतं.
काही महिलांना हृदयविकाराचा झटका येत असताना छातीसोबतच मानेभोवती आणि दोन्ही हातांमध्येही वेदना जाणवू शकते.
कॅलिफोर्नियामध्ये काम करणाऱ्या हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एलिन बारसेघियन म्हणतात की हार्ट अटॅकची सुरुवात होत असताना अनेकदा अजीर्ण झाल्यासारखं वाटतं. पण त्यातला फरत असा की हार्ट अटॅकमध्ये डावा हात, जबडा, पाठ आणि पोटात वेदनाही सुरू होऊ शकतात.
याशिवाय, माणसाला चक्कर येणं, गरगरणं, घामाघूम होणं, श्वास घ्यायला त्रास होणं अशीही लक्षणं दिसतात.

फोटो स्रोत, Getty Images
काहीवेळा हार्ट अटॅक अचानकही येऊ शकतो. पण अनेकदा त्याची लक्षणं अनेक तासांपूर्वी किंवा दिवसांपूर्वीही दिसू लागतात.
एखाद्या व्यक्तीच्या छातीत दुखत असेल आणि आराम केल्यावरही बरं वाटत नसेल तर तो हृदयविकाराचा झटका येणार असल्याचा इशारा असू शकतो.
डॉ. बारसेघियन म्हणतात, "तीन तासाच्या आत रक्त प्रवाह व्यवस्थित झाला नाही तर हृदयाचे स्नायू मरू लागतात. त्यामुळे ॲम्बुलन्स येईपर्यंत एखादी ॲस्पिरिन गोळी खावी असा सल्ला मी देते."
पण हृदयविकाराचा झटका जाणवत असेल तर कसलीही वाट न पाहता तातडीने डॉक्टरांकडे जावं यावर सगळे तज्ज्ञ भर देतात.
डॉ. इव्हान लेविन म्हणतात की हृदयविकाराच्या धोक्याबद्दल आपल्याला माहिती असायला हवी.
"आपलं वय, वजन, धुम्रपानाची किंवा दारू पिण्याची सवय यासोबतच घरातल्या लोकांचा आरोग्य इतिहास यावरून हृदय विकार येऊ शकेल की नाही हे ठरतं. त्यामुळे आपल्याला त्या बद्दल माहिती असायला हवी."
हे सगळे मापदंड माहीत असल्यावर तुम्हाला छातीत वेदना होऊ लागल्या तर उपचारासाठी डॉक्टरांकडे लगेचच गेलं पाहिजे, असं त्या म्हणतात.
ह्रदयविकाराचा झटका कसा रोखायचा?
निरोगी जीवनशैलीच्या आधारे हृदयविकाराचा झटका टाळता येऊ शकतो.
हृदयविकाराचा धोका कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. संतुलित आहार आणि व्यायामाद्वारे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करता येऊ शकते.
कोलेस्ट्रॉलची हा एखाद्या व्यक्तीच्या रक्तात आढळणारा एक पदार्थ आहे. तो निरोगी पेशी तयार करतो. पण काही कोलेस्ट्रॉलचीच्या वाढीमुळं हृदयरोगाचा धोका वाढतो.
हृदयरोगतज्ज्ञ यावर भर देतात की, हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी निरोगी आणि संतुलित जीवनशैली खूप महत्वाची ठरते.
निरोगी राहण्यासाठी कमी फॅट आणि जास्त फायबर असलेले पदार्थ खावेत असा सल्ला डॉक्टर देतात.
तसेच, दररोज मीठाचे सेवन 6 ग्रॅमपेक्षा कमी असावे. जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो, त्यामुळं हा सल्ला दिला जातो.
अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड आणि जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट पदार्थ टाळावे. त्याचं कारण म्हणजे, ते एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलचीचे प्रमाण वाढवू शकतात. अशा पदार्थांमध्ये मीट पाय, केक, बिस्कीट, सॉसेज, बटर आणि पाम तेलापासून बनवलेले पदार्थ यांचा समावेश होतो.
संतुलित आहारात अनसॅच्युरेटेड फॅटचा समावेश असावा, कारण त्यामुळं गुड कोलेस्ट्रॉलचीचं प्रमाण वाढतं. त्यामुळं हृदयाच्या धमन्या निरोगी राहतात आणि त्यामध्ये रक्तभिसरण चांगलं होतं.
मासे, आवाकाडो, नट्स आणि वनस्पती तेल यांचा समावेश त्यासाठी आहारात करावा. त्यामुळं निरोगी राहण्यास मदत होई शकते, असंही तज्ज्ञ सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. एलिन बारसेघियन यांच्या मते, "भूमध्यसागर परिसरातील हा आहार सर्वोत्तम समजला जातो. त्याचं कारण म्हणजे, त्यामुळं हृदयरोग कमी करण्यास मदत होते. ते वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झालं आहे."
संतुलित आहार आणि दररोज व्यायाम करून, एखादी व्यक्ती हृदय निरोगी ठेवू शकते. सोबतच, एखाद्या व्यक्तीचे वजन नियंत्रणात असेल तर त्याला रक्तदाबासारख्या समस्यांचा सामना कमी करावा लागतो.
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. इव्हान म्हणतात की, एखाद्या व्यक्तीने आठवड्यातून किमान पाच दिवस आणि दररोज 30 मिनिटे व्यायाम करावा.
तसंच निरोगी राहायचं असेल तर धूम्रपान करू नका, असंही ते सांगतात.
अमेरिकन हार्ट असोसिएशनने 24,927 लोकांवर एक अभ्यास केला. त्यांच्या अभ्यासात असं आढळून आले आहे, ई-सिगारेट आणि नियमित सिगारेट दोन्ही वापरतात त्यांच्या हृदयाला नियमित सिगारेट ओढणाऱ्यांइतकाच धोका असतो.
फक्त ई-सिगारेट वापरणाऱ्यांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण 30 ते 60 टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले आहे.
ज्यांना आधीच हृदयविकाराचा झटका आला आहे, त्यापैकी पाचपैकी एकाला पुढच्या पाच वर्षांत पुन्हा रुग्णालयात दाखल केलं जातं.
इम्पिरियल कॉलेज लंडन आणि स्वीडनमधील लुंड विद्यापीठातील संशोधकांच्या मते, हृदयविकाराच्या झटक्यानंतर स्टॅटिन्स आणि इझेटिमिब नावाची कोलेस्ट्रॉलची कमी करणारी औषधे घेतल्यास पुन्हा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होऊ शकतो.
"आमच्याकडे गेल्या अनेक दशकांपासूनचा डेटा आहे की तुमचे LDL कोलेस्ट्रॉल जितके कमी असेल तितके हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांचा धोका कमी होईल," असं डॉ. एलिन बारसेघियन म्हणतात.
तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढत आहे?
तरुणांची बदलती जीवनशैली हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमध्ये मोठी भूमिका बजावत असल्याची चिंता हृदयरोगतज्ज्ञांनी व्यक्त केलीय.
सामान्यतः वाढत्या वयानुसार हार्ट अटॅकचा धोका वाढत जातो. मात्र, यूएस नॅशनल सेंटर फॉर हेल्थ स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार मध्यम वयोगटातील लोकांमध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलं आहे.
2019 मध्ये 18 ते 44 वर्ष वयोगटातील जवळपास 0.3 टक्के लोकांना हार्ट अटॅक आल्याचं समोर आलं होतं. तर, 2023 पर्यंत हे प्रमाण वाढून 0.5 टक्क्यांवर पोहोचलं.
डॉ. इव्हान लेविन यांच्यानुसार तरुणांच्या जीवनशैलीतील बदल यामागचं प्रमुख कारण आहे. उदा. अधिक प्रमाणात प्रोसेस्ड फूड खाणं तसेच आरोग्याकडे दुर्लक्ष करणं आदि. सवयी अशाप्रकारच्या विकारांना आमंत्रण देतात, अशी चिंता आरोग्यतज्ज्ञ व्यक्त करतात.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. इव्हान म्हणतात, "आपल्याला अधिक व्यायाम करण्याची गरज आहे. याचा अर्थ दररोज जिमला जाणे असा नाहीयो. तर, दररोज थोडाफार व्यायाम किंवा पायी चालणे निरोगी आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे."
कोव्हिडनंतर घरून काम करणाऱ्यांची जीवनशैली आणखी बिघडली असल्याची चिंताही डॉ. लेविन यांनी व्यक्त केली.
धूम्रपानाचाही यात वाटा आहे, यामुळे धमन्यांमध्ये चरबी साचते. मात्र, इ-ई-सिगारेटचा तरुणांवर काय परिणाम होतो, हे अद्याप पूर्णपणे समोर आलेलं नाही, अशी चिंता डॉ. लेविन यांसारखे ह्रदयरोग तज्ज्ञ व्यक्त करतात.
डॉ. एलिन बारसेघियन म्हणतात, "फॅमिलियल हायपरलिपिडीमिया सारखी आनुवंशिक घटकदेखील तरुणांमध्ये लवकर हार्ट अटॅक येण्यास जबाबदार ठरतात. तसेच ताण-तणाव आणि अपुरी झोप हीदेखील यामागची प्रमुख कारणं आहेत."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











